अंक चौथा
प्रवेश पहिला
( स्थळ : कांचनभटाचें घर )
कांचन० : या अलीकडच्या पोरी म्हणजे मोठया धाडसी ! त्या शुभंकराच्या मुलीला पोरीपोरींनी सहज म्ह्टलं कीं तुला नवरा पाहिला आहे तो बायकांसारखं बोलतो. हें ऐकल्याबरोब तिनं जाऊन जीव दिला ! तसं जर कांहीं वेडा आमच्या पोरीच्या डोक्यांत शिरलं तर आमचं हुंडायाचं, तैनातीचं, आणि त्यावर श्रीमंत होण्याचं मनोराच्या जागच्या जागीं ढांसळून जायचं. तें कांहीं नाहीं. आजचा आणि उद्यांचा दिवस डोळ्यांत तेल घालून पोरीला जपलं पाहिजे, एकदां तिच्यावर अक्षता पडून आमच्या पदरांत पुरी रक्कम पडली, म्हणजे अर्धा निश्चिंत झालों. मग तिनं कांहीं केलंन तरी फार तर तैनातीलाच गोता बसेल. ( आंत पाहून ) काय ग ए, आज तरी जेवली का नीट ?
इन्दिरा० : ( बाहेर येऊन ) हं, जेवली म्हणजे काय ! मीं, तसंच तिच्या मामानं किती आर्जवं केलीं, तेव्हां कुठें अळंबळं दोन घांस खाल्लेन . माझा दादा म्हणत होता. --- आपलं बोलणं झालं तें सांगते. असं कांहीं खेंकसायला नको अंगावर ! तो म्हणत होता, पोरीला जर त्या स्थळाचा इतका तिटकारा, तर काय रक्कम घेतली असेल तितकी मीं देतों. त्यांची त्यांना देऊन टाका, आणि दुसरं स्थळ पाहून मी माझ्या भाचीचं लग्न करणार ! यांत काय गैर आहे त्याचं म्हणणं ?
कांचन० : काय गैर नाहीं ? आं ! हा पाहा ठरावाचा पक्का कागद झाला. आतां देवाला तरी फिरेल का लग्न ? तूं एक शहाणी, आणि तुझा दादा सात शहाणा !
इंदिरा० : आतां एक मेला झाला असेल कागद. पण मी त्याच्या अगोदरपासूनच ओरडतें आहे ना ? तिकडे कुणीं लक्ष दिलं होतं ?
आधींच आतांशीं पोरगी काळजीनं अगदीं अशी झाली आहे, त्यांतून आज दोन दिवस अन्न सोडलंन आणि उद्यां जर कांहीं भलतंच मनांत आणलंन तर मग कसं होईल ?
कांचन० : अग, म्हणूनच तुला सांगतों, कीं काय शहाणपण असेल तें दाखवायचा हाच प्रसंग आहे. आजन उद्यां तिला संभाळ, कीं आपलं काम झालं. हें लग्न ठरवून मलासुद्धां पश्चात्तपांत पडल्यासारखं झालं आहे ! आहे कुठं ती ?
इंदिरा० : बसली आहे मागीलदाराच्या खोलींत.
कांचन० : मीच जाऊन तिची कांहीं समजूत काढतों. ( जाटो )
इंदिरा० : पण हें पाहा. तिला माराबिरायचं नाहीं हो, सांगून ठेवतें. अगोदर हें असं कांहीं तरी वेडयासारखं करायचं आणि मग पश्चात्तापांत पडायचं ! कसला मेला स्वभाव आहे कुणाला ठाऊक !
( जाते )
प्रवेश दुसरा
( शारदा आपल्याशीं बोलत आहे )
शारदा : मीं किती नको नको म्हटलं, तरी काळ कुठं ऐकतो आहे ? त्याचा आपला क्रम चालायचाच. पंधरा दिवसांचे आठ झाले, आठांचे चार राहिले, आणि चारांचं एकावर आलं. आजचाच दिवस काय तो मधें, आणि उद्यां ? उद्यां काय ---
पद्य --- ( राम मही प्रणतपाल )
लग्न नव्हे मरण उद्यां ॥ ठरलें तें टळत नाहिं ॥ध्रु०॥
मातेची धरिलि कास ॥ परि तुटली तीहि आस ॥
नवस बोलिले शिवास ॥ अजुनि कसा वळत नाहिं ॥१॥
ईश काळजी हरील ॥ तुजसि योग्य पति वरील ॥
वदला जो पुण्यशील ॥ तोहि कुठें कळत नाहीं ॥२॥
हें बाबांचं द्रव्याचं वेड मला भोंवतं आहे आणि हे वेड घालविणारा मांत्रिक म्हणा, वैद्यराज म्हणा, या जगांत तरी कुणीं नाहीं म्हणतात. अशा मनुष्याचं मन रडण्यानं पाझरत नाहीं, कीं ममतेनं द्रवत नाहीं, भयानं भीत नाहीं, कीं रागानं डळमळत नाहीं. मग आतां करूं तरी काय ? असं अन्नपाणी सोडून मरण येईल म्हटलं, तर झिजत झिजत कधीं काळानं येईल तेव्हां येईल ! तंवर बाबांचा मतलब साधून किती तरी दिवस होतील. म्हणून एकदां वाटतं, कीं अगदीं तिखट, कड, झोंबणार्या, चरका बसणार्या शब्दांनीं माज्या मानांत काय आहे तें एकदां त्यांच्या तोंडावर बोलून टाकावं. फार झालं तर रागावतील, भारतील, जीव घेतील ! म्हणजे सुटेन तरी एकदाची ! पण असं कुठलं व्हायला ! तो मेला हुंडा येईल ना मघें ! ( आंत पाहून ) पाण हे बाबाच इकडे आले. अगबाई ? डोळे कां पुसताहेस ? माझ्याबद्दल वाईट वाटून कीं काय ? भलतंच ! माजघरांतून इकडं येतांना धूर लागून पाणी आलं असेल झालं !
कांचन० : ( येतयेत ) बाळे, काय करते आहेस ?
शारदा : प्रेम अधिक कीं पैसा अधिक, याचा विचार करतें आहे. पण बाबा, डोळे कां पुसतां ?
कांचन० : हा कन्याविरह मोठा कठीन आहे !
शारदा : बाबा ! किती कठीन असला, तरी तुचच्या मनापेक्षां तर कठीण नसेल ना ?
कांचन० : मुली, काय सांगूं ! कसं देऊं याचं उत्तर ! तुला मुलंबाळं होऊन अनुभवानंच कळेल तेव्हां कळेल. तुला लहानाची मोठी केली, अशक्ताची सशक्त केली, अज्ञानाची सज्ञान केली, आणि उदईक मीच तुला दुसर्याच्या स्वाधीन करणार, हा विचार मनांत येऊन, वरचेवर असं भडभडून येतं कीं काय सांगूं ! तूं तिकडे श्रीमंतीच्या वैभवावर लोळू लागशील; तुझं ठीकच आहे. पण उद्यां तूं गेलीस म्हणजे, बाळे ! माझं घर उदास दिसायला लागेला !
( रडूं लागतो )
शारदा : दिसायला लागेला खरंच; पण बाबा, एवढा सोन्याचा गोळा यायचा आहे, त्याच्याकडं पाहून कसं तरी दुःख गिळून टाका झालं ! काय करणार ! शिवाय त्याच सोन्याच्या प्रकाशानं घरहि चांगलं शोभिवंत दिसेल नाहीं ?
कांचन० : हें हें तुझं कुचकं बोलणं ! माझं अंत:करण किती कोंवळं आहे, हें तुला माहीत नाहीं, मी तुझं लग्नसुद्धां करणार नव्हतों, पण ब्राह्मणांच्या मुलींचीं लग्नं झालींच पाहिजेत, असं शास्त्र आहे, तिथं इलाज नाहीं !
शारदा : आणि ब्राह्मणांच्या मुली म्हातार्यांना विकाव्या, असंहि शास्त्र आहे, नाहीं बाबा ?
कांचन० : ( स्वगत ) ही फारच बोलायला लागली ! दाखवूं का एकदां नारसिंह अवतार ! पण नको ! अवघे दोन दिवस उरले आहेत. ( उघड ) तूं वाटेल तें बडबड, पण मीं तुला श्रीमंतांना द्यायची केली, ती केवळ तुझ्या सुखाकरितां !
शारदा : हो हो ! यांत काय संशय ! तशी मी लाडकीच आहें तुमची. पण बाबा, त्यांना देण्यांत असं कोणतं सुख पाहिलं आहे माझं ?
कांचन० : कोणतं सुख ? अग नोकरचाकर, दागदागिने, खाणंपिणं वस्त्रपात्र यांचं सुख घेशील तें निराळंच, पण या तुझ्या गरीब बापाला दारिद्यांतून काढशील हें केवढं सुख होईल तुला ! वेडी कुठली !
शारदा : खरंच वेडी मी ! बाबा, तुमचं दारिद्य दूर करण्यासाठीं देवानं मला तुमच्या पोटीं घातलीन , हें इतके दिवस माझ्या घ्यानांतच आलं नाहीं ! तेव्हां एक नव्हे शंभर वेडी ! आणि तुम्हींच जतन करून वाढविलेली तुमची मुलगी तुम्हीच विकणार, त्यांत वाईट तें काय ! पण मेली माझी पोरबुद्धि ! म्हनून मला उमज पडला नव्हता. आतां माझं कांहीं म्हणणं नाहीं, एक मात्र करा कीं ---
पद्य --- ( लक्ष्मी प्रभूसी म्हणे )
मागिल जन्मींचें, अतांचें, मी ऋण देणें असेल तितकें फेडून घ्या तुमचें ॥१॥
तुमचें मजवरचें, असें तें, प्रेम धनाचें, नव्हें मनाचें, कळलें मज पुरतें ॥२॥
पुढच्या जन्मिं तरी शिरावरि, भार न ठेवा, हे मानिन मी उपकारचि भारी ॥३॥
कांचन० : समजलों, तात्पर्य समजलों स्वांतलं, आमचं करणं वावगं असं एकदां तुझ्या मनानं घेतलं आहे, पण लग्न होऊन दोन मुलं झालीं म्हणजे त्यांना पाहायला येईन तेव्हां देईन याचं समर्पक उत्तर, हे माझे आतांचे शब्द विसंरू मात्र नकोस, बरं का ?
शारदा : तें मी विसरेन म्हटलं तरी व्हावयाचं नाहीं. मात्र मुलं पाहायला याल, कीं काय असेल नसेल त्यासकट मला परत घरीं घेऊन जायला याल, येवढं पाहायचं आहे.
कांचन० : बरं बरं ! ( जातो )
शारदा : इतकं लावून बोललें, तरी कांहीं नाहीं, खरंच आहे; किती पाणी घातलं तरी वटलेल्या वृक्षाला का पालवी फुटणार आहे ? ( दचकून ) अगबाई ! हें पाय आपटीत आपटीत कोण येत आहे ? मामा, हें काय ? तूं इतका संतापलेला कां दिसतोस ?
मामा : कोण नाहीं संतापायचा ? तुझ्याकरितां तुझ्या बापाचीं मीं इतकी आर्जवं केलीं, पण त्याला माझी कांहींच किंमत नाहीं.
शारदा : मामा, कशाला गेलास बरं त्यांचीं आर्जवं करायला ? मीं आतां माझ्या अद्दष्टांत काय असेल तें भोगायला अगदीं तयार झालें आहे. ( रडत ) प्रत्यक्ष चितेबरोबर जरी माझं लग्न लावलं तरी मी बोलायची नाहीं.
मामा : तें कां पण ? मी जिवंत असतांना तूं इतकी निराश कां होतेस ? माझ्याहि अंगांत ईश्वरानं सामर्थ्य दिलं आहे. चल, मी करणार तुझं लग्न.
शारदा : म्हणजे काय मामा ? मी नाहीं समजलें !
मामा : अग, तुझ्या बापाला मीं सांगितलं, त्या श्रीमंतांकडून काय रक्कम घेतली असेल. ती परत करा. तुझ्याजवळ नसेल तर मी देतों; मी दुसरं चांगलं स्थळ पाहून स्वतःच्या खचीनं लग्न करतो; पण ता म्हातार्याला मुलगी देऊं नका. परंतु तुला काय सांगूं शारदे ! तुझा बाप म्हणजे प्रत्यक्ष ब्रहाराक्षस ! मला काय म्हणतो, ‘ माझ्या मुलीच्या लग्नांत तुम्हांल बोलायचं कारण काय ? मीं ठरविलेलं स्थळ तुम्हांला आवडत नसेल, तर आलांत तसे चालते व्हा !’ हे त्याच्या तोंडचे शब्द ऐकले मात्र, आणि काय झालं तें झालं ! त्याच ठिकाणीं मनांत निश्चय केला मात्र, आणि काय झालं तें झालं ! त्याच ठिकाणीं मनांत निश्चय केल कीं, तुझ्या आईबापांना न विचारतां माझ्या घरीं नेऊन दुसरं उत्तम स्थळ पाहूण तिथं तुझं लग्न करायचं. बोल, हा माझा विचार तुला पसंत आहे कीं आहे कीं नाहीं ?
शारदा : माझ्यासाठीं तुझं मन इतकं कळवलून, माझं कल्याण व्हावं म्हणून हा निश्चय केलास, हे माझ्यावर तुझे डोंगराएवढे उपकार झाले; पण हा तुझा विचार अम्मळ कसासाच दिसतो मला.
मामा : कां ? त्यांत काय गैर दिसतं तुला ?
शारदा : अरे, आईबापांना न कळवितां मुलीनं निघून जायचं हें तुला तरी बरं दिसतं का ? वडिलांनीं दिलेल्या ठिकाणीं माझं कांहीं झालं तरी लोक मला दोष द्यायचे नाहींत, त्यांना माझी दयाच येईल. पण तूं सांगतोस तसं केलं, आणि जरी मोठया सुखांत पडलें तरी लोक माझी जन्मभर निंदाच करतील.
मामा : या कामांत लोक तुला खास खास नांवं ठेवणार नाहीं. आणि ठेवायलाच लागले. तर मी सांगेन त्यांना काय सांगायचं तें .
शारदा : ( रडत ) असं कसं म्हणतोस, मामा ! चांगल्यालासुद्धां लोक नांवं ठेवतात, मग वाइटाला का ठेवायला राहतील ? त्यांतून आम्हां बायकांच्या नांवाला इतकी देखील दांडगाई खपत नाहीं. अगदीं पारिजातकाच्या फुलाहूनसुद्धां नाजूक आमचं नांव. म्हणून हात जोडून सांगतें, मामा, ही गोष्ट पुन्हा काढूं नकोस. माझे बाबा मला विकोत. विहिरींत लोटोट. अन्नावांचून मारोत कीं पुरून ठेवोत: पण तूं म्हणतोस तसं कांहीं माझ्या हातून व्हावयाचं नाहीं, म्हणून सांगतें ---
पद्य --- ( कन्यकासीं आम्हां )
कोणि कांहीं नका शिकवुं आतां ॥ दोष लावूं नका व्यर्थ ताता ॥
देइ हातें मला तात ज्यासी ॥ लग्न होतांचि तो देव मजसी ॥१॥
( जाते )
मामा : जा, तूं तरी त्याचीच पोरगी कीं नाहीं ? मीच इथें राहत नाहीं. मब मागें कांहीं कां होईना ! ( जातो. )
प्रवेश तिसरा
( स्थळ : हेरंबमहाल )
श्रीमन्त : कोण आहेरे पहार्यावर ? घटका भरली की नाहीं अजून ?
पहारेकरी : नाहीं सरकार. थोडा अवकाश आहे.
श्रीमंत : इतका वेळ झाला तरी अजून अवकाश आहे ? ( खिडकींतून पाहून ) हा सूर्यंसुद्धां मघाशीं होता तिथंच आहे ! कांहीं नादांत गुंतून चालायचं विसरला कीं काय ? एकच दिवस राहिला आहे. पण किती सावकाश चालला आहे.
पद्य --- ( हट जावो )
पल घडी, दिन भासतसे ॥ दिनहि वर्षसा दीर्घ दिसे ॥
त्यांतुनि आम्हां पोक्त वरांना ॥ पळ जाई तो प्राण असे ॥१॥
शाम : ( आंत जाऊन ) सरकार, एकानं हा लखोटा आणून दिला ; आणि तो आपणच स्वत: वाचून पाहावा, अशी त्याची इच्छा आहे.
श्रीमंत : ( लखोटा घेऊन ) कोण तो ?
शाम : हें मी त्याला विचारणार होतों, इतक्यांत तो निघून गेला. सरकार.
श्रीमन्त : बरं, तूंहि जा निघून, बाहेर उभा राहा. हांक मारीन तेव्हां ये. ( शाम जातो. श्रीमंत लखोटा उघडून पाहतात व उपनेत्र लावून वाचूं लागतात ) “ हा एक प्रासादिक फटका, वाचून येईल रागाचा झटका, पण यांतील अनुभव नसे लटका. ” असा काय फटका आहे, तो वाचून तरी पाहूं ---
फटका
भल्या माणसा दसलाखाची गोष्ट सांगतों फोडुं नको ॥ पन्नाशीची झुळुक लागल बाइल दुसरी करूं नको ॥
भटें तटें तीं फुगा फुगवितिल त्यांच्या नादीं फुगूं नको ॥ सगे सोयरे भीड घालतिल परी भरीला पडूं नको ॥
कळी कोंबळी तुला कशाला पिशापरी ती खुडूं नको ॥ थोडी उरली कळ सोसावी पोर कुणाची नाडुं नको ॥चाल॥
कुणीं खुलविला खुलूं नको ॥ तरणा म्हणतां झुलूं नको ॥ फसव्या पाण्या भुलूं नको ॥
तुझें तूंच अवसान ओळखी भोल्यावरती चढूं नको ॥ फुकट तमाशा लोक पाहतिक दहांत हांशा पिकवुं नको ॥१॥
( रागानें कागद फाडीत ) काय उपदव्यापी लोक आहेत पाहा ! म्हणे पन्नाशीची झुळूक लागली दुसरी बाइल करूं नको. आणि भोवल्यावर चढूं नको आणि तुझं तूंच अवसान ओळख ! अरे शहाण्या ! अवसान ओळखल्याशिवायच का इतका पैसा उधळला ? आणि सांगतो, ‘ थोडी उरली कळ सोसाची. ’ फुकट उपदेश करायला यांचं काय जातं ! आमचे हाल आम्हांलाच टाऊक ! शामसुंदर, चल ये इकडे असा. ( तो जातो ) हं, हे घे तूं आणून दिलेल्या फटक्याचे तुकडे. असाच जा, हे सगळे जाळ, आणि याची राख नेऊन नदींत फेंकून दे. हंससोस काय ? जा आधीं. ( तो जातो ) पळून गेलेला कोदंड परत येऊन त्यानं तर ही टवाळी केली नसेलना ? चला, दीक्षिताला बोलावून आणून विचारूं. ( जातो )
प्रवेश चवथा
( दीक्षित येतो )
दीक्षित : इतक्या बंदोबस्तानं तळघरांत कोंडून ठेवलेला कोदंड ज्या दिवशीं आमच्या हातावर तुरी देऊन निसटून गेला, त्याच दिवशीं आमची ग्रहदशा फिरली ! पण ग्रहदशा म्हणण्यापेक्षां आमचीच अक्कल गेली असं का नाहीं म्हटलं ! कारण धोतरांत निखारा बांधावा त्याप्रमाणं कोदंडाला बाळगला हाच मूर्खंपणा केला. आज तो फिरून गांवांत आल्याची बातमी लागल्यापासून कांहीं भलभलतींच स्वप्नं पडूं लागलीं आहेत. प्रसंग तर असा बिकट आला आहे. कीं बोलून सोय नाहीं. दोघेहि आमच्या अंतरंगांतले इथले मोठे अधिकारी एकाएकीं स्थानभ्रष्ट झाले; आणि त्यांच्या जागीं आलेले शुद्ध तुळशींपात्रं ! त्यांनासुद्धां या दीक्षितानं डागळलं असतं; पण अवकाश नाहीं उरला. आज संध्याकाळीं लग्न. हें लग्न निर्विघ्न पार पडलं त्र आमची मध्यस्थी, बक्षीस, संभावना, वगैरे वगैरे पुष्कळच आहे. जर का कोदंडानं मध्येंच येऊन बिब्बा घातला तर, सगळंच आटपलं ! तेव्हां संध्या असा प्रश्न आहे कीं, भुजंगनाथ चतुर्भुज होणार कीं आम्ही होणार ? भुजंगनाथ चतुर्भुज झाला म्हणजे सहकुटुंब झाला. तर दोघांचंहि साधेल; आणि आम्ही चतुर्भुज झालों, त्र दोघांनाहि बाघेल. तें कांहीं नाहीं; भुजंगनाथ मरेना तिकडे ! आपण आपला बचाव केला पाहिजे. आणि याला उत्तम मार्ग “ य: पलायते !! ” पण हा भित्र्याचा मार्ग ! आपण प्रसंगाला तोंड देऊन युक्तिप्रयुक्तीनं आपला बचाव करणार ! कारण लाभ होण्याचा संभव आहे तो कां दवडा फुकट ! त्यांत शहाणपणा एवढाच करावाहीर, कीं या दीडदोन महिन्यांत हातचलाखीनं जें जडजवाहीर. सोनंनाणं आम्हीं अद्दश्य केलं आहे, तेवढं कुटुंबापाशी पोंचेल असं करावयाचं. मग दुर्दैवानं इकडे आम्हीं कैदेंत पडलों तरी बेहेतर । हो, एवढ ब्रह्मदेव ! तो सुद्धां कैदेंत पडला होता, मग आमची काय कथा ! बरं, हें काम सोपविण्याजोगा विश्वासू हुषार मनुष्य आपल्या जवळ कोण आहे ? आपला कानीफ ? छे ! तो विश्वासू आहे पण अडाणी ! कोणीं कांहीं विचारलें, तर मतलब संभाळून जाब दोणारा नव्हें, बरं, गोरख्याच्या जागीं ठेवलेला तो गंगाप्रसाद ? अंहं ! तोहि कुचकामाचा ! हुषार आहे, पण अतिशय पापभीरू. यांत त्याला कांहीं संशय आला तर भलतंच करून बसायचा, राहतां राहिला शामसुंदर ! आहा ! योग्य आहे. कारण ब्राह्यण आहे, चला; प्रथम त्याला चांगला सुवर्णमंत्रानं भाऊन, त्याच्या स्वाधीन ती पेती करून द्यावा पाठवून. तूर्तातूर्त हाच घाट बरा दिसतो.
( पडद्यांतून कोणी हांक मारतो, त्यास ‘ आलों ’ म्हणून जातो )
प्रवेश पांचवा
( स्थळ : रस्ता )
जान्हवी : ( मोठयानें ) अग वल्लरी ! चल कीं ग लौकर, तासभर नटणं चाललं होतं , तरी आणखी काय राहिलं आहे ?
वल्लरी : ( येतयेत ) अग बाबांनीं हांक मारली, म्हणून दरवाज्यापर्यंत आलेली पुन्हा परत गेलें, बरं, श्रीमंतांच्या लग्नाबद्दल तुला कांहीं गुणगुण कळली आहे का ?
जान्हवी : नाहीं ग बाई ! कसली गुणगुण ?
वल्लरी : ( मागें पाहून ) दम धर, हे मागून ब्राह्मण येत आहेत ते जाऊं देत म्हणजे सांगतें.
( चार पांच ब्राह्मण बोलत येतात )
शितिकंठ : अहो पुष्करभट ! तो कोदंड म्हणून या श्रीमंतांजवळ पुराणिक होता तो ! तो कांहीं आजच्या लग्नांत घोंटाळा करणार आहे म्हणे !
पुष्कर : खरं कीं काय ? करणारच असेल तर त्याला म्हणांव लग्नाची दक्षणा आटपल्यावर मग तरी कर ! कारण ही दक्षणा कांहीं चकारीं पकारीवर भागायची नाहीं, किमान पक्ष ( पांच बोटें दाखवून ) बाणसंख्या तर खरी ?
कौस्तुभ : चला तर तिकडेच जाऊं, लग्न झालं तर दक्षणा मिळतेच आहे आणि कांहीं घोंटाळाच झाला तर तीच मौज पाहूं ! इथं काय ! आम्ही सांगूनसवरून भिक्षुकबच्चे ! बारसं असो कीं बारावा असो, आम्ही आपले आहोंतच ! ( जातात )
वल्लरी : हें ऐकलंस जान्हवी ? आणि बाबांनीं मला हांक मारून हेंच सांगितलं.
जान्हवी : असं जर कांहीं होऊन लग्न मोडलं, तर खरंच, मी साखर वांटीन देवाला ! पण सुवर्णशास्त्री यायचेच आहेत ना लग्नाला ?
वल्लरी : अंहं ! ते आतांशा तिकडे जातच नाहींत, काय तर दीक्षितांचं आणि बाबांचं माडीवरल्या खोलींत केवढं भांडण झालं म्हणतेस ! मी दाराशीं कान लावून ऐकत होतें, बाबा त्यांना म्हणाले, कीं मुकाटयानं ठरल्याप्रमाणं आज संध्याकाळच्या आंत काय ती व्यवस्था झाली पाहिजे, नाहीं तर मी हें सगळं प्रकरण कोतवालींत देईन.
जान्हवी : हा काय घोंटाळा आहे ईश्वर जाणें, यांत यांत त्या बिचार्या शारदेचं कांहीं वाईट होऊं नये, एवढंच माझं देवापाशीं हात जोडून मागणं आहे.
वल्लरी : खरंच, कुठला मेला तो तोतया थेरडा श्रीमंत इथं आला ! आणि त्याला आपली पोंरगी विकायची कांचनभटाला तरी कुठली दुर्बुद्धि झाली कोण जाणें बाई !
जान्हवी ; मधाशीं तुंगा तिच्याकडून आलेली भेटली -- कुणाला बोलबायला चालली होती वाटतं. ती सांगत होती, कीं शारदा गौरीहरापुढें बसून रडते आहे सारखी ! पूर्जकडे कांहीं तिचं लक्ष नाहीं.
वल्लरी : बरोबरच आहे, गौरीच्या नि हाराच्या पूजेकडे तिचं लक्ष लागेल तरी कसं बरं ! कारण ----
[ पद्य --- ( ‘ दक्ष धुरंधर प्रलय भयंकर ’ या चालीवर )
हिमतनग जो पाषाणह्रदय तो प्रसवे कन्यागौरीला ॥ निष्ठुरतेचा अवगुण त्याचा अंगिं तिच्याही तो आला ॥१॥
स्वयंवरीं पाहोनि जियेनें म्हातारा शिव पति केला ॥ भक्ति तिच्यावरि जडेल कैशी योग्य नव्हे ती पूजेला ॥२॥
जान्हवी : ती तर त्या वेळीं अल्लडच होती म्हणा, तेव्हां तिला इतका कुठला पोंच ? पण हरा, तूं तरी चांगला पोक्त, विचारी होतास ना ?
मग ---
पद्य --- ( लावणी चाल )
वृद्धपणीं ती नवदारा ॥ केलि कशाला मदन हरा ॥
रीत घातली त्वां क्रूरा ॥ अनर्थ त्याचा हा सारा ॥
मार्गं आवडे जो थोरां ॥ इतरां वाटे तोच बरा ॥
अशा मुलींचे शिव्या---शाप ते, तुझ्याच माथीं कुविचारा ॥ पडतिल सारे इंदुधरा ॥१॥
वल्लरी : पण जान्हवी, अग तें बघ वाजायला लागलं ! चल, चल लौकर !
प्रवेश सहावा
( स्थळ : लग्नमंडप )
( शास्त्रीं, वैदिक, भिक्षुक, गृहस्थ बसले आहेत. एकीकडे बायकांची गदीं; मागच्या बाजूस शिपाई, प्यादे वगैरे उभे आहेत. बाहेर मंगलवाद्यें वाजत आहेत. बोहल्याजवळ वधूवारें उभीं आहेत, मंगलाष्टकें म्हणून त्यांवर अक्षता टाकीत आहेत असा प्रवेश )
श्लोक --- ( मंगलाष्टकें )
झाला सांग विवाह शंभु मग ये, कैलसिं गौरीसवें ॥ गौरीला दुंसरी जरा सवत ती, तीते न तें सोसवे ॥१॥
बोले क्रोधवशा, अशा विवशिला, कां आणिलें रे घरा ॥ भ्याली ऐकूनि ती उमाच बधुचें कुर्यात सदा मंगलम ॥२॥
जाईची कलिका वधू, वर दिसे राहूच कीं वांकला ॥ मीनाक्षी सुरदा वधू, रदांवांचूनि मंदाक्ष हा ॥
लावी जोड कुलाल, तोचि वधुचें कुर्यात सदा मंगलम ॥३॥
( पडद्यांत )
अहो धर्मशास्त्राचा खरा अभिमान बाळगणारे वैदिक गृहस्थहो, अहो उभयपक्षांकडील याज्ञिक उपाघ्याय हो, थांबा ! नाहीं तर महादोषाचे अधिकारी व्हाल. ( हें ऐकून सर्व चकित होतात व ‘ कोण ! कोण हो !’ असें परस्परांस विचारूं लागतात. )
दीक्षित : ( स्वगत ) दुसरा कोण ! कोदंडच हा. मला या प्रसंगीं यक्तिंचितहि न डगमगतां, प्रसंगावधान, गांभीर्य, धैर्य, चातुर्य, युक्ति इत्यादि सर्व आयुधं सज्ज ठेविलीं पाहिजेत. ( उघड ) अहो जोशीबुवा, उपाध्येबुवा, तुम्ही का थांबलांत ? चालूं द्या. तो असेल कुणी गांवांतला भ्रमिष्ट, तुम्ही कशाला तिकडे लक्ष देतां ?
कोदंड : ( बाहेर येत ) सोडा, मार्गं सोडा ! अहो, या अशा क्षेत्रांत त्यांतून ब्राह्मणांत काय अधर्म हा !
पद्य --- ( दक्षगर्वराशी )
ब्राह्मण सारे जमलां ॥ कैसा सोडुनि मग शास्त्राला ॥ द्विजविवाह हा चालला ॥१॥
जनका धर्म न दिसला ॥ कांचनतेजानें तो दिपला ॥ कां धना तुम्हीहि भाळलां ॥२॥
काश्यपगोत्रीयाला ॥ करितां तदगोत्रज ही बाला ॥ कां अंध असे जाहलां ॥३॥
उपाध्याय : काय ? काय ? श्रीमंतांचंहि काश्यप गोत्र ! विष्णवे नम:, विष्णवे नम: ! काय हो, कांचनभटजी ! काय म्हणतात हे ?
कांचन० : ते अगदीं असत्य बोलतात. प्रत्यक्ष दीक्षितांनीं श्रीमंतांचं गोत्र कौशिक म्हणून मला सांगितलं आहे. कां हो दीक्षित ?
श्रीमंत : हो, सांगितलंच. आणि तें कांहीं पदरचं नाहीं सांगितलं ! चालूं द्या, या बेडयाला नेऊन कोतवालाच्या स्वाधीन करतों. कोण आहे रे ! अरे ए !
कोदंड : काय हो श्रीमंत, तुमचं गोत्र काय बोला !
श्रीमन्त : (स्वगत ) तरी मी या दीक्षिताला म्हणत होतों, कीं नको हें लग्न ! हा कोदंड आमच्या मुंडावळया हिसकावून घेणार. ( कोदंडास ) आमचं गोत्र. ) कोंदडास ओढणार इतक्यांत --- )
दीक्षित : ( ओरडून ) कोदंडा, चल माझ्याबरोबर कोतवालाकडे, तिथे सांगतो श्रीमंतांचं गोत्र. ( कोदंडास ओढणार इतक्यांत --- )
कोदंड : आपण कशाल घेतां इतके श्रम ! हे पाहा कोतवालसाहेबच इकडे आले. कोतवालसाहेब, हेच ते दीक्षित महाराज ! मी यांचं गुह्य फोडीन, म्हणून मला तीन दिवस अन्नपाण्यावांचून तळघरांत कोंडून ठेवलं तें यांनींच !
दीक्षित : कुभांड ! कुभांड !
श्रीमंत : ( स्वगत ) माझ्या डोळ्यांपुढें काळ्या-पिंवळ्या रेषा दिसायला लागल्या.
दीक्षित : कोतवालसाहेब, शुद्ध कुभांड !
कोतवाल : अलबत, कुभांडच असलं पाहिजे, कारण आपल्यासारख्या वयोवृद्ध तपोवृद्ध. पवित्र ब्राह्मनाकडून असा निंद्य घातकी प्रकार होईल कसा !
दीक्षित : कोतवालसाहेब, तोंड आहे म्हणून बोलतात झालं. आपण राजाचे नेत्र, आपण राजाचे कर्ण, न्यायदेवतेचे दंडधारक आणि गोब्राह्यणंचें पर्यानं पालन करणारेहि आपणच आहांत. म्हणून आपल्यापुढं ब्रह्मकुळाल स्मरून खरंखरं सांगतों, या कोंदंडानं श्रीमंतांची मोत्यांची कंठी चोरली, म्हणून आम्ही याला धरून पूर्वीच्या कोतवालसाहेबांकडे पाठवीत असतां हा पळून गेला. असा वास्तविक प्रकार असून, हा कोंडून ठेवलं असं म्हणतो, मर्जी याची, या कलियुगांत जर पूर्वीप्रमाणं देवता जागृत असत्या, तर याची जिव्हा इथल्या इथं गळून पडली असती, असो, आपण किंचित बाजूला याल तर ती कंठी आपल्याला दाखवून आपली चांगली खात्री करून देतों,
कोतवाल : बस बस ! कंठी पाहून खात्री करून घेणारा तो पूर्वीचा कोतवाल मी नव्हें, अरे, या हरामखोरावर नजर ठेवा चांगली. बरं,
कोदंड, तुमची त्या तळधरांतून मुक्तता कुणीं केली म्हणून सांगितलंत ?
कोदन्ड : तो शामसुंदर येत आहे, त्यानं या गोरखाच्या साह्यानं माझी मुक्तता केली.
शाम० : ( येऊन ) कोतवालसाहेब, या दीक्षितांनीं आज सकाळीं माझ्याजवळ ही जडजवाहिराची पेटी देऊन सांगितलं ( पेटी पाहून दीक्षित ‘ घात झाला ’ असें म्हणतो ) कीं, गुप्तपणानं माझ्या गांवीं जाऊन, माझ्या कुटुंबाजवळ ही पेटी देऊन परत ये; म्हणजे तुला उत्तम इनाम देईन, मला यांचा संशय देऊन मीं थोडी चौकशी केली, तेव्हां त्यांत कांहीं भानगड आहे असं कळलं; म्हणून ही पेटी आपल्यापुढें हजर केली आहे, रीतीप्रमाणं व्यवस्था व्हावी.
कोतवाल : अरे, या पेटीचं कुलप फोडा पाहू आणि तो खोडा आणा इकडे ! कां दीक्षित महाराज ! हें सुद्धां कुभांडच असेल ? या कलियुगांतले लोक काय खोटं बोलतात हो ! ( शिपायांस ) पाहतां काय ! याचं पागोटं आणि शालजोडी घ्या काढून, आणि चढवा खोडा !
दीक्षित : पण - पण - कोतवालसाहेबांनीं ऐकून घ्यावं, ( हळूच ) माझा धंदा मध्यस्थीना ; यांचं लग्न मी जुळवून दिलं म्हणून त्यांनीं मला हें जडजवाहीर बक्षीस दिलं, तें मीं याला विश्वासू समजून, याच्याबरोबर गांवीं पाठविणार होतों, यांत कोणता अपराध, कोतवालसाहेब ?
( शिपाई खोडा घालतात )
कोतवाल : समजेल लौकरच कोणता तो. राहा असा इथं उभा !
दीक्षित : राहतों ! संगमनाथा ! तूं साक्षी आहेस !
कोतवाल : काय हो श्रीमंत, हें जडजवाहीर तुम्हीं या दीक्षिताला बक्षीस दिलं होतं का ?
श्रीमन्त : ( पाहून ) मी ? इतकं जवाहीर ? आणि याला बक्षीस ? महाराज, स्वप्नातसुद्धां नाहीं हो. हें यानं खास चोरलेलं आहे, याबद्दल याला चांगली शिक्षा ठोठावा.
कोतवाल : गप्प बैस थेरडया ! तुम्ही दोघेहि सारखेच नीच आहां !
श्रीमंत : आतां आमचं लग्न होत नाहीं !
कोतवाल : बरं कांचनभटजी, तुमचे स्नेही, आणि या दीक्षितांचे साथीदार ते सुवर्णशास्त्री कुठें आहेत ?
कांचन० : ते गेले असतील कुठें मसणांत. पण कोत वालसाहेब, माझी कन्यादक्षिणेची रक्कम तेवढी यांच्याकडून देववा. अधीं राहिली आहे --- अडीच हजार !
कोतवाल : जरा थांबा, कोदंड, तो श्रीमंतांचा पुतण्या कुठं आहे ?
कोदंड : तो आला पाहा. अहो भैरवनाथ, इकडे या !
श्रीमन्त : ( स्वगत घाबरून ) कोण भैरवनाथ --- माझा पुतण्या, माझा वैरी ! इथ आला ? मग झालं ! भरलं आमचं आयुंष्य ! तो पाहा, तो पाहा आलाच !
भैरवनाथ : काकासाहेब ! वा ! इकडे शंभर कोसांवर येऊन, श्रीमंतीचं सोंग घेऊन, नावं गांव बदलून, गोत्र चोरून, चतुर्भुंज व्हायची. तुमची स्वत:चीच का कलृप्ति ?
श्रीमंत : ( अर्धांगवायूचा झटका येऊन पडत पडत ) नव्हे या या--भ--भ--भ--बा--बा--मे--मे
कोतवाल : अरे अरे ! जोत जा, वैद्याला बोलावून आण. ( एक मुलगा जातो ) अहो भटजी, तुम्ही दोघे तिवे याला त्या खोलींत घेऊन चला. ( तसें करतात ) अहो कोदंड, कोदंड. आम्ही या दीक्षिताला घेऊन हेरंबमहालाला जप्तीचई मोहोर करून चावडीकडे जातों. वैद्य येईपर्यंत तुम्ही इथेंच राहा. गोरख, एक जवान घेऊन त्या सुवर्णशास्व्याला असेल तसा चावडीवर घेऊन ये. भैरवनाथ, तूं चल आमच्याबरोबर. ( जाऊं लागतात )
कांचन० : अहो कोतवालसाहेब ! हे श्रीमंत असे पडले, आणि दीक्षितांना तुम्ही घेऊन चललांत, पण आमची हुंडयाची रक्कम !
कोतवाल : घ्या, दीक्षिताकडून घ्या !
कांचन० : दीक्षित ! हुडयाची रक्कम टाका आणि मग चला कुठें ते ! अहो चाललांत काय ? माझी हुंडयाची रक्कम कोण देणार ? अहो कोतवालसाहेब ! तेवढी तरी माझ्या स्वाधीन करा. अरे गेले ! अहो हुंडा ---
( त्यांच्या मागोमाग जातो )
इंदिरा० : ( शारदेला पोटाशीं धरून ) देवा ! या माझ्या येवढयाशा निरपराधी पोरीवर एवढा दुःखाचा पर्वत लोटून दिलास, यांत काय न्यायीपणा दाखविलास, तुझा तुला ठाऊक ! चल शारदे, घरांत चल ! काय करायचं ?
शारदा : ( गळ्यास मिठी मारून ) आई, इतका वेळ होतीस कुठें तूं ? आणि अशी ओढतेस कां ? कुणीकडे घेऊन जातेस मला ? माझे इतके धिंडवडे काढलेद तरी पुरे नाहीं का झाले ? त्या दिवशीं विष देऊन मारून टाक म्हणून किती विनवण्या केल्या, तें तुझ्या हातून झालं नाहीं; आणि आज हे मुलीचे लग्नसोहाळे पाहावतात का ग तुला ?
इन्दिरा० : ( रडत ) नको नको ! शारदे, मी तुला पदर पसरतें, या वेळीं आणखी असं बोलूं नकोस ? हें बघ ---
पद्या --- ( अरे मेरे राम प्यारे राम )
आधिं तुझ्या या दुःखानें, प्राण असोनी मेलें ॥ध्रु०॥
त्यांतुनि शब्द विषारी ॥ बोलसि हे मर्मविदारी ॥ साहुं कसें त्राण नसे भेदिति ह्रदयां जणुं भाले ॥१॥
शारदा : आई, हा काय गोंधळ आहे तो तरी सांग मला !
पद्य --- ( आसजन गले )
मी समजुं तरि काय मुले मन ॥ पडति अक्षता शिरीं न तोंचि ॥ हे उदभवले मधिं काय कळेचि न ॥ध्रु०॥
हासुं काय सुटलें मी म्हनुनी ॥ का रडुं हें मस्तक पिटुनी लग्न होय कीं कुंबार अजुनी ॥ हरहर देवा कया विडंबन ! ॥१॥
इन्दिरा० : घरांत चल तुला सर्व सांगतें.
( तिला घेऊन जाते )
कोदंड : शिवशिव ! हिरण्यगर्भा ! केवढा अंध, अविचारी मी ! उपकारसुद्धां विचारानंच केला पाहिजे, नाहीं तर तोच अपकार होतो म्हणतात, तें आज माझ्या प्रत्ययाला आलं. या शारदेचं कल्याण करण्याच्या बुद्धीनं मीं हें काय केलं पाहिलंस !
पद्य --- ( माई सरसती शारदा )
म्यां लोटिली संकटीं ॥ निष्कारण शारदा बिचारी, मानिल मजसि महाकपटी ॥ध्रु०॥
बाल मृगी वृकमुखिंची ओढुनि ॥ टाकियली दावाग्निंत हातीं ॥ केविं ताप साहिल सुकुमारी एकटीं संकटीं ॥१॥
त वैद्यबुवा आले. चल मित्रा. ( जातात )