Android app on Google Play

 

'मी नास्तिक कां झालो' - शहीद भगतसिंग !!

 

"त्या दिवसापासून काही पोलीस अधिकारी मी नियमितपणे दोन वेळा देवाची प्रार्थना करावी म्हणून माझे मन वळवू लागले. मी तर नास्तिक होतो. फक्त शांततेच्या व आनंदाच्या काळातच मी नास्तिक असल्याची बढाई मारू शकतो, की अशा कठीण प्रसंगीदेखील मी माझ्या तत्त्वांना चिकटून राहू शकतो, याची माझ्यापुरती तरी मला कसोटी घ्यावयाची होती.

बऱ्याच विचारांती मी निर्णय घेतला की देवावर विश्वास ठेवणे व त्याची प्रार्थना करणे हे माझ्याकडून होणार नाही. नाही, ते कधीही शक्य नाही. ती खरी कसोटीची वेळ होती आणि त्यातून मी यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन बाहेर पडलो. इतर काही गोष्टींच्या बदल्यात स्वतःची मान वाचवण्याची इच्छा मी कोणच्याच क्षणी केली नाही. म्हणजे मी कट्टर नास्तिक होतो आणि आजपर्यंत नास्तिकच राहीलो आहे. त्या कसोटीला उतरणे ही साधी गोष्ट नव्हती.

'श्रद्धा' संकटांची व कष्टांची तीव्रता कमी करते, किंबहूना या गोष्टी ती सुखावहसुद्धा करू शकते. देवावरच्या विश्वासात माणसाला सांत्वन व बळकट राहावे लागते. वादळ आणि तुफानांमध्ये फक्त स्वतःच्या पायावरच उभे राहणे हा काही पोरखेळ नाही. अशा कसोटीच्या क्षणी गर्व, जर असलाच तर पार वितळून जातो. माणूस इतर सर्वसाधारण माणसांच्या श्रद्घांना बेदरकारपणे धुत्कारू शकत नाही, आणि त्याने जर असे केलेच तर आपण असाच निष्कर्ष काढला पाहिजे की त्याच्याकडे केवळ पोकळ ऐट नव्हे तर याहून दुसरी अशी काही शक्ती असली पाहिजे. सध्या माझी स्थिती ही नेमकी अशीच आहे.

न्यायालयाचा निकाल हा आधी पासूनच ठरलेला आहे. आठवड्याभरात जाहीर व्हायचा आहे. मी माझ्या ध्येयासाठी प्राणाचा त्याग करत आहे याखेरीज दुसरे कोणते सांत्वन माझ्याकरता असू शकते? एखादा देवावर विश्वास ठेवणारा हिंदू आपण पुढच्या जन्मी राजा म्हणून जन्मावे अशी अपेक्षा करत असेल, एखादा मुसलमान किंवा ख्रिस्ती आपल्या हाल-अपेष्टांचे व त्यागाचे बक्षीस म्हणून स्वर्गात भोगायला मिळणाऱ्या ऐश्वर्याची स्वप्ने पाहत असेल पण मी कशाची अपेक्षा करावी? मला चांगली कल्पना आहे की ज्याक्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी खेचली जाईल तो शेवटचा क्षण असेल. तोच अंतीम क्षण असेल.

मी, किंवा अगदी काटेकोर आध्यात्मिक भाषेप्रमाणे बोलायचे झाले तर माझा आत्मा याचा तेथेच अंत होईल. बस्स इतकेच. जर असे मानायचे धैर्य मला असेल तर कोणतेही भव्यदिव्य यश न मिळालेले, एक संघर्षाचे, थोड्याच दिवसांचे जीवन हेच खुद्द माझे बक्षीस आहे. याहून जास्त काही नाही. स्वार्थी हेतु न बाळगता, तसेच इहलोकी किंवा परलोकी फळाची अपेक्षा न ठेवता, अगदी निरिच्छपणे मी माझे आयुष्य स्वातंत्राच्या ध्येयासाठी वाहिले, कारण त्याहून वेगळे काही करणे मला जमलेच नसते !"

- शहीद भगतसिंग (वय 23 वर्षे)