Android app on Google Play

 

तृतीयपंथीयांच्या जखमा !!

 

शिक्षण नाही. कोणाचा सहारा नाही. आईबाप जवळ करीत नाही. समाज जगू देत नाही. ही परिस्थिती फारशी बदलण्याची चिन्हेही नाहीत. आम्ही म्हणजे जणू परग्रहावरून वस्तीला आलेली अस्पृश्य जमात. सांगा आम्ही जगायचं कसं?

तृतीयपंथीयांच्या शारीरिक किंवा मानसिक जडणघडणीतच काही वजावट राहिलेली आहे की, निसर्गाने त्यांना मुद्दामच वेगळेपणा बहाल केला, याविषयी परस्परविरोधी दृष्टिकोन आहेत. पण शास्रज्ञ, विचारवंत किंवा उत्क्रांतीवादी काहीही म्हणो, तृतीयपंथीयांना हीन लेखण्याच्या बाबतीत समाजात नेहमीच एकमत असते. तृतीयपंथीयांची गोष्ट निघाली की, शिव्याशापांनी भरलेला प्रवाह दुथडी भरून वाहू लागतो. याविषयी भरभरून बोलताना गोव्यात हल्लीच झालेल्या तृतीयपंथीयांच्या राष्ट्रीय मेळाव्यात सहभागी तृतीयपंथीयांनी त्यांच्या जखमा उघडल्या.

बलात्कार्यांना लगाम घालण्यासाठी त्यांच्या शरीराचा विशिष्ट अवयव कापावा अथवा त्यांना रासायनिक प्रक्रियेने नपुंसक करून तृतीयपंथी बनवण्याची कठोर शिक्षा द्यावी या मागणीने सध्या जोर धरला आहे. आग्रही ओठांवर आणि त्यांच्या मनात तृतीयपंथीपणा व नपुंसकपणा यांची गफलती सरमिसळ असते. ज्यांनी बलात्कार केला नाही किंवा आयुष्यात कुठलाही गुन्हा केला नाही, त्यांना तृतीयपंथीपणाची शिक्षा नशीब का देते याचा विचार मात्र अभावानेच होताना दिसतो.

गोव्यातील मेळावा ‘अनाम प्रेम’ चळवळीतील सेवाभावी कार्यकर्त्यांनी आयोजित केला. त्यामागे नशिबाला बोल लावत बसण्याऐवजी नशीब बदलण्याची जिगर हवी, अशी भूमिका होती.
तृतीयपंथी म्हणजे वेश्याव्यवसाय करणारे, आपले अवयव दाखविण्याची धमकी देऊन भीक मागताना लोकांना सतावणारे, तेवढेच त्यांचे कर्तृत्व हा गैरसमज दूर करण्यासाठी देशातील जागोजागी सर्व प्रकारच्या हिजड्यांचे मेळावे आयोजित व्हायला हवेत.

सध्या चित्रमालिकांमधून प्रसिद्धीस येत असलेल्या अभीना अहेर या हिजड्याने मेळाव्यात अतिशय अभ्यासपूर्ण व आत्मविश्वासी सादरीकरण केले. निरक्षरतेपासून उच्च शिक्षणाच्या दिशेने व परावलंबित्वापासून स्वावलंबनाच्या दिशेने तृतीयपंथीयांचा जो प्रवास होत आहे त्याचेच जितेजागते प्रतीक म्हणजे अभीना. तृतीयपंथीयांनी समाजाच्या दयेवर न जगता स्वपायांवर उभे रहावे यासाठी अभीना नृत्याच्या रिंगणात पदन्यास टाकीत अविरत प्रयत्न करते आहे. अभीनाच्या समविचारी आणि समआचारी साथीदारांची संख्या कमी असली तरी अगदीच नगण्य नाही. राष्ट्रीय मेळाव्याच्या उपक्रमाने पाठिंबा व प्रोत्साहनासोबत प्रतिष्ठाही मिळाली अशी कृतज्ञता अभीनाने आवर्जून व्यक्त केली. तृतीयपंथीयांना आज आत्मसन्मान व प्रतिष्ठेची भूक तहान आहे.

तृतीयपंथीयांसाठी शिक्षणाची दारे उघडू लागली की, त्यातून आत्मविश्वासाची झुळूकही शिरेल हे खरे असले, तरी नुसत्या शिक्षणाचाही फायदा नाही. शिक्षण घेतलेल्या तृतीयपंथीयांना त्या शिक्षणाचा वापर करण्याची संधी देण्याबाबतीत आपला समाज म्हणजे आपण सारे कमी पडतो. म्हणूनच ‘शिकून काय होणार?’ हा नैराश्यजनक सवाल तृतीयपंथीयांच्या मनात उगवतो.

बहुतेक तृतीयपंथीय शिक्षणापासून वंचित आहेत आणि नजीकच्या भविष्यात ही दुरस्थिती फारशी बदलेल अशी चिन्हे नाहीत. अशा अशिक्षित तृतीयपंथीयांनी कसे जगवे हा यक्षप्रश्न आहे. आईबाप त्यांना जवळ करीत नाही आणि समाज त्यांना समाजात जगू देत नाही. जणू तृतीयपंथी ही परग्रहावरून वस्तीला आलेली अस्पृश्य जमात आहे. तृतीयपंथीयांशी बोलताना जाणवले की, शिक्षणाची गरज त्यांच्यापेक्षाही जास्त त्यांच्या कुटुंबीयांना आहे. तृतीयपंथीयांचे पालक समाजाच्या दडपणाखाली चेपून स्वत:च्या संततीलाच नाके मुरडतात. आपल्या घरी हे असले अस्तित्व निपजले हे समाजाला कळले तर आपल्यावरच दोषारोप होतील या पालकांच्या मनातील धास्तीतून तृतीयपंथीविरोधी अढी किंवा चीड घरातूनच वाढीला लागते. खरे-खोटे साधूपरुष, ढोंगी बाबा, ताईत, अंगारे यांच्या मागे न लागता तृतीयपंथीयांच्या आई-वडिलांनी आपल्या मुलांना विकृत न मानता आहे तसे स्वीकारणे घडायला हवे. पालकांची सारी ताकद आपल्या तृतीयपंथीय अपत्यांचे लिंग लपविण्यात खर्च होते. या ताकदीचा ओघ तृतीयपंथीयांना सपोर्ट देण्याकडे वळवला पाहिजे.

शाळा कॉलेजांमधील छापील प्रवेश फॉर्मस्मध्ये केवळ मेल/फिमेल अशी खानेवारी असते, तृतीयपंथीयांसाठी त्यामध्ये तरतूद नसते. रेशन कार्ड, बँकांमधील खाती, शासकीय रोजगार खाते या सार्या ठिकाणी तीच परवड व तोच नन्नाचा पाढा. मग तृतीयपंथीयांनी शिकायचे तरी कसे? शिक्षण नाही म्हणून नोकरी नाही, नोकरी नाही म्हणून पगार बचत नाही व बँकेत खाते उघडता येत नाही म्हणून कर्जही मिळत नाही. मग त्यांनी उद्योगधंदा तरी कसा करायचा?

नोकर्यांमध्ये, बस, ट्रेनमध्ये महिलांना राखीव जागा असतात. तृतीयपंथीयांच्या नशिबी तीही सवलत नाही. एखादा तृतीयपंथीय चुकून किंवा हिंमत करून स्त्रियांसाठी राखीव असलेल्या सार्वजनिक शौचालयात शिरला तर तिथे आकांत उठतो आणि तो हिजडा जर पुरुषांच्या शौचालयात शिरला तर त्याला लैंगिक अतिप्रसंगांना तोंड द्यावे लागते. बलात्कार्यांना फाशी देऊन की तुकडे तुकडे करून मारावे या चर्चेत दिवसरात्र मग्न असलेला समाज तृतीयपंथीयांना मात्र रोजच अनुल्लेखाने मारतो. कुठल्या तृतीयपंथीयांवरच्या किती अतिप्रसंगांची नोंद किंवा किती विनयभंगांची दखल समाजाने आतापर्यंत घेतली आहे? जणू तृतीयपंथी जे भोगतात ते त्यांचे अपरिवर्तनीय प्राक्तन आहे.

स्वतंत्र भारताच्या भाग्यविधात्या संविधानात हिजड्यांचा उल्लेख नाही. जनरल क्लॉज अँक्ट या कायद्यानुसार ‘व्यक्ती’ या शब्दाची व्याप्ती ‘तो’ किंवा ‘ती’ इतकीच र्मयादित असते. त्यातही तृतीयपंथीयांचा समावेश नाही, म्हणजे आपल्या अवतीभवती वावरणारे हजारो लाखो तृतीयपंथी जणू अस्तित्वातच नाही. त्यांना अदृश्य करण्याची जादुई करामत आपल्या राज्यघटनेने केली आहे.

राज्यघटनेतील समानतेच्या तरतुदींविषयी एका तृतीयपंथीय सेक्स वर्करची मल्लिनाथी मार्मिक अन् हादरवणारी होती. मेळाव्याप्रसंगी ती म्हणाली ‘आम्ही जे करतो तेच स्री वेश्या करतात; पण त्यासाठी स्री वेश्यांना आमच्या तुलनेत चौपट कमाई मिळते. ही विषमता कधी आणि कशी दूर होणार?’

तृतीयपंथीसंबंधी बर्याच समस्या व प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे मिळविण्यासाठी आधी त्यांच्याच घरात संवाद वाढायला हवा. ते न घडता त्यांना जाणता अजाणता घराबाहेर हाकलण्यात येते. बाहेरही सर्वच नजरा तिरस्काराने रोखलेल्या. या नजरांपासून बचाव करायचा झाला तर कुटुंबानेच तृतीयपंथीयांचे चिलखत बनायला हवे. हे न घडले तर घरातून बाहेर फेकलेले रिजेक्ट्स एवढाच अपमानकारक शिक्का तृतीयपंथीयांच्या माथी कायम राहील. ही ललाटरेखा बदलण्याचे काम अनाम प्रेम व्रतस्थपणे करीत आहे आणि त्यासाठी कृपाली भिडे सारखी युवा कार्यकर्ती आपल्या आय.ए.एस. सनदी परीक्षेच्या अभ्यासाकडे प्रसंगी दुर्लक्ष करून जीवापाड प्रयत्न करते.

कृपाली अनुभवातून बोलते, ‘तृतीयपंथीयांवर होणारे अन्याय कमी करायचे असतील तर प्रथम त्यांच्या कुटुंबातील न्यूनगंड कमी करायला हवा’ हा दृष्टिकोन केवळ कायदा किंवा शिक्षणाच्या झारीतून पेरता येणार नाही. त्यासाठी तृतीयपंथीयांच्या कुटुंबीयांना समाजाची आश्वासक साथ हवी. अनाम प्रेमचे कार्यकर्ते ती साथ देण्यासाठी तृतीयपंथीयांच्या घरोघरी वेळोवेळी आपुलकीची शिदोरी घेऊन जातात.
समाज तृतीयपंथीयांना कसा वागवतो हे तृतीयपंथी डोळ्यात पाणी आणून सांगत होते आणि त्या पाण्यात वाहत होते ते माणुसकीचे कलेवर.

या मेळाव्याचा जमाखर्च काय ? माणुसकी माणसांपासून दूर वाहत गेली आहे या साक्षात्काराची फेरउजळणी एवढेच या मेळाव्याने योगदान दिले ? मला नाही तसे वाटत.

अश्रूंचा प्रवाह जरूर वाढला. पण त्यापेक्षाही जोमदारपणे वाढली ती प्रवाहाविरोधात पोहण्याची ताकद. काठावर बसलेल्या बिगर तृतीयपंथी समाजाने आता ही जोमदार ताकद वापरून माणुसकीच्या शत्रूसंगे म्हणजे स्वत:शीच लढायला हवे !!!

लेखं - सतीश सोनक
धन्यवाद- दै लोकमत