अंक दुसरा
प्रवेश पहिला
( स्थळ : गंगापुरांतील एक रस्ता )
दीक्षित : ( स्वगत ) या क्षेत्रीं येऊन जवळ जवळ महिना होत आला. इतक्या अवधींत आम्हीं काय केलें ? कां, पुष्कळ केलं. पहिली गोष्ट ही कीं, व्यवस्थित वळण बांधून येथील सरकारी हेरंबमहालांत आमच्या श्रीमंतांची स्थापना केली. कांहीं माहिती मिळवून, त्या माहितीला थोडं धोरण जुळवून आणि आंत आमची स्वतःची कल्पना मिसळून श्रीमंतांना शोभण्यासारखं व लोकांना पटण्यासारखं एक नांव शोधून काढलं. तें कोणतं ? तर मंडलेधरकरांचे सापत्न बंधु जयघुंडिराज. या क्षेत्रीं आल्या दिवसापासून विद्वान , शास्त्री, हरिदास, पुराणीक, अशांची योग्य संभावना; तसेंच दानधर्म, अन्नसंतर्पण, इत्यादिकांची गर्दी सुरू ठेवल्यानं श्रीमंतांच्या औदार्याचा चोहोंकडे डंका झडूं लागला. हें सर्व झालं. पण मुख्यकार्या संबंधानं काय झालं ? कां बरंच ? त्या दिशेनंहि या दीक्षितांच्या युक्तीचा जयच होत चालला आहे. श्रीमंत वृद्ध नसून तरणें आहेत, असा लोकांचा ग्रह केला. रूपानं, वयानं, आपल्याला हवी त्यापेक्षां रेसभर जास्त अशी कांचनभट म्हणून एका लोभी भिक्षुकाची लग्नाची मुलगी आहे, असा शोध काढला. त्या कांचनभटाचे स्नेही सुवर्णशास्त्री -- वेटयांचे गुण पाहून मग नांवं ठेविलेलीं दिसतात. त्या शास्त्र्याच्या मध्यस्थीनं कांचनभटाचं मन वळविण्याचं कारस्थान सुरू केलं आहे. मुलगी दिल्यास हुंडा म्हणून पांच हजार; शिवाय त्या भटाला श्रीमंतांचे श्वशुर म्हणूण वंशपरंपरेनं मोठीशी तैनात करून देऊं असं आमिष दाखवायला सांगितलं आहे. हजार वाटांनीं ही गोळीं चुकायची नाहीं, इकडे श्रीमंतांना तर लग्नाचं जसं कांहीं वेडच लागलं आहे. अष्टौप्रहर लग्नाशिवाय गोष्ट नाहीं दुसरी, त्यांचा प्रश्नहि लग्नच, आणि उत्तरहि लग्नच. ( दूर पाहून ) हे सुवर्णशास्त्री कांचनभटाच्या घराकडून आले. बहुधा यश संपादन करून आले असतील. चला, त्यांनाच विचारूं म्हणजे झालं. ( जातो )
प्रवेश दुसरा
( स्थळ : कांचनभताचें घर )
शारदा : ( मनाशी विचार करीत ) खरोखरीच,
पद्य -- ( हिंगण दिपची पदमिण हिंडती : धुमाळी )
बाळपणींचा काळ सुखाचा, आठवतो घडिघडी ॥ तशि नये फिरुन कधिं धडी ॥ध्रु०॥
किति हौसेनें टाकिलि असती त्यांत मागुती उडी ॥ परि दुबळी मानवकुडी ॥चाल॥ मनिं नव्हति कशाची चिंता ॥
आनंद अखंडित होता ॥ आक्रोश कारणापुरता ॥ जे ब्रह्म काय तें मायबाप ही जोडी ॥ खेळांत काय ती गोडी ॥१॥
पण तो काळ हां हां म्हणतां निघून गेला आणि हा मेला काळजीचा काळ येऊन मानेवर बसला. आतांशीं तर मनाला जसे कांहीं विंचू डसून राहिले आहेत. ( इतक्यांत वल्लरी येते )
वल्लरी : काय चाललं आहे इंदिराककू ? वेणीफणी झाली का ?
शारदा : ( सानंद ) या तुम्ही वल्लरी आक्का ! आज कुणीकडे आलं हे उंबराचं फूल ?
वल्लरी : अगबाई तूंच का शारदे ! केवढी मोठी दिसायला लागलीस ! अशी पाठमोरी उभी होतीस, मला वाटलं इंदिराकाकूच उभ्या आहेत !
शारदा : असं वाटलं का ? आणखी नाहीं कांहीं वाटलं ?
वल्लरी : वाटलं असतं, पण उपयोग काय वाटून ? कायसंसं म्हणतात तें ‘ ठिकाण नाहीं लग्नाला, आणि कोण घेईल मुलाला.’ बरं इंदिराकाकू कुठें आहे ? त्यांना अन तुला हळदीकुंकुवाला बोलवायला आलें आहें, आमच्या चंद्रिकेला आज पहांटे मुका मुलगा झाला हो !
शारदा : होय का ? बरं झालं बाई ! पण हें लवकरच नाहीं का झालं ? माझ्यापेक्षां पांच---सहा महिन्यांनीं चंद्रिका लहान असं आई सांगत होती.
वल्लरी : हो, मग लवकर कसलं ! हा चैत्र चालला आहे ना ! झालं तर, वैशाखांत तिला चौदावं लागतं. आणि तूं हिच्यापेक्षां पांच---सहा महिन्यांनीं मोठी ! पण तुझ्या बाबांना तूं अगदीं चिमुकलीच दिसतेस, म्हणून वाटतं अजून स्वस्थ बसले आहेत ? सांभाळ ग बाई ! नाही तर मेलं --- पण मीच एकदां येऊन इंदिराकाकूंना विचारणार आहें. उशीर झाला. जातें आतां. काकू आल्या म्हणजे सांग बरं का !
( जाऊं लागते )
शारदा : अग पण हो, कुंकू तरी लावूं दे. ( करंडा आणण्यास जाते )
वल्लरी : ( स्वगत ) खरंच, ही आधींच उफाडयाची, त्यांतून चौदावं वर्ष लागलेलं आणि लग्नाला तर अजून ठिकाण नाहीं. काय होणार आहें कुणाला ठाऊक ! ( शारदा येउन कुंकू लावते ) येतें बरं का आतां.
( जाऊं लागते )
शारदा : अशीच कधीं कधीं पायधूळ झाडीत जा. पण अगदीं घोडयावरूनच नको बरं का ! ( वल्लरी जाते ) या माझ्यापेक्षां लहान मुलीसुद्धां न्हात्याधुत्या होऊन चांगल्या संसार करायला लागल्या आणि मी अजून अशीच बसलें आहें ! बाबांच्या मनांत आहे तरी काय ? आम्हांला कुणाजवळ उघड बोलतां येत नाहीं, म्हणून समजायचं का राहील ? चंद्रिकेचं व्हायचं तसं झालं. पण तें कळल्यापासून मनांत एकसारखा विचार येऊन मला बाई भय वाटायला लागलं आहे. देवा !
पद्य --- ( सखयांनो दाखवा गे )
कधिं करिती लग्न माझें तुज ठावें ईश्वरा ॥ध्रु०॥
वाढली उंच ही किती ॥ हंसुनि बोलती ॥ नाक मुरडिटी ॥ स्त्रिया परभारी ॥१॥
मैत्रिणी वदति टोंचूनी ॥ शब्द ते मनीं ॥ जाति भेदुनी ॥ सुरीच्या धारा ॥२॥
जनक तो नांव काढिना ॥ माय सुचविना ॥ हौस मग कुणा ॥ कोण झटणारा ॥३॥
तें गंगेवर अंग धुवायला जाणं नको, मुलींशीं खेळणं नको. गाणीं शिकणं नको, देव नको, कांहीं नको, असं वाटायला लागलं आहे.
( इंदिराककू गंगेवरून अंग घुऊन येतात )
इंदिरा० : शारदे, आज तुला मुचकुंदांच्या घरीं कुंवारीण जायचं आहे, जा, लौकर अंग धुऊन ये.
शारदा : आई, मी नाहीं बाई जात कुंवारीण. उगीच थोरी पोरी तोंडाला येईल तसं बोलतात. मला वाईट वाटतं मग.
इंदिरा० : हा मेल्यांनो ! त्या काय म्हणून बोलतात ? त्यांचं तूं घोडं का मारलं आहेत ? आणि तसं वाईट वाटण्यासारखं बोलतात तरी काय ? अजून लग्न कां करीत नाहींत हेंच ना ? आज असं जी कोण विचारील तिला म्हणावं, ‘ होय. मला जन्मभर कुंवार ठेवणार आहेत. त्यांत तुमचं काय खरचतं ?’ घरोघर मातीच्याच चुली म्हणावं. न्हाण आल्यावरसुद्धां लग्नं झालेल्या पोरी जगांत का थोडया सांपडतील ? पण दुसर्याच्या रिकाम्या उठाठेवी करायची इथल्या बायकांना संवयच. जातांना तो दरवाज्याबाहेर जयंत खेळतो आहे, त्याची अंगरखा--टोपी घेऊन त्यालाहि घेऊन जा. आज सोमवार आहे. पण त्याला डूंबूं देऊं नकोस हो फार .
शारदा : ( जात असतां परतून ) पण खरंच आई, तूं अंग धुवायला गेली होतीस तेव्हां चंद्रिकेला न्हाण आलं म्हणूण वल्लरी हळदीकुंकवाला बोलवायला आली होती.
इन्दिरा० : तरी म्हटलं वाजत होंत काय ?
शारदा : पण आई, चंद्रिका माझ्यापेक्षां पांच---सहा महिन्यांनीं लहान नाग ?
इन्दिरा० : तूं अशी बोलत उभी राहूं नकोस, अंग धुवायला जा कशी. दुसर्याच्या घरीं जेवायला जायचं, तें आपलं वेळेवर गेलं म्हणजे बरं. ( शारदा भावाला हांक मारीत जाते ) हें हिनं कशा अर्थानं विचारलंन, तें मला कळत का नाहीं ? पण करायचं काय ? मनांतल्या मनांत जळफळावं आणि स्वस्थ बसावं झालं. हे आमचे पुरुष म्हणजे ---
कांचनभट : ( बाहेरून येऊन ) जयंता, अग शारदे !
इन्दिरा० : ती आतां इतक्यांत जयंताला घेऊन गंगेवर अंग धुवायला गेली आहे.
कांचन० : पण आहेस ना ? झालं तर. अशी इकडे ये पाहूं.
इन्दिरा० : ( दाराशी येऊन ) ही आलें. कां ?
कांचन० : मला किती दिवस एकसारखीं दुमणीं लावलीं होतीस कीं पोरगी वाढत चालली. तिला स्थळ नाहीं का बघायचं, लोक हंसतात; असन तसं, एक हजार गोष्टी. तेव्हां मी तुला काय सांगत होतों कीं, आमची शारदा मोठी भाग्यवान पोरगी आहे; तिचा नवरा आपोआप घरीं चालून येईल; तूं कांहीं काळजी करूं नकोस, असं सांगत होतों ना ?
इन्दिरा० : ( आनंदानें ) तसं आज कांहीं झाले आहे वाटतं ? खरंच आला आहे का कोणी ?
कांचन० : आला आहे:? लोटांगणं घालीत येईल लोटांगणं । आमची मुलगीच तशी आहे ! बरं , पण तूं सांग, कीं तुझ्या अगदी मनाप्रमाणं म्हणजे जांबाई कसा असाला ?
इंदिरा० : मीं काय सांगायचं त्यांत ! इकडे पसंत पडला म्हणजे झालं !
कांचन० : ( तिचे शब्द उच्चारून ) मी काय सांगायचं त्यांत ! इकडे पसंत पडला म्हणजे झालं ! हें हंसत हंसत आतां म्हणतेस, पण मग लागशील धुसफुसायला ! हें नाहीं खपायचं, मी असं म्हणतों, कीं सून पसंत करावी सासर्यानं आणि जांवई पसंत करावा सासूनं, कां, असंच कीं नाहीं ? त्यांतून तुझ्यासारख्या शहाण्या, चतुर सासूनं पसंत केल्यावर तो जगाला पसंत झालाच म्हणून समजावं, लाजूं नकोस. खरं म्हणतों ना मी ? नाहीं तर हा आपला आमचा संबंधा !
इन्दिरा० : ती गोष्ट कशाला आतां ? पदरीं पडलं, पवित्र झालं. त्यांतून मनांत असेल तर दुसरं लगीन करून घ्यायला हात का धरला आहे कुणीं ? मला आनंदच आहे त्यांत !
कांचन० : अरे रागावली ! थट्टासुद्धां समजत नाहीं. हिला. अजागळ रे अजागळ ! अशी बाहेर ये, आणि जांवई कसा पाहिजे तें मन मोकळं करून सांग.
इन्दिरा० : खरं मनापासून विचाराचं असलं तर सांगतें, आणि थट्टाच करायची असेल तर माझी एकटीचीच कांहीं मुलगी नव्हे ती. इकडेहि तिच्या बर्याची काळजी असलीच पाहिजे,
कांचन० : कसं गोड ! गोड !! गोड !!! बोललीस, मी तुला शहाणी, समंजस म्हणतों तें उगीच नव्हे. अग दोघांची आहे, म्हणूनच दोघांच्या विचारानं जो ठरेल तो जांवई पसंत करायचा. म्हणून तर आजपर्यंत लग्न लांबलं. हं, बोल, उशीर होतो.
इन्दिरा० : अगदीं खरं अगदीं माझ्या मनाजोगं ? तर माझ्या शारदेला बिंदी, बिजवरा, तन्मणी, कंठा, चंद्रहार घालणारा असा पालखीपदस्थ नवरा पाहिजे. ‘ हो ’ ‘ हो ’ नको करायला. माझी म्हणून उगीच कांहीं तरी म्हणतें असं नव्हे. माझी शारदा आहेच तशी !
पद्य --- ( राहेना गोविंद राधे )
जरी कुणा श्रीमंताची सून होय शारदा ॥ तरी त्यास साजे ऐशी तिची रूपसंपदा ॥ध्रु०॥
बघुनि तीस आकाशींची चांदणी दिपावी ॥ नाहिं रूपवंती दुसरी हजारांत ठावी ॥
हंसत थोर सरदारांनीं मागणी करावी ॥ परि मला मनचे मांडे चुरुनि काय फायदा ॥१॥
कांचन० : इतकी जर तुझी शारदा उत्तम आहे, तर मग मनचे मांडे कां म्हणतेस ? हें अशक्य आहे, असं तुला वाटतं का ?
इन्दिरा० : हो, अशक्यच नाहीं तर काय ? असं स्थळ मिळायला हुंडा किती भरावा लागेला ? आणि इकडचा सूर्य तिकडे उगवला तरी इकडून कांहीं पैसासुद्धां सुटायचा नाहीं, म्हणून मनचे मांडे म्हणायचे.
कांचन० : आणि माझ्या सुदैवानं हुंडा न भरतां असं स्थळ मिळालं तर ?
इन्दिरा० : मिळालं तर कांहीं मोठंसं नवल नाहीं. माझी शारदा आहेच तशी. तिच्यावरून श्रीमंतांच्या गोर्यागोमटया पोरी अशा ओवाळून टाकाव्यात. राजाला सुद्धा राणी शोभायची ! पण ब्राह्मणाची म्हणून इलाज नाहीं.
कांचन० : हो हो ! आहेच तशी. यांत काय संशय ! आणि म्हणूनच आपण हुंडा न भरतां, उलट मुलीला हुंडा देणारं पालखीपदस्थाचं स्थळ मिळालं तर मग कसं काय ?
इन्दिरा० : मग काय ? दुधांत साखर पडल्यासारखं झालं. उपाशी मागतो भाकर शिळी आणि देव देतो साखरपोळी. पण ही सगळी थट्टा दिसते आहे मला.
कांचन० : आणि शिवाय आम्हांला वर्षाची पांचशें रुपयांची नेमणूक ! ऐकलंस का ? श्वशुर म्हणून !
इन्दिरा० : आतां मात्र ही खास थट्टा. नाहीं तर एखादं मेलं श्रीमंत थेरडया म्हातार्याचं तरी स्थळ असेल. तसं असेल तर नाहीं हो द्यायची माझी मुलगी तसल्या म्हातार्याला !
कांचन० : तूं द्यायची नाहींस. आणि मी देईन का ? माया काय ती तुम्हांलाच वाटतं ? बरं, पालखीपदस्थाचं स्थळ तर तुला पसंत आहे हें तुमचं---आमचं जुळलं. आतां वयानं, रूपानं गुणानं, जांवई कसा असावा, तें सांग म्हणजे झालं.
इन्दिरा० : श्रीमंतीनं असा, आणि गुणानं, रूपानं, वयानं माझ्या मनाजोगा जांवई मिळाला, तर कुळस्वामिनीला बत्तीस पुतळ्यांची माळ करून वाहीन.
कांचन० : पण तुझ्या मनाजोगा म्हणजे कसा तें तरी सांग, म्हणजे सहज त्यांत तुझीहि परीक्षा होईल.
इन्दिरा० : होईना बापडी. पण माझी हौस म्हणजे ---
पद्य --- ( माळिण नवतरणी )
तरुण कुलिन गोरा, हंसतमुख, तरुण कुलिन गोरा ॥ पाहिजे मुलीला चतुर सदगुणी सुंदरसा नवरा ॥ध्रृ०॥
चाल ॥ पुरवील तिची जो हौस सदा बहुपरी ॥ घालील शाल जो मायेची तिजवरी ॥
तिळमात्र तिला जो दुःख न देइल घरीं ॥ विद्वानांत हिरा, चकाकत, विद्वानांत हिरा ॥१॥
कांचन० : शाबास ! शाबास !! शाबास !!! हे तुझे माझे विचार कसे जुळले म्हणतेस ! अगदीं बरोबर ! वाहवा ! लग्न झाल्यापासून असा अहा आजचाच पहिला योग.
इन्दिरा) : हो, कधीं विचारायचं नाही. मग योग तरी मेला कसा यावा ?
कांचन० : बरं, आजच्यानंच कांहीं झालं नाहीं, पण कसा असावा म्हटलंस ? कुलीन, हंसतमुख, सुंदर, पसंत ! पसंत ! अगदीं पसंत ! आणखी कसा ? चतुर असावा, हौशी असावा, वा ! या खुब्या बायकांनाच कळायच्या, विद्वान. माया करणारा, पोरीला दुःख न देणारा, अगदीं योग्य ! पण गोरा असावा म्हटलंस कीं नाहीं इथें मात्र अगदीं घसरलीस. आपल्या शारदेला काळासांवळाच नवरा पाहिजे. म्हणजे उत्तम मेळ बसला. तो तुमच्या -- आमच्यांत नाहीं म्हणुन तर वरचेवर चकमकी झडतात. हा अनुभव असून जर आम्हीं तोच प्रमाद पुढं केला, तर त्यांत काय शहाणपण ? म्हणून म्हणतों कीं ---
पद्य --- ( असा कोणारे मदन तो )
सांवला वर वरा गौर वधुला ॥ नियम देवादिकीं हाचि परिपाळिला ॥धृ०॥
गौर तनु जानकी राम घननीळ तो ॥ रुक्मिणी गोरटी कृष्ण काळा ॥
शुभ्र गंगा नदी सागराला वरी ॥ वीज मेघास ती घालि माळा ॥१॥
इंदिरा० : असो म्हणा, नाकाडोळ्यांनीं चांगला असून, तरुण असून जर थोडा काळासांवळा असला तर मग माझा कांहीं फारसा आग्रह नाहीं.
कांचन०: नाकाडोळ्यांनीं चांगला पाहिजे हें तुझं म्हणणं आम्हांला कबूल. पण तरून म्हणजे काय ? तेवीस--चोवीस वर्षांचा कोंवळा पोरगा ! ही तुझी आवड मला बिलकुल पसंत नाहीं. अग. चोविशीचा सुमार म्हणजे पुरुषांच्या मूर्खपणाचा सुकाळ ! हें सुद्धां माहीत नसावं तुला ?
पद्य
अगदिंच तूं वेडी ॥ वयांत या अविचार मदादिक पुरुषां बहु खोडी ॥१॥
बघसि न दूरवरी ॥ स्वयंमन्य ते, व्यसनी चंचल. बोधाचे वैरी ॥२॥
म्हणसी मी शहाणी, सांग टाकिल्या अशा पिशांनीं रडति किती तरूणी ॥३॥
इंदिरा० : हें मात्र खरं ग बाई ! परवां त्या यज्ञदेवांचय मुलीचं असंच कायसं झालं म्हणे !
कांचन० : मग ! सांगतों काय तुला ? म्हणून म्हणतों कीं, आमच्या शारदेला कमींत कमी निदान तीस वर्षांचा, शांत, पोक्त, विचारी असा नवरा पाहिजे, म्हणजे सर्वमान्य असा संबंधा झाला. तिसापेक्षां चार पांच वर्षं जास्त असलीं तर उत्तमच. म्हणजे काय ? हें मी पदरचं नाहीं सांगत; शास्त्राच आहे असं. ऐक ---
“ चतुर्दशवर्षकन्यां पंचतीसोत्तमो वरा: ।”
म्हणजे चौदा वर्षांच्या मुलीला पस्तीस वर्षींचा वर उत्तम. आणि आपल्या पोरीचं वय तितकंच आहे.
इन्दिरा० : म्हणजे ? माझ्या पोरीला पस्तीस वर्षींचा नवरा ? नको ग बाई ! जाळा तीं तुमचीं शास्त्रंन ते अनुभव.
कांचन० : हेंच तें. धोरण कमी म्हणतों तें हेंच ! शास्त्रवचन सांगितळं तुला. बरं, अजून पोरगी कशी येत नाहीं ? आतां तिला पाहायला ते दीक्षित यायचे आहेत.
इंदिरा० : खरं कीं काय ! अगबाई ! मी म्हणत होतें, तसे जर पोरीच्या अंगावर दोन दागिने करून ठेवले असते. तर नसते का बरं आज उपयोगी पडले ? म्हणजे तितकीच अम्मळ जास्त ह्यानं दिसली असती.
कांचन० : तेंच, तेंच, एकंदरींत धोरणच कमी. अग, आपल्या शारदेला दागिन्यांनीं का शोभा यायची आहे ? हें दागिने कुरूपाला सुरूप करतात. पण सुरूपाला कुख्प करतात. ही शारदा आली पाहा.
इन्दिरा० : आलीस का ? ( शारदा बाहेर येते ) अहाहा ! काय नेसली आहेस पण ? ते वेणीचे केस विसकटले आहेत ! इकडे ये आधीं माजघरांत. मी ते नीट करतें. आज तुला पाहायला यायचे आहेत. समजलीस का ?
जयंत : ( घाईनें येऊन ) बाबा, बाबा, आज नदीवर किनई एक बाई आंधोळीला आली होती. तिच्याबरोबर किनई आक्का भांडत होती हो.
कांचन० : होय ग शारदे ?
शारदा : छे छे ! मी कशाला भांडायला जाऊं ! जयंत मुंजीला मोठा झाला. आणि तुझे बाबा त्याची मुंज अजून कां करीत नाहींत म्हणून मला एका बाईनं विचारलंन , तेव्हां यंदी करणार आहेत म्हणून मीं सांगितलं तिला.
जयंत : नाहीं हो बाबा, खोटं बोलते ही. ती बाई किनई मला म्हणाली, बाबांना विचार, आक्काचं लगीन कधीं करणार म्हणून. मग --- मग आक्का मोठमोठयानं भांडली हो तिच्याशीं ! म्हणाली ---
( इतक्यांत एक शिपाई येउन दीक्षित आले आहेत असें कांचनभटास सांगतो, शारदा आंत जाते )
कांचन० : ( गडबडीनें उठून ) खरं कीं काय ? अग ए, दीक्षित आले. तेवढा तो गालिचा आण आधीं. ते आले बघ. नाहीं तर दोन पाट तरी घे.
( गालिचा आणून देते. गबडीनें पसरतो. दीक्षित, शास्त्री येतात. नमस्कारादि आदरसत्कार होतो. सर्व बसतात )
सुवर्ण० : भटजी, दीक्षितांचा तुम्हांला परिचय नाहीं. फार थोर ! फार योग्य ! महा विभूति आहे.
कांचन० प्रसंगाशिवाय परिचय होत नाहीं. आणि परिचयाशिवाय परीक्षा होत नाहीं. कां, असंच कीं नाही, दीक्षित ?
दीक्षित : असं पाहा, सूर्याच्या तेजानं चंद्र प्रकाशमान होतो, त्यांत त्या चंद्राची काय प्रशंसा करायची ? एका अर्थीं श्रीमंतांच्या छत्राखालीं आम्ही आहोंत. तेव्हां थोरच म्हणायचें. शास्त्रीबुवा, असाच ना अर्थ घ्यायचा ?
सुवर्ण ० : हो, असा घेतला तरी माझ्या विधानाला कांहीं बाध येत नाहीं. याल द्दष्टान्त, उत्तम हिरा सुरर्णकोंदणांत असला म्हणजे त्याचं तेज वाढतं हे खरं, परंतु तो स्वत: तेजस्वीच असतो. कां भटजी ?
कांचन० : वास्तविक आहे. इंद्रावांचून सुरगुरूला महत्त्व नाहीं आणि सुरगुरूवांचून इंद्राला नाहीं !
दीक्षित : कशाचे सुरगुरु आणि कशाचे हिरे ! थोरांनीं लहानांची प्रतिष्ठा वाढविली म्हणजे वाढते, इत्काच त्यांत्ला ग्राह्यांश. असो, शास्त्रीबुवा ---
( संज्ञा करतो. शास्त्री भटजीच्या कानांत सांगतो )
कांचन० : जयंता, जा बाळ. तुझ्या आक्काला घेऊन ये.
शास्त्री : मुलगी काय, हिरकणी आहे हिरकणी ! आपली शिष्टरूढी आहे म्हणून पाहायची. खेरीज भटजींच्या घरचं वळण म्हणजे शुद्ध बाळबोध ! मोठमोठयांनीं कित्ता घेण्यासारखं ! भटजी, मी मिथ्या प्रशंसा करीत नाहीं वस्तुस्थिति विदित केली.
भटजी : कशांचं कशाचं ! आपलं गरिबी जुन्या चालीचं वाडवडिलांनीं घालून दिलेलं संभाविती वळण घटवीत बसलों आहोंत झालें !
दीक्षित : म्हणजेच उत्तम. नाहीं तर मुलगी देखणी, आणि घरची चालरीत नाहीं, काय उपयोग !
जयन्त : ( शारदेस बाहेर ओढीत ) आतां कां, आतां कां येत नाहींस बाहेर ? बघा हो बाबा, ही येतच नाही. आई सांगते तरी येत नाहीं. लाजून उभी राहिली आहे. हात् तशी ! मला लाजरा म्हणतेस नाहीं का ! आतां कसं ! चल, चल !
भटजी : जयंता, सोड तूं तिला शारदे, ये अशी.
( येऊन, सर्वांना नमस्कार करून भटजींजवळ बसतो )
शास्त्री : मुली, तुझ्या नांवाचीं अक्षरं किती आहेत ?
शारदा : तीन.
शास्त्री : पहिलं काय ?
शारदा : शा.
शास्त्री : तिसरं काय ?
शारदा : दा.
शास्त्री : बरं, आतां मधलं अक्षर घालून एका देवाचं नांव घे पाहूं.
शारदा : रमाकांत !
दीक्षित : शाबास, हुशार आहेस, पण शास्त्रीबवा, नांव विचारण्याची ही नवीनच क्लप्ति काढलीत.
शास्त्री : आपला त्यांतल्या त्यांत विनोद ! बरं शारदे, जयंत हा भटजींचा कोण !
शारदा : त्यांचा मुलगा. माझ्या धाकटा भाऊ.
दीक्षित : बरं भटजी. मुलीचं टिपण आहे ना ? ( आणतों म्हणून कांचनभट उठून जातो ) तुम्हांला लिहितां बाचतां येतं का ?
शारदा : बालबोध येतं.
दीक्षित : कुणीं शिकिवलं.
शारदा : मामानं शिकिवलं.
जयंत : आणखी गाणीं छान म्हणते हो. आईनं तिला एका म्हातार्याच्या लग्नाचं गाणं शिकविलं आहेन. कसं छान आहे. त्यांत त्या म्हातार्याची बायकोच पळून गेली आहे. आक्का म्हणतेस का तें ?
शास्त्री : आहे, मुलगा धीट आहे चांगला. आणली काय काय येतं ते तुझ्या आक्काला !
जयंत : आक्का गाणीं करते, येवढी मोठी पोथी वाचते.
शास्त्री : आणि तुला नाहीं का कांहीं येत ?
जयंत : मला नाहीं येत कांहीं. ( भटजी पत्रिका आणून देतो )
दीक्षित : ( टिपण पाहत ) उत्तम ! यांचा देवगण, श्रीमंतांचा देवगणा. यांची आद्यनाडी, आणि श्रीमंतांची अंत्य नाडी. भटजी, पत्रिका उत्तम आहे. शुभग्रह बलवान ! षडाष्टक खडाष्टक कांहीं नाहीं, बरं भटजी, गोत्र ?
भटजी : आमचं गोत्र काश्यप. तें पत्रिकेंत आहेच.
दीक्षित : ( श्लोक पुटपुटत स्वगत ) गोत्र पटत नाहीं. सगोत्र होतं. आतां ? आतां काय, सगोत्र होतं म्हणून सोडायचं नाहीं. भुजंगनाथाची श्रीमंती जशी उसनी, तसं गोत्रहि उसनं घेतलं म्हणजे झालं. या प्रसंगीं ही युक्तित लढवलीच पाहिजे. ( उघड ) भटजी, जुळलं. मला मोठी काळजी होती, शारदाबाई. या. गोरख, तुझ्याजवळ दिलेलं बासन आणि ते पुडे आण. ( आणून ठेवतो ) शारदाबाई, ही शेलारी, हा चोळीचा खण आणि हा खाऊचा पुडा तुम्हांला. आणि जंयाता, हा तुला ! ( देतो ) ( शारदा नमस्कार करून तें घेऊन जाते. जय़ंत , ही घे अक्का पिंवळी बफीं, असें म्हणत नाचत जातो ) मग कसं काय भटजी ? श्रीमंतांच्या संबंधानं शास्त्रीबुवांनीं तुम्हांला संगितलंच आहे. हा संबंध ठरला असं मानायला कांहीं चिंता नाहीं ना ?
भटजी : चिंत्रा नाही. परंतु एकदां आंत जाऊन विचारून येतों.
शास्त्री : ( हळूच ) हें ढोंग आहे. उगीच चंद्रवळ आणतो आहे झालं ?
दीक्षित : तें मीं ओळखलंच. पण बायको विघ्न आणण्यासारखी नाहीं ना ? एरवीं पोरीवर उंची जडावाचे दागिने पडायचे आहेत, तेव्हां तसं करायची नाहीं; पण न जाणों.
शास्त्री : आणि विघ्न आणायलाच लागली तर तिलाहि एखादा उसठशीतसा दागिना द्यायचा केल म्हणजे पडते समजूत. कारण बायकांचं वर्म म्हणजे दागिने. कां भटजी, पडला का रुकार ?
भटजी : पडलाच म्हणायचा, पण एकवार श्रीमंतांना पाहून येण्याचा आग्रह आहे. वायकांची समजत, मीं सांगितलं पाहून येतों म्हणून येण्याचा आग्रह आहे. बायकांची समजत, मीं सांगितलं पाहून येतों म्हणून .
दीक्षित : कांहीं वावगं नाहीं, चला तर, का शास्त्रीबुवा?
शास्त्री : हो, म्हणजे शिष्टाचारहि झाला. आणखी शंकानिसनहि झालं. त्यांतून आंतली शंका ! हो ---
कांचन० : शास्त्रीबुवा, तुम्ही जरा आंत येऊन चला.
दीक्षित : बरं तर. शास्त्रीबुवा, तुम्हीच यांना घेऊन या, मी पुढें होतो, ( नमस्कार करून गोरखास हांक भारतो व चार पावलें पुढें होऊन ) हा भट आतां आमच्या नकली श्रीमंतांना पाहणार म्हणजे करणार तरी काय ? मोठी पंचाईत आली. तेवढी वेळ मारून नेली पाहिजे, म्हणजे बहुतेक निर्धास्त झालों. चला. त्यांची नक्कल नीट पढवून ठेवूं. नाहीं तर करायचे घोंटाळा.
प्रवेश तिसरा
( हेरंबमहालांतील दिवाणखाना, श्रीमंत एकटे बसले आहेत )
श्रीमंत : सार्या जन्मांत स्वसंतोषानं अशी मीं कुणाला एक बोटभर चिंवी, किंवा तांब्याचा तुकडा, किंवा घांसभर अन्न दिलेलं भला स्मरत नाही, तोच मी भुजंगनाथ, या पंधरा दिवसांत, हा भद्रेश्वर सांगेल त्याला, सांगेल तें, आपल्या हातांनीं. घ्या घ्या म्हणून देतों. अमका आला अमुक द्या, ब्राह्मणभोजनं घाला, नैवेद्य करा, अनुष्ठान बसवा, पूजा बांधा, तात्पर्य काय कीं, हें श्रीमंतीचं सोंग सांभाळायला पाण्यासारखा पैसा खर्च होतो पाण्यासारखा. इत्कं महाग कुटुंब करून पुढें निभाव कसा लागावा ! छे, छे, छे !
पद्य -- ( लते खचित तूं प्रियकरणी )
नको विवाहचि हा मजला ॥ सोंग नको हें श्रीमंतीचें, कीर्ति नको सन्मानहि असला ॥ध्रु०॥
धूर्त तो भद्रेश्वर वेंची । द्रव्य किती । या नाहिं मिती । पाहोनि अती । जिव घाबरला ॥१॥
आतां दीक्षित आले म्हणजे असंच सांगणार, ( कांहीं विचार करून ) अरे, पण भलत्याच आवेशांत विवाह नको म्हटलं खरं, पण विवाहच जर केला नाहीं तर कुटुंब कसं मिळणार ? आम्हांला पुत्र कसा होणार ? तसंच दोन महिन्यांच्या आंत लग्न करून सहकुटुंब परत येतों, असं मिशांना पीळ देऊन, मीं माझ्या पुतण्याला सांगितलं तें व्यर्थ होणार, त्याची वाट काय ? तेंहि असो, एक वेळ पत्करलं. परंतु आलों तसाच जर परत गेलों. तर गांवांत पोरांपासून थोरांपर्यंत सर्व म्हणायला लागतील कीं, मोठे लग्न करून घ्यायला गेले होते ! पण म्हातार्याला मुलगी देतो कोण ? ( आरशांत पाहून ) तेच लोक जर आतां पाहतील तर मला म्हातारा म्हणण्याची त्यांची पुण्याई नाहीं. मीं वेडा म्हणून भद्रेश्वरावर इतका रागावलो. ( मिशांवर पीळ देतदेत हंसत हंसत ) शावास आहे त्या भद्रेश्वर दीक्षिताची ! आम्हांसारख्यांचीं लग्नं हवी ती युक्ति लढवून, त्यानंच जुळवून द्यावींत वा कामांत त्याचा हात धरणारा दुसरा मध्यस्थ मिळायचा नाहीं !
पद्य --- ( द्वैत करी ही विनाश अवघा )
मध्यस्थाची असे कुशलता त्याच्या अंगीं पुरी ॥ स्वाहा केलें धन बहु माझें मजला फसवुनि जरी ॥१॥
दंतपंक्ति ही नवी जडविली; युक्ति तयाची खरी ॥ सहज चावतां स्पष्ट बोलतां येतें तरुणापरी ॥२॥
मिशा काजळी कशा दिसति या कलप चोळितां वरी । पाहूं आतां कशी येइना नवरी चालत घरीं ॥३॥
शरीराची तयारीहि बरीच ओत चालली आहे. ( दंडावर बुक्क्या मारून ) हे दंड पंधरा दिवसांपूर्वीं अगदीं मऊ पिसपिशीत लागत होते, तेच आतां वरवंटयासारखे घट्ट लागतात. तशीच ही छातीसुद्धां किती रुंदावली ! या मांडया तर शिसवीच्या खांबासारख्या झाल्या आहेत. आणि इतकं हें सारं झालंच पाहिजे, कारण दररोज खाद्य कसं चाललं आहे ! बैठकी मारायच्या, केहाळेपाक बडवायचा, जोर---जोडी करायची, आटीव दूध झोकायचं. नमस्कार घालायचे, बदामाची खीर चापायची. हो, खरंच वेळ झाली. शामसुंदर ! अरे शाम ! इकडे ये,
शाम : ( येतयेत ) काय आज्ञा आहे ?
श्रीमंत : असात तोंडांतल्या तोंडांत काय पुटपुटतोस ? मोठयानं नाहीं का बोलतां येत ?
शाम : चुकलों यजमान, काय हुकूम आहे ?
श्रीमंत : हुकूम कसला ? कूष्मांडपाक आणण्याची वेळ नाहीं का झाली ?
शाम : यजमानांनीं काल ताकीद केली होती कीं पाक पचत नाहीं म्हणून आणूं नकोस.
श्रीमंत : अरे नंदीबैल. पाक पचत नाहीं म्हणायाला मी का म्हातारा आहे का रे ?
शाम : ( स्वगत ) म्हातारा असून शिवाय मूर्ख आहेस !
श्रीमंत : कां रे ? आतां कां तोंड बंद झालं ! पाक पचत नाहीं असं म्हटलं होतं ?
शाम : ( आर्जवानें ) मला तसं ऐकायला आलं, सरकार.
श्रीमंत : तसं ऐकायला आलं ! जा, बहिरट कुठला, चार वडया घेऊन ये; ( शाम जाऊं लागतो ) पण आधीं ती रंगीत जोडी आण पाहूं. ( जाऊं लागतो ) अरे शाम ! इकडे ये. खरंच सांग, मी म्हातारा दिसतों का रे ?
शाम : ( जवळ येऊन ) भलतंच सरकार ! असाल तर दिसाल !
श्रीमंत : तर मग माझं वय किती असावं बरं ?
शाम : श्रीमंतांचं वय जवळ जवळ तिशीच्या पुढें आणि बत्तिशीच्या आंत; फारच झालं तर बत्तिशी पार पडली असेल !
श्रीमंत : इतकंच, इतकंच, बरं जा, जोडी आणि पाक आणून दे. ( शाम जातो. ) हा म्हणतो बत्तीस, मी म्हणतों चाळीस ! तरी कांहीं म्हातारा नव्हे, बत्तिशी पडली असं ऐकून आलं, तेव्हां म्हटलं या शाम्याला आमचं वर्म कळलं ! पण नाही, चला आतां थोडा व्यायाम करूं. ( उठूं लागतो ) ओय ! ओय ! ओय ! पण ही कमरेची वळ कधीं राहणार ? चोरून शेकतों, तेल चोळतों, तरी कमी होत नाहीं.
( कमरेवर बुक्क्या मारतो इतक्यांत भद्रेश्वर येतो त्यास ) कां दीक्षित, त्या अभ्रकाचं काय केलंत ?
दीक्षित : त्या अभ्रकाचं राहूं द्या. ( आजूबाजूस पाहून ) श्रीमंत, आपल्याला कळवलंच होतं, त्याप्रमाणं कांचनभटांची मुलगी पाहून ठरवून आलों.
श्रीमंत : ( आनंदानें ) काय, पाहून ठरवून देखील आलांत ? कशी काय आहे सांगा पाहूं ?
दीक्षित : काय सांगूं श्रीमंत ! अहाहा ! मुलगी पण मुलगी ! शुद्ध शुक्राची चांदणी चमकत होती. तेरावे सरून चौदावं लागून पांच सात महिने झाले आहेत.
श्रीमंत : ( आंनदानें ) काय म्हणतां ! ठरवा मुहूर्त, बरं, गोरी आहे ना ?
दीक्षित : गोरी नव्हे नुसती ! उजळा घातलेली बावनकशी सोन्याची पुतळी आहे ! फारच, अतिशयच मनोहर १
श्रीमंत : ( घाईनें चुटकी वाजवीत ) हं, चला तर, लागा तयारीला. उशीर नको, उठा, सुहूते ठरवून या.
दीक्षित : श्रीमंत, आतां इतक्यांत कांचनभटजी आपल्याला पाहण्याकरितां येतील. ते येऊन गेले म्हणजे काय तें ठरवूं.
श्रीमंत : मला पाहायला येणार ? खुशाल येऊं द्यात !
दीक्षित : श्रीमंतांनीं अंतरमहालांत जाऊन बसावं. म्हणजे इथल्यापेक्षां तिथं उजेड कमी आहे; आणि तितकं तें आपल्याला बरं, तसंच आपल्याला किंचित कमी ऐकायला. येतं हें त्यांना कळून उपयोगी नाहीं, म्हणून त्यांना कांहीं विचारूं नका. आणि त्यांनीं कांहीं विचारलं तर धोरणानं माझ्याकडे वोट करा. ते येऊन जाईतों भागवताची पोथी पाहत बसा, मला जी बतावणी करावयाची ती मी करतों. बरं, श्रीमंत, मग चला तर आंत जाऊन बसा. इतक्यांत येतील ते. मी बाहेर जाऊन वसतों. ( जातो )
श्रीमंत : खुशाल येऊं देत असं मीं जोरानं सांगितलं खरं, पण इतक्यांतल्या इतक्यांत छाती धडधडायला लागली हें काय ?
कामदा
मी नसे जरी भ्रम जातिचा ॥ भास कां असा होत भीतिचा ? ॥
समयिं जो न भी पुरुष तो खरा ॥ उक्तिविषयिं या किंतु ये अरा ॥
( जातो )
प्रवेश चवथा
( स्थळ : रस्ता )
कोदंड : मला एक मोठा भ्रम होता, कीं या भुजंगनाथरूपी वृद्ध अस्वलाला आपली मुलगी देणारा चांडाळ या क्षेत्रांत, त्यांतून ब्राह्मणांत तरी कोणी निघणार नाहीं ! परंतु इथल्या एका कांचनभटानं तो माझा भ्रम दूर केला. वाहवारे कांचनभट ! अरे, सात्त्विक जनकाचा अपल्यरस्नेह कुणीकडे ! आणि लांढग्यासारखी ही तुझी स्वमावनिष्ठुरता कुणीकडे ! शिवशिव ! खरोखर ---
पद्य --- ( करि दळो बारो कामिनो )
मज गमे ऐसा जनक तो ॥ मांग साचा ॥ध्रु०॥
मुख सुरकुतलें, मस्तक पिकलें ॥ शरीर रोगांनीं पोखरिलें ॥
स्मशान ज्यानें सन्निध केलें ॥ त्या प्रेताला दुहिता विकितो ॥१॥
क्रूराधम हा जनक कशाचा ॥ अप्रत्यमक्षी व्याघ्र मुखाचा ॥
वास नसावा जगीं अशाचा ॥ नवल हेंच यम यास विसरतो ॥२॥
बरं, मुलींत कांहीं व्यंग आहे ? तेंहि नाहीं, हा जितका दुर्गुणी, त्यापेक्षां ती शतपट सदुगुणी, हा जितका कुरूप. त्यापेक्षां ती सहस्त्रपट सुरूप. अहा ---
पद्य - ( आनंद सागरम् )
बिंबाधरा, मधुरा विनयादिगुणीं मनोहरा मधुरा ॥ध्रु०॥
ती सुंदरा ॥ विगुणा बरा ॥ घटिता विधि पी काय सुरा ॥१॥
असो. तिला आश्वासन दिल्याप्रमाणं आपलं कर्तव्य करावं, तर आतां ----
दिंडी
भेटतों मी जावोनि भुजंगाला ॥ बोध करितों साधार कांहिं त्याला ॥
सुदैवानें वळल्यास कार्य झाले ॥ न तरि करणें तें पाहिजेच केलें ॥१॥
( जातो )
( स्थळ : दिवाणखाना )
श्रीमन्त : कांचनभट आम्हांला पाहायला आले होते, त्या प्रसंगीं भद्रेश्वर दीक्षित होते म्हणून वेळ निभावली; नाहीं तर आमची जरा धांदल उडाली असती. तो भट तर आमची श्रीमंत पाहून अगदीं गार होऊन गेला. आतां फक्त मुहूर्तनिश्चय व्हायचा अवकाश कीं आम्ही पुन्हा सहुकुटुंब झालों. मग काय ? अरे पण हां हां हां !
पद्य --- ( मन रमो सगुणागजवदन नामे )
मन किती उताविळ घेत धांब ॥ कधिं वरिन नोवरी हीच हांव ॥ध्रु०॥
स्त्रीसह केव्हां निघेल येथुनि ॥ केव्हां पुनरपि बधिन गांव ॥१॥
दावुनि भार्या मम वैर्याला ॥ त्वावरि केव्हां करिन डाव ॥२॥
पुत्रवंत होवोंनि कधीं मी ॥ गाजवीन लोकांत गांग ॥३॥
कोदंड : ( येऊन मानपूर्वक नमस्कार करतो )
श्रीमन्त : ( आनंदानें ) या. बसा, आमच्या लग्नाचं ठरलं; कळलंच असेल तुम्हांला ?
कोदंड : हो, कळले श्रीमंत; आणि त्याचसंबंधानं ---
श्रीमन्त : ऐकून तर घ्या आधी. दीक्षित म्हणतात, ठरलेली मुलगी अशी आहे, कीं प्रत्यक्ष अप्सराच !
कोदंड : ( हात जोडून ) आणि म्हणूनच एक विनंति करावयाची आहे.
श्रीमन्त : समजलों काय विनंति करणार ती. मुहूर्त ठरवून लग्नसमारंभ एकदां लवकर उरकून घ्या, हीच ना ? माग त्यांत विनंति कशाला ? मीच तुम्हांला सांगतों कीं, या कामांत श्रमाकडे पाहूं नका, खर्चाकडे पाहूं नक, होईल तितकी घाई करून एकदां शुभमंगल होऊं द्या. काय समजलांत ?
कोदंड : पण या विषयाचा आपण चांगला पोक्त विचार केला आहे का ?
श्रीमन्त : अहो ! हें लग्न एकदां उरकून टाका; मग सावकाश विचार करूं,
कोदंड : आधीं क्रिया आणि मग विचार ? छे ! छे ! आपण ही लग्नाची कल्पना सोडून द्या.
श्रीमन्त : ( आश्चर्यानें ) काय ? लग्नाची कल्पना सोडून द्या ? आणि घरा कसली ? ( इतक्यांत दीक्षित व सुवर्णशास्वी येता ) काय चमत्कारिक आहां हो तुम्ही ! ऐकलंत का दीक्षित ? अहो शास्त्रीबुवा ! कोदंड सांगतात कीं, लग्नाची कल्पना सोडून द्या ! कशी आहे मसलत पुराणिकबुवांची !
दीक्षित : पुराणिकबुवाच ते ! त्यांना काय या विषयाचं ज्ञान ! “ भीष्मांनीं जे आहेत्ते दहा बाण सोडले, आणि द्रौपदी शोकाकुल होत्साती महा आक्रोश करती झाली बरं काय त्या कालाचे ठायीं जे आहेत्ते ! ” यांचं काम !
सुवर्ण० : यांत काय संदेह ! त्यांतून यांची स्मश्रु नुकती कुठें द्दश्यमान व्हायला लागली आहे. अनुभव तो दूरच आहे !
श्रीमंत : मी त्यांना असंच उत्तर देणार होतों इतक्यांत तुम्ही आलांत म्हणून थांबलों.
सुवर्ण० : कोदंड, शास्त्र प्रतिपादन करतं कीं, प्रसंगोपात्त भाषण करूनसुद्धां विवाह जुळबावा. आणि तुम्ही जुळलेल्यांत व्यत्यय आणतां ! योग्य ! स्तुत्य उद्योग !
कोदंड : ( स्वगत ) हें दोघांचं त्रिकूट जमलं. आतां आपली मात्रा चालायचं कठीणच दिसतं. तथापि, दोन वळसे देऊन पाहू. ( उघड )
श्रीमंत, मी आपल्याला हिताची गोष्त सांगतों; ती न ऐकाल तर जगाच्या उपहासाला पात्र व्हाल !
श्रीमंत : जगाशीं आम्हांला काय करायचं आहे ? आम्ही आमचे स्वतंत्र आहोंत. बस्स ! आम्ही लग्न करणार !
दीक्षित : छान, छान ! श्रीमंतांनीं अगदीं समर्पक उत्तर दिलं. का शास्त्रीबुवा ?
सुवर्ण० : तें काय विचारावं ? श्रीमंतांचं उत्तर म्हणजे गदाच ती ! प्रहाराबरोबर चूर्ण व्हायचं. ( हंसतात )
कोदंड : वा ! काय प्रशंसा चालली आहे ! श्रीमंत, पुन्हा एकवार सांगतों कीं, यांच्या प्रशंसेला भुलून माझ्या शब्दाचा अव्हेर करूं नका !
श्रीमंत : फार भय घालतां हो ! तर मग आम्ही लग्न करणारच !
कोदंड : श्रीमंत ! प्रसंगीं शब्दांतला जोर आपल्या उपयोगी पडायचा नाहीं; म्हणून सांगतों, कीं तुमच्यासारख्यांनीं लग्न करण्याचा काय परिणाम होतो तो जगांत नीट डोळे उघडून पाहा; आणि हा ---
पद्य --- ( गजानना करना )
नका करूं अविचार ॥ भार्या नूतन वृद्धपणीं ती व्याधिच देते ताप अपार ॥ध्रु०॥
क्षीर सुवेसम ती क्षुधिताला ॥ परि न पचे त्या क्षुधा न ज्याला ॥ तरूणी सुखदा तरूणाला ॥ जरठा करि अपकार ॥१॥
शक्ति नसोनी मुक्त हातीं ॥ धरितां प्रवल हिरावुनि नेती ॥ जरठ पतीची तीच गती ॥ घ्या मनिं यांतिल सार ॥२॥
सुवर्ण० : यजमान, आपण कांहीं वृद्ध नाहीं, तेव्हां यांचा निषेध आपल्याला तर लागू पडतच नाहीं. पण अहो कोदंड ! तरुणाप्रमाणं सशक्त असून जर एखाद्या वृद्धाला विधुरदशा प्राप्त झाली तर त्यानं द्वितीय, तृतीय नाहीं चतुर्थ संबंध सुद्धां कां करूं नये ?
श्रीमंत : हेंच विचारणार होतों मी. हो. वृद्ध असून निःशक्त असेल तो लग्नाच्या यातायातींत पडेल कशाला ? कां हो दीक्षित. असंच ना ?
दीक्षित : अगदीं असंच ! आणि तरुण असून शक्ति नसेल. तो तरी कशाला पडेल !
श्रीमंत : बरोबर ! बरोबर बोललांत. कारण ---
पद्य --- ( विधितनये पाव गे )
बळ ज्याचें त्यास तें ॥ मंथनविष जग जाळित सुटलें, विण्णु न घे, विधि तोहि न घे, शिव सहजीं पचवि तें ॥ध्रु०॥
वयोवृद्ध परि त्या शंभूनें ॥ उगाचि कां, जी कुमारिका, वरिलें त्या गौरिते ॥१॥
शक्ति तशी माझ्याही अंगीं ॥ म्हणुनि हवी स्त्री तरूण नवी ॥ यांत चुके कोणतें ॥२॥
दीक्षित : वाहवा ! वाहवा ! शास्त्रीबुवा, ऐकलंत श्रीमंतांचं भाषण किती पोक्त, किती साधार, किती जोराचं आणि किती स्पष्ट आहे ! या भाषणानं मंद मनुष्याचं सुद्धां समाधान झाल पाहिजे !
कोदन्ड : अहो दीक्षित ! अहो शास्त्रीबुवा ! केवळ कविकल्पनाधार जी देवादिकांची मानवी कृति तिचा गूढार्थ मनांत न घेतां ती आधारभृत धरून तदनुसार मनुष्यांनीं वागणं म्हणजे केवढा मूर्खपणा, हें या श्रीमंतांना नको, परंतु तुम्हां दोघांना तरी कळलंच पाहिजे. कारण तुम्ही दीक्षित, आणि हे शास्त्रीबुवा ! अहो, गोपिकांचा आधार घेऊन इतर स्त्रिया जर जारकर्म करूं म्हणतील, तर तें तुम्हांला मान्य होईल का ?
सुवर्ण० : ( ओरडून ) जितं जितं ! दीक्षित, थांबा, मी देतों याचं उत्तर. अहो कोंदड. ‘ न स्त्री स्वातंत्र्यमर्हति ’ हें शास्त्रवचन आपल्या श्रवणपुटांत कथीं प्रविष्ट झालं आहे का ?
( श्रीमंत व दीक्षित आनंदानें ‘ वाहवा ’ म्हणून टाळ्या वाजवितात )
कोदंड : शास्त्रीबुवा, असा कोलाहल केल्यानं पक्षाचं मंडन होत नाहीं, तुम्ही सांगतां तें वचन माझ्या श्रवणपुटांतच नव्हे तर अंत:करणपुटांत सुद्धां मीं सांठवून ठेवलं आहे. परंतु एक डोळा यमपुरीकडे आणि दुसरा स्मशानाकडे ठेवलेल्या थेरडयानं तरूण कुमारीशीं विवाह लावा, अशी, शास्त्रीची तरी स्पष्ट संमति आहे का ?
सुवर्ण० : नसेल. पण निषेध तर नाहीं ना ? यद्यपि असला तथापि शास्त्राद्रूधिर्बलीयसी !
कोदंड : म्हणजे स्त्रियांना तेवढे शास्त्राचे कडक निर्वंध आणि पुरुषांना मात्र पुरुषांनीं स्थापन केलेल्या शिथिल रुढी, हा कोणता न्याय ?
दीक्षित : हा पुरुषसत्तान्याय, असंच का म्हणा ना ? होय कीं नाहीं, शास्त्रीबुवा ?
सुवर्ण० : नाहीं; नाहीं, दीक्षित मी म्हणतों हा अन्नोदरन्याय, म्हणजे जावत्कालपर्यंत हें उदर आहे तावत्कालपर्यंत त्याला अन्न हें पाहिजेच.
श्रीमन्त : त्याचप्रमाणं आम्हीं आहोंत तोंपर्यंत आम्हांला बायको ही पाहिजेच !
सुवर्ण० : अहाहा ! श्रीमंतीनीं अगदीं उत्तम रामवाण निर्णय केला. ‘ शुन: कपाले लगुडप्रहार; ’ याच न्यायाचा या कलिकालांत अवलंब केला पाहिजे, का कोदंड, मुख म्लान झालं ? शंकासमाधान होऊन प्रत्यय आला वाटतं ?
कोदंड : आला: परंतु तो कशाविषयीं ? तर वीतभर पोटाकरितां तुम्ही उभयतां कोणतंहि निंद्य कर्म करायला चुकणार नाही, याचा आल ! आतां मी जर तुम्हांला श्वानवृत्तीचे म्हणेन, तर त्यांतहि तुमचा गौरवच केल्यासारखा होईल. कारण त्याच्या ठिकाणीं प्रामाणिकपणा हा तरी एक मोठा गुण असतो; परंतु ---
पद्य --- ( मम गौरीही कूपि कशि न मी )
श्वानाहुनि अति नीच तुम्ही रे, स्वार्था मांजरसे टपतां ॥ जंबुकगुरु जनवंचनकामीं ॥ साधुबकापरि वरि दिसतां ॥१॥
वेदशास्त्रसंपन्न म्हणवितां ॥ केलि मुखोद्रत ति गीता ॥ तत्व तयांतिल कळे हेंच का ॥ सत्यपराङमुख कां होतां ॥२॥
श्वान नाचतें पुच्छ घोळितें, चाटि अंग तुकडयाकरितां ॥ तसें नाचतां आर्जव करितां, रुचे समर्था तें वदतां ॥३॥
तो म्हणे अश्व वृषभाला ॥ तुम्ही मान तुकवितां त्याला ॥ तो म्हणे अहो रवि मेला ॥ लावितां पदर डोळ्यांला ॥
मी कसा तरुण रंगेला ॥ म्हणतांचि मदन अवतरला ॥ नरनंदी हे लक्ष्मीनंदन ॥ त्यांत भोंवतीं तुम्हि जमतां ॥
श्वान काक बक ढोंगी सोंगी ॥ दिवटी त्याच्या करि देतां ॥४॥
दीक्षित : कोदंडा, मर्यादा सोडून चाललास ! शुद्धीवर ये ! कुणाला काय बोलतोस ? कृतघ्ना, विपत्काळीं तुला आश्रय दिला, त्याचे हे उपकार फेडतोस काय ?
कोदंड : तो आश्रय परोपकारबुद्धीनं दिला नाहींस, तूं रचलेल्या कपटनाटकांत माझा उपयोग होता, म्हणून दिलास १
श्रीमन्त : ( सभय ) हा विषारी साप आमच्यावर उलटल्यासारखा दिसतो ! याचे दांत पाडले पाहिजेत, नाहीं तर हा दंश करील. हो दंड करील !
कोदंड : अरे जा ! श्रीमंताचं सोंग घेणार्या थेरडया, ढोंग्या भुजंगनाथा , आतां एका क्षणांत तुझी श्रीमंती झाडून टाकतों पाहा !
श्रीमन्त : ( घाबरून ) हा पाहा दीक्षित, हा पाहा काय म्हणतो तें ! याला कांहीं तरी द्र्व्याची लांलूच दाखवा.
दीक्षित : ( बाजूस ) श्रीमंत, आपण घाबरूं नका असे. काय करायचं त्याची योजना मीं पूर्वींच करून ठेवली आहे. ( उघड ) अहो कोदंड, झालं तें गेलं. आतां बोलूनं नका. हवं तर श्रीमंतांच्या लग्नाबरोबरच तुमचे लग्न करून टाकतों. हवी तर नवरत्नांची एक मुरेखशी कंठी गळ्यांत घालतों. बोला, कोणतं पसंत पडतं ?
कोदंड : चल, भाषण करूं नकोस ! तुला स्वतःसारखेच सर्व दिसतात ! माझं ऐकायचं असेल, तर लग्नाचा नाद सोडून या नंदीबैलाला घेऊन आतांच्या आतां या क्षेत्रांतून चालता हो. असं न करशील, तर तुझ्या कारस्थानाचा एका घटकेंत सर्व क्षेत्रभर डंका वाजला म्हणून समज !
श्रीमंत : ( बाजूस ) दीक्षित, होय म्हणा ! हें लग्न नको आणि ही भानगड नको. चला, आलों तसे मुकाटयानं परत जाऊं. हवं तर मी बोलतों. अहो कोदंड. तुमच्या म्हणण्याप्रमाणं आम्ही निघून जातों आणि पुन्हा मेलों तरी लग्नाचं नांव काढणार नाहीं अशी शपथ घेतों.
दीक्षित : श्रीमंत. हें काय ? तुम्ही स्वस्थ बसा, कोदंडा, या दीक्षिताला अजून तूं चांगला ओळखला नाहींस, तुझ्यासारख्या कच्च्या पोराच्या दटावणीला मी भीक घालतों काय ? तूंच हें क्षेत्न सोडून या क्षणीं चालता हो, नाहीं तर तुज्यावर हवं तें कुभांड रचून तुला इथलं कारा-गृह दाखवीन. कोदंड : दाखविशील. कारण ---
कोदंड : दाखविशील. कारण ----
पद्य --- ( फिरवि वदन )
तूं पापी अधमाधम खलकषाय, निंद्य जगिं तुज काय ॥ मूतिंमंत तूं अपाय, संग्रहघट कुमतीचा हा त्वदीय काय ॥ध्रु०॥
करुनि विविध पातकांस ॥ भोगिति जे नरकवास ॥ प्रमुख त्यांत व्हावयास ॥ कोण तुजशिवाय ॥१॥
( जाऊं लागतो )
दीक्षित : अहो कोदंड, थांबा ! ( हात धरून ) सर्पाला दुखवून जिवंत सोडीन, इतका मी भोळा नाहीं. या, या हेरंबमहालाच्या गारशा तळघराचं तर थोडं सुख घ्या. छे छे ! आतां ही धडपड --- अरे गोरख, कानीफ ( ते येतात ) चला; या चोराला चतुर्भुज करून तळघरांत नेऊन टाका.
( ते पुढें सरतात )
कोदंड : अरे, तुम्ही मला बांधून नेणार तर न्या, परंतु आधीं या नीचाचा प्राण घेतों. मग न्या.
दीक्षित : बघतां काय ! ओढून घेऊन चला. ( ओढूं लागतात )
कोदंड : ( जातांना ) घ्यानांत ठेव. तुला या दुष्कर्माबद्दल झाडा देण्याचा प्रसंग लवकरच येईल ! ( त्यास घेऊन जातात )
दीक्षित : बरं बरं ! पाहूं म्हणे ! बरं श्रीमंत, मी या शास्त्रीबुवांना घेऊन इथले एक अधिकारी परिचयाचे झाले आहेत, त्यांना भेटून याची काय व्यवस्था करावयाची तें ठरवून येतों.
सुवर्ण० : थोडा तरी सुवर्णप्रयोग करावा लागेल.
दीक्षित : पण मग अगदीं निर्धास्त.
श्रीमंत : ठीक आहे. कांहीं करा, पण याचं तोंड पुन: उघडणार नाही असं करा.
दीक्षित : तें माझं काम चला. शास्त्रीबुवा. ( जातां जातां ) प्रथमत: असं करूं, आणि असं नच जुळलं तर तसं करूं. ( जातात )
श्रीमन्त : शावास आहे आमच्या दीक्षितांची ! याला म्हणावं प्रसंगावधान. नाहीं तर आम्ही ! हें तुमचं कपट बाहेर फोडतों असं कोदंड म्हणाला मात्र, आणि इकडे माझ्या जिवाची काय त्रेधा झाली, ती फक्त मलाच ठाऊक. ईश्वराला सुद्धां कळली नसेल !
साकी भरे कांपरें, भ्रमे द्दष्टि ही, जीभहि गेलि सुकोनी ॥ दीक्षितरायें लाज राखिली संकट तें टाळोनी ॥
आशा लग्नाचीं । झाली प्रबळ पुन्हा अमुची ॥१॥ ( जातो )