Android app on Google Play

 

छत्रपती शिवराय मुस्लिमांचे विरोधक होते काय ?????

 

छत्रपती शिवरायांचा लढा मुस्लीम धर्माविरूध्द नसून जुलमी इस्लामी राजसत्तेशी होता,दुर्दैवाने आज शिवरायांच्या नावाचा वापर हिंदू-मुस्लीम असे दंगे घडविण्यासाठी होतो.आपण सर्वांनी खरा इतिहास समजून घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात धर्माला स्थान नव्हते. छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचा वध केला पण त्याची समाधीही प्रतापगडाच्या पायथ्याला बांधली. छत्रपती शिवराय , छत्रपती संभाजीराजें यांना धर्माच्या बंधनात अडकवून काही राजकारणी मंडळी व इतिहासकार त्यांचे महत्व कमी करत आहेत.

आपल्या समाजामध्ये मुस्लिमांच्या बाबतीत असं चित्र निर्मान केलेलं आहे की मुस्लिम म्हणजे अत्यंत कर्मठ आहे, अत्यंत क्रुर आहे आणि जास्त जास्त असला तर अतिरेकी ही भुमिका महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे.खेड्यामध्ये प्रश्न विचारला की तुमचा एक नंबरचा शत्रू कोण ? आमचं मराठ्याचं पोर म्हणतं मुसलमान, त्याला विचारलं की तुझ्या गावामध्ये मुसलमानांची घरे किती ? तो म्हणतो ५ ते १० तुझ्या गावामध्ये मसलमानाने कितीजनांवर अन्याय केला ? एकानेही नाही. तुझ्या गावामध्ये एकाही मुसलमानाने दादागिरी केली नाही , एकानेही अन्याय केला नाही मग तुझा एक नंबरचा शत्रु मुसलमान कसा ? तो म्हनतो मला काय माहीत लोकं म्हणतात म्हणून मी म्हणतो.

छ.शिवाजी राजांची अशी प्रतीमा केलेली आहे की शिवाजी म्हणजे मुस्लिमांचा कर्दनकाळ,मुस्लिमांच्या कत्तली-आम करणारा शिवाजी.जणु काही केवळ मुसलमान कापणे हाच शिवरायांचा एक-कलमी कार्यक्रम होऊन बसला आहे. अफ़जल खान चा कोतळा काढणारा शिवाजी, शाहीस्ते खाना ची बोटे छाटणारा शिवाजी. जणु काही शिवाजी राजांनी मुसलमान कापण्याचं कंट्राटच घेतलं होतं.सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत शिवाजी फ़क्त मुसलमानांची खांडोळी करायचे असाच इतिहास आजपर्यंत दाखवला जात आहे.

नेमके चित्र उभे केलं जाते की शिवराय अफ़जलखानाचे पोट फ़ाडत आहेत आणि खाली लिहिलेलं असतं "दहशदवाद असा संपवावा लागेल", मराठ्यांच्या डोक्यात फ़िट की मुसलमान मारल्याशिवाय दहशदवाद संपत नाही. अफ़जलखानाचा कोतळा काढला त्याच वेळी क्रुष्णा भास्कर कुलकर्णी मारला गेला हे का कळत नाही यावर चर्चा का होत नाही ? शिवाजी महाराज मुस्लिमांचे विरोधक होते असे चित्र का उभे केले जाते ? शिवाजी राजांच्या चारी बाजुने मुसलमान राज्ये होती, पण मुसलमान राज्ये होती याचा अर्थ शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक होते काय ? औरंगजेबच्या सैन्यात हिंदू नव्हते काय ? मिर्जा राजे काय मुसलमान होता काय ? औरंगजेबने आपले चार भाऊ मारले ते काय हिंदू होते काय ? आपल्या बापाला अटक केली तो काय हिंदू होता काय ? या सगळ्या सत्तेच्या लढाया असतात हे लक्षात घेतले पाहिजे.

शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक होते तर , शिवरायांच्या तोफ़खान्याचा प्रमुख कोण होता ? इब्राहिम खान, शिवरायांच्या आरमार चा प्रमुख कोण होता ? दौलत खान, शिवरायांच्या घोडदळाचा प्रमुख कोण होता ? सिद्धी हिलाल, शिवरायांचा पहिला सरसेनापती कोण ? नुर खान, शिवरायांच्या बरोबर आगर्याला गेलेला मदारी मेहतर मुसलमान, शिवरायांचा वकील काझी हैदर हा मुसलमान, शिवरायांचं एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचं नाव मिर मोहम्मद हा ही मुसलमान आणि अफ़जलखानाचे पोट फ़डण्यासाठी वाघनख्या पाठवून दिल्या तो रुस्तम- ए-जमान खान हा ही मुसलमान या माहितीवरून नजर फिरवली की, ज्या गोष्टी लक्षात येतात त्या अशा शिवाजी महाराजांनी सैन्यातील अत्यंत महत्वाच्या पदावर मुस्लीम मावळ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. शिवाजीराजांची लढाई आदिलशहा, मुघल, सिद्दी, पोर्तुगीज यांच्याविरुद्ध होती; पण ती राजकीय लढाई होती. धार्मिक लढाई नव्हती. शिवरायांच्या सैन्यात ३५ टक्के सैन्य मुस्लिमांचे होते. त्यांच्या २७ अंगरक्षकांपैकी १० अंगरक्षक मुस्लिम होते. सर्वात महत्वाचे म्हणजे या मुस्लीम मावळ्यांपैकी कोणीही फितूर झाल्याची अथवा शत्रूला मदत केल्याची कोठेही इतिहासात नोंद नाही. एवढे मुसलमान जर शिवरायांच्या सैन्यात असतात तर शिवराय मुस्लिमांचे विरोधक असतात काय ???

शिवरायांनी एकही मश्जीद पाडली नाही , एकही कुराण जाळलं नाही, मग मुसलमानांवर हल्ले करताना शिवरायांच्या नावाचा का वापर केला जातो ? याचा गांभिर्याने या देशामध्ये विचार झाला पाहिजे.हा विचार जर देशामध्ये पसरला तर देशामधली सामाजिक दुरी निश्चित दुर होईल. शिवाजीमहाराज धर्मनिरपेक्ष म्हणजेच समता, मानवतावादी होते. शिवचरित्रातून मानवतावाद शिकता येतो.
अफजलखान आल्यानंतर शिवाजीमहाराज काही अनुष्ठानाला बसले नाहीत किंवा वारीला, कुंभमेळ्याला किंवा नारायण नागबळी करायला गेले नाहीत, तर "यश मिळविण्यासाठी हातात तलवार घ्यावी लागते, रणांगण गाजवावे लागते, चातुर्य पणाला लावावे लागते,' हे महाराजांनी ओळखले होते. शिवरायांकडून आज वैज्ञानिक दृष्टिकोन शिकावा.

इतिहासकार जि.एस.सरदेसाई आपल्या " न्यू हिस्टरी ऑफ मराठास" या ग्रंथात लिहीतात ...
"रायगडावर राज्याभिषेकाच्या तयारीसाठी अनेक नवीन इमारती बांधल्या जात होत्या . बरेचसे बांधकाम पूर्ण झाले तेव्हा महाराज मोरोपंथ पिगंळे यांच्यासोबत पहाणी करण्याकरता गेले .
सर्व पहाणी करून शिवाजी महाराज म्हणाले.... तुम्ही जगदीश्वराचे मंदिर बाधले चांगले केले ,
पण माझ्या मुस्लीम प्रजेसाठी मशीद कोठे आहे ??????????
लागलीच महाराजांनी हुकुम दिली की माझ्या मुस्लीम प्रजेसाठी मशीद बाधा अन
ती...ही ... माझ्या महाला समोर बाधां
त्यानुसार पिग्ळ्यानी रायगडावर , महाराजांचा हुकुम शिरसावंदच मानून , मशीद बाधली "

महाराष्ट्रामध्ये एक अंदोलन चालू होतं , जय शिवाजी आणि पाडा कबर , कुठली ? प्रतापगडच्या पायथ्याची. पाडा पण बांधली कोणी ? अरे शिवरायांनी बांधलेली कबर शिवरायांच नाव घेऊन पाडली जाते हे अत्यंत दुर्दैव आहे.असं चित्र उभं केलं जातं की मुसलमान म्हणजे अतिरेकी मग मालेगाव मधील पांडे, नांदेड मधील पुरण्याला सापडलेले अतिरेकी मुसलमान होते काय ? इंदिरा गांधींना कोणी मुसलमानाने मारले काय ? महात्मा गांधींना कोणी मुसलमानाने मारले काय ? राजीव गांधींना कोणी मुसलमानाने मारले काय ? काय चाललंय काय ? अरे अतिरेकींना जात- धर्म नसतो.

जे मुसलमान अतिरेकी असतील त्यांना भर चौकात ठेचुन मारा पण या देशावर प्रेम करणार्या सर्वसामान्य मुसलमानांचा त्या अतिरेक्यांशी काय संबंध ? हि भुमिका आपन समजुन घेतली पाहिजे.
मित्र-मैत्रिणीनो मग आपणच सांगा असा धार्मिक साहिष्णूता असलेला आपला जाणता राजा मुसलमान विरोधी कसा ???

लेखं- प्रबोधन टीम(संग्रहित लेखं)