परशुरामाचा पाळणा
जो जो जो जो रे सुखधामा । भक्तपूर्ण कामा ॥धृ॥
क्षत्रिय संहारी रणांगणी । उग्र स्वभाव करणी ।
भारी श्रमलासी खेळणी । उद्धरिता हे धरणी ।
धेनुद्विजांचे पाळणा । करिता अवतारणा ।
तुजला निजवीता पाळता । दीनावरि करी करुणा ॥१॥
देव अवतरले हृषीकेशी । भृगु ऋषीच्या वंशी ।
संगे घेऊनिया विधि हरिसी । रेणुकेचे कुशी ।
सागर सारुनिया वसविले । कोकण जन पाळिले ।
दुष्टा चरणाते दवडिले । यश हे प्रसिद्ध केले ॥२॥
स्वस्थानी जावे भार्गवा । अखंडित चिरंजीवा ।
योगमाया ते करि सेवा । परशुराम देवा ।
हालवी रेणुका पाळणा । गाई त्या सगुणा ।
सखया रामाच्या आभरणा । चुकवी जन्ममरणा ॥३॥