Android app on Google Play

 

वाचा आणि विचार करा..

 

चार यंगस्टर्सची किंवा पुरुषांची टाळकी एकत्र जमली कि, मुलींबाबत चर्चा होणार नाही असं फार क्वचितच घडतं. परवाचीच गोष्ट आम्हा मित्रांची फोनाफोनी करून भेट ठरली आणि इथलं तिथलं बरळून झाल्यावर शेवटी ओघानेच पूर्वपरंपार चालत आलेल्या वादाकडे आम्ही शिरलो तो म्हणजे "स्त्री श्रेष्ठ कि पुरुष..??"

जवळपास सगळे जण तावातावाने आम्ही पुरुषच कसे श्रेष्ठ हे ठासून सांगू लागले.

"ए..चला असलं काही नाही हा, आज मुली पण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, त्या काही कमी नाहीत कशात..." असं म्हणत त्यातल्या एका समंजस मित्राने पुरुषी अहंकाराने भरलेल्या त्या वातावरणात राणी लक्ष्मिबाई, सावित्रीबाई फुलेंपासून ते अगदी आता बोर्डात येणाऱ्या मुलींची उदाहरणं देत आपल्या मताचा घोडा दामटवला. मी हे सर्व शांतपणे ऐकून घेत होतो. शेवटी संदीप म्हणाला- "तू काय सुपारी घेतलीयेस का तोंडात, जे तुला बोलता येत नाहीये...???"

मी हसून पाहिलं त्याच्याकडे आणि म्हणालो- " कदाचित माझी या बाबतीतली मतं तुमचा 'male ego' हर्ट करतील पण आता विचारलंस म्हणून सांगतो."

सगळेजण हा आता काय वेगळं सांगणार आहे अशा नजरेने माझ्याकडे बघू लागले.

त्या नजरांकडे एकदा माझी हसरी नजर फिरवत मी पुढे म्हणालो- "निसर्गाने पुरुषांना खूप शारीरिक सवलती दिल्या आहेत. जसं कि, आपल्याला ना सकाळी उठून घरची कामं उरकावी लागतात..ना घरच्या सगळ्यांच्या आवडी-निवडीचा विचार करत त्यांच्या आवाडीचे ब्रेकफास्ट बनवत बसावं लागतं..ना आपल्याला ज्या घरात लहानाचे मोठे झालो ते घर सोडून, ते कुटुंब सोडून लग्न करून दुसऱ्याच एका अनोळखी कुटुंबात जावं लागतं ...ना कि त्या अनोळखी घरातल्या अनोळखी माणसांचे स्वभाव समजून घेत त्यांच्यासोबत जगावं लागतं..सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ना महिन्या महिन्याला येणाऱ्या मासिक पाळ्यांचा (Menstruation Period) चा सामना करत दिनचर्या सांभाळावी लागते..ना नऊ महिने पोटात एक गर्भ सांभाळून त्याला जन्म देतानाच्या होणाऱ्या तीव्र वेदना झेलाव्या लागतात...मांसपेशिंच्या ताकदीच्या तुलनेत महिला पुरुषांच्या बाबतीत कदाचित कमजोर ठरू शकतील पण सहनशीलता, त्याग आणि जगण्याची लढाऊ वृत्ती या बाबतीत त्या सर्वच प्रकारे पुरुषांशी वरचढ ठरतात, श्रेष्ठ ठरतात आणि म्हणून स्त्रियांचा मला विलक्षण आदर वाटतो, अभिमान वाटतो.."

मगाशी कंटाळवाण्या नजरेने बघणाऱ्या माझ्या मित्रांच्या डोळ्यात आता एक चमक दिसत होती. "आम्ही इतका विचार कधी केलाच नव्हता यार..बरोबर आहे तुझं....." असं म्हणत त्यांनी मला शाबासकीची पावती देत आपलं मत परिवर्तन करून घेतलं.

मित्रांनो हा प्रसंग सांगण्याच्या उद्देश हाच कि, स्त्री मग ती कोणतीही असो, घरातली किंवा बाहेरची, जातीतली किंवा परजातीतली तिच्याकडे विकृत नजरेने बघताना एकदा आपल्यातील तिच्यासमोर असणार्या त्रुटी आधी तपासून पहा. त्यांचा आदर करा आणि त्यांच्याकडूनही आदर मिळवा.

मी व्यक्तीशः आणि आमची प्रबोधन टीम या 'स्त्री शक्तीला' मनापासून वंदन करतो..!! त्यापुढे नतमस्तक होतो..!!

लेखं - गौरव गायकवाड (मुंबई)