Get it on Google Play
Download on the App Store

लग्नाच्या मोहिमेची पूर्वतयारी

वर शोधाया जाण्यापूर्वी किती तयारी लागे - बाळकराम

कोणत्याही महत्कार्याला सुरुवात करण्यापूर्वी त्याची आधी किती तरी तयारी करावी लागते, याचे थोडक्यात चटकदार वर्णन शिरोभागी दिलेल्या अर्ध्या साकीत कवीने दिलेलेच आहे! परीक्षेचे कागद तीन तासांत चट्दिशी लिहून काढण्यासाठी आलेला उमेदवार आधी वर्षभर पूर्वतयारी करीत असतो. एखाद्या दिवशी सकाळी पेढीच्या दारांवर दिवाळे फुकट मोकळे झाल्याची नोटीस अचानक लावणार्‍या पेढीवाल्या भागीदारांना चार-चार महिने आधी खलबते करावी लागतात. त्याचप्रमाणे माझे मित्र तिंबूनाना यांच्या ठकीसाठी नवरामुलगा शोधण्यासाठी पुण्यास येऊन ठेपण्यापूर्वी आम्हाला आधी किती पूर्वतयारी करावी लागली, याची वाचकांना या लेखात थोडक्यात माहिती करून देण्याचे योजिले आहे.

सौंदर्यपरीक्षणाच्या अनेक दृष्टीपैकी अत्यंत तीव्र अशा स्त्रीदृष्टीने पाहिले तरीही ठकीचे सौंदर्य अलौकिक होते असे प्रांजलपणाने कबूल करावे लागेल! ठकीची अंगकांती सुवर्ण रंगाची आहे; मात्र ही सुवर्णरचना सोनेरी किंवा तांबडया शाईने करून भागावयाचे नाही. या रंगामुळे ठकीच्या बहुतांशी गैरहजर भोवयांची उणीव, किंवा धांदरटपणाने डोळयाबाहेर येऊन भोवतालच्या प्रदेशात बागडणार्‍या काजळाचा फाजीलपणा, ही दोन्हीही तिऱ्हाईताच्या चटकन् लक्षात येत नसत. महाकवी कालिदासाने शकुंतलेच्या सौंदर्यसर्वस्वाची जी लतिकेशी तुलना केली आहे, तीच ठकीच्या बाबतीतही सत्याला न सोडता करून दाखविता येईल. इतकेच नव्हे, तर एखाद्या लतेशी पूर्ण सदृश न व्हावयाला शकुंतलेच्या ठिकाणी जी एक मोठी उणीव होती, तीसुध्दा ठकीच्या वर्णनात भरून निघाली आहे. कारण, शकुंतलेप्रमाणेच ठकीचे 'बाहू ढापे लतिकेचे' व 'कर पल्लव साचे' असून शिवाय एखाद्या लतिकेप्रमाणे ठकीच्या एका डोळयात फूलही आहे! त्याचप्रमाणे, सुंदर स्त्रीला अप्सरेची किंवा देवांगनेची उपमा देऊन तिला 'देवी' या संबोधनाने पाचारण्याचा प्रघात आहे; या दृष्टीने पाहिले तरी, ठकीचे सौंदर्य कसोटीस उतरण्यासारखेच होते. तिच्या तोंडाकडे पाहताच हजारो देवींचे दर्शन घेतल्याचा साक्षात्कार होऊन शिवाय भाविक वारकर्‍याला तर आळंदीच्या वाकडया विठोबाची आठवण होत असे. कारण, ठकीची मान स्वभावत:च उजव्या बाजूकडे जराशी कलती असल्यामुळे ती नीट उभी राहिली असताही समोरून पाहणारास परेड करताना 'आइझ राइट'च्या पवित्र्यात उभ्या असलेल्या शिपायासारखी दिसत असे. एखादे वेळी कंबर कसून अशा लष्करी पेशात ठाण मांडिलेल्या ठकीकडे पाहिले, म्हणजे उजव्या सोंडेचा गणपती किंवा डाव्या तोंडाचा मारुती, यांसारख्या दुर्मीळ दैवतांप्रमाणेच तिचे अपूर्व कौतुक करावेसे वाटल्यावाचून राहात नसे.


सौंदर्याकडे पाहावयाच्या दृष्टी अनेक असल्यामुळे, कवितेप्रमाणेच सौंदर्याचीही व्याख्या करता येणे शक्य नाही, हे कोणीही समंजस मनुष्य कबूल करील. काशीच्या अयोध्याप्रसादाच्या अर्धांगीला आपल्या पतिराजाच्या दाढीमिशी टोपाच्या जंगलात सृष्टीसौंदर्याचे माथेरान दिसत असते, तर रामेश्वरच्या बिजरंगय्याची बायको आपल्या पतिराजाच्या खांद्यावरील सर्वस्वी तासून काढलेल्या नारळी सागरगोटयाच्या संन्यस्त स्वरूपातच सौंदर्याची परमावधी पाहात असते. हिंदुस्थानच्या पूर्वेकडच्या प्रदेशात चीनांगना लिहंगचंगाच्या गजाने मोजण्याजोग्या शेंडीच्या पाशात गुरफटून जाते; तर पश्चिमेकडे कोणी हबशीण आपल्या शिद्दी मकांडयाच्या डोक्यावरील उगवत्या जागीच मुरकुंडी मारल्यामुळे मुंगळयासारख्या दिसणार्‍या केशगुच्छावर फिदा असते. महाराष्ट्रभामिनीची कुंदकळयांसारख्या शुभ्र दंतपंक्ती पाहून ब्रह्मो सौंदर्य आपली रंगवून काळी केलेली बत्तिशी उपहासाने व्यक्त केल्यावाचून राहणार नाही! त्याचप्रमाणे पीतवर्ण चिनी लोखंडी पट्टयांनी आपल्या सहधर्मचारिणीच्या पावलांची वाढ खुंटलेली पाहून खूष होतो! श्वेतवर्ण युरोपियन चामडयाच्या पट्टयांनी आपल्या अर्धांगीच्या कटिबंधाची वाढ थांबविण्यात आनंद मानतो, तर कृष्णवर्ण हिंदू अज्ञानाच्या पट्टयांनी आपल्या गृहदेवतेच्या डोक्याची वाढ थांबविण्यात धन्यता मानतो.

सौंदर्यनिरीक्षणाच्या पध्दती देशदृष्टीप्रमाणेच व्यक्तिदृष्टयाही बदलत असतात. उंटाप्रमाणे अठरा अंगांनी वाकडेपणा दाखविणार्‍या व विश्वसौंदर्याचे गालबोट म्हणून प्रसिध्द असलेल्या कुब्जेकडे पाहून, करोडो गोपींवरून फिरून आलेली श्रीकृष्णाची चंचल दृष्टी जादूने खिळल्यासारखी स्थिर झाली; रघुवीराच्या घोरपडयाच्या शाईप्रमाणे लिहिताना निळया रंगावरच सीतामाई बहाल होत्या; यथार्थनामा अष्टावक्राच्या स्त्रीने किंवा सुपाएवढाल्या नखांच्या शूर्पणखेच्या पतीने आपापल्या प्रेमपत्रांबद्दल गळयात मिठी मारताना तिच्या शेपटाकडे पाहून, अर्जुनाने आपल्या गळयात ही घोरपड कशाला हवी अशा अर्थाची कुरकूर कधीच केली नाही, किंवा श्रीमती सौ. हिडिंबेच्या ताडमाड लांबीच्या सुळया-दातांकडे व 'विक्राळ दाढांकडे' पाहूनही युवराज भीमाने तिला 'दंतव्रण करि गाला' असे म्हणताना तसूभर माघार घेतली नाही. फार कशाला, आपल्या अनुगुणरूप अर्धांगीला देशोधडी लावून गेल्या पिढीतल्या शिळयापाक्या जीवनरसाची लयलूट करणारी रंगेल नरमौक्तिके आमच्या टीचभर महाराष्ट्र जनसमुद्राच्या चिखलातच इतकी सापडतील की, त्यांची भली लांबलचक वैजयंती सहज करता येईल. सारांश, सौंदर्याची व्याख्या अमर्याद व अंधुक असल्यामुळेच काळेबेंद्रे व नकटया नाकाचे कुब्जेचे वंशज घटकाघटका आरशासमोर उभे राहून माकडचेष्टा करताना दृष्टीस पडतात.

याप्रमाणे सौंदर्याच्या बाबतीतही 'भिन्नरुचिही लोक:' असल्यामुळे, माझ्या कित्येक वाचकांना ठकीचे सौंदर्य न पटून किंबहुना हास्यास्पदही वाटून, ठकीचे लग्न इतके प्रयत्न करूनसुध्दा न जमण्याचे कारण तिचे लावण्यच असावे, असा तर्कही ते करू लागतील; परंतु धर्म, हरिश्चंद्र यांसारख्या पौराणिक पुरुषांच्या सत्यप्रियतेचे स्मरण करून मी वाचकांना पूर्वीच सांगून ठेवतो की, यद्यापि ठकीच्या लग्नाला सत्राशे विघ्ने येत गेली, तथापि तिच्या सौंदर्यामुळे तिला कोणी नाकारल्याचे माझ्या स्मरणात नाही! अडचण पडे ती नेहमी हुंडा, पोषाख, पत्रिका यांसारख्या महत्त्वाच्या बाबतीतच! नाही म्हणावयास एका तरुण वयाच्या टारगट सुधारकाने मात्र पत्रिका जमत असूनही केवळ मुलगी पसंत नाही अशा क्षुल्लक कारणामुळे आम्हाला निरोप दिला! अर्थात आजकाल वडीलधार्‍या माणसांची लग्नासारख्या धार्मिक गोष्टीतसुध्दा अवज्ञा करण्याचे जे तरुण खूळ माजले आहे, त्यावर मखलाशी करण्यासाठीच त्या पोराने ही पोरकट सबब पुढे आणली. हे उघड उघड दिसतेच आहे.

अरेरे! बरेवाईट समजू लागण्यापूर्वीच लग्नाच्या शृंखलेत स्वत:ला बांधून घेऊन मोकळे होणारे, किंवा हुंडयापाडयांची नीट व्यवस्था लागताच वडिलांनी तारेने तिथिनिश्चय कळविल्याबरोबर एखाद्या वीराप्रमाणे लग्नमंडपात सुमुहूर्ती येऊन थडकणारे ते आमचे पितृभक्तिपरायण आर्य नवरदेव आज कोठे गेले?

सुधारकमजकुरांना मुलगी देण्याची चूक आमच्या हातून झाली नाही, याबद्दल पुढे आम्हाला मोठे समाधान वाटले; कारण काही दिवसांनी मशारनिल्हे टारगट, एका इराण्याच्या दुकानात राजरोसपणे चहा घेताना दृष्टीस पडले. जातीचा हिंदू, पण हाडाचा मात्र नाही! सदरहु दुकानात आम्ही एका कोपर्‍यात बसलेले असल्यामुळे स्वारीच्या मुळीच दृष्टीस पडलो नाही! बशीतल्या ऊन चहावर फुंकर टाकण्याच्या मिषाने तिंबूनाना त्या पापभ्रष्ट सुधारकाबद्दल निराशेचे दीर्घ नि:श्वास टाकू लागले. नानांच्या मनोभावाला शाब्दिक स्वरूप देण्यासाठी मी म्हणालो, नाना, बरे झाले या कर्मनष्टाच्या गळयात आपण ठकी बांधली नाही! सुधारकाला पोर देणे म्हणजे पोरीचा पुनर्विवाह लावण्यासारखेच मी समजतो! मग धडधडीत एखाद्या गुत्त्यात नेऊन पोरीला दारूच्या पिंपात का लोटू नये! ('सुधारक' या शब्दाने तिंबूनानांना दारू व पुनर्विवाह याखेरीज कसलाही बोध होत नसे!) अरे, चांगले हिंदू म्हणवता, आणि इराण्याच्या दुकानात! नाना, स्वारीची जरा उडवतोच आता! (मोठयाने) अहो शिष्ट! आपले वडील हिंदूच होते ना?

प्रश्नाचे उत्तर दिल्यावाचून स्वारी येथून चालती झाली. प्रश्नात थोडी खोच होतीच; तिने स्वारी वरमली आणि दुसरे काय? आमच्या शेजारच्या बाकावरचे दोनचार मुसलमान या वेळी हसावयास लागले. उघडउघड ते आमच्या धर्म ग्लानीलाच हसत असावेत! त्यांच्या हसण्याने बिचारे तिंबूनाना मात्र ओशाळल्यासारखे दिसू लागले. बरोबरच आहे, का दिसणार नाहीत? आमच्या सनातन समाजातली जातिबंधने याप्रमाणे तटातट तुटताना पाहून कोणाचे हृदय तसेच तुटणार नाही? आमच्या धर्मरक्षकांनी इकडे जरूर लक्ष घालावयास पाहिजे. प्राचीन काळी द्वैतमताचे खंडन करून अद्वैताची स्थापना करणार्‍या आद्य शंकराचार्यांनी आपल्या एकटयाच्या सामर्थ्याने भगवंतांनी निर्मिलेल्या चार वर्णाच्या एकदम अठरा जाती केल्या; आणखी आज शेंडीस रुपया वसूल करण्यासाठी उभ्या वर्षातून अवघे पाचदहा तरी शंकराचार्य येत असून सर्वांना मिळून या अठरापगड जातींचे पदर उलगडून आणि अठराशे जातींच्या चिंध्यापांध्या करता येत नाहीत. तिकडे सुधारक लोक कोकणस्थ- देशस्थांतला भेद केवळ प्रांतिक म्हणून मोडण्याच्या खटपटीत आहेत, तोच इकडे आपण कोकणस्थात रत्नागिरे, कुलाबे, किंवा देशस्थात नगरी, सोलापुरी, पुणेरी यांसारखे जिल्हेवारीने भेद करून, किंबहुना कुटुंबागणिक जाती निर्माण करून व सर्वांमधून इथूनतिथून रोटीबेटीव्यवहाराचे निर्बंध पसरून सनातन धर्माला मजबुती का बरे आणू नये? अशा प्रयत्नाने सुधारकांचा तेव्हाच पाडाव होईल. पण लक्षात कोण घेतो? एका आधुनिक कवीने म्हटले आहे, 'धर्मगुरू ते नि:सत्त्व दंडधारी' ते काही खोटे नाही!

वरील धर्मविषयक विषयांतराबद्दल वाचकांची माफी मागून व या सुधारकी अपवादाखेरीज ठकीच्या सौंदर्याला कोणीही नावे ठेवली नाहीत असे पुन्हा सांगून मी पुढच्या मार्गाला लागतो.

पहिल्या दोनतीन वर्षातल्या आमच्या पुण्यावरच्या वैवाहिक मोहिमा हिंदुस्थानभर एकामागून एक सतरा धावत्या स्वार्‍या करूनही अखेरीस असंतुष्ट राहणार्‍या गिझनीच्या महंमदाच्या उनाड धोरणावर करण्यात आल्या होत्या. आम्ही मोठमोठाल्या शहरी चारसहा दिवसांच्या येऊन जाऊन खेपा घालीत असू. या खेपेस आम्ही आमचे धोरण बदलून महंमद घोरीच्या चिरस्थायी तत्त्वाबरहुकूम पुण्यात चारसहा महिने कायमचा तळ देण्याचा मनसुबा केला; पावसाळयाचे चार महिने आम्ही आमच्या गावी राहून विवाहविषयक वाङ्मय वाचण्यात घालविले. हेतू हाच की, गोत्र, पत्रिका, जात, कूळ वगैरे सर्व बाबींबद्दल आमचे आम्हालाच कळून, पुढे उगीच वेळाचा अपव्यय होऊ नये! या विचारास अनुसरून आम्ही मनुस्मृति, विवाहविधी, नवरदेवाची जोडगोळी, पाराशस्मृती, मेन्स हिंदू लॉ, मिताक्षरटीका, जबरीचा विवाह, लग्नसंस्था वगैरे विवाहविषयांवरील ठळक ठळक पुस्तके वाचून टाकिली. मी तर पुनर्विवाहावरील एकदोन पुस्तकेसुध्दा हातावेगळी केली. त्याचप्रमाणे गुदस्ता खटपटी करताना ज्या अडचणींचा अनुभव आला होता त्याचे यंदा आधीपासून निराकरण करण्याचा निश्चय केला. विषयाला सुरुवात होण्यापूर्वीच आडनावामुळे गोत्रांचा 'प्रथम ग्रासे मक्षिकापात:' होऊ नये म्हणून आधी आम्ही दोघांनीही आमची मूळची आडनावे बदलून अनुक्रमे देशपांडे व कुळकर्णी ही संदिग्ध स्वरूपाची सामान्य नावे घेतली; आणि ठकीच्या गृहस्थपेशाच्या मामाला त्याच्या नकळत जोशी बनविले. ज्येष्ठांत ज्येष्ठ मुलाचे लग्न करण्याचा प्रघात नाही असे कळल्यामुळे, ज्येष्ठ मुलाच्या बापाला ज्येष्ठांत लग्न करण्याची गळ घालण्यात फुकट वेळ न घालविण्याचे ठरविले. इतकेच नाही, तर एखाद्याला वाजवीपेक्षा अधिक मुले असली, तर त्याच्याकडे अधिक महिन्यात जावयाचे नाही, असाही निश्चय केला. एके ठिकाणी आमचे कपडे पाहूनच आमच्या दारिद्य्रासकट हुंडयाची अटकळ बांधून एका श्रीमंतांनी आम्हाला देवडीवरूनच निरोप दिल्यामुळे, या खेपेस पुण्यास गेल्याबरोबर आम्ही दोघांसाठी उंची पोषाख करण्याचे 'बजेट' मंजूर करून घेतले. तिंबूनानांच्या कुटुंबाला चार वर्षांखाली देवाज्ञा झाली होती, ते व्यंगसुध्दा एके ठिकाणी आड आले होते. बहुतेक बाबतीत उभयपक्षांचे चांगले जमूनही वरपक्षाने अखेर मुलाला सासू नाही, या कारणामुळे लग्न फिसकटविले होते. त्या प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नानांनी पहिल्या मुहूर्तालाच स्वत:ला चतुर्भूज करून घेऊन 'चक्षुवै सत्यम्' या न्यायाने प्रतिपक्षाचे समाधान करण्यासाठी आपल्या नूतन कुटुंबाला बरोबर घेण्याचे ठरविले. काही जुन्या मतांची माणसे मुलीचे वय जास्त असले म्हणजे कां कूं करतात, हे लोकविश्रुत आहेच. ही अडचण दूर करण्यासाठी पूर्वी चित्रगुप्ताच्या जमाखर्चावर दरोडा घालून ठकीचे वय चोरण्याचा आमचा परिपाठ असे; परंतु अशी लबाडी उघडकीस आल्यामुळे एकदा आम्हाला हाती आलेले स्थळ दवडावे लागले; म्हणून यंदा आम्ही निराळीच तजवीज केली. ठकीच्या वयोवर्णनाला तिखटमीठ लावण्याऐवजी आम्ही सालमजकुरी ठकीचे मीठ अजिबात तोडून व तिला एकभुक्त ठेवून तिच्या वयात बरीच काटकसर केली. आमचे मित्र चिंतोपंत यांच्या सूचनेप्रमाणे माजोरी बैलाप्रमाणे ठकीला ऊन पाण्याचा रतीबही सुरू केला होता.

असाच समजुतीचा घोटाळा एकदा पत्रिकेच्या बाबतीतही झाला होता. ठकीला मंगळ आहे किंवा नाही, याविषयी मी सेमिरामीस राणीची पहिली मंगळागौर कोणत्या साली झाली, या प्रश्नाइतकाच माहीतगार होतो. एखाद्या पत्रिकेकडे पाहून मला डॉक्टरने लिहून दिलेल्या प्रिस्क्रिप्शनकडे पाहण्यापेक्षा जास्त बोध होत नसे. मंगळवारी जन्मलेल्या मुलालाच काय तो मंगळ असतो, अशी माझी अंधुक समजूत असे. एके ठिकाणी सर्व गोष्टी बिनबोभाट पटून मुलगा अमंगळ असल्यामुळे मुलीलाही मंगळ नसल्याची खात्री होताच तिथिनिश्चय करण्याचे त्याच्या बापाने कबूल केले. दुसर्‍या दिवशी आम्ही ठकीची एक बनावट जन्मपत्रिका तयार करून तिच्यातून मंगळाला अजिबात अर्धचंद्र दिला, व ती त्या गृहस्थाच्या स्वाधीन केली. पत्रिकेकडे बराच वेळ निरखून पाहून अखेरीस मंगळाचा उल्लेख करावयाचा चुकून राहिल्याबद्दल त्यांनी शंका प्रदर्शित करताच मी अजाण बालकाच्या निर्दोष हास्यमुद्रेने म्हणालो, चुकून राहिला नाही! मुलीलाच मुळी मंगळ नाही, मग पत्रिकेत कोठून येणार?

हे उत्तर ऐकताच त्या गृहस्थाने संतापाने पत्रिका जमिनीवर फेकली. त्याच्या तांबडया-लाल डोळयांच्या जागी एक सोडून दोन मंगळ दिसू लागले. अशा मंगलदृष्टीने तो गृहस्थ आमच्याकडे पाहात असताही आम्ही शनीसारखे काळेठिक्कर पडलो, व अखेरीस आम्ही मंगळाची जी दशा केली होती तीच त्या गृहस्थाने आमची केली! या अनुभवामुळे बनावट मृत्यूपत्राप्रमाणे बनावट जन्मपत्रे करण्यालासुध्दा निर्ढावलेला धंदेवालाच लागतो अशी खात्री होऊन या वर्षी आम्ही आमच्या आबाभटजींनाच बरोबर घेतले होते. यंदा लग्न पार पाडल्याखेरीज फिरावयाचे नाही अशी आम्ही प्रतिज्ञा केली असल्यामुळे चातुर्मासात सुध्दा जमल्यास कार्य उरकून घेता यावे म्हणून, पुढीलप्रमाणे दूरदर्शीपणाची तरतूद ठेविली. व्यंकटगिरीस जाऊन चातुर्मासात किंवा कृष्णानर्मदा यांमधील प्रदेशाखेरीज इतरत्र कोठेही अगदी सिंहस्थातसुध्दा लग्न करावयास हरकत नाही अशा अर्थाचा मजकूर जुनाट जुन्नरी सुडाच्या कागदावर शिर्‍याच्या शाईने लिहून जास्त जुनाट रंग देण्यासाठी तो कागदाचा फळका मंदाग्नीने तव्यावर जरासा परतून घेतला, व त्याला जुन्या धार्मिक आज्ञापत्राचे पूर्ण स्वरूप देण्यासाठी त्याखाली भृगुसंहितेतही ज्यांच्या पत्रिका नमूद केल्या नाहीत अशा काल्पनिक वेदोनारायणांची नावे घालून शेवटी माहुलीचे रामशास्त्री प्रभुणे व काशीकर गागाभट्ट यांच्याही सह्या ठोकून दिल्या.

गेल्या साली पुण्यातल्या तांगेवाल्याशी भाडे ठरविण्याची घासाघीस करण्यातच आमची अर्धीअधिक शक्ती खर्च होऊन जात असल्यामुळे मुलांच्या बापाशी हुंडयाबद्दल घासाघीस करण्यापुरता जीवच आमच्यात उरत नसे. यासाठी यंदा आम्ही नानांची थोरली तट्टयाची गाडी पुण्यास नेण्याचे ठरविले; व एक चांगलासा मुहूर्त पाहून तिंबूनाना, आमच्या नव्या वहिनी, ठकी, नानांचा चिमण्या, आबाभटजी, रंगू गाडीवाला, दोन बैल व मी आपापल्या सामानसुमानासकट गाडी घेऊन निघालो. आमच्याबरोबर सामानसुमान पुष्कळच होते. ठकीची व नव्या वहिनींची बासने, वेणीफणीची बाक्से, पेटया, आमची बोचकी, दोन-चार वळकटया, आंबाडा औषधांचा झोळणा, तंबाखूचा बटवा, भजनाचा पखवाज, बिनखुंटयांची व तुटक्या तारांची एक सतार, चिमण्याची 'शिलेटपेनसल', रंगूची घोंगडी, गोधडया, आमची भांडीकुंडी, चार महिन्यांच्या बेगमीचा दाणागोटा वगैरे सर्व प्रकारच्या मालमत्तेच्या वैचित्र्याचे आमच्या गाडीत एक लहानसे प्रदर्शनच झाले होते.

पुण्यास आल्याबरोबर प्रथम आम्ही पोशाखाचे 'एस्टिमेट' करावयास लागलो. उध्दारक किंवा सुधारक यापैकी कोणाच्याही घरी प्रवेश होण्यास मज्जाव नसावा म्हणून नानांनी जुन्या चालीचा व मी नव्या थाटाचा पोषाख करावयाचे ठरविले. साधारणपणे दोघांचा 'कंप्लीट आऊटफिट' व्हावयास अदमासे पाऊणशे रुपयांच्या घरात जाईल असा माझा अभिप्राय ऐकताच आम्ही मोकळया मैदानात असूनही तिंबूनाना जीव गुदमरल्याचा अभिनय करू लागले! नानांना हसतहसत टोमणा देण्याच्या उद्देशाने मी म्हणालो, नाना! आता पाऊणशे रुपयांचा पोषाख घ्यावयाला कचरता; मग उद्या जावयासाठी पोषाख करतेवेळी काय करणार तुम्ही?

नानांनी गंभीरपणे उत्तर दिले, बाळकराम, वेडया उगीच पैसे पाण्यात घालण्यात काय हशील? तुझ्या पोषाखाचा खर्च म्हणजे निव्वळ बुडीत खर्च! जावई पोषाखाबरोबर ठकीलाही पत्करील हे तू विसरतोस! तेव्हा त्याच्यासाठी का नाही हवा तसा खर्च करणार! चल; पत्कर तू ठकीला आणि-

नंतर चार दिवसांनी मी सावध झालो!

एका दवाखान्यात पांढर्‍या सफेद चादरीच्या बिछान्यावर मला निजविले होते. माझ्या लोखंडी खाटेच्या उशालगतच तिंबूनाना बसले होते. माझ्या अंगात फणफणलेला ताप टीचभर थर्मामिटरच्या काबूत येण्यासारखा नसल्यामुळे डिगऱ्यांची मोजमाप करण्यासाठी वाव-दीडवाव लांबीची तीनचार ब्यारोमिटरे आणून ठेविली होती. जवळच दहावीस जणांचा घोळका बसला होता. त्यांच्याकडे मी जिज्ञासापूर्वक पाहताच नानांनी पुढील माहिती दिली.

ठकीच्या लग्नाच्या खटपटीत मला नानांबरोबर बरेच हेलपाटे घालणे आवश्यक असल्यामुळे, प्रस्तुत प्रसंगाप्रमाणे थट्टेच्या बोलांनीसुध्दा माझ्या हृदयाला असे धक्के बसू लागले, तर कामात वारंवार व्यत्यय येण्याची भीती होती. सबब माझे नाजूक हृदय (Heart) काढून टाकून त्याच्याऐवजी अशा प्रसंगी टक्कर देण्याजोगे कठीण हृदय बसवून घेण्यासाठी नानांनी चार साधे डॉक्टर, तीन देशी वैद्य, एक गुरांचा डॉक्टर, दोन वैदू, एक खाटीक व एक चांभार, एवढयांची एक कमिटी बसविली. कमिटी हल्ली त्या विषयाचा खल करीत होती. कमिटी मधूनमधून मजकडे पाहत होती; जो-तो आपल्या परीने इलाज सुचवित होता. माझे मूळचे हृदय कापून काढण्याबद्दल सर्वांचे एकमत होते. वादविवाद फक्त बदली देण्याबद्दलचा होता. डॉक्टर लोकांनी एखाद्या मेलेल्या माणसाचे चांगलेसे हृदय पाहून ते बसविण्याची सूचना पुढे आणली. खाटकाच्या मनातून बकर्‍याचे काळीज वापरावयाचे होते. वैद्य मंडळाने तळहाताएवढी कुरेदाची शाळुंखा करून बसविण्याचे योजिले. सालंमिस्त्री आणि सफेदमिस्त्री यांची समभाग पुरचुंडी कोल्ह्याच्या कातडीत गुंडाळून माझ्या हृदयाच्या जागी ठेवावी, असे वैदूचे म्हणणे होते. गुरांचा डॉक्टर पिसाळलेल्या कुत्र्याच्या जिभेचा तुकडा वापरण्याची शिफारस करीत होता, आणि चांभार तर माझ्या नाजूक हृदयालाच जुन्या जोडयातला सुखतळ दोन्ही बाजूंनी शिवून घेतला म्हणजे आणखी दोन वर्षे तरी पाहावयास नको, असे छातीला हात लावून सांगत होता. शेवटी डॉक्टरांचा विजय झाला; कमिटीने आपला अभिप्राय नानांना कळविला.

त्या दिवशी दवाखान्यात एका शास्त्र्याचे, एका तरुण सुधारकाचे व एका दरोडेखोराचे अशी तीन प्रेते येऊन पडली होती. शास्त्रीबोवांच्या घरी त्यांच्या तीन विधवा मुली, दोन तरुण विधवा बहिणी व उत्तरवयात केलेल्या दोन पोरसवदा स्त्रिया, याप्रमाणे सारी बायकामंडळीच असल्यामुळे स्मशानयात्रेची तरतूद करून ठेवण्यासाठी दूरदर्शीपणाने ते होऊनच मरायला दवाखान्यात आले होते; सार्‍या जन्मभर सुधारणेच्या लांबलांब बाता मारल्यावर एकाएकी पत्नी परलोकवासी झाल्यामुळे स्वत:वर आलेला पुनर्विवाहाचा प्रसंग टाळण्यासाठी सुधारकाने अफू खाऊन जीव दिला होता; आणि दिवसाढवळया एके ठिकाणी दरोडा घालीत असताना गवगवा झाल्यावर चौथ्या मजल्यावरून उडी टाकल्यामुळे दरोडेखोराला मरण आले होते. तिघांचीही प्रेते फाडून पाहता सुधारकाचे हृदय माझ्या हृदयापेक्षा कमकुवत होते, असे ठरले. सूक्ष्मदर्शक यंत्राने शोधून पाहताही शास्त्रीबुवांच्या हृदयाचा थांग न लागल्यामुळे त्यांना हृदयच नव्हते, असे सिध्द झाले; आणि दरोडेखोराचे हृदय काळजासकट उरफाटे लोंबकळत असलेले आढळून आले. अखेर सर्वानुमते त्याचीच निवड झाली. पुढे मला दोन दिवस कोकाईनच्या पिंपात भिजत घातल्यावर माझे हृदय कापून काढून त्याच्या जागी त्या दरोडेखोराचे उरफाटे हृदय सुलट करून चिकटवून दिले, आणि त्याची क्रिया अव्याहत चालण्यासाठी एक रास्कोप सिस्टिम लिव्हर वॉच कायमची किल्ली देऊन त्यावर बसविले. याप्रमाणे हे 'ऑपरेशन' सुखरूप पार पडले, व आम्ही आपल्या कार्याला लागलो.

वरील हकीकतीत वाचकांना एखाददुसरा शब्द अतिशयोक्तीचा आहे असे वाटण्याचा संभव आहे; परंतु ईश्वराला स्मरून मी प्रतिज्ञा करतो की वरील मजकुरात एक अक्षर वावगे लिहिले असल्यास, ज्या टाकाने मी लिहीत आहे त्याची बोथी झडून जावो!

  • मी नवी दुसरी आणीन - बाळकराम

नानांनी स्वत:साठी जुन्या दक्षिणी तऱ्हेचा गुढघ्याशी गोष्टी सांगणारा मलमलीचा अंगरखा बरोबर आणलेला होताच. त्याचे हात चुण्याचे असून त्यापैकी एकेकाची लांबी इतकी होती की, दोहींचे नेहमीच्या हाताएवढाले तुकडे पाडले असते तर हजार हातांच्या सहस्त्रार्जुनालाही त्या अंगरख्याच्या बाहेरची तसूभर धांदोटी लावल्यावाचून उपयोग करून घेता आला असता. नानांच्या फार तरुणपणी त्यांनी एकदा 'विदाउट तिकीट' प्रवास करून पाहिला होता, त्याप्रसंगी 'मिशार निल्हे' अंगरखा त्यांच्या अंगात होता. बोरीबंदर स्टेशनवर तिकीट कलेक्टरला 'पास' असे सांगून झटक्यासरशी बाहेर येताना त्याने आपला हात धरल्याचे गिरगावात येईपर्यंत नानांना कळले नाही, असे ते सांगत असतात! थोडक्या वेळात चुमण्याच्या हातावरून पत्ता काढीत येऊन तिकीट कलेक्टराने नानांजवळून योग्य ते पैसे वसूल करून घेतले! हा अंगरखा अंगात असला म्हणजे इंद्रायणी, मुळामुठा या नद्यांना नाना 'हातभर लांबीचे झरे' असे तुच्छतापूर्वक म्हणत असत. नानांच्या आजोबांच्या लग्नप्रसंगी त्यांना पोषाखावर मिळालेले दीडशे हात लांबीचे व मूळच्या तांबडया व जुनेपणाच्या काळया अशा दोन्ही रंगांवर सारखाच हक्क दाखवणारे पागोटे मुहूर्ताचे म्हणून नानांनी बरोबर आणले होते. मात्र ते पुन्हा बांधून देण्यासाठी पुण्यातल्या सार्‍या पगडबंदांनी मिळून कमीत कमी एक वर्षाची मुदत मागितल्यामुळे आणि खडकवासल्याच्या धरणात कपडे धुण्याची परवानगी नसल्याकारणाने धोबी लोकांनी 'टाटास्कीम'चा तलाव तयार होईपर्यंत धीर धरावयास सांगितल्यामुळे नानांनी ते पागोटे जुन्या स्वरूपातच वापरण्याचा निश्चय केला. या पागोटयाला मधून विसावा देण्यासाठी नानांनी स्वत:चा जुना रुमालही आणला होता. वस्त्रसृष्टीतले लागेबांधे प्राणिसृष्टीतल्या लाग्याबांध्यांप्रमाणे काळाबरोबर दृढ न होता उलट तुटत जात असतात, या न्यायाला अनुसरून, नानांच्या रुमालाचे व त्याच्या जरीच्या काठाचे अलीकडे नीटसे सूत जमत नसल्यामुळे, त्यांचे परस्परांशी इतक्या तुटकपणाचे वर्तन असे की, ते दुरून पाहणार्‍याच्याही दृष्टीला येई. त्यांचा तात्पुरता सलोखा सांभाळण्यासाठी रुमाल बांधून झाल्यावर त्याचे लोंबकळणारे काठ वरून गुंडाळून घ्यावे लागत असल्यामुळे तो रुमाल चापून चोपून बांधल्यानंतर गुजराती नाटकातल्या राजांच्या मंदिलाप्रमाणे शोभिवंत दिसे, आणि एखादे वेळी सारे काठ उलटया पट्टीत बसले म्हणजे त्यात ओतारी लोकांच्या बेडौल पागोटयांतली साधेपणाची झाक दिसून येई. नानांच्या पोषाखात वीतभर रुंदीच्या करवतीकाठी नागपुरी उपरण्याचा उल्लेख केला, म्हणजे त्याचे वर्णन पूर्ण होते. विरत चाललेल्या पोतामुळे नॉटिंगहॅमच्या जाळीदार विलायती कापडातली पारदर्शकपणाचा अपूर्व गुण या पौर्वात्य कारागिरीत अलीकडे स्वत: दिसून, पलीकडचे पदार्थही स्पष्ट दाखवू लागला होता. मळक्या जुनेपणामुळे निळसर झालेल्या या अंबरपटाच्या भर मध्यावर अगदी नव्या हारकचे जाड ठिगळाचे पूर्ण चंद्रबिंब चमकत होते. ही चंद्रकळा दिवसाढवळया पुरुषाच्या अंगावर दिसू नये, म्हणून नानांना उपरणे ठाकठीक उभे चुणून केवळ काठाचा कमरपट्टा कंबरेभोवती गुंडाळावा लागे!

माझ्या पोषाखाची धाटणी सुधारलेल्या बाण्याची होती, हे पूर्वी सांगितलेच आहे; परंतु नवाईने नटण्याच्या हुच्चपणाने जुन्याला अजिबात चाट देण्याइतके अनुकरणांध मात्र आम्ही झालो नव्हतो! बुटाचे लेस व खिशातले हातरुमाल यांखेरीज बाकीच्या दरोबस्त चिजा जुन्या असून त्यांपैकी बहुतेक तर जुन्या बाजारातूनच घेतल्या होत्या, हे सर्व सांगावयास मला अभिमान वाटतो! प्रथम पगडयांची ट्रम निघाली त्या वेळी नानांच्या वडिलांनी एक सुबक पिवळी पगडी घेतली होती. तिचा माझ्यासाठी जीर्णोध्दार करावयाचा नानांनी निश्चय केला. नवेपणी शंकराच्या जटेतून निघणार्‍या गंगामुखाप्रमाणे वर डोकावणारी पगडीची कोकी काळपुरुषाच्या बोजड पायांखाली चिरडून पगडीच्या घेराच्या पातळीशी समांतर झाली होती. तिचा जर काळाठिक्कर पडल्यामुळे नारळाच्या चोडासारखा किंवा पार करपलेल्या करंजीसारखा दिसू लागला होता. थोर घराण्यातल्या कुलवधूप्रमाणे तिलाही आज कैक वर्षे सूर्याचे ऊन कसे ते माहीत नव्हते. अर्थात अशा कुलवधूची आपल्या मालकाच्या डोक्यावर बसण्यापेक्षा त्याच्या पायाशी लोळण घेण्याची विशेष प्रवृत्ती दिसल्यास नवल नाही. शेवटी आर्य नवरदेवाचे पूर्ण हक्क घेऊन मी कातडयाच्या लहानशा वादीने इंग्रजी टोपीच्या धर्तीवर पगडीला डोक्यावर खिळून टाकली. माझा तांबडया रेघांचा कफचा सदरा आत घालून त्याची मूळची पडती कॉलर असूनही तिला एका नव्या कॉलरीची जुलुमाची जोड दिली. जुन्या बाजारात एका काबुल्याजवळून एक खाकी रंगाची इजार व सोजिराचा तांबडा बनातीचा कोट अगदी सस्तात मिळाल्यामुळे नवीन मालाच्या दगदगीत मुळीच पडावे लागले नाही. कोटाची शिवण ठिकठिकाणी उसवल्यामुळे एखाद्या मुलाने फाजील हुंडयाची मागणी करताच काखाबगला वर करून मोकळे होण्याची चांगलीच सोय जमून आली होती. बिचारीच्या डाव्या पायाला मात्र गुडघ्यापासून खाली जाजमाच्या जुन्या खारव्याची जोड दिली असल्यामुळे, लांबून पाहणारास माझा एक पाय लाकडाचा असावा असा भास होत असे. आम्ही रहावयास जे बिऱ्हाड घेतले होते, त्या जागी आमच्या आधी राहणार्‍या पलटणीतल्या एका परदेशी पेन्शनर जमादाराने, घर सोडताना आपल्या जुन्या बुटांचा जोड टाकून दिला होता, तो अनायासेच आमच्या उपयोगी पडला. बुटात तळवे साफ गेलेला एक पायमोजांचा जोडही सापडला. मोज्यांना तळवे नसल्यामुळे एकपरी बरेच झाले होते! कारण, जुने धोरण न सोडता होता होईतो 'अप्टुडेट फॅशन'मध्ये असण्याचा माझा विचार असल्यामुळे, मी विजार मूळची थोडीशी लांडी असताही तिला चारचार बोटे दुमडून घेत असे, व अशा रितीने उघडया पडलेल्या पोटर्‍या बूट घातल्यावरही मोजे हवे तितके अलग वर ओढून घेऊन झाकून न टाकता येत असत. नानांच्या उपरण्याचेच जुळे भावंड माझ्याही कटीखांद्यावर खेळत असे. माझ्या हृदयातच घडयाळ असल्यामुळे बाह्यात्कारी मी एक शेंडाच खिशात लटकावून दिला होता. अर्थात या घडयाळाकडे मला अध्यात्मदृष्टीनेच पाहावे लागत असे, हे सांगणे नकोच. उपरण्याचे काठ अस्ताव्यस्त होऊ नयेत म्हणून टाचण्यांनी मी त्याला लांबलचक गळपटयाचे स्वरूप दिले होते. खिशातला हातरुमाल वारंवार धुण्याची दगदग पडू नये म्हणून त्याची सुरेख घडी घालून एका बाजूला टिपकागदाचा एक बेताचा तुकडा टाचण्यांनी अडकवून टाकिला. घाम पुसते वेळी अर्थातच मी टिपकागदाचा उपयोग करून हातरुमाल जशाचा तसा ठेवीत असे. याप्रमाणे काळे बूट, पांढरे पायमोजे, खाली तुमान, तांबडा कोट आणि पिवळी पगडी, अशा विविध रंगांचा साज घातल्यावर मी अक्षरश: पंचरंगी पोपटाप्रमाणे दिसत असे व कधीकधी तर उपरणे गळयाभोवती गुंडाळून ऐटीने दोन्ही सोगे टाकून कंठ फुटल्याची खूणही पटवून देत असे.

'एक नूर अदमी और दस नूर कपडा' असे म्हणतात ते काही खोटे नाही! कारण, एकच तिंबूनाना, पण कपडयांत जराजरा फेर केला, की निरनिराळे दिसू लागत! पांढरा स्वच्छ पायघोळ अंगरखा न कमरेभोवतालचा उपरण्याचा कंबरपट्टा चढवून वर मोठे पागोटे ठेवले, म्हणजे त्यांच्याकडे पाहातच कृष्णशास्त्री चिपळूणकर, सर दिनकररावराजे राजवाडे, केरूनाना छत्रे वगैरे गेल्या शतकांतल्या त्या मध्यान्हीच्या तेजोभास्करांची आठवण होई; पगडी काढून पांढरा फेटा नीटनेटका बांधताच तेच तिंबूनाना रेल्वेस्टेशनावरील रिफ्रेशमेन्ट रूमच्या दरवाज्यावरच्या 'वेटर'सारखे दिसू लागत; आणि रुमाल काढून बोडके राहताच देशी मिशनऱ्यांसारखे दिसत; रुमाल जरासा अस्ताव्यस्त बांधून गादीवर बसताच अयोध्येच्या नवाबासारखे किंवा मशीर उल्मुल्कासारखे शोभू लागत. मीसुध्दा कमरेला उपरणे गुंडाळून व बूट काढून उभा राहताच गाडीमागे उभ्या राहणार्‍या 'सइसा'सारखा दिसत असे.

माझे ऑपरेशन व आमचे पोषाख होईपर्यंत गेलेला वेळ आम्ही पूर्वतयारीच्या किरकोळ बाबती उरकून घेण्यात घालविला. पूर्वतयारीत कोणतेही न्यून म्हणून राहू द्यावयाचे नाही, अशी आमची भीष्मप्रतिज्ञा होती. हुंडयापांडयाचे जमून ऐन वेळी रक्कम उभी करावयास अडचण पडू नये म्हणून आबाभटजींना गावी पाठवून नानांच्या स्थावरजंगम मिळकतीचे तपशीलवार टाचण व खतेपत्रे आणविली होती. खानेसुमारीच्या ऑफिसात जाऊन हिंदुस्थानातील लहानमोठया अविवाहित हिंदू लोकांचा नक्की आकडा आणविला. भद्रेश्वर दीक्षितांचा पुण्यातला सारा गोतावळा जमवून वरसंशोधनार्थ दाही दिशांकडे उधळून दिला. तमाम न्हावी लोकांना हजामती करताना आपापल्या यजमानांजवळ आमच्याबद्दल गोष्टी काढण्याची पगारी कामगिरी सांगून टाकिली; ठळक अक्षरांत काढिलेल्या चार शिळांच्या मोठमोठया जाहिराती झाडून सार्‍या भिंताडांवरून व बुरुजांवरून फडकवून दिल्या. जाहिरातीतील मजकूर:-

या जाहिरातीने पुणे शहरभर आमचे नाव ज्याच्या-त्याच्या तोंडी झाले. लागलीच आम्ही त्यांच्याही पुढे जाऊन ठिकठिकाणच्या वृत्तपत्रांतून व मासिक पुस्तकांतूनही पुढील आशयाची जाहिरात झळकावयास लाविली.

लग्नास तयार!

वर पाहिजे! वधूपक्षाची कसलीही अट नाही!! मुलगी उत्तम, सुरेख, नाकीडोळी नीटस. वयाने तिच्या पाठच्या भावांपेक्षा थोडी मोठी. शरीराने सुदृढ, बाळबोध वळणाची. हुंडा भरपूर. पत्रिका हव्या तितक्या. मुलीच्या सौंदर्याची आम्हीच तारीफ करण्यात अर्थ नाही. अगदी जन्मांधानेसुध्दा (तिच्या रूपाने चकित होऊन शून्यदृष्टीने तिजकडे पाहात रहावे.) दोन मुली एकदम करणारास एक मुलगी इनाम! ही सवलत तिंबूनानांच्या धाकटया चारी मुलींची लग्ने होईपर्यंत देण्यात येईल! त्वरा करा! तीन दिवसांत हटकून लग्न.

गरजूंनी खाली सही करणारास समक्ष भेटावे, अगर बाजूस दिलेल्या पत्त्यावर पत्रव्यवहार करावा. टपालहशील माफ. तारेचा पत्ता :- 'बाळक्या' बाळकराम गणेश टेलिफोन नंबर:- 11॥ पत्ता:- घर नंबर 109, ग्रामोफोन नंबर:- 2034217 गुरुवार पेठ, पुणे.

जाहिरातीचा मसुदा पाहून नाना निहायत खूष झाले; परंतु मुलीच्या सौंदर्याच्या उल्लेखाबद्दल मात्र ते जरा कच खाऊ लागले. तेव्हा मी त्यांची समजूत केली की, नाना, हा जाहिरातींचा काळ आहे! आजकाल जाहिरातींतून अचूक गुणकारी औषधांची भपकेदार वर्णने येतात, त्यांच्यात औषधापुरते तरी सत्य सापडण्यासारखे असते काय? मग आपल्यालाच लोकांच्या भोळेपणाचा फायदा घ्यावयाला कोणती हरकत आहे?

याप्रमाणे सर्वतोपरी तयारी झाल्यावर आमची गाडी दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत पुणे शहराच्या पेठापेठांतून, आळीआळीतून आणि गल्लीगल्लीतून फिरू लागली. पुणे शहराच्या या दिग्विजयात आम्हाला काय काय अनुभव आले त्याची माहिती पुढील खेपेस देण्याचे (कोणी न मागताच) अभिवचन देऊन तूर्त वाचकांची रजा घेतो.