रोगाची साथ आणि प्राण्यांची सभा
एकदा प्राण्यांमध्ये रोगाची साथ सुरू होऊन हजारो प्राणी मरू लागले. आपण फार पाप केल्यामुळे देवाने हा कोप केला आहे असे सर्व प्राण्यांना वाटून त्यांनी आपली वाईट कृत्ये कबूल करायचे ठरविले व जो सर्वात मोठा अपराधी ठरेल त्याने देवाच्या कोपाला शांत करण्यासाठी बळी जावे असे ठरले. ठरल्या वेळी सगळेजण हजर झाले व न्यायाधीशाच्या जागी एकमताने कोल्ह्याची निवड केली गेली. प्रथम सिंहाने पुढे होऊन कबुली दिली, 'मी फार गरीब कोकरांना ठार मारलं, एवढंच नव्हे तर फार भूक लागल्याने एका धनगरालाही ठार मारून खाल्लं.' त्यावर न्यायाधीश म्हाराज मोठ्या गंभीरतेने म्हणाले, 'एखाद्या सामान्य प्राण्याने अशा गोष्टी केल्या असत्या तर नक्कीच मोठा अपराध ठरला असता. पण महाराजांना इतरांपेक्षा जास्त सवलती असतात. मूर्ख बकर्या नि एकच धनगर खाणं हा काही मोठा अपराध नाही.' या निकालामुळे हिंस्त्र प्राण्यांनी कोल्ह्याची तारीफ केली. यानंतर वाघ, चित्ता, अस्वल वगैरे प्राण्यांनी आपापल्या कबूली दिल्या व कोल्ह्याने वरीलप्रमाणेच निकाल दिला. शेवटी एक गरीब गाढव पुढे येऊन म्हणाले, 'एका शेतकर्याच्या इनाम जमिनीतलं मूठभर हिरवं गवत मी खाल्लं. आणि त्याबद्दल मला पश्चात्ताप' काय पश्चात्ताप ?' न्यायाधीश झालेले कोल्होबा ओरडले. 'अरे पाप्या नक्कीच तुझ्या पापामुळे सध्या हा देवाचा कोप झालेला आहे. यालाच मरणाची शिक्षा योग्य आहे !' असा निकाल कोल्होबांनी देताच सगळ्यांनी मिळून त्या बिचार्या गाढवाला ठार मारले.
तात्पर्य
- बळी तो कान पिळी.