जगज्जेते अलबर्ट आइन्स्टाईन
हिटलरची दहशत जगाला ठावूक
आहे. याच हिटलरच्या भीतीने एक वैज्ञानिक अमेरिकत पळून गेला पण अमेरिकेत
जाऊन त्याने असा शोध लावला की, ज्याची दहशत आजही जगात कायम आहे. त्याचे नाव
होते अलबर्ट आइन्स्टाईन. या थोर वैज्ञानिकाने नुसत्या तर्काच्या आधारावर
जगावर आपल्या नावाचा शिक्कामोर्तब केला तो कायमचाच. म्हणूनच याला आधुनिक
‘भौतिकशास्त्राचा जनक’ म्हणतात.
त्यांचा जन्म जर्मनीच्या ‘उल्म’ शहरात
झाला होता, पण ते १ वर्षाचे असतानाच त्यांच कुटुंब म्यूनिखमधे स्थलांतरित
झालं. लहानपणापासून अलबर्ट आइन्स्टाईन अतिशय लाजाळू होते. त्याच्या आईला
पियानो वाजविण्याची खूपच आवड. आईच्या अंगाखांद्यावर खेळता-खेळताच अलबर्ट
आइन्स्टाईन पियानो वाजवायला शिकले. संगीतात इतके तल्लीन होऊन जात की
भूख-तहानपण विसरून जात. पियानो या वाद्याच्या संगीताला नवीन उंचीवर नेणारा
वादक अचानक विज्ञानाची कास धरून चालू लागला.
लहानपणी त्यांच्या
वडिलांनी त्यांना एक घड्याळ भेट म्हणून दिलं. त्या घडाळ्याच्या चेनला एक
चुंबकीय कंपास लागला होता. अलबर्ट आइन्स्टाईन घड्याळ बघायला खूप उशीरा
शिकले परंतु त्या चुंबकीय कंपासाविषयी त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झालं
होतं. ते आपल्या वडिलांना त्या कंपासाविषयी प्रश्न विचारून भंडावून सोडत.
जितके उत्तरं मिळत जात, तितकीच त्यांची जिज्ञासा वाढीस लागायची.
गणितात
अलबर्ट आइन्स्टाईन हातखंडा होता, पण इतर विषयांबद्दल त्यांना कुठलीच गोडी
नवहती. १५ वर्षे वयाचे असताना त्यांच कुटुंब इटलीला चाललं गेलं. अलबर्ट
आइन्स्टाईनला मात्र शिक्षणासाठी स्विर्त्झलॅन्डला धाडण्यात आलं.
स्विर्त्झलॅन्डच्या ज्युरिख विश्वविद्यालयात प्रवेशासाठी त्यांनी परीक्षा
दिली तर चक्क नापास झाले. तब्बल एक वर्ष त्यांनी सलग अभ्यास केला व
प्रवेशासाठी दुसर्यांदा परीक्षा दिली. या वेळेस मात्र गणितात आणि
भौतिकशास्त्रात विशेष चमक दाखवत ते उत्तीर्ण झाले. याच विश्वविद्यालयात
त्यांच्या गणित आणि भौतिकशास्त्राला ‘लय’ मिळाली ज्याला लोकं आजही दाद
देतात. शिक्षण पूर्ण करता क्षणीच त्यांनी स्विर्त्झलॅन्डचे नागरिकत्व
स्वीकारले. प्राध्यापक होण्याची त्यांची इच्छा तीव्र होती, पण सर्व जागी ते
अपयशीच ठरले. वैचारिक मतभेद या अपयशाच्या मुळाशी होते. अखेर त्यांनी
‘पेटेंट’ देण्यार्या ऑफिसमधे नोकरी स्वीकारली.
याच दरम्यान
युगोस्लाव्हियाची मिलेवा मॅरिक नामक मुलगी त्यांच्या जीवनात आली. प्रेमात
पडलेल्या जोडप्याने १९०३ मधे लग्न केलं आणि दोन अपत्यांना जन्म दिला.
‘पेटेंट’ ऑफिसमधे काम करत असताना ‘लोकांनी सादर केलेले शोधाचे पेटंटचे
अर्ज’ अलबर्ट आइन्स्टाईनला विचार करण्यासाठी प्रवृत्त करीत. त्यांच्याजवळ
प्रयोगशाळा नव्हती. कदाचित हेच कारण असावं की त्यांची तर्कशक्ती प्रबळ होत
गेली. ते आपल्या मुलांसोबत फिरायला जरी निघाले तरी त्यांच्या हातात एक
डायरी कायम असायची त्या डायरीत ते नोंदी ठेवत. गाडी चालवता-चालवता जर कुठे
काही सुचलं तर हे महाशय तिथेच गाडी थांबवून टिपणं काढीत. त्यांची ती डायरी
आज अनमोल संपत्ती समजल्या जाते कारण त्यात ब्रम्हांडातील अनेक रहस्यांची
उकल व समस्यांचे निराकरण दिललं आहे.
इ. स. १९०५ मधे वयाच्या २६ व्या
वर्षी ज्युरिख विश्वविद्यालयाने त्यांना पीएच.डी. बहाल केली. याचवर्षी
भौतिकशास्त्रांच्या एका प्रख्यात मासिकात त्यांनी आपले पाच शोधनिबंध
प्रकाशित केले. हे पाच लेख इतके ‘दणकेबाज’ होते की अलबर्ट आइन्स्टाईन अचानक
विश्वप्रसिद्ध व्यक्ती होऊन गेली.
पहिल्या शोधपत्रात त्यांनी लिहिलं
होतं की, जेव्हा पोटॅशियम, टंगस्टन इत्यादी धातूंवर प्रकाश पडतो तेव्हा या
धातूंमधून इलेक्ट्रॉन निघायला लागतात. अशा इलेक्ट्रॉनला फोटो इलेक्ट्रॉन
म्हणतात आणि या प्रभावाला फोटो इलेक्ट्रिक प्रभाव म्हणतात. या प्रभावाचा
सिद्धांत प्रतिपादित केल्याबद्दल अलबर्ट आइन्स्टाईनला नोबल पारितोषिक
सन्मानित करण्यात आलं.
दुसर्या शोधनिबंधात त्यांनी ‘ब्राऊनियन गतिचा’
सिद्धांत प्रतिपादित केला. या सिद्धांतानुसार ‘तरल पदार्थात स्वतंत्रपणे
तरंगत असणार्या कणांची गती तरल पदार्थांच्या अणुंच्या एकमेकांवर लागोपाट
आपटण्यामुळे होते!’
तिसर्या शोधनिबंधात त्यांनी विश्वविख्यात
सापेक्षतेचा सिद्धांतप्रतिपादित केला होता. या लेखातून त्यांनी सिद्ध केलं
होतं की द्रव्यमान, अंतर, व काळ यासारख्या भौतिक राशी (ज्यांना स्थिर
मानल्या जातं) सुद्धा वेगासोबत बदलतात. हा जगाला हादरवून टाकणारा सिद्धांत
ठरला. या शोधनिबंधाचा एक असाही अर्थ होता की जगात ‘ईश्वर’ नामक कुठलीही
संस्था नाही. समजण्यास अत्यंत किचकट असा हा शोधनिबंध जगातील मोजक्याच
वैज्ञानिक डोक्यात शिरू शकला.
चौथ्या शोधनिबंधात त्यांनी द्रव्यमान
आणि ऊर्जेच्या समतुल्यतेविषयी अतिशय क्रांतिकारी सिद्धांत मांडले होते. या
सिद्धांतानुसार जर एक पाऊंड पदार्थास ऊर्जेत रूपातंरित केल्या गेले तर
त्यातून निर्माण होणारी एकंदर ऊर्जा ७० लाख टन डायनामाईटला पेटवल्यानंतर
निर्माण होणार्या ऊर्जेच्या बरोबरीची असेल. हीच प्रक्रिया जर शृंंखलेत
घडवून आणली तर होणारा स्फोट ‘कल्पनातीत’ असेल. हाच सिद्धांत अणुबॉम्बचा
पाया ठरला.
मुळात अणुबॉम्बची गरज हिटलरच्या मुसक्या आवळण्यासाठी पडली
होती. जर्मनी अणुबॉम्ब बनविण्याच्या प्रक्रियेत बराच पुढे सरकला होता.
शिवाय प्रचूर मात्रेत युरेनियम असलेला ‘झेकोस्लोवाकिया’ जर्मनीच्या ताब्यात
होता. ‘हिटलर जवळ अणुबॉम्ब’ या कल्पनेनेच अंगावर शहारा यायचा म्हणून मित्र
देशाचे वैज्ञानिक एकत्र येऊन अणुबॉम्बवर काम करू लागले. अलबर्ट आइन्स्टाईन
व ओपनहीमरचा वाटा अर्थातच सिंहाचा होता.
जर्मनीत वैज्ञानिकांमधे
‘‘मोठे साहेब म्हणतील तेच खरं!’’ अमेरिकेत मात्र नवशिक्यांच्या विचारांचाही
आदर होत होता. बघता-बघता अमेरिकेने अणुबॉम्ब बनवलाच. पण तोपर्यंत हिटलर
लयास गेला होता. जर्मनीने शस्त्र टाकली होती. परंतु जपानने अमेरिकेत मुसंडी
मारली आणि तो झोपलेला सिंह जागा झाला. जपानची युद्धाची तयारी बघता अजून २०
वर्षे तो सहज युद्ध करू शकणार होता. पर्ल हार्बरच्या विमानतळावर जपानने
हकनाक आग ओकली, आणि जपानला ठेचण्यासाठी अणुबॉम्बच वापरण्याचे ठरले. हे
कळल्याबरोबर अलबर्ट आइन्स्टाईन आणि इतर जेष्ठ वैज्ञानिकांनी अमेरिकेचे
अध्यक्ष रूझवेल्टकडे धाव घेतली. अलबर्ट आइन्स्टाईनने रूझवेल्टला समजविल की,
हा फार मोठाच नाही, तर फार भयानक बॉम्ब आहे. कृपया याचा वापर करू नका.
जगावर राज्य करू पाहणार्या अमेरिकेने त्यांचे म्हणने ऐकून घेतले नाही.
हिरोशिमा आणि नागासाकी उद्ध्वस्त झाल्याचे कळल्यावर अलबर्ट आइन्स्टाईन लहान
मुलासारखे हमसून-हमसून रडला.
या नंतर मात्र त्याने उर्वरित आयुष्य परमाणू ऊर्जेच्या शांतिपूर्ण प्रचारासाठीच खर्ची घातले.
जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हीटी आणि ब्रम्हांडात गुरुत्वाकर्षणावर शोध
करणार्या, जर्मनीत जन्मलेल्या अलबर्ट आइन्स्टाईनची अमेरिकेत पोहचण्याची
कथा ही विलक्षण आहे.
इ.स. १९३३ पर्यत हिटलर जर्मनीचा हुकूमशाह झाला
होता. त्याच्या विरुद्ध तोंड उघडण्याची कुणाची हिम्मत नव्हती. ज्यू लोकांना
यातना व देहदंड देणं सुरू झालं. अलबर्ट आइन्स्टाईन ज्यू होता. अलबर्ट
आइन्स्टाईनने हिटलरच्या विरोधात भाषणं देण्यात सुरुवात केली. याने हिटलर
भडकला. त्याने अलबर्ट आइन्स्टाईनला अद्दल घडविण्याचे ठरविले. याच दरम्यान
अलबर्ट आइन्स्टाईनला अमेरिकेत एका व्याख्यानासाठी पाचारण करण्यात आलं.
अलबर्ट आइन्स्टाईन अमेरिकेत असतानाच त्यांच्या एका मित्राने त्यांना कळविलं
की, ते जर्मनीत परतता क्षणीच त्यांना ‘टिपले’ जाणार आहे. त्यांच्या
विरुद्ध जर्मनीत खटला ‘पूर्ण’ झाला होता. अलबर्ट आइन्स्टाईनने अमेरिकेच्या
प्रिन्सटन विश्वविद्यालयात रुजू होण्यात शहाणपण समजलं आणि इथेच ‘अणु
ऊर्जेची’ पायाभरणी झाली.
या महान वैज्ञानिकाच्या वैयक्तिक जीवनाला एक नाजूक प्रसंग सहसा चर्चिला जात नाही. तो म्हणजे त्याच्या घटस्फोट आणि पुनर्विवाहाचा.
आईन्सटाईनला आपल्या पहिल्या पत्नी मिलेवापासून फारकत घ्यायची होती. आपल्या नवरेपणाचा हिसका दाखवित त्याने अजब आणि जाचक अटी घातल्या.
त्याची पहिली पत्नी मिलेवा मेरिक, भौतिकशास्त्र आणि गणितात शोधकार्य
करणारी युरोपमधील बहुधा पहिली महिला वैज्ञानिक होती. १९०३ मध्ये २४ वर्षीय
आईन्सटाईन २८ वर्षीय मिलेवा मेरिकशी विवाहबद्ध झाला. तो तिच्यासोबतच
शोधकार्य करीत होता. त्यांना एकूण तीन अपत्ये झाली. (त्यांच्या पहिल्या
मुलीचा मुद्दा वादग्रस्त आहे.) १९०५ पर्यंत आईन्सटाईन आपल्या जादुईशोधाच्या
बराच जवळ पोहोचला होता, ज्यामध्ये मिलेवानेही त्याला सहकार्य केले होते.
१९०९ च्या सुमारास त्यांच्या विवाहसंबंधात तणाव निर्माण झाला. अचानक
आईन्सटाईनच्या जीवनात त्याच्या एल्सा नामक मावसबहिणीने प्रेयसीच्या रूपात
प्रवेश केला होता. बुद्धिमत्ता आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व मिलेवाचे बलस्थान
होते तर (न्यूनगंड)मनोगंड हा तिचा मोठा दोष होता. शोधकार्यातील अपयशांनी
तिला पूर्वग्रहदूषित केलं होतं. याउलट एल्सा कुटुंबवत्सल, लोभस, पारंपरिक
आणि घरकामात निपुण होती. तिच्या प्रेमामुळे आईन्सटाईनचे विवाहसंबंध जास्त
तणावपूर्ण झाले. मिलेवाला आईन्सटाईन हवा होता पण आईन्सटाईनने विवाह
टिकविण्यासाठी जाचक अटी घातल्या.
या अटी ऐकल्यावर मिलेवाने काही दिवस
संसार पुढे रेटला पण शेवटी आपल्या मुलांना घेऊन निघून गेली. आईन्सटाईन
एल्सासोबत स्वत:चे संशोधन पुढे नेऊ लागला. १९१६ मध्ये आईन्सटाईनला घटस्फोट
हवा होता पण तो मिळाला १९१९ मध्ये.
कोर्टात झालेल्या कराराप्रमाणे
आईन्सटाईनला दर महिन्याला अर्धा पगार मिलेवाला द्यावा लागत होता. नोबेल
पारितोषिकाची रक्कम सुद्धा मिलेवाच्या मुलांसाठीच खर्च करण्याची तरतूद
करारामधे करण्यात आली होती.
१९१९ मध्ये एल्सासोबत विवाहबद्ध झालेला
आईन्सटाईन जेंव्हा जगविख्यात माणूस झाला तेव्हा त्याची पहिली प्रेयसी आणि
पत्नी मिलेवा मानसोपचाराच्या सहाय्याने जीवन कंठित होती.
आयुष्यभर
विज्ञान आणि शांतीची सेवा करणारा हा दिव्य पुरुष १८ एप्रिल १९५५ मधे
महानिद्रेत गेला. त्याला अशी बुद्धी कशी प्राप्त होऊ शकली, याचा अभ्यास
करण्यासाठी त्याचा मेंदू ‘विज्ञानाला दान’ करावा अशी विनंती वैज्ञानिकांनी
त्याच्या कुटुंबियांना केली. विज्ञानाचा आदर करणार्या त्याच्या
कुटुंबीयांनी परवानगी दिली.
या महान वैज्ञानिकाचा ‘थोर मेंदू’ आजही ‘प्रिन्स्टन हॉस्पिटल’ मधे सुरक्षित आहे आणि वैज्ञानिकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.
- प्रा. डॉ. शिरीष उर्हेकर
९४२३४१२८४०