सिलिंडर व ग्राहकांचे हक्क !!
स्वयंपाकासाठीचा गॅस ही जीवनावश्यक वस्तू बनली आहे. गॅसची टाकी घेण्यासाठी वितरण केंद्रावर मोठ्या रांगा दिसून येतात, हे याचेच द्योतक आहे. चूल, शेगडी आणि रॉकेलचा स्टोव्ह ही स्वयंपाकाची साधने अनेक वर्षांपूर्वी कालबाह्य झाली आहेत. हल्ली ग्रामीण भागातही अनेकांच्या घरी गॅस पाहायला मिळतो. निर्धूर, पेटवायला सोपा आणि झटपट स्वयंपाक अशी वैशिष्ट्ये असणाऱ्या कुकिंग गॅसला सरकारने अनुदान देऊन त्याचे योग्य प्रकारे वितरण व्हावे म्हणून विशेष यंत्रणा उभी केली आहे. असे असूनही सर्वसामान्यांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळतेच असे नाही. घरात येणारे सिलिंडर योग्य वजनाचे नसल्याचीही अनेक उदाहरणे सापडतात. असे होत असेल तर नागरिकांनी त्याचा विरोध करणे गरजेचे आहे. नागरिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सरकारने त्यांना कायद्याचे संरक्षणही दिले आहे; पण वितरकाकडे तक्रार केल्यास बऱ्याचदा तो तक्रार करणाऱ्या ग्राहकांबद्दल मनात अढी ठेवून त्यांना त्रास देण्यास सुरवात करतो. अशा वेळी कायद्याची मदत घेऊन त्याच्यावर कारवाई करता येते, हे ग्राहकांनी लक्षात घ्यावे.
सिलिंडरमध्ये ठरवून दिलेल्या वजनापेक्षा कमी गॅस असेल, तर वजन- माप अधिनियम आणि भादंविच्या कलम 415 आणि 420 अन्वये संबंधित कंपनीविरुद्ध कोर्टात खटला दाखल करता येतो आणि आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांना कलम 417 अन्वये एक वर्ष कैदेची शिक्षा होऊ शकते. सिलिंडर देण्यास अनावश्यक उशीर किंवा टाळाटाळ होत असेल तर ग्राहकाला वितरक बदलता येतो. सिलिंडरचे सील व्यवस्थित नसल्यास ग्राहकाला ते परत करून दुसरे सिंलिडर घेण्याचा हक्क असतो आणि त्याविरुद्ध ग्राहक कायदेशीर कारवाईही करू शकतो. परवाना असूनही गॅस शेगडी दुरुस्त करता न येणे हा गुन्हा आहे.
सिलिंडरमध्ये किरकोळ त्रुटी असेल तरी तो वापरण्यायोग्य नसून, त्यात गॅस भरणे चुकीचे आहे. एखादा वितरक असा सिलिंडर दुरुस्त करून वापरत असेल तर त्याला शिक्षा होऊ शकते. गॅस सिलिंडरमुळे एखादा अपघात झाल्यास त्याची माहिती 24 तासांच्या आत मुख्य नियंत्रकाला देणे बंधनकारक आहे. शिवाय या घटनेबद्दल जवळच्या पोलिस ठाण्याला सूचित करावे. या अपघातात कोणाचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीला ओळखणारा एक तरी साक्षीदार हवा. अशा वेळी ज्या कंपनीचे सिलिंडर वापरत असू, त्या कंपनीचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, विशेष ओळख, तपासणी प्रमाणपत्र, मुख्य नियंत्रण अधिकाऱ्याचे अनुमोदनपत्र आदी गोष्टींची माहिती जवळ असायला हवी. ही माहिती नसेल तर आजच ती मिळवण्याचा प्रयत्न करा. सिलिंडरच्या स्फोटामुळे मालमत्तेचे नुकसान झाल्यास नुकसानभरपाई मिळवण्यासाठी ग्राहक न्यायालयात जाऊ शकतो. या स्फोटात कंपनीचा निष्काळजीपणा सिद्ध झाला, तर कंपनीकडून नुकसानभरपाई मिळू शकते. नवीन कनेक्शन घेताना अनेक वेळा वितरक सिलिंडरबरोबरच गॅसची शेगडी, तांदूळ, चहा- पावडर, व्हॅक्यूम क्लिनर अशा वस्तू विकत घेण्याची सक्ती करताना आढळतात. अशा प्रकारची सक्ती करणे चुकीचे असून, तसे झाल्यास ग्राहकांनी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे संपर्क साधावा. त्यातूनही प्रश्न सुटला नाही तर यानंतर अखिल भारतीय ग्राहक पंचायत "ग्राहक पेठ' टिळक रोड, पुणे येथे तक्रार करावी.
सिलिंडरलाही असते एक्स्पायरी डेट-
औषधे आणि खाद्य पदार्थांप्रमाणेच गॅस सिलिंडरलाही वापरायची अंतिम तारीख अर्थात एक्स्पायरी डेट असते. सर्वसामान्य ग्राहकाला त्याबद्दल फारशी माहिती नसते. त्या गॅस सिलिंडरमध्ये गॅसचा पुनर्भरणा किती तारखेपर्यंत करायचा यासाठी ही तारीख गॅस कंपन्यांना मार्गदर्शन करते. पण ही बाब ग्राहकांना माहीत नसल्याने काही वेळा ही तारीख उलटून गेल्यानंतरही सिलिंडरमध्ये गॅस भरला जातो. असा सिलिंडर वापरण्यास सुरक्षित नसतो. त्यामुळे ही तारीख पाहून घ्यायला हवी. गॅस सिलिंडरच्या वर लोखंडी रिंग असते. ही रिंग सिलिंडरला चार लोखंडी पट्ट्यांच्या साह्याने जोडलेली असते. त्यांपैकी एका पट्टीच्या आतल्या बाजूला एक्स्पायरी डेट लिहिलेली असते. वर्षाच्या चार तिमाहींसाठी ए, बी, सी आणि डी अशी मुळाक्षरे वापरलेली असतात आणि त्यापुढे वर्ष लिहिलेले असते. एखाद्या सिलिंडरच्या पट्टीवर बी 10 असे लिहिले असेल तर तो सिलिंडर 2010 या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीनंतर म्हणजे डिसेंबरनंतर वापरण्यात येऊ नये, असा संकेत असतो. ग्राहकांनी सिलिंडर घेताना हा सांकेतिक क्रमांक अवश्यक पाहावा.
वितरक म्हणतात दर वेळी वितरकांना दोषी ठरवू नये....
केंद्र सरकार घरगुती गॅसवरील सबसिडी कमी करणार, या भीतीमुळेही जादा मागणी नोंदविली जाते आहे. ग्राहकाला 24 तासांत सिलिंडर मिळाला पाहिजे, असे गॅस कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे. हे खरे असले तरी त्या प्रमाणात या कंपन्यांकडून सिलिंडरचा पुरवठा होतोच असे नाही. यातून "बॅकलॉग' वाढत जातो. मागणी-पुरवठ्याचे सूत्र बिघडले की टंचाई झाल्याचा प्रचार केला जातो. यातून वितरक बदनाम होतो. सिलिंडर पोचविण्याऱ्या मुलाला जादा पैसे देऊन घेतलेला सिलिंडर व्यावसायिक कारणासाठी वापरणार नाही, त्यातील गॅस मोटारींमधील टाकीत भरणार नाही, सिलिंडरसाठी जादा पैसे देणार नाही, एवढे जरी लोकांनी ठरविले तरी व्यवस्था सुधारायला वेळ लागणार नाही. गैरप्रकार होत असतील तर टाळी एक हाताने वाजत नाही, हेही समजून घ्यावे. नवीन गॅसजोड घेताना वस्तू विकत घेण्याची सक्ती केली जाते. कारण वितरकांना त्या वस्तू विकण्याची सक्ती गॅस कंपन्यांकडून केली जाते. लोकांनी त्याचा खुलासा या कंपन्यांकडे मागायला हवा. आता सबसिडी कमी करण्याचा विचार सरकार करीत आहे. यातून अनेक यंत्रणांना भ्रष्टाचाराचे आणखी एक साधन मिळणार आहे. त्यामुळे समान किमतीला सिलिंडर मिळावा. लोकांनीही एक सिलिंडर नेल्यानंतर दोन दिवसांत पुन्हा मागणी नोंदवू नये. ग्राहकाला हक्क कळत असेल, तर कर्तव्यदेखील समजली पाहिजेत.
- विजय भावे, अध्यक्ष, गॅस वितरक राज्य संघटना
पंधरा दिवसांनी बुकिंग करावे-
गॅस कंपनीकडून पुरवठा कमी पडला, तर सिलिंडर वाटपात खंड पडण्याची शक्यता असते. या तुटवड्यामुळे प्रतीक्षा यादी वाढते आणि कृत्रिम टंचाई झाल्याची ओरड होते. आता सिलिंडरचे भाव वाढणार, या भीतीमुळे लोक गरज नसताना बुकिंग करण्याचा प्रयत्न करतात. अगदी दोन सिलिंडरधारकही इतरांचा विचार न करता, लवकर सिलिंडर पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करत असतात. जवळच्या व्यक्तींना सिलिंडर वापरण्यासाठी देण्याचे प्रकारही घडतात. तरीही मागणी केल्यास सात दिवसांत सिलिंडर देण्याचा आमचा प्रयत्न असतो. 21 दिवसांनंतर बुकिंग असा नियम नाही; पण ग्राहकांनी जबाबदारीचे भान ठेवायला हवे. आता हिंदुस्थान पेट्रोलियमने 24 तास सुरू राहणारी ऑनलाइन बुकिंगची पद्धत सुरू केली आहे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता नाही. वितरकाबरोबर सिलिंडरची वाहतूक करणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. सिलिंडरच्या किमतीपेक्षा कुणी जास्त पैसे मागत असेल, तर ग्राहकांनी ते देऊ नये. वितरक अडवणूक करत असेल तर कंपनीकडे तक्रार करता येते.
- मोहन भारदे, सहकारनगर
किमतीपेक्षा जास्त पैसे नको-
सध्या गॅस कंपन्यांकडून सिलिंडरचा पुरवठा सुरू आहे. त्यामुळे कोठेही अडचण नाही; परंतु वाहतुकीमुळे सिलिंडरची गाडी येण्यास विलंब झाल्यास त्याचा वाटपावर निश्चित परिणाम होतो. तो सुरळीत करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे ग्राहकांनी वितरकांना समजून घेतले पाहिजे. ग्राहकाने मागणी नोंदविल्यानंतर त्याला सिलिंडर मिळणारच आहे; पण कधीतरी तांत्रिक अडचण येऊ शकते, याचा विचार लोकांनी केला पाहिजे. गॅस कधी संपेल, याचा अंदाज बांधून नागरिक सिलिंडरसाठी मागणी नोंदवू शकतात. सर्वच भागांमध्ये नागरिकांना घरपोच सिलिंडर पोचविला जातो; परंतु एखाद्या ठिकाणी रस्तादुरुस्तीचे काम सुरू असेल तर घरपोच देण्यात अडचण येते. त्या वेळी नागरिकांनी समजून घ्यावे. सिलिंडरच्या किमतीपेक्षा अधिक पैसे ग्राहकांनी देऊ नयेत.
- विनोद राठी, कात्रज
तक्रार कोठे कराल ?
अन्नधान्य वितरण अधिकारी : (020) 26123743 (पुणे शहरासाठी)
जिल्हा पुरवठा अधिकारी : (020) 26123907 (ग्रामीण भागासाठी)
हिंदुस्थान पेट्रोलियम : (020) 26213104/05
भारत पेट्रोलियम : (020) 26359796
लेखं - सकाळ