उत्पत्ति धडा 48
1 मग काही काळानंतर आपला बाप फारो आजारी असल्याचे समजले म्हणून योसेफ आपले दोन मुलगे मनश्शे व एफ्राईम यांना घेऊन आपल्या बापाला भेटावयास गेला;
2 “योसेफ आपणास भेटावयास आला आहे” असे समजल्याबरोबर इस्राएल फार अशक्त झाला होता; तरीही अगदी कष्टाने प्रयत्न करुन तो बिछान्यावर उठून बसला.
3 मग इस्राएल योसेफास म्हणाला, “सर्वसमर्थ देवाने मला कनानातील लूज येथे दर्शन देऊन आशीर्वाद दिला.
4 देव म्हणाला, ‘मी तुला खूप संतती देईन व ती वाढवीन आणि तुम्ही एक मोठे राष्ट्र व्हाल; तुझी संतती या देशाची कायमची वतनदार होईल.’
5 आणि आता तुला दोन मुलगे आहेत. मी येथे मिसरला येण्यापूर्वी हे दोघे येथे जन्मले. तुझे हे दोन मुलगे मनश्शे व एफ्राईम मला माझ्या स्वत:च्या मुलासारखे आहेत; म्हणजे जसे मला रऊबेन व शिमोन तसेच हे दोघे आहेत.
6 ते माझे मुलगे आहेत म्हणून माझ्या सर्व मालमत्तेत वाटेकरी होतील; परंतु तुला जर आणखी मुलगे झाले तर मग ते तुझे होतील; पण ते एफ्राईम व मनश्शे यांना, त्यांच्या मुलग्यांसारखे होतील म्हणजे पुढील काळात एफ्राईम व मनश्शे यांच्या मालमत्तेचे ते वारस होतील म्हणजेच त्यांचे वतन एफ्राईम व मनश्शे ह्या त्यांच्या भावांच्या नावाने चालेल.
7 कारण पदन - अराम येथून येताना तुझी आई राहेल एफ्राथजवळ आम्ही, वाटचाल करीत असताना कनान देशात मरण पावली; त्यामुळे मी फार दु:खी झालो; तेव्हा एफ्राथच्या म्हणजे बेथलेहेमाच्या वाटेवर मी तिला मूठमाती दिली.”
8 मग इस्राएलाने योसेफाच्या मुलांना पाहिले; तेव्हा इस्राएल म्हणाला, “हे मुलगे कोणाचे आहेत?”
9 योसेफ आपल्या बापास म्हणाला, “बाबा! हे माझे मुलगे आहेत; हे मला देवाने दिले आहेत.”इस्राएल म्हणाला, “तुझ्या मुलांना माझ्याकडे आण म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.”
10 इस्राएल अतिशय म्हातारा झाला होता आणि त्याची नजर मंद झाल्यामुळे त्याला चांगले स्पष्ट दिसत नव्हते; तेव्हा इस्राएलाने त्या मुलांना कवटाळून त्यांचे मुके घेतले.
11 मग इस्राएल योसेफास म्हणाला, “मुला तुझे तोंड पुन्हा पाहावयास मिळेल असे वाटले नव्हते, पण पाहा! देवाने तुझी व माझी भेट होऊ दिली. मला तुझी मुलेही पाहू दिली.”
12 मग योसेफाने आपल्या मुलांना इस्राएलाच्या मांडीवरुन काढून घेतले; ते मुलगे इस्राएला समोर उभे राहिले व त्यांनी त्याला लवून नमन केले.
13 योसेफाने मनश्शेला आपल्या डाव्या हाती म्हणजे तो इस्राएलाच्या उजव्या हाती येईल असे व एफ्राईमाला आपल्या उजव्या हाती म्हणजे तो इस्राएलाच्या डाव्या हाती येईल असे उभे केले.
14 परंतु इस्राएलाने आपल्या उजव्या डाव्या हातांची घडी टाकून अदलाबदल केली आणि आपला उजवा हात त्याने धाकटया मुलाच्या म्हणजे एफ्राईमाच्या डोक्यावर ठेवला व डावा हात थोरल्याच्या म्हणजे मनश्शेच्या डोक्यावर ठेवला;
15 आणि इस्राएलाने योसेफाला आशीर्वाद दिला; तो म्हणाला,“माझे पूर्वज अब्राहाम व इसहाक यांनी आपल्या देवाची उपासना केली व त्याच देवाने मला माझ्या सर्व आयुष्यभर चालवले आहे;
16 तोच मला सर्व संकटातून सोडवणारा माझा देवदूत होता. त्यानेच ह्या मुलांना आशीर्वाद द्यावा अशी मी प्रार्थना करतो. आता ही मुले माझे व आपले पूर्वज अब्राहाम व इसहाक यांचे नाव चालवोत; ते वाढून त्यांची पृथ्वीवर अनेक कुटुंबे, कुळे व राष्ट्रे होवोत अशी मी प्रार्थना करतो.”
17 आपल्या बापाने एफ्राईमाच्या डोक्यावर आपला उजवा हात ठेवला असे पाहिले तेव्हा योसेफाला ते आवडले नाही; त्याला तो हात एफ्राईमाच्या डोक्यावरुन काढून मनश्शेच्या डोक्यावर ठेवावयास पाहिजे होता म्हणून योसेफाने आपल्या बापाचा हात धरला.
18 योसेफ आपल्या बापास म्हणाला, “बाबा! तुम्ही आपला उजवा हात चुकीच्या मुलावर ठेवला आहे. मनश्शे हा प्रथम जन्मलेला म्हणजे माझा थोला मुलगा आहे.
19 परंतु त्याचा बाप आपले म्हणणे कायम ठेवत पुढे म्हणाला, “माझ्या मुला! मला माहीत आहे; होय मला माहित आहे की मनश्शे हा प्रथम जन्मलेला आहे; आणि तो महान होईल; तो अनेक राष्ट्रांचा पिता होईल म्हणजे त्याच्यापासून अनेक राष्ट्रे उदयास येतील, परंतु धाकटा भाऊ थोरल्या पेक्षाही अधिक महान होईल आणि त्याची कुळे वाढून त्यांचा मोठा राष्ट्रसमूह निर्माण होईल.”
20 तेव्हा त्या दिवशी इस्राएलाने त्या मुलांना आशीर्वाद दिला; तो म्हणाला,“इस्राएल लोक आशीर्वाद देताना तुमची नावे उच्चारितील; ते म्हणतील, “देव तुम्हाला एफ्राईमासारखा, मनश्शेसारखा आशीर्वाद देवो.”
21 मग इस्राएल योसेफास म्हणाला, “माझे शेवटचे दिवस आता अगदी जवळ आले आहेत, आता मी मरणार; परंतु देव सतत तुमच्या बरोबर राहील, तो तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या देशात घेऊन जाईल.
22 तुझ्या भावांना मी जे दिले नाही ते मी तुला देतो; मी स्वत: तलवारीने व धनुष्याने लढून अमोरी लोकाकडून जिंकलेला पर्वत तुला देतो.”