Get it on Google Play
Download on the App Store

तो एकदम विक्षिप्तपणे हसत होता

नमस्कार, माझे नाव विकी चेंदवणकर आहे. मी वेंगुर्ला शहरातील उभादांडा या गावात राहतो. मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेली एक सत्य घटना सांगू इच्छितो. ही घटना साधारणपणे ३ वर्षांपुर्वी मी आणि माझ्या मित्रांसोबत घडलेली आहे. अशी घटना ज्या घटनेने मला आणि माझ्या मित्रांना मुळापासून हादरवून सोडले. तर आता वेळ न दवडता मी कथेला सुरुवात करतो. मी नुकतीच १० वीची परिक्षा दिली होती. ते दिवस सुट्टीचे असल्यामुळे माझे २ मित्र सुट्टीत मज्जा करण्यासाठी गावी आले होते. अक्षय आणि सुमित. त्यांपैकी अक्षय हा माझ्यापेक्षा १ वर्षांनी मोठा होता, तर सुमित हा ५ वर्षांनी मोठा असून तो मजबूत बांध्याचा होता. ते गावी आल्याआल्या पहिले माझ्या घरी आले मला भेटायला. मी त्यांना त्या रात्री माझ्याच घरी रहायला सांगितले, कारण आम्ही पार्टी करायचा बेत आखला होता म्हणून. त्या दिवशी रविवार होता आणि माझे खास मित्र घरी आले होते म्हणून मी घरी चिकन करायला सांगितले. आम्ही सर्वांनी जेवन आटोपले. सर्वांचे जेवून होईपर्यंत साधारण रात्रीचे १०.३० वाजले. आमचे घर मोठे असल्यामुळे आम्ही वलईत झोपायची तयारी केली. अंथरुन वगैरे घालून झाल्यावर आम्ही गप्पागोष्टी करत बसलो होतो. गप्पागोष्टी करता- करता आमचा बीअर पिण्याचा मुड झाला. बीअरचे दुकान तसे जवळच होते. मी माझी बाइक काढली. आम्ही ३घे बसलो आणि थेट बीअरच्या दुकानात गेलो. आम्ही प्रत्येकी २-२ बीअर घेतल्या, सोबत उकडलेले चणे, वेफर्स वगैरे घेऊन आम्ही घराच्या दिशेने निघालो. आमच्या घराच्या जवळच एक शेतमळा होता. आम्ही ३ घांनी पण तिथेच बीअर पिण्याचे ठरवले. आम्ही सर्व सामान घेऊन मळ्यात गेलो आणि एक चांगली जागा शोधून तिथे प्यायला बसलो. एव्हाना रात्रीचे ११.३० वाजले होते. मळ्यात सगळीकडे चांदणे पडले होते. सर्वत्र भयाण शांतता पसरली होती. त्यात आवाज येत होता तो फक्त रातकिड्यांचा. आम्ही लगेच बीअर उघडून १-१ घोट मारला. वाह...... काय मज्जा येत होती बीअर प्यायला. आम्ही मस्तपैकी गप्पागोष्टीं मारत बीअर ढकलत होतो. मळ्यात मस्त वारा सुटला होता. त्यामुळे उन्हाळ्याचे दिवस असूनपण उकाडा जाणवत नव्हता. हळूहळू बाटलीमधली बीअर संपू लागली होती आणि अगदी तशीच आम्हाला हळूहळू नशा चढत होती. मला तशी बिअर प्यायची सवय असल्यामुळे मला तेवढी नशा झाली नव्हती पण अक्षय मात्र फुल टल्ली झाला होता. आमच्या गप्पागोष्टी चालू असताना मी मध्येच भूतांचा विषय काढला. तेही मला भूतांच्या गोष्टी सांगण्याचा आग्र करु लागले. आमचे गाव तसे पहायला गेल्यास भूता- खेतांनी भरलेलेच आहे. आमच्या गावी भरपूर वाईट जागा, म्हणजेच भूतांचे वास्तव्य असलेल्या जागा आहेत. तसे म्हणाला गेलात तर माझे गाव एक 'Haunted place'च आहे. मी त्यांना आता भूतांबद्दल सांगू लागलो आणि तेही मोठ्या उत्सुकतेपणे ऐकू लागले. तसे बघायला गेलात तर आमच्यामध्ये भित्रा असा कोणीच नव्हता. सुमितचा तर भूत-प्रेत यांसारख्या गोष्टींवर तर अजिबात विश्वासच नव्हता तरीपण उत्सुकतेपायी तो ऐकत होता आणि तेही एकदम मन लावून. मी त्यांना आमच्या घराजवळच असलेल्या एका जागेबद्दल सांगण्यास सुरुवात केली. तिथे एका बाईचा वास आहे. तसे बघायला गेलात तर ती जागा माझ्या घरापासून १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. तर मी त्यांना त्या जागी राहणा- या त्या बाईविषयी सांगू लागलो. तिचे ज्या जागी वास्तव्य आहे त्या जागी एक पिंपळाचे भलेमोठे झाड आहे आणि बाजूलाच बसण्यासाठी एक कट्टा आहे ज्याला आम्ही मुस म्हणतो. मी त्यांना सांगितले की ती जागा एकदम भयावह आहे. त्या जागी एका बाईच्या आत्माचा वावर आहे तोही खुप वर्षांपासून. पौर्णिमा असो की अमावस्या, ती बाई कधीपण दिसते. तिने अनेक लोकांना त्रास दिला आहे. त्या रस्त्यावरुन जाणा- या वाटसरुंना ती बाई हमखास दिसतेच दिसते किंवा झपाटते तरी. मी जे सांगत होतो ते अक्षय याला पटत होते, पण सुमित याला पटत नव्हते. त्याने सरळ-सरळ तू पकवत आहेस असे मला म्हणाला. मी मग त्याला त्या बाईचा एक किस्सा सांगितला. खुप वर्षांपुर्वी त्याच रस्त्यावरुन १ जोडपे जात होते. त्यावेळी साधारणतः रात्रीचे १ वाजले होते. ते जोडपे बाइकवरुन आपल्या घरी जात होते. तर झाले असे, जो बाइक चालवत होता त्याला त्या जागी पांढरी साडी नेसलेली बाई दिसली. ती बाई रस्त्याच्या कडेला, त्याच पिंपळाच्या झाडाखाली ती उभी होती आणि दाखवत होती. त्या बाइक चालवणा- याला कळून चुकले की हे नक्कीच भूत आहे आणि आता आपले काही खरे नाही. तो त्या बाईच्या साधारण १० मीटरच्या अंतरावर होता की अचानक त्या बाईने लिफ्ट्साठी जो हात पुढे केला होता, तो हळूहळू लांब होत होता. त्या माणसाची बायको त्याच्या पाठीमागे बसली होती. त्यामुळे त्या माणसाने मागे परत न फिरण्याचा निर्णय घेतला आणि बाइकचा स्पिड वाढवला. इथेतर त्या बाईचा हात लांबच होत चालला होता. आता तर त्याची बाइक त्या बाईच्या एकदम जवळ आली होती. अचानक त्या बाईचा हात एकदमच लांब झाला आणि तिने बाइअकच्या मागे बसलेल्या त्या माणसाच्या बायकोचे सरळ केसच पकडले. तीचे केस पकडून तिला पाठीमागे ओढले. ओढताच क्षणी त्याची बायको पाठच्यापाठी रस्त्याव खुप जोरात आदळली आणि तिचे डोके फुटून जागच्या जागी ती मेली. त्या माणसाचाही बाइकवरचा ताबा सुटून गंभीररित्या अपघात झाला. त्या माणसाच्यापण डोक्याला इजा होऊन तो तिथेच बेशुद्ध पडला. त्याला नंतर दवाखान्यात नेण्यात आले ( कोणी नेले, कधी नेले, कसे नेले याबद्दल काहीच माहिती नाही). त्याचे यशस्वीपणे ऑपरेशन झाले आणि त्याला नविन जीवनदान मिळाले. पण त्या घटनेमुळे तो आपल्या अर्धांगिणीला म्हणजेच आपल्या बायकोला कायमचा गमवून बसला होता. ही गोष्ट मी जेव्हा अक्षय आणि सुमितला सांगितली, तेव्हा अक्षय त्या जागी जाण्यासाठी फार उत्सुक झाला. "मला आत्ताच्या आत्ता त्या जागेवर घेऊन चल", असा तगादाच त्याने माझ्या मागे लावला. मी त्याला सांगितले की, आत्ता ह्यावेळी त्या जागी जाणे हे धोकादायक आहे आणि तुमची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. मी तुम्हाला त्या जागी नाही घेऊन जाऊ शकत. हे ऐकताच सुमित जोरजोरात हसू लागला. त्यांना मी जे काही सांगितले, ती सुमितला एक कथाच वाटत होती. सुमित मला बोलला की, तु जे काही आता सांगितलेस ते जर खरे आहे, तर मला त्या जागी घेऊन चल आणि तेही आत्ताच्या आत्ताच. माझ्याकडे तो हट्टच धरु लागला. मी खुप आढेवेढे घेऊन शेवटी त्या जागी त्यांना नेण्यास तयार झालो. त्यावेळी रात्रीचे जवळपास १ वाजला होता. मी माझी बाइक घरीच ठेवून आलो होतो. बाइकने जायचे ठरविले असते तर बाइकच्या आवाजाने घरातील सर्व मंडळी जागी झाली असती. म्हणून आम्ही तिथे जाण्यासाठी चालतच निघालो. मी रस्त्यावरुन जाताजाता घरावर १ ओझरती नजर टाकली. घरातील सर्व लाइटस बंद करुन सर्वजण झोपले होते. आम्ही आमच्या घराजवळून गुपचुप निघालो. बीअर्ची नशा अजुन थोडीफार बाकी होती, म्हणून मला तशी भीती वाटत नव्हती. आम्ही आता चालत-चालत main रस्त्यावर पोहोचलो होतो. कुत्रे आमच्याकडे बघून जोरजोरात भुंकत होते. त्यांच्या भुंकण्याचा कर्कश आवाजामुळे माझे काळीज अजुन जोरजोरात धडधडू लागले. त्यातच त्या बाईच्या कथा आठवून अजुन भीती वाटत होती. भीती तर मनातून खुप वाटत होती, पण सुमित काही केल्या ऐकणारा नव्हता. तसा तो होताच धीट. अक्षयचा स्वभाव जवळजवळ माझ्या स्वभावाशी मिळता- जुळता होता. त्यालापण भीती वाटत होती, म्हणून तो माझा हात धरुन चालत होता. पण सुमित मात्र बिंधास चालत होता. आमच्यासोबत आता काय घडणार आहे, ह्याची त्यालाच काय, आम्हाला पण पुसटशी कल्पनासुद्धा नव्हती. आम्ही जाणून-बुजून मृत्यूच्या दाढेत पाय ठेवायला जात होतो. म्हणतात ना वेळ आली की मती बिघडते आणि बुद्धी भ्रष्ट होते. तशीच आमची बुद्धी भ्रष्ट झाली होती. मला आता जाम भीती वाटत होती आणि स्वतःचा रागदेखील येत होता की, का म्हणून ह्यांना मी ती कथा सांगितली. काय गरज होती मला भूताचा विषय काढायचा? आता पुढे नक्की काय घडणार? काय होणार? असे असंख्य प्रश्न माझ्या मनाला भेडसावत होते. आम्ही रस्त्यावरुन चालतच होतो. त्या जागेवर पोहोचायला आम्हाला अजून ५ मिनिटे तरी लागणार होती. रस्त्यावर चिटपाखरु देखील नव्हते. आम्ही तसेच त्या भयाण अंधारात पुढे-पुढे चालत होतो. माझ्या मनात अजूनही विचारांचा कल्लोळ चालूच होता. एव्हाना ते पिंपळाचे झाड लांबूनच दिसू लागले होते. लांबूनच ते झाड एकदम विचित्र आकार-विकार असलेले आणि भयानक वाटत होते. माझी भीतीने तर मजबूतच फाटली होती. मी सुमितला सांगितले की तु ते झाड इथुनच बघ. मला खुप भीती वाटत आहे. आपण आता घरी जाऊया चला. पण तो माझे काहीही ऐकून घेतच नव्हता. त्याला बघायचेच होते की पिंपळाच्या झाडाखाली नक्की कोण आहे ते.... तो मला बोलू लागला की, तू १ नंबरचा भित्रा आहेस. आता गप्प चल त्या पिंपळाच्या झाडापर्यंत. मी असताना तु कशाला घाबरतोस. मी कोणाच्या बापाला पण घाबरत नाही. हे ऐकून अक्षयने लगेचच पैज लावून टाकली की, तु जर कोणाला घाबरत नाहीस ना, तर तु एकटा त्या पिंपळाच्या झाडाजवळ जा आणि त्याच्या पारावर निदान २ मिनिटे तरी बसुन ये. जर तु असे केलेस तर लगेच मी तुला ५०० रुपये देईन. हे ऐकून सुमित जाम खुश झाला आणि लगेच त्याने ती पैज स्विकारुन पिंपळाच्या झाडाच्या दिशेने जाण्यासाठी एकटाच निघाला. मी आणि अक्षय मात्र तिथेच थांबलो. आम्ही जिथे थांबलो होतो तिथुन ते पिंपळाचे झाड ५० ते ७० मीटर अंतरावर तरी असणार. सुमित एकटाच त्या झाडाच्या दिशेने चालत जात होता आणि जसा तो पुढे-पुढे जात होता तसा-तसा तो रस्त्यावरील लाईटच्या उजेडात अंधुक दिसत जात होता. एव्हाना सुमित झाडाजवळ पोहोचलादेखील होता. तिथले एवढे काही स्पष्ट दिसत नव्हते. फक्त सुमितची अस्पष्ट अशी काळी सावली दिसत होती. तो नेमका तिथे ऊभा राहून काय करत होता, हे काही कळायला मार्ग नव्हता. इथे मी भीतीने खूप घामाघुम झालो होतो, कारण मी त्या भूताचे बरेच किस्से ऐकले होते. त्या बाईच्या भूताने आतापर्यंत ब-याच जणांना त्रास दिला होता. त्यामुळे मला १००% खात्री होती की सुमित बरोबर पण नक्कीच काहीतरी विपरित घडणार, पण तसे काही वाईट घडू नये म्हणून मी मनोमन देवाकडे प्रार्थना करत होतो. आम्ही सुमितच्या येण्याची वाट बघत होतो. सुमित त्या झाडाखाली काय करत आहे, हे काहीच दिसत नव्हते. एवढ्यात सुमितला यायला पाहिजे होते, पण तो येण्याची चिन्हे काही दिसत नव्हती. १५ मिनिटांच्या वर वेळ होऊन गेली होती. इतक्यात त्याची काही हालचाल होताना दिसली. त्याची आकृती हळूहळू मोठी होत होती. तो आमच्या दिशेने येत होता. तो आमच्या जवळ आला, मोठमोठ्याने हसू लागला आणि म्हणू लागला की, मी पैज जिंकलो. चला आता मला माझे बक्षीस द्या. तो बोलत असताना मला त्याच्या वागण्यातील फरक स्पष्टपणे जाणवत होता. तो एकदम विक्षिप्तपणे हसत होता. त्याचे हसणे एकदम असुरी प्रकारचे वाटत होते. त्याच्या नजरेत एक प्रकारची कृर भावना दिसून येत होती. हा जो आता आलेला तो अगोदरचा सुमित नव्हता. नक्कीच त्याच्याबरोबर काहीतरी वाईट घडले होते, हे कळायला मला वेळ लागला नाही. त्याने ठरल्याप्रमाणे अक्षयकडे ५०० रुपये मागितले, पण अक्षयने त्याला पैसे देणार नाही असे मस्करीमध्ये बोलला. हे ऐकताच त्याला खुप राग आला आणि तो मोठ्मोठ्याने हसू लागला. त्याचे डोके आता लालभडक दिसत होते. तो बोलला, "चालेल, तुम्ही मला माझे पैसे देत नसाल तर मी आता तुम्हालाच घेऊन जाते", असे म्हणत त्याने जवळच्या कुंपणातला एक बांबू काढला आणि काही कळायच्या आतच त्याने त्या बांबूने अक्षयच्या मांडीवर जोरात प्रहार केला. प्रहार एवढ्या जोरदार होता की, अक्षय खालीच कोसळला. मी समझलो होतो की त्याला भूतानेच झपाटले आहे. मला त्या वेळी काहीच कळत नव्हते की काय करु आणि काय नको ते? माझे डोके अगदी सुन्न झाले होते. मी अक्षयला उचलण्याचा प्रयत्नच करत होतो. एवढ्यात सुमितने माझ्यावर पण प्रहार करण्याचा प्रयत्न केला. त्याने मला मारण्यासाठी बांबू उचलला, पण मी त्याचा तो वार चुकवला. तरीही त्याचा वार माझ्या हाताला लागलाच. मी लगेच रस्त्यावरची धूळ उचलली आणि सुमितच्या डोळ्यात फेकली. त्याला आता काही दिसत नव्हते तरीपण तो म्हणत होता की, " मी आज तुम्हा दोघांना मारुन टाकणार, सोडणार नाही तुम्हा दोघांना." त्याचा तो आवाज एकदम भयानक होता. त्याचा तो आवाज आता एखाद्या बाईप्रमाणे येत होता. आम्ही आता दोघेही सर्व शक्तीनींशी पळत होतो. आमच्या दोघांची आता मागे वळून पाहण्याची हिंम्मत पण होत नव्हती. आम्ही तसेच कसेबसे धावत घरी आलो आणि दरवाजा उघडून लगेच अंथरुनावर झोपलो. घरात आतल्या खोलीत सर्वजण झोपली होती. आम्ही दोघेही काही बोलण्याच्या मनःस्थिती नव्हतो. काही केल्या आमच्या काळजाचे ठोके काही कमी होत नव्हते. ठोके स्पष्टपणे ऐकू येत होते. अक्षयच्या पायातून रक्तपण येत होते. माझ्या हातातून पण थोडेफार रक्त वाहत होते. पण भीतीपोटी आमच्या वेदना कुठल्या कुठे पळून गेल्या होत्या. त्या क्षणी आम्हाला कुठल्याच वेदना जाणवत नव्हत्या. जाणवत होती ती फक्त भीती. डोळ्यासमोर तो सुमितचा भयानक चेहरा फक्त दिसत होता आणि कानात गुंजत होता तो फक्त मारुन टाकण्याचा त्याचा तो विचित्र बाईसमान भयानक आवाज. मनात विचारचक्र चालू होते. फक्त सुमितचाच विचार मनात येत होता. काय झाले असणार त्याचे? कुठे असणार तो? काय केले असेल त्या भूताने आता त्याचे? असल्या प्रश्नांनी मला तर अगदी भेडसावून सोडले होते. मी प्रथमच असा अनुभव घेतला होता. मला मनापासून सुमितची मदत करण्यासाठी तिथे पुन्हा जावे असे वाटत होते, पण भीतीमुळे माझे हातपायच गळून पडले होते. शरीरात त्राणच उरले नव्हते. घामाने पुर्ण शरीर ओलेचिंब झाले होते. मी चादर डोक्यावर ओढून झोपलो होतो. चादर डोक्यावरुन काढून बाहेर बघण्याची पण माझी हिंम्मत होत नव्हती. पण सुमित माझा मित्र होता. काही केल्या मला त्याला वाचवायचे होते. मला सुमितची मदत करायला जायला पाहिजेच होते. मी माझ्या मनात विचार पक्का केला की आज काहीही होऊ दे, मी माझ्या मित्राला सुमितला मृत्युच्या दरव सोडवून आणणारच. देवाकडे मी प्रार्थना केली की माझ्या सुमितला त्या भूतापासून वाचव आणि पुर्ण ताकदीनिशी मी माझ्या तोंडावरील चादर बाजूला केली आणि अक्षयला उठविले. तोही जागाच होता. त्याला मी हे सर्व सांगून सुमितला आणण्यासाठी अक्षयला घेऊन घराबाहेर पडलो. किती वाजले होते ते पण आम्हाला माहीत नव्हते. मी देवाचे नाव घेऊन माझी बाइक काढली आणि सुमितला आणण्यासाठी आम्ही पडलो. आम्ही पुन्हा यमराजाकडे स्वतःहून निघालो होतो याची मला पर्वा नव्हती. माझे डोळे फक्त सुमितलाच शोधत होते. आम्ही आता त्या झाडाजवळ पोहोचणारच की इतक्यात मला सुमित बेशुद्धावस्थेत रस्त्यावर पडलेला आढळून आला. मी तिथेच बाइक लावली. पण त्याच्याजवळ जाण्याची हिंम्मत होत नव्हती. शेवटी मी त्याच्या जवळ गेलो आणि नक्की तो बेशुद्धच आहे ना याची खात्री करुन घेतली. त्याचा श्वास चालू होता आणि नाडीचे ठोकेही चालू होते. आम्ही दोघांनी त्याला कसेबसे उचलून बाइकवर बसविले आणि त्याच अवस्थेत त्याला घरी आणले. त्याला घरी आणून कसेबसे अंथरुणावर झोपवले. मला आणि अक्षयला काही केल्या झोप येत नव्हती. कशीबशी आम्ही जागे राहून पुर्ण रात्र काढली. पहाटेच्या सुमारास थोडीशी डुलकी लागली आणि उठलो तो थेट सकाळी १० वाजताच. उठून बघितले तर बाजूला फक्त अक्षयच झोपला होता. मला अचानक काल घडलेल्या घटनेविषयी अचानक आठवले. मला पुन्हा काहीच सुचेनासे झाले. काल रात्री माझ्यासोबत हे सर्व घडले यावर अजुनही विश्वासच बसत नव्हता. मला ते एक वाईट पडलेले स्वप्न वाटत होते. पण जसे माझे लक्ष हाताला झालेल्या त्या जखमांकडे गेले तस मला कळले की ते स्वप्न नसून खरच काल माझ्यासोबत घडले होते. मी काहीसा विचार केला आणि अक्षयला पण उठविले. आळस देत तोही जागा झाला. आम्ही दोघे एकमेकांच्या चेह-याकडे बघत बसलो आणि नंतर आम्ही सुमितकडे जाण्याचा निर्णय घेतला. सुमित आपल्या मामाकडे रहायला आला होता. त्याचे घर तसे जवळच होते. आम्ही लगेच तयारी केली आणि सुमितकडे जाण्यासाठी निघालो. आम्ही सुमितच्या घरी पोहोचलो. तो तयारी करुन माझ्याच घरी यायला निघाला होता. आम्ही त्याला घेऊन गार्डनमध्ये गेलो. कारण काल त्याच्यासोबत काय-काय घडले होते ते सर्व मला जाणून घ्यायचे होते. आमही काही वेळेतच गार्डनमध्ये पोहोचलो. आम्ही सर्व बेंचवर बसलो आणि त्याला काल घडलेल्या घटनेविषयी विचारले, पण त्याला काल काय घडले हेच आठवत नव्हते. मी त्याला जरा नीट आठवायला सांगितले. त्याने थोडा त्याच्या मेंदूवर ताण दिला आणि त्याने आम्हाला सांगितले की जेव्हा तो त्या पिंपळाच्या झाडाजवळ पोहोचला आणि त्या झाडाच्या पारावर बसला तेव्हा त्याला इतर गोष्टींत जसे घडते, तसेच नेमके त्याच्यासोबत घडू लागले. त्याला त्यावेळी वातावरणात एकदम बदल जाणवू लागला. त्याच्या आसपास कोणीतरी आहे असा त्याला भास होऊ लागला. अचानक त्याला कोणा बाईचा हसण्याचा आवाज येऊ लागला, पण त्याला आजूबाजूला कोणीच दिसत नव्हते. तो हसण्याचा आवाज एकदम भयानक वाटू लागला. त्यानंतर तो हसण्याचा आवाज अचानक रडण्यामध्ये रुपांतरित झाला. तो आवाज एवढा भयंकर होता की त्या आवाजाने सुमितच्या काळजाला चिरुनच टाकले होते. एवढ्या धीटपणे वागणा- या सुमितचा धीटपणा कुठल्याकुठे पळून गेला होता. आता त्याचे हातपाय थरथरु लागले होते. थंड वारा सुटलेला असतानाही तो घामामुळे पुर्ण न्हाऊन गेला होता. त्याचे शरीर एकदम थंड पडले होते. तरीपण तो तशाच अवस्थेत कोण आहे? कोण आहे तिथे? असे विचारत होता, पण तो रडण्याचा आवाज काही थांबत नव्हता. त्याच्या आजुबाजुला पण कोणीच दिसत नव्हते. तो आवाज वाढतच चालला होता. त्याला फक्त आपल्या भोवती कोणीतरी आहे असा भास होत होता. सुमितला आता कळून चुकले होते, की तो आता एका पिशाच्चाच्या तावडीत सापडला होता. ज्यातून त्याची सुटका होणे शक्य नव्हते. तो तिथून पळायचा प्रयत्न करत होता, पण त्याला कोणीतरी अडवत होते. अशी कोणतीतरी शक्ती होती जी त्याला ति हलायला पण देत नव्हती. तो तेथून पळ काढण्याचा खुप प्रयत्न करत होता, पण तो काही केल्या तेथून हलत नव्हता. त्याची सर्व शक्ती व्यर्थ जात होती. ४-४ जणांना भारी पडेल असा मुलगा, आज साधा जागेवरुन त्याला त्याचा पायदेखील उचलता येत नव्हता. तो कर्णकर्कश आवाज वाढतच चालला होता. आता त्याचे कान फुटायची पाळी आली होती. आणि त्यानंतर जे काही घडले ते त्याच्यासाठी तर खुपच भयंकर होते. त्याला आपल्या पाठीमागे कोणीतरी आहे असे वाटले, म्हणून त्याने मागे वळून पाहिले तर त्याच्या पाठीमागे पांढ-या साडीत १ बाई ऊभी होती. तिचे केस मोकळे सोडलेले होते. तिच्या चेह-यावर जागोजागी जखमा झाल्या होत्या. चेहरा पुर्ण पांढरा फटिक पडला होता. ठिकठिकाणी साडी फाटलेली होती. डोक्यातून रक्त वाहत होते. तिचे डोके एकदम लाल- लाल होते. एकूनच तिचे रुप हादरवून टाकणारे होते. ती हळूहळू सुमितच्या दिशेने येत होती. त्यानंतर पुढे कय घडले ते सुमितला काहीच आठवत नव्हते. त्याच वेळी नेमके भूताने त्याच्यावर झडप घातली होती. तो बेशुद्ध पडला होता. त्याला त्या भूताने आपल्या वशमध्ये केले होते. बस एवढेच सुमितला माहित होते. त्यानंतर जे काही घडले ते मी त्याला सविस्तरपणे सांगितले. ते सर्व ऐकून तर त्याची हवाच टाईट झाली. त्याने माझे ऐकले असते तर आज ही वेळच आली नसती. त्याने नंतर त्याबद्दल माझी माफीपण मागितली. नंतर मी त्याला घेऊन जवळच्याच गावातल्या एका साधूबाबांकडे घेऊन गेलो. त्यांनी सर्व काय प्रकार आहे ते ओळखले. उतारा करुन त्यांनी एक धागा गळ्यात बांधायला दिला. तेव्हापासून त्याला भूतांपासून कसलाच त्रास झाला नाही. आता त्याचे लग्नपण झाले आहे. कधी कधी तो गावी येतो आणि त्या जुन्या ही घडलेली घटना फक्त आम्हा तिघांनाच माहित आहे. पण जेव्हा- जेव्हा ही घटना मला आठवते तेव्हा- तेव्हा अंगावर शहारे येतात. ही स्टोरी लिहिताना पण अंगावर आता शहारा येत आहे. आता त्या जागी ते झाड नाही आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कारणाने ते भलेमोठे झाड आता तोडण्यात आले आहे. झाड तोडल्यानंतर तिथे कधीच कोणाला ती बाई परत दिसलीच नाही. आता तिथे ते पिंपळाचे झाड पण नाही आहे आणि नाही त्या बाईचे भूत. कधीतरी तेथून जाताना ते झाड आठवते आणि घडलेला तो प्रसंग डोळ्यासमोर येतो. आणि सर्व आठवणी ताज्या होतात. आयुष्यात अशा काही घटना घडून जातात की त्यामुळे आपण त्या गोष्टी आयुष्यभर कधीच विसरु शकत नाही. ही घटना माझ्या हृदयात कायमची कोरली गेली आहे आणि ती मी कधीच विसरु शकणार नाही.