Android app on Google Play

 

बस नावाची संस्था

लग्न हे एक कर्मकांड नसून एक संस्था (institution) आहे असे समजले जाते. प्रतीकात्मक दृष्ट्या लग्न कर्मकांड वाटले तरी वास्तविक दृष्ट्या लोकांनी बायको साठी न भांडता आरामात राहावे ह्या साठी बनवेले गेलेली लग्न हि एक संस्था आहे. अर्थात हजारो वर्षे लागून मानवाने हि संस्था विकसित केली आहे. पण लग्ना सारख्या क्लिष्ट विषयावर भाष्य करण्याची सदर लेखकाची लायकी नाही. दर शनिवारी दूरदर्शन वर दोरेमोन आणि निन्जा हातोरी बघत पिझ्झा खाणार्या माझ्या सारख्या  प्रौढ माणसाने मानवी संबंधावर लिहिणे म्हणजे सन्नी लीवोनीने वटसावित्रीचे व्रत करण्यासारखे होय.

मला एका दुसर्याच संस्थे बद्धल लिहायचे आहे. हि संस्था म्हणजे "बस". बस हा शब्द "ढुंगण टेकणे" ह्या शारीरिक क्रिये इतकाच जुना मराठी शब्द असला तरी आज काल माणसाना कोंडून नेणार्या वाहनासाठी वापरला जातो. बस मध्ये ढुंगण टेकणे ह्या शारीरिक क्रियेला "शीट मिळणे" म्हणतात. गोव्यात प्रयिवेट बस हा प्रकार फारच लोकप्रिय आहे. बस हे नुसते वाहन नसून संस्था आहे असे सदर लेखकाचे ठाम मत अहे. ( सदर लेखकाची सर्व मते एक तर "प्रांजळ" असतात किंवा "ठाम" असतात हे वाचकांनी कृपया लक्षांत घ्यावे. प्रांजळ मत म्हणजे पडद्याआडून स्मितहास्य ठेवून आपल्याकडे बघणारी सुंदर मुलगी तर, ठाम मत म्हणजे आपला विशाल देह घेवून "मात्सो फाटल्यान वच" असे बस मध्ये चढत म्हणणारी मासेवाली ख्रिस्ती बाई, एव्हडाच फरक ह्या दोन प्रकारच्या मतांत आहे. )

बस हि संस्था आहे कारण बस चालवणे हे "सायीकल चालवणे" ह्या प्रकारचे चालवणे नसून "आम्ही सहकारी संस्था चालवतो" ह्या प्रकारचे चालवणे आहे. लहान पणी  बहुतेक मुलांचे "मी मोठा होवून बस चालवणार" असे स्वप्न असायचे. बस चालवणारा तो चालक म्हणजे अर्जुनाचा रथ चालवणारा कृष्णच वाटायचा. गर्दीच्या बस मध्ये केबिन मध्ये जागा मिळवणे म्हणजे तर साक्षात नारायणच्या बाजूला बसून त्याचे न्यान ऐकण्याचा अनुभव असायचा. आधीच गजबजलेल्या रस्त्यावरून चालक जेंव्हा बस चे ते सुकाणू धरून वाट काढायचा तेंव्हा तर आम्हा लहान मुलाना "ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली" ह्याच प्रकारचा चमत्कार वाटायचा. मग जेंव्हा कधी बस देवूळ किंवा चर्च समोरून जायची तेंव्हा हाच चालक त्या परमेश्वराला होर्न रुपी नमस्कार करायचा.  "देवाचिये द्वारी उभा क्षणभरी। तेणे मुक्ती चारी साधियेल्या" असे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगून ठेवले असेल पण दोन पाय आणि दोन हातानी ५०-६० लोकांचे जीव अक्षरशः कोंबून ठेवलेले ते वाहन चालवताना क्षणभरासाठी होर्न वाजवून आपली मुक्ती साधावणारा एकमेव तो हा चालकच होत.

बस म्हणजे फक्त वाहन नसायचे. सरकारी कदंबा बसच्या त्या पांढर्या निळ्या बसमध्ये रंगी बेरंगी private बसी म्हणजे हिजाबी स्त्रियामध्ये बसलेल्या पंजाबी ललना वाटायच्या. प्रत्येक बसची आपली अशी ओळख असायची. नावें तर काय ? "मोर्निंग स्टार" हि मडगाव कारवार  दरम्यान चालणारी सर्वांत जुनी बस संस्था.सकाळी सहा वाजता क्षितिजावर दिसणाऱ्या शुक्र ताऱ्याला पाहून  मंगेश पाडगांवकरनी "शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी" असे प्रेमगीत लिहिले पण तसले प्रतीभेतचे देणे नसलेले आमच्या सारखे पामर मात्र सकाळी सहा वाजता कुडकुडत बस थांब्यावर "आवाज येता रे, येता शी दिस्ता" म्हणत प्रियकराची वाट बघणार्या प्रिये प्रमाणे "मोर्निंग स्टार" ची वाट बघत असत. गावांतील किती विद्यार्थ्यांनी ह्या बस च्या जोरावर शिक्षण पूर्ण केले आणि किती जणांनी शहरांत नोकरी केल्या ह्याला गणना नाही. पण हि बस जेंव्हा बंद पडली तेंव्हा तेंव्हा म्हणे कारवार मध्ये दारूचे भाव वाढले. म्हणजे आपल्या उदरांत विद्यार्थी, सरकारी कर्मचारी आणि मासेवाल्या शिवाय आणखी काय काय गोष्टी हि बस घेवून जात होती ह्यांची कल्पनाच केलेली बरी. ह्या बस शिवाय टायना आणि शुभलक्ष्मी ह्या दोन बसेस त्याच रूट वर चालायच्या. टायना हि वेगात जाणारी एक्ष्प्रेस्स तर शुभलक्ष्मी "ठेविले अनंते तैसेचि राहावे चित्ती असू द्यावे समाधान" ह्या प्रिन्सिपल वर चालणारी धीमी गतीची, प्रत्येक थांब्या वर थांबून थांबून चालणारी मंदगतीची बस होती. ह्या बस च्या तुलनेत अनिल कुंबळेची गोलंदाजी सुद्धा वेगवान वाटत असे. 

थालीपीठ पोह्यांना ज्या प्रकारे मेगी नुडल ने धोबी पछाड टाकला त्याच प्रमाणे ह्या मोठ्या बसीना मिनी बस नावाच्या प्रकाराने मागे टाकले. बस छोटी पण जास्त वेगवान आणि आधुनिक सोयी सुविधा वाली असायची. आधुनिक म्हणजे धक्के कमी आणि सोयी  सुविधा म्हणजे  स्पीकर वाले music. dJ हि प्रकरणे आज काल कूल झाली  आहेत पण त्या काळी तो बसचा चालक DJ असायचा. आणि त्याचे संगीत ज्ञान म्हणजे काय ? Backstreet Boys चे Quit Playing Games with my heart पासून कांटा लागा पर्यंत आणि जगजीत सिंघ चे कोई फरियाद पासून मुकेश चे "चांद सी मेरी मेहबूबा" पर्यंत एकदम काहीही आवाज त्या स्पीकर मधून येत असत.  आमच्या गावांत केबल हे प्रकरण आले नव्हते त्यामुळे MTV वगैरे चेनल  फक्त ऐकून ठावूक होते. त्यात आधुनीक संगीत म्हणजे काय हे त्या DJ चालकाच्या कृपेने आम्हाला समजायचे. हिमेश रेशमिया नावाचा गायक तर साक्षांत ह्या बस चालकांच्या विनंतीवरून देवाने घडविला आहे असे वाटायचे. म्हणजे चेहरा आवाज आणि उच्चार ह्या तिन्ही द्रीष्टीकोनातून हिमेश म्हणजे फोंडा - पणजी रूट वर बस चालवणारा माणूस वाटत असे. सुदैवाने आज काल त्याचा  पत्ता नाही.

आजकाल संगीत क्षेत्राने काय क्रांती केली आहे ह्याची विचारपूस करण्याची ह्या लेखकाची छाती नाही. मिली सायरस चा Wrecking Ball video बघून आणखीन काय काय शक्य आहे हि कल्पना लेखकाने करायचा प्रयत्न केला पण निकी मिनाजच्या Anaconda ह्या गाण्याने लेखकाची कल्पनाशक्तीला "अणु पासोनी ब्रम्हांड एव्हडा होत जात असे, तयासी तुळणा कैसी पाहता पाहता नसे" ह्या पद्धतीने तुच्छ ठरविले. बस ह्या संस्थेचा आणि लेखकाचा सध्या संबंध येत असल्याने सध्याची "dj गिरी" कशी आहे ह्याची कल्पना नाही.

बस ह्या संस्थेतील एक महत्वाचा घटक म्हणजे "थांबा". लग्न संस्थेत सप्तपदीचे  आहे तेच महत्व बस ह्या संस्थेत थांब्याचे आहे. "थांबा" हे क्रियापद असले तरी बस संस्थेत ते नाम असते. प्रत्येक थांब्याचे विशेष नाम सुद्धा असते. केपें शहरांत "कादये कडेन" हा बस थांबा मला विशेष आठवणीत आहे. एके काळच्या ऐतहासिक तुरुंगाला  सरकार आणि इतर लोक विसरून गेले तरी बस संस्थेने मात्र अजरामर केले. बस थांबा आणि बस थांबण्याचा काही संबंद आहे असे कदाचित भोळ्या वाचकांना  वाटेल पण प्रत्यक्षांत ती एक पोपुलर गैरसमजूत आहे. बस थांबा हि एक स्पर्धा असते. रिले मध्ये ज्या प्रकारे पुढचा धावक पळण्यासाठी थांबलेला असतो आणि पळणारा धावक थांबण्यासाठी धावत असतो  असाच काही प्रकार बस थांब्यावर घडतो. सारे प्रवासी बस येयील ह्या पद्दतीने चातकाप्रमाणे बस ची वाट बघतात, बस येते पण थांबत नाही, आधीच्या "देवाचिये द्वारी उभा क्षण भरी " ह्या उक्ती प्रमाणे बस क्षणभर थांबल्या प्रमाणे होते आणि प्रवासी लोक आंत उडया मारतात. आंत पोचताच आधी शिट पकडण्याचा प्रयत्न होतो, व ते नाही तर नंतर वरचे बार. शीट सापडणे म्हणजे साक्षांत ब्रम्ह दर्शन होणे. पण बहुतेल लोकांना फक्त धरण्यासाठी वरील बार सापडत असत. "युगे अठ्ठावीस विटेवरी उभा, वामाङ्गी रखुमाईदिसे दिव्य शोभा ।" असे विठ्ठलाचे तुकाराम महाराजांनी केले असेल पण बस प्रवासी मात्र युगे अठ्ठावीस त्या बारानां लोंबकळत स्वतःचीच शोभा करून घेत असतात. वामांगी असते घामाची दुर्गंधी तर दुअसर्य बाजूला वाहक महोदय "मात्सो भीतर चल रे” म्हणत टोचत असतात. 

बसचा सर्वांत महत्वाचा घटक म्हणजे "प्रवाशी", इतर सर्व business मध्ये ग्राहक हा परमेश्वर स्वरूप असला तरी ह्या संस्थेत ग्राहक हा सर्वांत दुय्यम घटक असतो. बस चे प्रवाशी अनेक प्रकारचे असतात. लहानपणी आई ने सांगितले होते के शेवटचे शिट हे नेहमी उनाड आणि मवाली लोकांचे असते. तेंव्हा पासून शेवटच्या सीटवर बसण्याचे माझा निर्धार पक्का होता आणि संपूर्ण कोलेज शिक्षण पूर्ण होई पर्यंत त्याच सीटवर बसून मी उनाडक्या केल्या. 

समाजवादाच्या गरिबीतून आपला भारत देश हल्लीच थोडाफार सुधारू लागला आहे. सुदैवाने मुक्त अर्थव्यवस्था आमच्या गरीब देशाला चार चांगले दिवस दाखवत आहे. पण तरी सुद्धा बस हे प्रकरण मात्र नेह्री इन्दिरच्या जमान्यातच अडकून आहे. आज सुद्धा बस कोणाचीही असली तरी दर मात्र सरकार ठरवते. दर वर्षी बस प्रवास हा जास्त धोक्याचा, जास्त गर्दीचा आणि कमी दर्जाचा होत चालला आहे.

उलट मुंबई पुणे, मुंबई गोवा इत्यादी मार्गावर धावणार्या बसेस वाट्टेल तो दर आकारू शकत असल्या तरी १०० रुपये पासून १००० रुपये पर्यंतच्या अनेक बसी ह्या मार्गावरून घडवत असतात तसेच आरामदायी सुविधा प्राप्त करून देत असतात. बस संस्था हि फार महत्वाची संस्था अहे आणि आमच्या अर्थव्यवस्थेत तिला मनाचे स्थान असलेच पाहिजे.

अभिरुची मासिक खंड १

संपादक - अभिरुची मासिक
Chapters
लग्न आणि आपण
लग्न आणि आपण भाग २
Abortion. [Serious horror story]
बस नावाची संस्था