पिंपळ पान.....प्रेमा काय देऊ तुला ?
वास्तविक मैत्रीचे पहिले काही महिने हे पारखण्याचे दिवस असतात. ही व्यक्ती आपल्याला जीवनभर साथसंगत देऊ शकेल का, सुखात आणि दुःखात, आजारात आणि आरोग्यात आपल्याशी एकनिष्ठ राहील का, आपल्या मुला-बाळांचा सांभाळ करू शकेल का, इत्यादी...
तिचं वय होतं 19. तिच्या आईनं तिला माझ्याकडं पाठवलं होतं. ती एका खासगी शाळेत शिक्षिका होती. पार्टीच्या वेळी तिला तो मुलगा भेटला. त्याचं वय 21. दोघांनी एकमेकांचे भ्रमणध्वनी-क्रमांक घेतले. त्यानं पाठवलेल्या शृंगारिक एसएमएसनं ती मोहरून जात असे. "मला तुझ्याबरोबर खूप बोलायचं आहे. हॉटेल "राज'मध्ये येशील का? संध्याकाळी ये...'' त्यानं सांगितलं. एका तरुण मुलाबरोबरची तिची ही पहिली खासगी भेट होती. दीड तास कसा निघून गेला, ते तिला समजलंच नाही. त्यानं हिंमत धरून टेबलाखालून तिच्या पायांना स्पर्श करून पाहिला. तिच्या देहबोलीचा अंदाज घेऊन तो धीट होत गेला...
आपली मुलगी कुणाच्या तरी जाळ्यात अडकत आहे, ह्याची कुणकुण तिच्या आईला लागली. ""माझं त्या मुलावर प्रेम बसलं असून, त्याच्याशिवाय मी कुणाचाही विचार करू शकत नाही...'' मुलीनं आग्रहानं सांगितलं. मी तिची समजूत घालावी म्हणून आईनं तिला माझ्याकडं पाठवलं होतं. मुलगी माझ्या परिचयाची होती. औपचारिक बोलणं झाल्यावर मूळ प्रश्नाला मी हात घातला.
"तुमची ओळख किती महिन्यांची?'' मी.
"अडीच महिन्यांची'' ती.
"मुलगा काय करतो?''
"त्यानं डिप्लोमा केला असून, नोकरीच्या शोधात आहे...!''
"त्याचं राहतं घर आहे का?''
"ती पाच भावंडं असून, त्याचा क्रमांक तिसरा आहे. चौथी बहीण व पाचवा भाऊ शाळेत शिकत आहेत...घर जुनं आहे; परंतु त्यांना ते मोडून नवं बांधायचं आहे.''
"त्याच्याकडं सेव्हिंग आहे का?''
"विशेष काही नाही; परंतु तो परदेशी जाण्याच्या विचारात आहे. तिथं चांगला जॉब मिळेल, अशी त्याला शाश्वती आहे.''
"त्याचं एकत्र कुटुंब आहे...घरची परिस्थिती बेताची आहे...त्याला अजून नोकरी लागलेली नाही...सारं कसं अधांतरी आहे.... तरी तुम्ही लग्न करण्याचं ठरवलं आहे?''
"लग्न तीन-चार वर्षांनी करणार...मलाही तोपर्यंत पर्मनंट नोकरी मिळेल...''
"अडीच महिन्यांची तुमची ओळखदेख, तरी तुम्ही एकमेकांना लग्नाची वचनं देऊन बसला आहात?''
"तो माझ्यावर खूप खूप प्रेम करतो. आम्ही रोज चॅटिंग करतो...त्याला मी विसरू शकत नाही.
तुमच्या घरून या नात्याला ठाम विरोध आहे आणि त्याला कारणंही तशीच आहेत....
तुम्ही मैत्री तोडू नका; परंतु एकमेकांना एकांतात भेटत जाऊ नका...त्याला जाऊ दे परदेशी...मग पाहू या...काय सांगावं, तो दुसऱ्या कुणाच्या प्रेमात पडला तर...''
ती- "त्याची एक मैत्रीण होती; परंतु माझ्यामुळं त्यानं तिला सोडून दिलं...'' .
मी.- "तेच मी सांगत आहे..त्याला तुझ्यापेक्षा अधिक आकर्षक मुलगी भेटली तर? तू त्याचा भरवसा देऊ शकतेस?''
ती क्षणभर शांत झाली. गोंधळली आणि म्हणाली, ""तरी मी त्याला विसरू शकत नाही...''
"तुम्ही लक्ष्मणरेषेचं भान ठेवूनच प्रेम करता ना?'' मी संकोचत विचारलं.
ती कावरीबावरी झाली. स्वतःला सावरीत म्हणाली, ""एकदा आमचे शरीरसंबंध आले...फक्त एकदाच...आम्ही दोघं एका लॉजमध्ये गेलो होतो.''
"मुली, त्या गोष्टी कधी एकदाच घडत नाहीत...खरं सांग...''
"तीन-चारदा. आता मी त्याला कशी विसरू?''
"तुझा निर्धार असेल तर ते शक्य आहे. मात्र, तुम्हाला काही काळासाठी मैत्री तोडावी लागेल...''
"हो'-"ना' करत ती तयार झाली.
आठ दिवसांनी ती स्वतःहून भेटायला आली. बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला....ती ओक्साबोक्शी रडू लागली.
"काही महिने एकमेकांपासून दूर राहायचं, हा माझा निर्णय मी त्याला सांगितला. त्यालाही वाईट वाटलं. तो खूप रडला. गेल्या महिन्यात तो परदेशी गेला आहे. आता त्याचा फोनही येत नाही. बहुदा तो मला विसरला असावा....''ती"
खूपच दुःखद आहे हे...माणूस प्रसंगी किती फसवा असू शकतो, ह्याचा अनुभव तू घेतला आहेस...खूप मोठी किंमत मोजून...तरी जे झालं ते बऱ्यासाठी झालं. तू लवकर सुटलीस....'' मी.
आईला अंधारात ठेवून तू मोठी जोखीम घेतलीस...जुगार खेळलीस...त्यात तू हरली आहेस...मात्र, त्यामुळं जगाचा अंत झालेला नाही. झालं गेलं गंगेला मिळालं.''
त्या दोघांचं नातं आता तुटलं आहे. ती मला कधीमधी भेटते. खूप जखमी झालेली दिसते. तिनं स्वतःलाच जखमी करून घेतलं आहे.
एखाद्या व्यक्तीकडे आपण आकर्षित झालो, की आपल्या मेंदूत डोफेमाइन नावाचा स्राव स्रवू लागतो. आकर्षणाच्या प्रक्रियेत मेंदूतून अशी अनेक रसायनं स्रवत असतात.
डॉ. हेलन फिशर ह्या मानसशास्त्रज्ञ सांगतात, की .....
जेव्हा माणसं प्रेमानं आंधळी होतात, त्या वेळी मेंदूत होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेमुळं शरीरात प्रचंड ऊर्जा निर्माण होते. भावना उफाळून येतात आणि माणूस वेडेपणाच्या पातळीवर जाऊन पोचतो. त्यामुळे प्रेमिक रात्रभर गप्पा-गोष्टी करत बसतात किंवा पहाटेपर्यंत चांदण्यात भटकत राहतात, कविता लिहू लागतात...एका स्पर्शासाठी किंवा दर्शनसुखासाठी सात सागर पार पाडण्यास तयार होतात. ऑक्सिटॉसिन या द्रावाचा एक चांगला फायदा आहे. या स्रावामुळं प्रेमिकांमध्ये निष्ठेच्या भावनेची वाढ होते. त्यामुळं उभयता एकमेकांसाठी कुठलाही त्याग करण्यास तयार होतात. प्रेम असफल झालं म्हणजे कधीकधी प्रेमिक आत्मघाताला प्रवृत्त होतात, कारण दोघंही परस्परांवरील आकर्षणामुळं वेडेपिसे झालेले असतात. त्यांना तारतम्य राहत नाही. कधी कधी आकर्षण म्हणजे केवळ वासनेचा भडकाही असू शकतो. प्रेम नव्हे, तर वासना माणसाला आंधळी करीत राहते.
वास्तविक मैत्रीचे पहिले काही महिने हे पारखण्याचे दिवस असतात. ही व्यक्ती आपल्याला जीवनभर साथसंगत देऊ शकेल का? सुखात आणि दुःखात, आजारात आणि आरोग्यात आपल्याशी एकनिष्ठ राहील का? आपल्या मुला-बाळांचा सांभाळ करू शकेल का? इत्यादी...
केट टेलर ह्यांनी म्हटल्याप्रमाणं लग्न करण्याचं ठरवून, पती-पत्नी पालक म्हणून एक गुंतवणूक करत असतात. या गुंतवणुकीबाबत स्त्री फारच दक्ष असते. तो तिचा स्त्री-सुलभ स्वभाव आहे. प्राण्यांतही नरापेक्षा मादी आपल्या पिलांना अधिक जपत असते, असं दिसून येईल.
पुरुष पटकन प्रेमात पडतात आणि प्रेमातून बाहेरही पटकन पडतात; तसंच स्त्रियांपेक्षा पुरुषांची लैंगिक सुखाची ओढ अधिक तीव्र असते. अनेकदा ते प्रेम नसतंच मुळी. तो असतो वासनेचा भडका. प्रेम असतं देवासमोर तेवणाऱ्या मंद नंदादीपासारखं. शांत. संयमी. कायमस्वरूपी. वासना असते फटाक्यासारखी. स्फोट होऊन नष्ट होणारी. तात्कालिक. खरी प्रेमळ व्यक्ती आपल्या माणसाला, त्याच्या, तिच्या नाजूक भावनांना जपत असते. त्यागासाठी सदासिद्ध असते.
अमेरिकेत एक संशोधन झालं. सर्वेक्षण करणाऱ्या तरुण-तरुणींनी एका विद्यापीठाच्या आवारात जाऊन स्त्री-पुरुषांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी त्यांना सां गितलं, ""तुम्ही खूपच आकर्षक दिसता की हो.'' त्यानंतर त्यांनी त्यांना तीन प्रश्न विचारले.
1) तुम्ही माझ्याबरोबर फिरायला याल का?
2) माझ्याबरोबर घरी याल का?
3) माझ्याबरोबर सेक्स कराल का?
तरुणांनी ज्या स्त्रियांना प्रश्न विचारले, त्यांची उत्तरं पुढीलप्रमाणे होती. पहिल्या प्रश्नाचं उत्तर 50 टक्के होय, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सहा टक्के होय आणि सेक्सविषयीच्या प्रश्नांना सर्व जणींनी नकार दिलेला होता.
ज्या तरुणींनी पुरुषांना प्रश्न विचारले होते, त्यांना अशी उत्तरं मिळाली 50 टक्क्यांनी फिरायला जायची तयारी दाखवली. 70 टक्के जणांनी मुलींच्या घरी जाण्याची आणि 75 टक्के जणांनी सेक्स करण्याची तयारी दाखवली. ही आकडेवारी अर्थातच अमेरिकेतील आहे; परंतु त्यावरून पुरुषांच्या मानसिकतेची ओळख पटू शकते.
पुनःपुन्हा परोपरीनं विनंती करून केट टेलरबाई मुलींना लक्ष्मणरेषेचं भान ठेवण्याचा आग्रह करतात. त्या काकूबाई नाहीत, जीर्णमतवादी नाहीत की धर्ममार्तंडही नाहीत; तर त्या समुपदेशक असून, नामवंत नियतकालिकांत स्तंभलेखन करतात. त्यांची लैंगिक संबंधांबद्दलची पुस्तकं अमेरिकेत गाजत आहेत.
तारुण्यात त्यांच्याही हातून चुका झाल्या आणि त्यांवरून त्यांनी वेळीच धडा घेतला. "विवाह झाल्याशिवाय सेक्स नाही,' हा नियम त्यांनी कटाक्षानं पाळला. "नाही' म्हणण्याची ताकद जिच्या अंगी असते, ती खरी मर्दानी ठरते आणि जीवनात यशस्वी होते.
"दुर्दैवानं पाऊल वाकडं पडलं तरी निराश न होता, कुढत-रडत न बसता आपल्या कौमार्याची जोपासना करावी. कौमार्य हे शरीराचं आहे, त्यापेक्षा अधिक मनाचं आहे, ते आपल्याला शुद्ध करता येतं,'' असं त्या सांगतात. तेव्हा, सावध हरिणी सावध गं । करील कुणितरी पारध गं ।।
लेखं - फादर फ्रान्सिस दिब्रिटो
साभार - ई सकाळ