उत्पत्ति धडा 18
1 काही काळानंतर परमेश्वराने अब्राहामाला पुन्हा दर्शन दिले. अब्राहाम तेव्हा मम्रेच्या एलोन झाडांच्या राईत राहात होता. एके दिवशी भर दुपारी कडक उन्हाच्या वेळी अब्राहाम आपल्या तंबूच्या दाराशी बसला होता.
2 अब्राहामाने वर पाहिले तों आपल्या समोर तीन पुरुष उभे असलेले त्याला दिसले; त्यांना पाहून अब्राहाम धावत त्यांना सामोरा गेला आणि त्याने त्यांना लवून नमन केले;
3 अब्राहाम त्यांचे स्वागत करुन म्हणाला, “माझ्या स्वामीनों, मी जो आपला सेवक त्या माझ्या सोबत कृपा करुन काही वेळ राहा;
4 तुमचे पाय धुण्यासाठी मी पाणी घेऊन येतो; तुम्ही झाडा खाली सावलीत अमळ विसावा घ्या;
5 मी तुम्हासाठी थोडी भाकर आणतो; तुम्हाला पाहिजे तेवढे जेवा; मग पुढील प्रवास चालू करा.”ते तीन पुरुष म्हणाले, “बरं, हे तर ठीक आहे आम्ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो.”
6 अब्राहाम लगेच घाईने पळत तंबूत गेला व साराला म्हणाला, “तिघांना तीन भाकरी पुरतील एवढे पीठ ताबडतोब मळ, त्याच्या भाकरी कर.”
7 नंतर अब्राहाम आपल्या गुरांच्या कळपाकडे पळत गेला, आणि त्यातून त्याने उत्तम कोवळे वासरु घेतले; ते दासाजवळ देऊन त्याने त्याला लवकर कापून जेवणासाठी रांधण्यास सांगितले;
8 अब्राहामाने त्या तीन पुरुषांना वासराचे शिजवलेले मांस, तसेच दूध व लोणी खाण्यासाठी त्यांच्यापुढे वाढले आणि त्यांचे जेवण संपेपर्यंत अब्राहाम राईत झाडाखाली त्यांच्या जवळ त्यांची सेवा करण्याकरीता उभा राहिला.
9 ते पुरुष अब्राहामाला म्हणाले, “तुझी बायको सारा कोठे आहे?”अब्राहाम म्हणाला, “ती तंबूत आहे.”
10 मग परमेश्वर म्हणाला, “मी पुढल्या वसंत ऋ तूत येईन त्या वेळी तुझी बायको सारा हिला मुलगा होईल.”सारा तंबूच्या तोंडाशी उभी राहून कान देत होती म्हणून या गोष्टी तिने ऐकल्या.
11 अब्राहाम व सारा वयाने फार म्हातारे झाले होते. साराचे मुले होण्याजोगे वय निघून गेले होते.
12 म्हणून साराने जे ऐकले त्यावर विश्वास ठेवला नाहीं. ती स्वत:शीच हसून म्हणाली, “मी म्हातारी झाली आहे, आणि माझा नवराही म्हातारा झाला आहे मी इतकी म्हातारी झाली आहे की आता मला मूल होणे शक्य नाही.”
13 तेव्हा परमेश्वर अब्राहामाला म्हणाला, “सारा का हसली? मी आता म्हातारी झाली आहे म्हणून मला मुलगा होईल काय असे ती का म्हणाली.
14 परमेश्वराला काही अशक्य आहे का? येत्या वसंतऋ तूत सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा येईन तेव्हा तुझी बायको सारा हिला मुलगा होईल.”
15 परंतु सारा म्हणाली, “मी हसलेच नाही!” (ती असे म्हणाली कारण ती फार घाबरली होती.)परंतु परमेश्वर म्हणाला, “नाही, मला माहीत आहे की हे खरे नाहीं; तू नक्की हसलीसच.”
16 नंतर ते पुरुष उठले व सदोम नगराकडे वळून ते तिकडे जाण्यास निघाले; अब्राहाम त्यांना वाटेस लावण्यासाठी त्यांच्या बरोबर थोडा रस्ता चालून गेला.
17 परमेश्वर आपणा स्वत:शीच बोलला, “मी आता जे काही करणार आहे त्या विषयी अब्राहामाला सांगावे काय?
18 कारण अब्राहामापासून एक मोठे व शक्तीमान राष्ट्रे नक्की निर्माण होईल, आणि पृथ्वीवरील सगळी राष्ट्रे त्याच्यामुळे आशीर्वादित होतील.
19 मी अब्राहामाबरोबर एक विशेष करार केलेला आहे, तो यासाठी की त्याने आपल्या मुलांना व वंशजाना देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्याची आज्ञा करावी आणि त्यांनी न्यायनीतीने चालावे; मग मी परमेश्वर त्याला मी दिलेल्या वचनाप्रमाणे जे द्यायचे ते देईन.”
20 मग परमेश्वर म्हणाला, “सदोम व गमोरा येथील लोक फार दुष्ट आहेत असे मी पुष्कळ वेळा ऐकले आहे.
21 म्हणून मी स्वत: प्रत्यक्ष जाऊन परिस्थीती पाहीन व मग त्यांची दुष्ट करणी ऐकल्याप्रमाणे खरोखर आहे की काय हे मला नक्की समजेल.”
22 मग ते पुरुष सदोमाकडे वळून चालू लागले, परंतु अब्राहाम परमेश्वरा पुढे तसाच उभा राहिला.
23 मग अब्राहामाने परमेश्वराजवळ जाऊन विचारले, “परमेश्वर तू दुष्ट लोकांचा नाश करताना चांगल्या लोकांचाही नाश करणार काय?
24 आणि जर कदाचित त्या नगरात पन्नास लोक चांगले व नीतिमान असतील तर? तरी ही त्या नगराचा तू नाश करणार काय? तू खात्री ने नगरात राहाणाऱ्या पन्नास नीतिमान लोकांसाठी नगराचा बचाव करशील.
25 तू नक्की नगराचा नाश करणार नाहीस; दुष्ट लोकांना मारण्यासाठी तू पन्नास नीतिमान लोकंना मारणार नाहीस; आणि जर तसे झाले तर मग चांगले व वाईट अशा लोकांची गत सारखीच होणार; त्या दोन्ही प्रकारच्या लोकांना शिक्षा होणार; तू सर्व पृथ्वीचा न्यायाधीश आहेस, तू योग्य तेच करशील हे मला माहीत आहे.”
26 नंतर परमेश्वर बोलला, “या सदोम शहरात मला पन्नास चांगले लोक आढळले तर त्यांच्यासाठी मी संपूर्ण शहराची गय करीन, व सर्व शहर वाचवीन.”
27 मग अब्राहाम म्हणाला, “हे प्रभु, तुझ्या तुलनेने मी केवळ धूळ व राख आहे, तरी तुला एक प्रश्न विचारु दे;
28 समजा कदाचित् जर पाच लोक कमी असतील म्हणजे फक्त पंचेचाळीसच चांगले लोक असतील तर? त्या पाच कमी असलेल्या लोकांकरिता तू सर्व नगराचा नाश करशील काय?”परमेश्वर म्हणाला, “मला पंचेचाळीस लोक चांगले आढळले तर मी नगराचा नाश करणार नाही.”
29 पुन्हा अब्राहाम परमेश्वराला म्हणाला, “आणि जर तेथे तुला चाळीसच चांगले लोक आढळले तर? संपूर्ण शहराचा तू नाश करशील काय?”परमेश्वर म्हणाला, “जर मला चाळीसच लोक चांगले आढळले तर मी शहराचा नाश करणार नाही.”
30 मग अब्राहाम म्हणाला, “प्रभु, कृपा करुन माझ्या बोलण्याचा तुला राग न यावा; मला आणखी विचारण्याची परवानगी असावी; तेथे फक्त तीसच लोक चांगले असतील तर? तू त्या नगराचा नाश करशील काय?”परमेश्वर म्हणाला, “जर तीस चांगले लोक असतील तर मी तसे करणार नाही.”
31 मग अब्राहाम म्हणाला, “प्रभु, थोडा त्रास देऊन पुन्हा विचारु का? समजा तेथे कदचित् वीसच लोक चांगले असतील तर?परमेश्वराने उत्तर दिले, “जर तेथे वीसच लोक चांगले असतील तर त्या वीसा करिता मी नगराचा नाश करणार नाही.”
32 अब्राहाम म्हणाला, “प्रभु, कृपा करुन माझ्यावर रागावू नकोस, परंतु शेवटी एकदाच थोडा त्रासदायक प्रश्न विचारण्यास परवानगी असावी, कदाचित् तुला तेथे दहाच लोक चांगले आढळले तर तू काय करशील?”परमेश्वर म्हणाला, “जर मला नगरात दहाच लोक चांगले आढळले तर त्या दहाकरिता मी नगराचा नाश करणार नाहीं.”
33 मग अब्राहामाशी बोलणे संपविल्यावर परमेश्वर निघून गेला आणि अब्राहाम आपल्या तंबूकडे परत गेला.