अंक पाचवा
प्रवेश पहिला
( स्थळ : रस्ता )
कांचन० : ( वेडयाच्या वेषानें )
पद्य --- ( बारोप्रिया व्यागत )
घट तीन धनानें भरले ॥ नसती ठावे कोणा, गुप्त ते तळघरीं पुरले ॥ध्रु०॥
उरलें कन्याधन करिं पडतां ॥ व्याजवृद्धि वर्षासन येतां ॥ कांहीं थोडया काळे, पाहीन दैन्य मम सरलें ॥१॥
भुजंग बरा झाला कीं त्याच्या गळ्यांत पोरगी बांधतो; आणि राहिलेला हुंडा घेतों चोपून. पण तो म्हणेल दीक्षितांकडून घे आणि दीक्षित आहेत कैदेंत. मग ? बरं यांतल्या रिकाम्या थैल्या किती आहेत ? पाहत नाहींत कुणीं ? ( सोडीत ) जयंताच्याऐवजीं मुलगीच झाली असती तर छान झालं असतं, अरे ! या थैलींत दगड कुणीं भरून ठेविले ! ( हंसून ) बायको म्हणते तुम्हांला वेड लागलं आहे; बाहेर जाऊं नका. ( पाहून ) आली रे आली ! तीच आली. मला खांबाशीं बांधून डागायचा बेत आहे तिचा. हं ! पळातर इथून; त्या देवळांत लपून बसूं.
( रुपया, रुपया म्हणत चिंध्या गोळा करून पळून जातो )
इन्दिरा० : ( धांवत येऊन ) अहो, आडवा हो त्यांना. हं, ठेवा उभे करून, अगबाई ! त्यांनासुद्धां लोटुन देऊन गेले पार ! काय बाई हें वार्यासारखं धांवणं ! मी बायकोमाणूस, पळूं तरी किती यांच्यामागून ! पळूं नये म्हटलं तर हा मेला जीव राहत नाहीं. ( हिरन्यगर्म येतो त्यास ) तुम्ही त्यांना धरण्याकरितां धांबलांत पण ते कांहीं सांपडत नाहींत. ( रडत ) दुसर्याला असा विनाकारण त्रास होतो याचं वाईट वाटतं.
हिरण्य० : त्रास कसला इंदिराबाई ! पण रडतां कां अशा ?
इन्दिरा० : रडूं नको तर काय करूं ! अहो ---
पद्य --- ( मदनतात मनमोहन )
हाल इकडचे पहावया कां आजवरी जगलें ॥ नाहिं अन्न ना स्नान न निद्रा दिवस किती झाले ॥ध्रु०॥
पोरें टोंरें लागति पाठी हसती चिडवीती ॥ ऐकवेनसें बोलति भलतें अति चेष्टा करिती ॥
कोणि मारिती बघवेना हो उपायही हरले ॥१॥
हिरण्य० : इंदिराबाई. तुम्ही आतां घरीं चला. मी त्यांना कांहीं वेळानं घेऊन येतों.
इंदिरा० : घरीं जाऊन तरी काय ! रडायचंच. तुमच्या त्या कोदंडबुवांनीं चांगल्या बुद्धीनंच भुजंगनाथाचं लग्न मोडलं म्हणा, पण आतां ते मेले गांवांतले गळेकापू शास्त्री ! माझ्या पोरीचं लग्न झालं म्हणून बसले आहेत. अहो, त्यांना कोणी चांगला दडपता नाहीं का हो ! ( डोळ्यांस पदर लावून ) मेल्यांनो, नुसत्या अक्षतासुद्धां पडल्या नाहींत आणि लग्न झालं म्हणतां ! या दुष्टाव्याबद्दल देव तुम्हांला खास खास पाहून घेईल रे चांडाळांनो !
हिरण्य० : इंदिराबाई, तुम्हांला अजून कळलंच नाहीं म्हणायचं ! येथील शास्व्यांचा दुराग्रह पाहून माझा मित्र कोदंड शंकराचार्यांकडे गेला होता, तो आज सकाळींत परत आला आणि आतां जगदगुरूंकडून आणलेलं आज्ञापत्र इथल्या ब्राह्मणसमेंत घेऊन गेला आहे.
इन्दिरा० : काय आनलं आहे आज्ञापत्र ?
हिरण्य० : त्यांतला सारांश हा कीं, सप्तपदी झाल्यावांचून विवाह पूर्ण होत नाहीं, ब्राह्मणांनीं धर्मसंबंधांत स्वतंत्र बंडाळी करणं इष्ट नाहीं. हें आज्ञापत्र मान्य न केल्यास इकडून विलंब न लागतां योग्य तो विचार होईल.
इन्दिरा० : आणि हें इतकं सगळं कोदंडांनीं केलं ना ? देवा, त्यांना उदंड आयुष्य दे, आणि त्यांच्या हातून तरी माझ्या शारदेवरचं एवढं अरिष्ट दूर करीव !
हिरण्य० : बरं इंदिराबाई, मीं विचारूं नये, ( चोहोंकडे पाहत ) पण शारदा माझी सख्खी बहीण, आणि तुम्ही माझ्या मातु:श्री. अशा भावानं विचारतों, कीं काल मीं कांहीं ऐकलं तें ---
इन्दिरा० : समजलें. समजलें, तुमच्या कानांपर्यंतसुद्धां आलीना ती गोष्त ! ( रडूं कोसळून ) मेल्या दुर्दैवानं भाजल्यावर डाग दिलान हो ! आतां तर पोरीकडे पाहावत देखील नाहीं. असं वाटतं कीं विष खाऊन प्राण द्यावा ! हेंच जर व्हावयाचं तसं होऊन मग झालं असतं ---
हिरण्य० : इंदिराबाई, हें काय ! वयमनाप्रमाणं घडून येणार्या गोष्टीविषयीं निरर्थक दुःख करून काय होणार !
इन्दिरा० : ( सुस्कारा सोडून ) तेंडि खरंच.
पद्य ---- ( भैरवी : त्रिताल )
नशिबीं असे नच तें ठळे ॥ परि उगिचचि आइचें आंधळें हें खूळें मन तळमळें ॥ध्रु०॥
संकटिं दुसरें संकट हें ॥ कैसें खट आलें ॥ कां रे देवा त्वां मुलिशीं ॥ वैर असें धरिलें ॥
चिंता वाढे शतपट आतां ॥ पति तिस कसा न कळे मिळे ॥१॥
( एकदम सुचल्यासारखें करून ) का हो हिरण्यगर्मं, कोदंडांचं लग्न अजून व्हावयाचं आहे म्हणून ऐकलं, तें खरं का ?
हिरण्य० : मी समजलों हें विचारण्याचा उद्देश ! माझ्यहि मनांत तें कधींच आलं आहे.
इन्दिरा० : पाहा एवढं जर घडवून आणलंत तर बहिणीच्या हातांत तुम्हीं चुडे घातल्यासारखं हिईल. धर्मापरी धर्म घडून वृक्षावर वेल चढविल्याचं पुण्य लागेल.
हिरण्य० : आतां मल जास्त सांगायला नको. पण तुम्ही जातां ना घरीं ?
इन्दिरा० : जातें, देवळांतूनच जातें महणजे झालं. पण मीं म्हटलेलं ध्यानांत राहीलना ?
हिरण्य० : त्याविषयीं अगदीं निश्चिंत असा. ( इंदिराबाई जाते ) काय बिचारीच्या जिवाची त्रेधा चालली आहे ! बरं कोदंड अद्याप कां येत नाहीं ! चला, आपणच त्या सभेकडे जाऊं ( कोदंड येतो त्यास ) कां कोदंडा, कसं काय झालं. सांग लौकर, श्रींच आज्ञापत्र पाहूण शास्त्रीमंडळींचे डोळे उघडले असतील चांगले !
कोदंड : ( प्रवेश करून ) काय वेडा आहेस तूं ! अरे, जे दुराग्रहमदानं अंध झालें. त्यांचे डोळे असे कसे उघडतील ?
हिरण्य० : तर मग काय जगदगुरुंची आज्ञासुद्धां त्यांनीं अमान्य केली !
कोदंड० : नसती केली तरच आश्चर्य ! कारण,
पद्य --- ( अति करुण शरण )
ते कुटिला कपटि काक जातिचे ॥ व्रणविदारणांत निपुण, परिशिलें न ज्यांनिं कानिं नांव सुमतिचें ॥ध्रु०॥
काकाची ती सभाहि ॥ ओरडले कोणि कांहीं ॥ मान्यांना मान नाहिं ॥ निंदक जे स्मृतिचे ॥१॥
हिरण्य० : त्यांचं म्हणणं तरी काय मग ?
कोदंड : हेंच, कीं क्षेत्रस्थांच्या मनाविरुद्ध शंकराचार्यांची आज्ञा आम्हांला मान्य नाहीं. असं म्हणार्यांचाहि मला इतका राग आला नाहीं; पण तो सुवर्णशास्स्त्री मोठय प्रतिष्ठितपणानं म्हणतो, कीं अहो कोदंड ! श्रींची संमति मिळालीच आहे; आतां तुम्हीच शारदेला सनाथ करा म्हणजे झालं. म्हणजे श्रींचीहि आज्ञा पाळल्यासारखी झाली, आणि त्या दीन धेणूचाहि उद्धार केल्याचं पुण्य मिळालं !
हिरण्य० : जाऊं दे मित्रा, दुष्ट तो दुष्टच ! मी तुझी मार्गप्रतीक्षा करीत बसलों असतां, आपल्या वेडया नवर्यामागून धांवत आलेली इंदिराबाई माल भेटली. तुला काय सांगूं ! पतीच्या व कन्येच्या अशा द्विविध दुःखांत ती अद्यापि जिवंत कशी राहिली, हेंच नवल ! त्यांतून शारदेच्या दुःखानं तर तिचं तर ह्रदय अगदीं विदीर्ण झालं आहे !
कोदंड : कां नाःईं व्हायचं ? अरे, माझा आणि त्या शारदेचा कांहीं संबंध नसतां, तिच्याविषयीं मला इतकं वाईट वाईट ; मग ती तर प्रत्यक्ष आईच तिची !
हिरण्य० : आणि मित्रा ! शारदेसाठीं तूं किती श्रम घेत आहेत, हें जेव्हां मीं तिला सांगितलं तेव्हां तर तिचे डोळे भरून आले. तुला दीर्घायुष्य चिंतून, त्यांचंहि लग्न अजून व्हायचं आहे ना ? असं किती आशालभूत दीन मुद्रेनं तिनं मला विचारलं म्हणतोस ! खरंच मंत्रा, तूं आतां तुझ्या पूर्वींच्या प्रतिज्ञेपासून मुक्त झाला आहेस. मग तूंच शारदेचं पाणिग्रह्ण करीनास ?
कोदंड : हिरण्यगर्भा, शारदेची सांप्रतची कष्टमय अवस्था, याच प्रसंगीं ब्राह्मणांनीं तिच्यावर धरलेलं शस्त्र, संध्या लोकांकडून होणारा तिचा उपहास आणि तिची भावी भयंकर स्थिति या सर्व गोष्टी मनांत आणून मी तिचं पाणिग्रहण करण्याला सिद्ध झालों समज; तथापि तिनं माझा स्वीकार कां करावा बरं ! कारण ---
साकी --- ( धन ज्या जवली स्त्री त्याची )
भूमि--सदन--धनहीन असा मी न मला तात न माता ॥
घ्यावें भिक्षापात्र तिनें का वरूनि अशा अवधूता ॥१॥
बरं, क्षणभर अशीहि कल्पना करूम कीं, हें साहस करायला ती तयार झाली; तथापि हे वेदशास्त्रशून्य व्रणान्वेषी ब्राह्यण आम्हां उभयतांचाहि किती छळ करतील याची कल्पना नाहीं तुला ...
पद्य --- ( मोरे लागीं )
नागिणी चपल खलजिव्हा ॥ दुःस्वभावा धरि दावा, चावेल संधि ये जेव्हां ॥ध्रु०॥
सुंदरदाराकरलोमानें ॥ विघ्न विवाही केलें त्यानें ॥ म्हणतिल, लांच्छन तें नांवा ॥१॥
असो, याविषयीं मग बोलूं. पण आधीं आज्ञेप्रमाणं ब्राह्यणसभेंत घडलेला वृत्तान्त श्रींना कळविला पाहिजे, तर चल बिर्हाडीं, पत्र देऊन गोरखाला श्रींच्या मुक्कामीं पाठवून देऊं. ( जातात )
प्रवेश दुसरा
( स्थळ : नदीकांठ )
( शारदा जीव देण्याच्या तयारीनें येते )
शारदा : स्वप्नाच्या नादांत मी किती लौकर या स्मशानाजवळ आलें ! त्या पेटलेल्या चितेच्या उजेडानं अंधुक दिसतो आहे, तोच
डोहाचा खडा, ( चालतां चालतां ) मरणा, लोकांच्या सांगण्यावरून मी तुला आजपर्यंत भयंकर समजत होतें; पण आज अनुभवानं सांगतें कीं ---
पद्य --- ( रडत माझें बाळ )
सदय शान्त अससी मरणा ॥ भीति तुझी वाटेना ॥ध्रु०॥
हीन दीन दुःखी दुबळी ॥ ज्यांस ओस दुनिया सगळी ॥ येति त्यांस घेसी जवळी ॥ प्रेम तुझें आटेना ॥१॥
म्हणुनि मीहि येतें वेगें ॥ मायबाप सोडुन मागें ॥ कर्म फार गांजूं लागे ॥ दुःख पोटिं सांठेना ॥२॥
इतका निर्धार केला, तरी अजून आईकडे मन धांवतं. मी नाहींशी झालें असं कळेल तेव्हां बिचारी दुःखानं धायधाय करील. जयंताला तर चुकल्याचुकल्यासारखं होऊन ‘ अक्का कुठं आहे ग ?’ म्हणून आईला विचारील ! पण जाऊं दे. मायेनंच मनुष्य फसतं. अगदीं डोहांत उडी पडेल अशा ठिकाणीं खडकावर उभं राहावं, आहा ! ही जागा चांगली आहे. ( कांस घालून कंबरेला दगड बांधून ) देवा ! माझ्या आईला. बाबांना, तसंच जयंताला माझा लौकर विसर पडेल असं कर. माझं कल्याण व्हावं म्हणून ते कोदंड किती झटले, त्यांना सुखी ठेव. माते नदी ----
पद्य --- ( दे मला काळि घोंगडी )
जी मला जन्म दे आई, तीहि या काळीं । पारखी झाली ॥ तूं दुजी माय गे माझि म्हणुनि तुजजवळीं तांतडी केली ॥
सप्रेम सुता घे उदरिं फार ही भ्याली । ब्राह्मणीं छळिली ॥चाल॥ समजली प्रीति वडिलांची, काय ती ॥
उमजली नीति शास्त्रांची काय ती ॥ ये वीट कुडीचा बाई नको ही मेली, अमंगळ असली ॥१॥
( दिवा ! आलें रे आलें ! असें ओरडून उडी टाकणार इतक्यांत कोदंड धांवत येऊन तिला धरून ) हां हां हां ! शारदे ! काय करतेस हें !
पद्य --- ( हा प्रभाव सर्वहि )
थांब थांब करिसि असा सात्मघात कां ? ॥ दाटुनि कां घेसि शिरीं घोर पातका ? ॥ध्रु०॥
सोशिलासि दुःखताप तेंचि तप घडे ॥ होसि दिव्य, जळुनि जाय, दुरित सांकडे ॥
जातां कां पडसि बळी नीच अंतका ॥१॥
शारदा : ( कपाळावर हात मारीत खालीं बसून ) अरे चांडाळा दुर्दैवा ! अजून देखील तूं माझी पाठ सोडीत नाहींस ना !
पद्य --- ( चाल कानडी दादरा )
काय मी अभागिनी ॥ मजसि मरुंहि न दे कुणी ॥ध्रु०॥
अससि कोण पुण्यवंत ॥ माझा कां बघसि अंत ॥
ठेवुनि मज जगिं जिवंत ॥ लाभ कुणा काय त्यांत ॥
सोड मला, ऐक विनवणी ॥१॥
कोदंड : शारदे, तूं मला ओळखलंस का पण ?
शारदा : ( न्याहाळून पाहून ) अगबाई १ कोदंडमहाराज ! तर मग माझं स्वप्न होणार कीं काय ! ( उत्कंठेनें ) आपण इथें अकस्मात
कसे आलांत ? माझ्या दुर्दैवानं का सुदैवानं ?
कोदंड : तुझ्या माझ्या उभयतांच्याहि सुदैवानं ! कारण, येथील शास्त्रीभिक्षुकांचं बंड मोडून. आपल्या समक्ष आज सायंकाळच्या सुमुहूर्तावर तुझा विवाह करण्याकरितां, शंकराचार्यांची स्वारी आतांच येणार आहे. म्हणून प्रातःस्नान, संध्यार्चन आटपून घेण्यासाठीं मी गंगेवर चाललों होतों. इतक्यांत कोणी स्त्री स्मशानाकडे चालल्याचा भास झाला. कशामुळें असेल तें असो. परंतु मला तुझाच संशय येऊन, तुझ्या मागोमाग इथपर्यंत आलों, आणि पाहतों तों माझा संशय खराच !
शारदा : तुमच्या संशयाप्रमाणं माझं स्वप्नसुद्धां खरं होणार तर मग ! महाराज, आपला स्वप्नावर विश्वास आहे का ?
कोदंड : अगदीं निदिध्यास लागलेल्या गोष्टीविषयींच्या स्वप्नांतलीं कांहीं स्वप्नां क्कचितकालीं अंशत: खरीं होतात. तुला कोणतं स्वप्न पडलं होतं सांग पाहूं ?
शारदा : अशी अडीच तीन तास रात्र राहिली असेल आणि माझा डोळा लागून असं स्वप्नं पडलं कीं, मी जीव देण्याकरितां नदीवर आलें. आणि आतां अशी उडी टाकणार ( कोदंड झटकन तिचा हात धरतो ) इतक्यांत आपण येऊन माझं असंच पाणिग्रहण केलंत.
कोदंड : झालं तर ! शारदे, हें स्वप्न इतकंच खरं व्हायचं होतं !
शारदा : ( किंचित निराश होऊन ) काय म्हटलंत महाराज ?
कोदंड : असं वाईंट वाटूं देऊं नकोस, कारण जगद्गुरुंनीं तुझ्याकरिता जो वर निश्चित केला आहे, तो एक तरुण, विद्वान , श्रीमंत असून ---
शारदा : ( कानांवर हात ठेवून ) नको नको नको ! तो मेला भयंकर शब्द मला ऐकायलासुद्धां नको. त्याच्याच पायीं माझी अशी दशा झाली. बरं, आणखी एकदां मी आपल्याला विचारतें कीं, नाहीं ना माझं सगळं स्वप्न खरं होत ?
कोदंड : शारदे, कांहीं महत्कार्याकरितां मीं अविवाहित राहण्याचा संकल्य केला आहे. तो मला मोडतां येत नाही.
शारदा : मग माझा निर्धार मला मोडतां येत नाहीं. सर्वस्वीं आपली झालेली ही काया भलत्याच्याच सेवेंत झिजवायची, त्यापेक्षां माशांनीं खाल्लेली काय वाईट ! माझा असा शेवट कां झाला, हें जगाला नीट समजावून सांगा. येतें मी आतां. ( धांवूं लागते )
कोदंड : ( तिला धरून ) शारदे, हें काय ? तुझ्या कल्याणार्थ मी इतका श्रमलों त्याचं हेंच फळ काय ?
शारदा : ( सोडवून घेऊन ) व्हा दूर ! आतां माझ्या अंगाला स्पर्श कराल, तर तो निव्वळ पापबुद्धीनं करतां असं मी समजेन.
कोदंड : ( स्वगत ) स्त्रीहत्येचं महापातक टाळण्याला या प्रसंगीं असत्या बोलल्यावांचून गत्यंतर नाही. (उघड) शारदे, मी तुझं पाणिग्रहण करतों, पण हें साहस करूं नकोस. (तिला अडवितो)
शारदा : ( त्याचा हात दूर करते ) त्या उगवत्या सूर्यनारावण समक्ष वचन दिल्याशिवाय मला खरं वाटायचं नाहीं.
कोदंड : बरं तर
पद्य --- ( जयति जय सुरसरित )
घेइं मम वचन हें सुगुणमणिमंजिरी ॥ध्रु०॥
साच तुज वरिन मी भंगुनिहि मन्नियम ॥ साक्षि अरूनाक्षि, तो विश्वसाक्षी करी ॥१॥
शारदा : ( कंबरेचा धोंडा सोडून ) आणि मीहि माझ्या देहाऐवजीं दुःखाच्या ओझ्याबरोबर या मेल्या दगडाला नदींत टाकतें.
कोदंड : तो पाहा शिंगाचा ध्वनि ऐकूं येतो. जगदगुरूंची स्वारी आली वाटतं. अहाहा ! शारदे, सुप्रभातकाल म्हणजे मंगलकारक खरा.
पद्य --- ( उठि प्रभातमा पोरमा )
हा बालदिवाकर करीं ॥ अंधकारा हरी ॥ दुःख वारी दुरी ॥ बघ तुझेंहि ॥ध्रु०॥
चल शंकरगुरूसन्निधीं ॥ थोर करुणानिधी ॥ प्रणत होउनि पदीं ॥ कळवूं हेंहि ॥१॥
शारदा : ( हात जोडून ) ही मी तयार आहे !
( जातात )
प्रवेश तिसरा
( स्थळ : रस्ता )
बिंबाचार्य व हिरण्यगर्ग बोलत बोलत प्रवेश करतात )
बिंबाचार्य : आम्हीं ऐकलं कीं सायंकाळीं वाद होणार.
हिरण्य० : छे ! छे ! प्रातःकाळीं श्रींची स्वारी मठांत येतांच वादाला प्रारंभ होऊन दोनप्रहरीं समाप्त झाला.
बिंबाचार्य : वादश्रवणाचा असा अपूवं प्रसंग आला असतां आम्हीं दवडला ! अरे अरे ! प्रत्यक्ष गंगाप्रवाहांतील नाहीं तर कावडींतील तरी गंगाजल प्राशन करावं. तुम्हींच त्या वादप्रसंगाचं सुंदर वर्णन करा म्हणजे झालं.
हिरण्य० : मला आतां वेळ नाहीं. कारण शारदा. कोदंडविवाहकाल अगदीं जवळ आला, म्हणून थोडक्यांत सांगतों ऐका. श्रींची स्वारी सभेंत येऊन आसनावर विराजमान होतांच, क्षेत्रस्थांचे प्रमुख जे भट्टाचार्य, त्यांनीं प्रथमत: ‘ वाचादत्ता मनोदत्ता कृतकौतुकमंगला ’
इत्यादि कश्यपवचनाच्या आधारानं पूर्वपक्ष केला.
बिंबाचार्य : वाहवा ! वाहवा ! भट्टाचार्य म्हणजे जाडीच प्रकरण तें ! त्यांचा पूर्वपक्ष ! मग काय विचारावं ! बरं मग ?
हिरण्य० : मग काय ! श्रीसमागमें आलेले रामनंदनाचार्य, ऐका ऐका म्हणून सरसावले पुढें. त्यांची ती भव्य भुद्रा, तो गंभीर कंठ, ती अगाध विद्वत्ता, ती अलौकिक वाकपटुता, तें सूक्ष्म अवलोकन, ती अश्रुतपूर्व स्मरणशक्ति, इत्यादि अद्वितीय गुण पाहून सभा थक्क झाली. पूर्वपक्षाचें खंडन करतांना, प्रसंगानुरूप मनु, याज्ञवल्क्य, देवल, शातातप, नारद, कात्यायन, शौनिक. वसिष्ठ इत्यादिकांना त्यांनीं मूर्तिमंत आणून समेंत उभें केलं, असा भास झाला. रामनंदनाचार्यांचा वाकप्रवाह एखाद्या वेगवान नदीप्रमाणं धो धो शब्द करीत चाललेला पाहून, प्रत्यक्ष जगदगुरुंनींहि मान डोलाविली ! आहाहा ! काय सांगूं, बिंबाचार्य !
पद्य --- ( वाहवा थोर तू भूपाला )
जेव्हां वाद मरा आला ॥ चढलें स्फुरण अधिक त्याला ॥ध्रु०॥
वादरणींचा रणपंडित तो, वीर धनंजय जैसा ॥ स्मृतिशास्त्राचा अक्षय भाता, सारथि सदगुरु सरिसा ॥१॥
व्या हो म्हणुनि वचनसायकां वाकगांडिवा जोडी ॥ ओढी परपक्षावरि सोडी, शिरें तयांचीं पाडी ॥२॥
हठवादी, ते भट्टकटकभट, त्या सन्मुख लटपटले ॥ हटले चुटपुटले, मग उठले श्रींच्या चरणीं तटले ॥३॥
बिम्बाचार्य : अरे, अरे, अरे, अरे ! एकूण भट्टाचार्यांची शेवटीं अशी फजिती झाली ना ? व्हावयाचीच, कारण जंबुकांन सिंहाच्या अंगावर चालन जावं, तसा प्रकार त्यांनीं केला होता. बरं, नंतर काय झालं ?
हिरण्य० : नंतर श्रींचा स्वारी भट्टाचार्यप्रमुख शास्त्रीभिक्षुकांस विवाहमंडपांत येण्याविषयीं आज्ञा करून विवाहाची तयारी कोठपर्यंत आली तें पाहण्याकरितां स्वत: हेरंबमहालांत निघून गेली.
बिम्बाचार्य : शेवटीं देशस्थ शारदा, आणि कोकणस्थ कोदंड, असं हें गंगाजमनी जांडपं होणार अं ! असो, जगदगुरूंनींच निर्णय केला तेव्हां तो आम्हांला मान्य आहे. बरं पण कां हो, अविवाहित राहायचं अशी कोदंडाची प्रतिज्ञा होती ना ?
हिरण्य० : हो, होती. परंतु श्रींनीं आद्यशंकराचार्यांच्या शिवगुरुनामक पित्याची गोष्ट सांगून गृहस्थाश्रमाचं खरं महत्त्व मनांत भरवून व तारुण्यांतील प्रतिज्ञा बहुधा विचारपूर्वक केलेल्या नसतात, असं सप्रमाण सिद्ध करून त्याचं मन वळविलं.
बिम्बाचार्य : तें सगळं यथास्थित झालं म्हणा, परंतु कांचनभटाचं वेड अद्यापि गेलं नाहीं, तेव्हां आज कन्यादान कोणाच्या हातून होणार ?
हिरण्य० : मुलीच्या मातुलाच्या हातून. तो श्रीसमागमें आजच इथं आला आहे.
बिम्बाचार्य : बरं, ते भुजंगनाथहि हिंडू फिरूं लागले म्हणतात, खरं का ?
हिरण्य० : हो हो, वैद्यबुवांनीं त्याला मृत्यूच्या दाढेंतून मोठया शथींनं ओढून काढला. आतां तो श्रींच्या आज्ञेनं चतुर्थाश्रम घेऊन महायात्रेला जाणार आहे.
बिम्बाचार्य : योग्य योग्य ! वृद्धापकाळीं हेंच योग्य ! असं असून बेटा विवाह करायला निघाला होता ! आज ते बिवाहमंडप साजरा करायला येणार असतीलच ?
हिरण्य० : अवश्य, ते तर आलेच पाहिजेत ?
बिम्बाचार्य : मग चल, आपणहि येणार, असा योग तरी पुढं कधीं यावा ?
हिरण्य० : चला, वाद ऐकणार होतां, तो विवाहच पाहा म्हणजे झालं. चला लौकर. या पाहा भटाभिक्षुकांच्या झुंडीच्या झुंडी धांवताहेत दक्षिणेकरितां. ( जातात )
प्रवेश चवथा
( स्थळ : हेरंबमहाल )
( सर्व राजचिन्हानीं युक्त असे श्रीमत जगदगुरु सिंहासनावर विराजमान झाले आहेत, सभाजन हात जोडून उभे आहेत, वैतालिक बिरुदावलि गात आहे )
वैता० : श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्यवर्य, पदवाक्यप्रमाणपारावारपारीण यमनियमासनप्राणायामप्रत्याहारध्यानधारणासमाध्यष्टांगयोगानुष्ठाननिष्ट, तपश्चक्रवर्तीं, अनाद्यविच्छिन्नगुरुपरंपराप्राप्तषटदर्शंनसंस्थापचार्य,
व्याख्यानसिंहासनाधीश्वर, सकलनिगमागमसारह्रदय, सांख्यत्रयप्रति. पादकवैदिकमार्गप्रवर्तक, सर्वतंत्रस्वतंत्र, श्रीमहाराजधानी श्रीमंत राजाधिराज गुरु भूमंडलाचार्य ऋष्यशृंगपुरवराधीशपंचगंगातीरवासकमलानिकेतनकरवीरसिंहासनाधीश्वर, श्रीमत शंकरभगवतपादजान्हवीजनित श्रीविद्यानरसिंहभारतीमहाराज !
जगदगुरु : ( आशीर्वादात्मक नारायण ! नारायण ! असें म्हणून सर्वांस बसावयास सांगून रामनंदनाचार्य येतात त्यांस ) का रामनंदनाचार्य, कोठपर्यंत आलं ? सप्तपदी पूर्ण झाली का ?
रामनंदन० : होय महाराज, सप्तपदी होऊन वधूवरांनीं ध्रुवदर्शनहि घेतलं. आतां जगदगुरुचरणवंदनार्थ, तीं उभयता इतक्यांत इकडे येतील.
जगदगुरु : ईश्वरानं कार्य निर्विघ्नपणें पार पाडलं. रामनंदनाचार्य, या बसा असे. या प्रसंगीं तुम्हीं चांगलं साह्य केलंत, म्हणून तुमच्या अलौकिक विद्वत्तेस अलंकारच अशी ‘ सभामार्तंड ’ ही पदवी संस्थानदेवतेकडून तुम्हांस मिळत आहे, तिचा स्वीकार करा.
( कारकून पत्रिका व महावस्त्र वगैरे रामनंदनाचार्यास देतो )
रामनंदन० --- ( त्यांचा स्वीकार करून ) माझ्या हातून जें अल्पस्वल्प कार्य झालं असेल. तें केवळ याच चरणप्रभावानं होय, अतएव या बहुमानास मी यत्किंचितहि पात्र नाहीं. तथापि प्रसाद म्हणून ---
जगद्गुरु : त्याचप्रमाणं, रामनंदनाचार्थ; आजापासून या संस्थानच्या शास्त्रीमंडळांत अग्रस्थानीं तुमची योजना केली आहे.
रामनंदन० : हा तर मजवर श्रींकडून बहुमानाचा वर्षावच होत आहे !
जगदगुरु : आणि त्याला तुम्ही सर्वतोपरी पात्रहि आहांत ! ( भट्टाचार्यांकडे वळून ) का भट्टाचार्य, असंच कीं नाहीं ! ( भट्टाचार्य हात जोडून कोरडें हंसून मान हालवितो ). ( भुजंगनाथाकडे वळून ) भुजंगनाथ ते तुम्हीच ना ? तुमचा तर पुनर्जन्मच झाला.
भुजंग० : होय महाराज. आणि म्हणूनच आज या महापातक्याला हे जगदगुरुंचं दर्शन झालं; पावन झालों ! आतां अधीं संपत्ति धर्मार्थ आणि अर्धी पुतण्यास देऊन संन्यासी संन्यासी होऊन काशीवास करावा अशी इच्छा आहे.
जगदगुरु : उत्तम आहे ! तुम्हांसारख्यांना हाच उक्त मार्ग !
( इतक्यांत कोदंड व शारदा येऊन जगदगुरूंस साष्टांग नमस्कार करतात. शारदेच्या मौत्रिणी व जयंत तिच्या मागोमाग येतात )
जगदगुरु : नारायण ! नारायण ! नारायण ! नारायण ! कोदंड. आजपासून तुम्ही गृहस्थाश्रमी झालांत. या आश्रमाचे धर्मं तुम्ही जाणतच आहांत, परंतु हेंहि ध्यानांत ठेवा. ---
कोदंड : काय ती आज्ञा व्हावी.
जगदगुरु : ऐका ---
साकी
गृहलक्ष्मी ही स्त्री बहुमान्या सांभाळा प्रेमानें ॥
तसंच शारदे, परमपूज्य पति दैवत तुज हें पूजिं यास नेमानें ॥
गृहसुख तुम्ही ध्यावें ॥ त्यांतचि परसुख साधावें ॥१॥
कोदंड : जगदगुरूंची आज्ञा शिरसावंद्य आहे.
वल्लरी : गडे शारदे. ‘ तुला योग्य पति मिळेल ’ असं कोदंडांनीं तुला संगमनाथाच्या देवळांत आश्वासन दिलं होतं तें त्यांनीं खरं केलं ना ?
( शारदा लाजून खालीं पाहते )
जगदगुरु : अहो भट्टाचार्यप्रमुख. आम्ही या कोदंडपंडितांस इतउत्तर या प्रांताचे धर्माध्यक्ष, व हिरण्यगर्भांस त्याच्या साहाय्यास नेमले आहेत. तर सर्वांनीं त्यांच्या धर्माज्ञेंत वागून, त्यांचा योग्य असा मान ठेवावा.
सर्व --- ( हात जोडून ) जगदगुरूंची आज्ञा आम्हांस प्रमाण आहे.
कोदंड : ( हात जोडून ) महाराज ! आमची योग्यता ती काय, आणि हा अधिकार केवढा !
जगदगुरु : असो ! जगदीशानं आणखी तुमचं कोणतं इष्ट करावं ?
कोदंड : तूर्त हें होवो ---
पद्य --- ( तुम जागो मोहन प्यारे )
जरठें न विवाह करावा ॥ कधिं न जनकें जरठ वरातें तनुजादेह विकावा ॥ध्रु०॥
ही भवदाज्ञा जो नच पाळी ॥ महापातकी स्वकुळा जाळी ॥
लोकनियमनास्तव तत्काळीं ॥ भूपें तो दंडावा ॥१॥
जगदगुरु : तथास्तु ! तथास्तु ! तथास्तु !
( पडदा पडतो )
ईशप्रार्थना
पद्य --- ( हरिलें मन्मन तव सुमुखानें )
सुमंत्रिमंडळ सार्वभौमिनी । सदा यशस्वी विजयशालिनी ।
बहुदिन पालो आर्यमेदिनी । नीति दया समद्दष्टि धरोनी ॥ध्रु०॥
प्रजाहि वागो राजशासनी । सद्धर्माचा आश्रय करुनी ।
अंधाचार विचार विसर्जुनि । सत्याचें द्दढ कवच घालुनी ।
ज्ञानोद्यम हा मंत्र घेउनी । निज कर्तव्या जागो निशिदिनिं ॥१॥
समाप्त