Get it on Google Play
Download on the App Store

स्वयंपाक घरातील गोष्टी

राष्ट्राचे खरे जीवन स्वयंपाकघरावरच अवलंबून आहे.

- स्वामी विवेकानंद

फ्रान्सच्या सिंहासनावरून पदच्युत झाल्याबरोबर माझ्या मुलाने भटारखाना उघडावा; म्हणजे त्याला अन्नाचा तुटवडा पडणार नाही.

- नेपोलियन बोनापार्टचा आपल्या मुलाला उपदेश

प्रत्येक पुरुषाने जेवणाच्या गोष्टीकडे प्रथमच लक्ष पुरविले पाहिजे. मला जर कधीच पोटभर जेवावयास मिळाले नसते, तर माझ्या हातून इतकी पुस्तके लिहून होण्याचा सुतराम् संभव नव्हता.

- हर्बर्ट स्पेन्सर

अन्नाद्भवन्ति भूतानि। (असतील शिते तर जमतील भुते.)

- श्रीमद्भगवद्गीता

प्रस्तुत लेखाचा मथळा वाचून लगेच लेखकाच्या नावावर नजर टाकताच माझ्या सार्‍या वाचकभगिनी एकदम थबकतील, आणि मला स्वयंपाकघरातून हाकलून लावण्याचा ठराव करू लागतील! माझ्या भगिनीवर्गाने आपल्या या गरीब भावंडावर अशी आग पाखडण्यापूर्वी पुढील चार शब्द वाचून पाहण्याची कृपा करावी. माझ्या सुशिक्षित भगिनीजनांच्या विचारशीलतेची मला खात्री असल्यामुळे, या शब्दाकडे त्यांचे रागावलोकन होणार नाही, अशी मला पूर्ण उमेद आहे. बाकी एखाद्या निरक्षर बाईने मात्र हे चार शब्द वाचण्याची तसदी घेतली असती किंवा नाही, याची शंकाच आहे! बहुधा पहिल्या दोन ओळींवरच नजर फेकून तिने माझा लेख चुलीत टाकला असता, आणि तापलेल्या कालथ्याच्या किंवा जळत्या कोलिताच्या साहाय्याने मला स्वयंपाकघरातून पिटाळून लावले असते. यद्यपि प्रत्येक समाजाने आपापल्या परीने स्त्री-पुरुषांसाठी भिन्नभिन्न कामे नेमून दिली आहेत; तथापि प्रसंगविशेषी एका मनुष्यभेदाच्या प्राण्याला दुसर्‍याचे हक्क घेण्यापुरती सवलत देण्यात येते. स्त्री-पुरुषांमध्ये खरोखर म्हटले असता 'जो भेद विधीने केला' आहे, त्याचे वाजवीपेक्षा फाजील स्पष्टीकरण एका सुप्रसिध्द मराठी नाटककाराने एकाच पद्यात केलेले वाचकांच्या माहितीत असेलच. त्याव्यतिरिक्त स्त्री-पुरुषांच्या हक्कांचे वर्गीकरण निव्वळ मनुष्यनिर्मित असून पुष्कळ वेळा त्यात अतिव्याप्ती झालेली दिसून येते. सर्कशीच्या रिंगणात वाघाच्या तोंडात मर्दानी हिंमतीने मान देऊन बायका धीट पुरुषांनाही थक्क करून सोडतात, तर नाटकगृहातल्या रंगस्थलावरचे स्त्री नट आपल्या हावभावयुक्त मुरक्यांनी वारांगनांनाही लज्जेने पहावयास लावतात. एकीकडे विश्वविद्यालयीन उच्चतम परीक्षांतल्या यशस्वी उमेदवारांच्या नाममालिकेला आपल्या नावांनी नटविणारी अभिमाननीय रमणीरत्ने आहेत, तर दुसरीकडे आपल्या नावाच्या चार अक्षरांसाठीसुध्दा दुसर्‍याचा दस्तुर ठोकून, आर्यसंस्कृतीने स्त्रियांसाठीच आखलेल्या अज्ञानवर्तुलाच्या अगदी मध्यस्थानी चमकण्याजोगी उच्च जातीची नररत्नेही आहेत! लग्नप्रसंगी, अक्षतीसारख्या मिरवणुकीत, पुरुषांचा नेहमीचा पुढारीपणाचा मान आपल्याकडे घेऊन महिलासमाज घराबाहेर पडत असतो, त्या वेळी रिकाम्या झालेल्या स्वयंपाकघरात पुरुषवर्गातल्या स्वयंसेवकांचे पथक काम उरकीत असते. कधी कधी तर निसर्गाच्या कृतीतसुध्दा स्त्री-पुरुषभेदाबद्दल ढिलाई दिसून येते! दाढीमिशीला मुकलेले आजन्म संन्यासी कितीतरी वेळा दृष्टीला पडतात; आणि शारीरशास्त्रविषयक पुस्तकांतून दाढीमिशीच्या झुपक्यांनी कलंकित झालेल्या स्त्री-मुखचंद्रांची चित्रेही बहुश्रुत वाचकांनी पाहिली असतील. याप्रमाणे स्त्री-पुरुषांनी परस्परांना आपापल्या कार्यक्षेत्राचे एखाद्या वेळी सीमोल्लंघन करताना पाहिले, तर उगाच हाकाटी करीत बसण्याचे कारण नाही.


इतक्याउपरही इंग्लंडातील चालू बायकांच्या बंडाचे प्रवेश रोज वाचल्यामुळे आपल्या हक्कांना विशेष जपणार्‍या एखाद्या करारी भगिनीने मला स्वयंपाकघरात शिरण्यास मज्जाव केला, तर तिचेही पुढील युक्तिवादाने समाधान करता येण्यासारखे आहे. स्त्रियांना पुरुषाप्रमाणे शिक्षण देवविण्यासाठी अट्टाहास करताना, प्राचीन आर्यावर्तातल्या स्त्री-शिक्षणाची उदाहरणे देण्यासाठी सुधारकांनी गार्गी, मैत्रेयी यांच्याकडे धाव घेतली, त्याप्रमाणे माझ्या या विधानाच्या प्राचीनतेलाही विराटराजाच्या घरी बल्लवाचे काम बारा महिने करणार्‍या भीमाचा बळकट पाठिंबा आहे. स्त्री-शिक्षणापासून सुपरिणामांचीच निष्पत्ती होते, हे दाखविण्यासाठी सुधारकांना युरोपातल्या स्त्रियांकडे बोट दाखवावे लागले; परंतु पुरुषांच्या हातून पाकनिष्पत्ती चांगली होते, याची साक्ष मी देशातल्या देशात पटवून देईन! आज प्रत्येक श्रीमंताच्या घरी चाललेल्या अन्नयज्ञातून होतृपदाचा मान आम्हा पुरुषांनाच मिळत नाही काय? 'पंचाग्निसाधन करू धूम्रपान' अशा बाण्याने ठिकठिकाणी बसलेले आचार्‍याचे अड्डे आजच ओस पडले आहेत काय? पेशवाईत पर्वतीवरचे वरणाचे व भाज्यांचे हौद ज्यांच्या कृतींनी भरून निघाले, त्या वीरांच्या हातातली सारे-पळे आज गंजत पडले आहेत असे आम्हाला वाटते काय? नाही भगिनींनो, नाही! त्यांच्या वंशजांच्या हातात ते झारेपळे आज तीच कामे करीत आहेत! अशा प्रकारे झार्‍यापळयांच्या शस्त्रास्त्रांनी सायुध झालेली आचारी, पाणके, वाढपी, वाढपी आणि खटपटी यांची चतुरंग सेना भांगेने धुंद होऊन, खोकल्याच्या किंकाळया मारीत व चिलमीच्या धुराचे लोट सोडीत, स्वयंपाकघराच्या किल्ल्यावर आपल्या साधनांचे यशोध्वज फडकविण्यासाठी सज्ज झाले असता, तुम्ही स्वयंपाकघराचे रक्षण कसे करणार? तो पाहा, तो खटपटी वीर, आपल्या वज्रमुठींनी कणिक तिंबून काढीत आहे! खांद्यावर घागर घेऊन घाव ठोकणार्‍या त्या पाणीदार वीराने तर अंगणात नुसता चिखल माजवून दिला आहे! तसाच तो तिसरा वीर केळीच्या आगोतल्यासारखा कापीत चालला आहे! आणि सर्वांच्याही पुढे आघाडी मारून आगीत तोंड घालण्यासाठी थेट चुलीपर्यंत जाऊन भिडलेला तो जवानमर्द ब्राह्मणभाई तर आवेशाच्या एका फुंकराने उडालेल्या राखेच्या लोटात पार दिसेनासा झाला आहे! भगिनींनो! अजून तरी ऐका आणि आम्हा पुरुषांनाही स्वयंपाकाचे समान हक्क द्या!

याप्रमाणे सार्‍या पुरुषजातीसाठी स्वयंपाकघराची दारे मोकळी करून घेतल्यावर, मी आत पाऊल टाकण्यापूर्वी स्वत:च्या लायकीबद्दल येथे थोडीशी प्रस्तावना करणे जरूर आहे, म्हणून अगोदर तिकडे वळतो.

पाकशास्त्रातील नैपुण्याबद्दल आमच्या घराण्याचा पूर्वापार लौकिक चालत आलेला आहे. आमच्या पंचक्रोशीत होणारी प्रयोजने, सहस्त्रभोजने, श्राध्दकर्मे, गावजेवणे वगैरे लहानमोठया प्रमाणांची सार्वजनिक भोजनकार्ये आमच्या घरचा एक तरी पुरुष स्वयंपाकाला असल्याखेरीज सहसा तडीला जात नसत. गेल्या सात पिढयांत आमच्या घरात बायकांना स्वयंपाक करण्याची सक्त मनाई होती. माझ्या आजोबांच्या अमदानीपर्यंत हा लौकिक अव्याहतपणे कायम होता. माझ्या वडिलांनी मात्र पूर्वपरंपरा सोडून विद्याभ्यास, नोकरी यांसारखे नसते धंदे करण्यात सार्‍या आयुष्याची माती केली! माझ्या आज्याने पुण्याला एक नमुनेदार खाणावळ घातली होती. तिजबद्दल लोकप्रियता इतकी जबरदस्त वाढली होती की, काही विशेष कारणाकरिता, खाणावळीचा दरवाजा कायमचा बंद करून एकाएकी माझे आजोबा निघून गेल्यावर दुसर्‍या दिवशी जेवणाच्या वेळी पंक्तिबारगिरांचा एक तांडाच्या तांडा खाणावळीला गराडा घालून आपापल्या परीने हळहळू लागला! अर्थात्, लोकांचा लकडा चुकविण्यासाठी, आजोबांना कोणाला कळविल्यावाचून रातोरात जावे लागले होते! आपली लोकप्रियता खरी आहे, की लोक नुसत्या नावावरच जातात हे नीट अजमावून पाहण्यासाठी, आजोबांनी पुढे एका अगदी अनोळखी शहरात नाव बदलून दुसरी खाणावळ काढली व तिच्यातही अखेरीला पहिल्यासारखे नाव मिळविले. माझ्या वडिलांनी यद्यपि आपला पिढीजाद धंदा सोडून दिला होता, तरी माझ्याबरोबर आमच्या घराण्याच्या स्वयंपाकनैपुण्याने पुन्हा जन्म घेतला. मला स्वयंपाकाचे उपजत वेड होते. तिसर्‍या-चौथ्या वर्षीच माझ्या बहिणीशी चूलबोळक्यांसाठी मांडावयास लागून मी आजोबांची प्रीती संपादन केली. आजोबांनी मला लहान लहान भांडयाकुंडयांचा सबंध 'सट' आणून दिला होता. खेळातल्या चूलबोळक्यांचा आमच्या घराइतका मोठा संग्रह सार्‍या आळीत मिळून नव्हता! पाचव्या सहाव्या वर्षी तर माझ्यावाचून आमच्या आळीत भातुकलीचा एकही समारंभ पार पडत नसे. या वयात मी समवयस्क सवंगडयांबरोबर उनाडण्यात दिवस न घालविता, आईजवळ स्वयंपाकघरात बसून तिच्या भाकरी करण्याकडे, किंवा भाजी फोडणीला टाकण्याकडे, घटकाघटका लक्षपूर्वक पाहत असे. तिखटमिठाच्या डब्यांतून ते ते पदार्थ वेळोवेळी आईला काढून देण्याच्या सरावामुळे तद्विषयक बारीकसारीक माहिती मला त्या वेळीच झाली होती. अशा एखाद्या प्रसंगी माझ्याकडे पाहून आजोबांना गहिवर दाटून येई व मला पोटाशी धरून ते म्हणत की, वडिलाने कुलाचार सोडला; पण हा मात्र कुलदीपक होणार खास! बाळक्या, बेटया, तू मोठमोठया लोकांच्या घरी दिवस काढ!

आजोबांच्या अशा उत्तेजनपर शब्दांनी मात्र स्फुरण चढून, मी थोडेसे पीठ घेऊन भाकरी करावयाला, किंवा उरापोटी वरवंटा उचलून काहीतरी वाटावयाला मोठया आवेशाने सरसावत असे. लौकरच मला स्वयंपाक करण्यात बरेच कळू लागले. एकदा तर आईने संध्याकाळचा स्वयंपाक माझ्या हातून करवून घेतला. आजोबांनी तर त्या दिवशी खाण्याचा असा सपाटा सुरू केला, की माझ्या पाककौशल्याची बातमी ऐकून बाबांनी संतापाने न जेवण्याचा निश्चय जर केला नसता, तर आईसाठी मागे घासभरसुध्दा अन्न उरले नसते! दुसर्‍या दिवशी या खाण्याने आजोबांची पोटदुखीची व्यथा उपटून अखेर त्या प्रेमळ म्हातार्‍याचा त्यातच अंत झाला! जाताजाता येथे एवढे सांगणे योग्य वाटते की, मी केलेल्या भाताचा पिंड देईपर्यंत म्हातार्‍याच्या पिंडाकडे कावळयांनी ढुंकूनसुध्दा पाहिले नाही! असो.

आज मला माझ्या या आवडत्या विषयासंबंधी दोन शब्द लिहिण्याची स्फूर्ती माझ्या भगिनींचे एतद्विषयक लेख वाचून झालेली आहे, हे कबूल केले पाहिजे. सदर लेखांतून दिलेली पक्वान्नांची काहीकाही नावे पाहून प्रथम माझे लक्ष या विषयाकडे वळले. या नावाकडे लक्ष देताच काव्यशास्त्राप्रमाणेच पाकशास्त्रातही काव्यालंकारांना बराच वाव मिळालेला आहे, असे वरवर पाहणारालाही दिसून येईल. 'स्वयंपाकघरा'तल्या बर्‍याचशा गोष्टींतून, 'मोहन' हा नायक असावा असे वाटते! माझ्या पाकशास्त्रांतून मी याला असूयेने हद्दपार केल्याचे वाचकांना दिसून येईलच. 'दुधाचा रस्सा', 'दह्याची भाजी', 'कांद्याच्या करंज्या' किंवा 'तिखटमिठाच्या मेसूरवडया' ही स्वयंपाकघरातल्या काव्यशास्त्रातील विरोधाभास अलंकाराची उदाहरणे असून 'भोपळयाच्या बियांचे अनारसे' अद्भूतरसाच्या कोटीत जमा होतात. 'अलिजाबहादुर' हे पक्वान्न वीरसाचे एकलकोंडे उदाहरण असून 'फजिता' हे हास्यरसाचे अपत्य असावे. 'मुरक्की', 'सुरळी होळगी' ही पात्रे परभाषावाचक असून संगीत 'मृच्छकटिका'तल्या बौध्द भिक्षूप्रमाणे किंवा 'शारदे'तल्या मुसलमान शिपायाप्रमाणे हास्यरसाचाच उठाव करणारी आहेत. अशा प्रकारची नामावली पाहून माझ्या माहितीत असलेली आमच्या घराण्यातली पिढीजाद पाकरहस्ये वाचकांच्या फायद्यासाठी पुढे दिलेली आहेत. ही पक्वान्ने कित्येक वाचकांना कदाचित माहीत असण्याचाही संभव आहे; परंतु असे वाचक फार थोडेच सापडतील अशी मला आशा आहे. 'स्वयंपाकघरातील सामान्य व्यवस्थे'विषयी प्रथम 'चार शब्द' लिहिल्यानंतर काही पक्वान्नांची माहिती देऊन वाचकांची सप्रेम रजा घेण्याचा माझा संकल्प आहे.

स्वयंपाकघरातील सामान्य व्यवस्था

माझ्या एका भगिनीने म्हटले आहे की, स्वयंपाकघरात आधी चांगला उजेड पाहिजे. ही गोष्ट अगदी बरोबर आहे; परंतु या गोष्टीकडे विशेष लक्ष देण्याची तिची सूचना मात्र मला कबूल नाही! स्वयंपाकघरातल्या कोणत्याच गोष्टीकडे अजिबात लक्ष न दिले, म्हणजे अनायासेच कामाचा चांगलाच उजेड पडतो, हे उघड आहे. दुसर्‍या एका भगिनीने स्वयंपाकघर अगदी आरशासारखे स्वच्छ ठेवण्याविषयी सूचना केली आहे. तीसुध्दा जराशी चुकीचीच आहे. माझ्या मते आठ-पंधरा दिवसांनी घरातला केर काढणे फार उत्तम! अशाने वेणीफणी करताना उघडेच टाकून दिलेले 'बाकस' वेळीअवेळी लाथाडल्यामुळे त्यातून चोहीकडे उधळलेले मणी, टिकल्या, घुंगर्‍या किंवा याच प्रकारचे किडूक-मिडूक आठ-पंधरा दिवसांत एखाद्या वेळी पायदळी सापडून पुन्हा मिळण्याचा संभव असतो. झालेला केर कोपर्‍यात गोळा करण्यापूर्वी तिकडच्या धोतराच्या ओलवतीचा बोळा एकीकडे ठेवलेला बरा; नाहीतर केराचा लेप बसून धोतराला लुगडयाची कळा येते आणि मग धुणी धुवावयाच्या वेळी आपल्याला धोतर शोधून काढण्यासाठी उगीच घरभर येरझारा घालाव्या लागतात. एका बाईला तर अशा रीतीने गडप झालेला धोतराचा बोळा शोधून काढण्यासाठी 'तिकड'च्या खिशातले पैशाचे पाकिटसुध्दा उघडून पाहण्याची तकलीफ घ्यावी लागली! त्याचप्रमाणे लोटे, गडवे, पाट वगैरे इकडे तिकडे पडलेल्या चिजा केराबरोबर न जाऊ देण्याची खबरदारी घ्यावी. कारण केर भरून टाकताना मग उगाच जिवापाड ओझे उचलावे लागते. मी तर म्हणतो, की रांगती पांगती मुलेसुध्दा केरात जाऊ देऊ नयेत. कोपर्‍यातून बाहेर गडगडताना ती पुन्हा केर करून ठेवतात. मुलांच्या बाबतीत एकंदरीनेच जास्त लक्ष दिलेले काही वाईट नाही. गतवर्षी आमच्या गावी एका बाईने गडबडीत आपले चारपाच वर्षाचे निजलेले मूलसुध्दा बिछान्यात गुंडाळले आणि अखेर बिछान्याच्या वळकटयांच्या उतरंडीखाली ते पोर अक्षरश: चेंगरून मेले! सकाळी झालेली ही गोष्ट अकरा वाजता जेवतेवेळी तिच्या लक्षात आली. झालेल्या प्रकरणात जरासा हलगर्जीपणा झाला, असे म्हणण्याचे मी धाडस करितो. कारण, नऊ साडेनऊ वाजताच मुलाची एकदा चौकशी केली असती, म्हणजे मग त्याच्यासाठी केलेले सपाट वाटीभर कण्यांचे खिमट फुकट गेले नसते! एवढयासाठीच मुलांकडे जरा विशेष लक्ष पुरविण्याची मी सूचना करीत आहे. ऐन घाईच्या वेळी पोळी लाटताना किंवा वरण घाटताना सकाळपासून भुकेलेला बाळया सारखा रडत आला, तर त्रासिकपणे 'मर मेल्या' म्हणून त्याच्याकडे हातातले लाटणे किंवा पळी फेकून मारू नये. संतापाच्या भरात बाळयावरचा नेम चुकून त्याची हाडे मोडण्याऐवजी पाटयावर आपटल्यामुळे लाटणे किंवा पळी मोडून चार आण्याचे नुकसान झाल्याची अनेक उदाहरणे घडलेली आहेत. तसेच घाईघाईने भाजी चिरून झाल्यावर, रांगते मूल जवळपास असल्यास विळीचे पाते उघडे ठेवूनच दुसर्‍या कामाला लागू नये. पोराच्या जातीने सहजगत्या हातपाय कापून घेतल्यामुळे पुन्हा विळीचे काम लागल्यास धुवून घेण्याची यातायात करावी लागते. गडबडीच्या वेळी हाताहोईतो 'जळळं मेलं कारटं' 'तिकड'च्या समोर आदळून बसवावं, हे उत्तम. तिकडून ऑफिसचे काम घरी पाहत बसण्याचे सोंग चाललेले असते, तिकडे लक्ष देण्यात काहीच अर्थ नाही. आंघोळीला पाणी उपसून देताना गंगाजळाच्या तळाशी भाताच्या शितांचा थर बसविण्याची काळजी घ्यावी. पेंढयाच्या काडया, कोळसे, भाजीची डेंखे वगैरे योग्य मिश्रण असल्याने घरातली काडीसुध्दा फुकट जात नाही, अशी 'तिकड'ची खात्री होते. जमल्यास आंघोळीचे पाणी उपसल्यावर प्रथम केर काढावा व नंतर आंघोळीला 'खाली' बोलवावे. अशा रंगीबेरंगी पाण्यामुळे, आपण लुगडेबिगडेसुध्दा धुवून घेतल्याचा 'तिकडे' संशय येऊन उलट आपल्या कामाचा उरक लक्षात येतो आणि तळचा शितांचा थर पाहिल्याबरोबर भात झाल्याची खूण पटून 'तिकडे' ऑफिसात वेळेवर जावयाला मिळण्याची खात्री वाटू लागते. वेणीफणी स्वयंपाकघरातच करण्याचा सराव ठेवला, म्हणजे मग भाकरी करताना पिठात केस गेल्यावाचून राहत नाहीत आणि अशी 'केशाकर्षणा'ने बनलेली भाकर उभ्याओणव्याने ताटात टाकली, तरी सहसा तिचे तुकडे होत नाहीत. एका भगिनीने सुचविल्याप्रमाणे 'वाढताना ताटात गर्दी करू नये, पदार्थ थोडथोडया प्रमाणात वाढावे, म्हणजे ताट पाहूनच जेवणाराचे समाधान होते.' विशेषत: पाव्हणेरावळे असल्यास ही सूचना जरूर अमलात आणावी. मागून घेण्याची सोय नसल्यामुळे पाहुण्यांना 'ताटाकडे पाहूनच समाधान' मानण्यावाचून अशा प्रसंगी गत्यंतर नसते!

यावाचून स्वयंपाकघरातल्या साधारण व्यवस्थेखेरीज पुष्कळ गोष्टी सांगण्यासारख्या आहेत; परंतु स्थलसंकोचास्तव येथेच आटोपते घेऊन मला माहीत असलेल्या मुख्य मुख्य पदार्थांच्या कृती देऊ लागतो:-

चापटपोळया

स्वत:च्या खेरीज दुसरी चांगलीशी पाठ घ्यावी. आपल्या हाताची बोटे नीट पसरून हात खूप जोराने त्या उघडया पाठीवर आपटावा. असेच चार-सहा वेळा करावे. चांगल्या चापटपोळया होतात.

धम्मकलाडू

वरच्याप्रमाणे, फक्त हाताची चांगली भक्कम मूठ करावी. याच पदार्थाला कोठेकोठे 'मुष्टिमोदक' असेही म्हणतात. हे दोन्ही पदार्थ वेळीअवेळी मुलांना द्यावयाला चांगले असतात.

कणिक तिंबणे

हव्या तशा हाताने दुसर्‍यावर माराचा वर्षाव केला, म्हणजे त्याची कणिक तिंबून निघते. हे फार आटाआटीचे पक्वान्न आहे.

विहिणीची रेवडी

मोठया मानापमानाने विहीणबाईंना बसावयास बोलवावे. शेजारच्या पाजारच्या बायकांना बोलावणे असावेच. मग वेळ पाहून उखाळयापाखाळया काढाव्या व घालूनपाडून बोलावयास सुरुवात करावी. विहीण चांगली तापून निघेपर्यंत उणीपाणी काढावयाचे सोडू नये. लौकरच सार्‍या बाया हसावयास लागतात व विहीणीची शोभा होऊन चांगली रेवडी होते. मात्र यात आपल्याकडे वरमाईपणाने नाते असले पाहिजे.

पोळया लाटणे

माझ्या भगिनींनी या कामात फारच मर्यादशील वृत्ती ठेवल्यासारखी दिसते. पोळया, कधी कधी पुर्‍या व सठीसामासी पापड लाटण्यापलीकडे त्यांच्या मनाची धाव जात नाही. खरे म्हटले असता सवड सापडल्यास कोणताही पदार्थ लाटावयास मागेपुढे पाहू नयेत! अर्थात्, संकोचवृत्तीच्या सासुरवाशिणींना या बाबतीत थोडे जपून वागले पाहिजे. त्यांनी माझ्या एका भगिनीच्याच शब्दात म्हणावयाचे असल्यास, पोळी फार मोठी लाटू नये, पुरीसारखी लाटावी, व इकडे तिकडे कोणी नाहीसे पाहून हलक्या हाताने तव्यावरून काढून घ्यावी. ताजी मिळते, दुसरे काय! बाकी झाकून ठेवलेली पोळी लाटावयास सुध्दा हरकत नाही. या कामी तरतरीतपणा विशेष लागतो.

बर्फीची चटणी

चांगली शेर, दीडशेर सुरती बर्फी घ्यावी व सहज हाताला लागेल अशी उघडी ठेवावी. स्वयंपाक करताना अगर येताजाता तिचा एकेक बकाणा भरीत जावे. घटकेच्या आत सगळया बर्फीची चटणी होते. माझ्या एका भगिनीने कुरकूर केली आहे की, दररोज नवीन चटणी करण्यास फार अडचण होते. माझ्या मते कोणत्याही आवडत्या पदार्थाची तेव्हाच चटणी करून टाकता येते.

थंडा फराळ

दुपारची जेवणे झाली म्हणजे खुशाल तणावून द्यावे व चुलीला वाटाण्याच्या अक्षता द्याव्या. संध्याकाळी 'तिकडून' कामकाज करून कंटाळून घरी येणे झाल्यावर आजाराची सबब सांगावी. 'तिकडे' बहुतकरून चुलीची आराधना करण्याचा कंटाळा असतोच! अशा वेळी हजार हिश्शांनी 'थंडा फराळ' करून वेळ भागवावी लागते; हा पदार्थ उपासालासुध्दा चालतो.

अंगाचा तिळपापड

बहुतेक प्रकार वरच्यासारखाच. मात्र 'तिकडून' ज्या दिवशी दोनचार स्नेहीसोबती संध्याकाळी फराळाला बोलवायचे झाले असेल, त्याच दिवशी हा पदार्थ करता येतो. ऐन वेळी चुलखंडात जिकडेतिकडे सामसूम पाहून तिकडच्या अंगाचा तिळपापड होतो. पण चौरचौघांदेखत बोलावयाचे मात्र नाही. कदाचित् दुसर्‍या दिवशी हा तिळपापड आपल्या अंगावर शेकून घ्यावा लागतो.

पाठीचे धिरडे

सारी तयारी पुन्हा वरच्यासारखीच. पाहुणा मात्र एकच असावा आणि 'तिकडून' विचारणे झाले, म्हणजे आपण जळफळू लागावे. 'तिकडून' एखाददुसरा शब्द तोंडातून काढताच आपण तोंडाला तोंड द्यावे. 'तिकडून' हातघाईवर येणे होते आणि लौकरच आपल्या पाठीचे चांगले धिरडे होते. हे पोटाला बाधत नाही.

हाडाची पूड

नेहमी कैदाशिणीप्रमाणे वागणे ठेवावे. वेळ-अवेळ पाहिल्यावाचून तोंडाला येईल ते भकावे. 'तिकड'च्या माणसांना शिव्यागाळी कराव्या. काही म्हणता काही ऐकू नये. सार्‍या घराला सळो की पळोसे करावे. एखाद्या दिवशी तरी आपल्या हाडांची चांगली पूड होते! हे पक्वान्न नेहमी करावयास सोपे नाही!

मनातले मांडे

आपल्या जन्मजन्मांतरी मिळणार नाहीत असे दागिने अंगाखांद्यावर घालून आपण मिरवत असल्याची नेहमी कल्पना करीत बसावे. यालाच 'मनातले मांडे खाणे' असे म्हणतात. गरिबांच्या संसाराला हा पदार्थ वाटेल तेव्हा करता येण्यासारखा आहे.

माणसांचे मेतकूट

घरची चांगली श्रीमंती असल्याखेरीज हा पदार्थ होत नाही. घरात चाकरमाणसे पुष्कळशी असली म्हणजे आपण त्यांच्यावर मुळीच लक्ष ठेवू नये. दळण, बाजारहाट, शिधा वगैरे गोष्टी होतील तशा होऊ द्याव्या. लौकरच सार्‍या माणसांचे छान मेतकूट जमते. अर्थात हे उघडयावर येईपर्यंत टिकते.

घरादाराचे खोबरे

'तिकडे बाटलाबाईसारखे एखादे व्यसन लागलेले पाहताच आपण वैतागाने चाकरमाणसांवर घर टाकून माहेरची वाट धरावी. वर्ष-सहा महिन्यांत सार्‍या घरादाराचे खोबरे होते. हा पदार्थ जन्मात एखाद्या वेळेला करता येतो.

अकलेचा कांदा

आपले चांगले आठ-दहा वर्षाचे पोर घ्यावे. त्याची तिन्हीत्रिकाळ सारखी वाखाणणी करावी. तो बोलेल ते त्याला बोलू द्यावे. 'तिकडून' त्याच्यावर जरा रागवायचे झाले, की पोराला पोटाशी धरून दिवसभर रडत बसावे. त्याचे भलभलते लाड मनापासून पुरवावेत. वर्षा दोन वर्षात पोराचा चांगला अकलेचा कांदा तयार होतो. पुढे याला बाहेरच्या लोकांनी चांगला फोडून काढताना पाहिले म्हणजे मात्र खरोखरीच डोळयांना पाणी येते.

गुळाचा गणपती

आपलेच तीन-चार वर्षाचे पोर घ्यावे. त्याला नेहमी स्वयंपाकघरात बसवून ठेवावे. नेहमी त्याच्या हातावर गोडधोडाचे काहीतरी ठेवीत जावे. त्याला इकडची काडी तिकडे करू देऊ नये. शाळेतसुध्दा जाऊ देऊ नये. खायला हवे तसे घालावे; पण जागचा हलू देऊ नये. लौकरच बसल्या जागी मुलगा अगदी गुळाचा गणपती होतो. हा पुष्कळ वर्षे टिकतो.

याशिवाय 'डाळ शिजवणे', 'नाकाला मिरच्या लावणे', 'वाटाण्याच्या अक्षता', 'पुराणातील वांगी', 'वाटेल त्या कामाचा खिचडा', वगैरे पुष्कळ लहानसान पदार्थ सहज करता येण्याजोगे आहेत; परंतु स्थलसंकोचास्तव त्यांची माहिती देत बसणे शक्य नाही. तूर्त दिले आहेत, तेवढया पदार्थांचेच माझ्या भगिनींनी मोकळया मनाने चीज केले म्हणजे स्वत:ला धन्य समजेन. त्यांनी माझ्या या गुणाचे सहृदयपणाने कौतुक करावे, एवढेच या भोळयाभाबडया व गरीब भावंडाचे मागणे आहे.