Get it on Google Play
Download on the App Store

रिकामपणाची कामगिरी

वरसंशोधन

अडला हरि गाढवाचे पाय धरी॥

- व्यवहारकोश

वसंत ऋतूत आपल्या सृष्टीमध्यें केवढाले फेरफार घडून येतात हे नव्याने कशाला सांगावयाला पाहिजे? झाडांना पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतो, वेलींना फुले येतात, ठिकठिकाणच्या वक्त्यांना शब्द फुटतात, पांढर्‍या सशांना पोरे होतात, मेंढयावरची लोकर कातरतात, कोकिळेला कंठ फुटतो, छत्र्यांवर नवे अभे्र चढतात, शहरबाजारांतून खेडेगांवच्या पाहुण्यांना ऊत येतो, मोराला नवा पिसारा फुटतो, कुत्र्यांना लूत लागते, तोरणा-करवंदांचे पेव फुटते, कलिंगडे विकावयास येतात, वगैरे हजारो घडामोडींनी चराचरसृष्टी अगदी गजबजून जाते. या चमत्कारसृष्टीतच आणखी एका चमत्कारमय फेरफाराची गणना करावयास पाहिजे. वसंतोत्सवाच्या सुमारास अनेक फेरफारांप्रमाणेच नवर्‍या मुलांची व त्यांच्या आईबापांची माथी फिरत असतात! पिसाळलेले कुत्रे चावलेला मनुष्य ज्याप्रमाणे आंगोठीच्या मेघांचा गडगडाट ऐकताच पुन्हा पिसाळतो, त्याप्रमाणेच मुंजीच्या वाजंत्र्यांचा कडकडाट कानी पडताच 'उपवधू' मुलांच्या व त्यांच्या वाडवडिलांच्या अंगी भिनलेले अहंपणाचे विषही तडाक्यासरशी उचल खात असते. क्षणार्धात त्यांना आपल्या स्थितीचा, आपल्या किमतीचा, आपल्या योग्यतेचा, किंबहुना आपल्या स्वत:चाही विसर पडून ते अंकगणिताचे पुस्तक रचणार्‍या संख्या-पंडिताप्रमाणे सरसहा मोठमोठाल्या रकमा बडबडू लागतात, आणि बिचार्‍या मुलीच्या बापांना ही अवघड उदाहरणे सोडवावी लागतात. ईश्वराच्या दयेने मला स्वत:ला मुलगी नाही! परंतु काही स्नेह्यासोबत्यांबरोबर करमणुकीखातर खेटे घालून या बाबतीत मी जो अनुभव मिळविला आहे, त्याचा फायदा मी उदार बुध्दीने वाचकांना देण्याचे योजिले आहे.

या सुमारास प्रत्येक 'नवरबापा'चे मन म्हणजे थोरथोर ऐतिहासिक पुरुषांच्या गुणविशेषांचे प्रदर्शनच बनून जाते, असे म्हणण्यास हरकत नाही. महंमद गिजनीच्या धनलोभाने तो स्वार्थपरायण होतो, नेपोलियनच्या महत्त्वाकांक्षेने तो आपल्या मुलाकडे पाहतो, नाना फडणिसाच्या व्यवहारकौशल्याने तो मुलाची किंमत ठरवितो, शिवछत्रपतींच्या धाडसाने वाटेल त्या विजापुरकरावर तो त्या रकमेचा मारा करतो, आणि नादिरशहाच्या क्रूरपणाने ही रक्कम वसूल करून घेतो. त्या एकाच हृदयात रजपुतांचा शिपाईबाणा आणि मराठयांचा गनिमी कावा हे एकाच वेळी उचंबळत असतात. अष्टवसूंच्या अंशांपासून उत्पन्न झालेल्या भीष्माचार्याप्रमाणे, अनेक ऐतिहासिक पुरुषांचा हा मानसपुत्रही, मुलाचा अव्वाच्या सव्वा हुंडा घेण्याची भीष्मप्रतिज्ञा करतो, आणि तितक्याच नेटाने ती तडीसही नेतो. स्वत: नवरामुलगा तर हरभर्‍याच्या झाडावर रात्रंदिवस मुक्काम करून 'बापसे बेटा सवाई' ही म्हण वाजवीपेक्षा फाजील खरी करून दाखवीत असतो. आपल्या अंगच्या लोकोत्तर गुणांनी अनेक म्हणींची नायिका होऊन बसलेली वरमाई तर- परंतु 'अनिर्वर्णनीयं नाम परकलत्रम्!'

अशा प्रकारच्या मनोवृत्तीच्या लोकांशी प्रसंग पडत असल्यामुळे एका मुलीचे लग्न जमविणे म्हणजे आपली एखादी कविता एखाद्या प्रमुख मासिक-पुस्तकांतून छापवून आणण्याइतकेच कठीण कार्य होऊन पडते! कविता व कन्या या जोडीतले हे साम्य लक्षात आले, म्हणजे कवितेला कवींची कन्यका म्हणणार्‍या पहिल्या कल्पक मनुष्याची खरोखर तारीफ करावीशी वाटते!

एकदोन पिढयांपूर्वी मुलीच्या बापावर मुलाची परीक्षा पाहण्याची जबाबदारी असे. साधारणत: या परीक्षेस अक्षर काढणे, श्लोक म्हणणे, एक भले मोठे पागोटे डोकीवर घालून व लांबलचक अंगवस्त्र अंगाभोवती लपेटून भावी सासर्‍यासमोर आपला तोल सांभाळून नीट बसणे, पत्रावळी लावणे, हेच विषय असत. आमच्या आधुनिक विद्वानांना ही विषयांची यादी पाहून हसू येईल; परंतु या विषयांच्या मुळाशी केवढे व्यवहारज्ञान दडी मारून बसले आहे, याची मात्र त्यांना कल्पनाही होणार नाही. अक्षर काढणे व श्लोक म्हणणे या विषयांच्या आवश्यकतेबद्दल सांगावयास नकोच. सुधारलेल्या स्वरूपात हे प्रकार हल्लीही आपल्यांत वावरत आहेत, हे थोडा विचार केल्यास पटण्यासारखं आहे. पागोटयाचा प्रश्न मात्र जरा डोक्याला शीण देण्यासारखा आहे खरा; सबब त्याचे स्पष्टीकरण देणे जरूर आहे. एवढे थोरले बोजड पागोटे जो डोकीवर घेऊन नीट बसतो तो नवरामुलगा पुढेमागे बायको डोईजड झाली, तरी तिला नीटपणे वागवून घेणारच, हे या बाबतीवरून उघड होते. पत्रावळी लावण्यात मुलांचे व्यवहारोपयोगी ज्ञान दिसून येत असे. पूर्वीच्या चंचल वैभवाच्या काळी वडिलोपार्जित मिळकतीवर आजन्म अवलंबून राहणे खात्रीचे नसे; तेव्हा अर्थातच अशा प्रसंगांत सापडल्यास मुलास काही रोजगारधंदा येतो किंवा नाही, हे पाहण्यासाठी पत्रावळी लावण्यास सांगत असत. इंग्लंड, जर्मनी वगैरे देशांतून राजपुत्रांना, त्यांच्या मुख्य (राज्य करण्याच्या) धंद्याखेरीज अडीअडचणीच्या प्रसंगासाठी पायमोजे विणण्याचा, जोडे शिवण्याचा, किंवा असाच एखादा (पोट भरण्याचा) धंदा शिकविण्याची वहिवाट आहे. हे लक्षात घेतले, म्हणजे आमच्या पत्रावळया पूर्वजांना हसण्याचे काहीच कारण उरत नाही. आता येथे कोणी असा आक्षेप काढतील की, या एकाच धंद्याकडे सर्वांचे लक्ष का लागावे? आमच्या आक्षेपकांना आम्ही त्या काळच्या समाजस्थितीचा विचार करण्याची विनंती करितो. पत्रावळी लावण्याचा उपक्रम सनातन नाही; त्याचा जोराने प्रचार पेशवाईत- विशेषत: पेशवाईच्या उत्तर अमदानीत- सुरू झाला असावा. पेशवाईत जेवणावळींना राजाश्रय मिळाल्यामुळे त्या सर्व देशभर प्रचलित होत्या; समाजाचा मोठा भाग त्या वेळी जेवण व तद्विषयक भानगडीत गुंतलेला असे. अर्थात, जेवणावळीच्या उपकरणांना नेहमी जोराची मागणी असायची; त्यामुळे पत्रावळीसारख्या महत्त्वाच्या वस्तूच्या व्यापारात जितके लोक गुंततील तितके थोडे होते. पत्रावळीच्या व्यापाराला मी हे फाजील महत्त्व देतो असे मात्र कोणी अनुमान बांधू नये. एकंदर भोजनकलेचीच त्या वेळी चलती होती. सवाई माधवराव साहेबांच्या लग्नप्रसंगी तर सामानसुमानाची यादी करताना बारभाईंनी जी बारकाईची मुत्सद्देगिरी दाखविली आहे, तीवरून आणि दुसर्‍या बाजीराव साहेबांच्या अमदानीत, ताक किंवा पापड, लोणचे चांगले केल्याबद्दल कैकांना गावच्या गाव इनाम मिळाल्याबद्दलच्या ज्या कर्णकथा आहेत, त्यावरून माझ्या म्हणण्याची यथार्थता सहज लक्षात येण्यासारखी आहे.

प्रस्तुत हे परीक्षणाचे वेड नाहीसे झाले आहे. असे होण्याचे कारण शोधून काढणे मात्र फारच कठीण आहे. एवढे मात्र खरे की, हल्ली जावयाची परीक्षा घेत बसून भागावयाचे नाही. पत्रावळी लावण्याच्या कसोटीचा आग्रह धरला, तर बहुश: गुरवाखेरीज कोणाची निवड होणे शक्य नाही. आणि आजकालच्या या टोपीच्या अमदानीत पगडबंद जावयासाठी हट्ट घेतला, तर तो साठी उलटून गेलेल्या पोक्त नवर्‍या मुलाच्या प्राप्तीनेच भागवावा लागेल! हल्ली जो माल मिळेल तो पदरात पाडून घेण्याकडेच मुलीच्या बापाची अनिवार प्रवृत्ती दिसून येते. नवरामुलगा पुरुषजातीचा असला म्हणजे झाले. मग तो 'बायकांच्या बंडा'तील जागरूकाच्या म्हणण्याप्रमाणे, परंतु अगदी निराळया अर्थाने, 'चुकून पुरुषाच्या जन्माला' आला असला तरीसुध्दा, न खलु तद्वाच्यं वधूबंधुभि:!

लग्नाचे मुहूर्त शुक्रोदयकाळीच सापडत असल्यामुळे वर्षातून लग्नाचा हंगाम दोनदा येत असतो. पहिला मोसम मार्गशीर्षादि तीन महिने चालतो, व दुसरा बार वैशाख-ज्येष्ठ या महिन्यांत उडत असतो. या हंगामाच्या आधी काही दिवस उपवर वधूंचे बाप वरसंशोधनाच्या मोहिमेवर निघतात. या कामगिरीप्रीत्यर्थ ज्या येरझारा घालाव्या लागतात, त्यांना 'जोडे फाडणे' ही लाक्षणिक संज्ञा दिलेली आहे. पय:प्राप्ती होण्यासाठी प्रथम गाईच्या सडांना लावण्यासाठी थोडे पेय (पक्षी पाणी) खर्ची घालावे लागते. त्याप्रमाणे एक जोडा जमविण्यासाठी आधी एक जोडा (पक्षी खेटर) फाडावा लागतो. हेच यात लक्षात ठेवण्यासारखे आहे.

अमुक एके ठिकाणी एखादा सजातीय अविवाहित मुलगा आहे, असे कळल्यानंतर तत्प्राप्तीच्या खटपटीची जी स्थिती असते तिला 'नाद असणे' किंवा 'गळ असणे' असे परिभाषिक नाव आहे. लग्न जमविताना वधूवरांकडे मुख्यत: धार्मिक, व्यवहारिक व शारीरिक अशा तीन दृष्टींनी पहावयाचे असते. पत्रिका पाहणे व गोत्र जमणे या दोन गोष्टींचा धार्मिक बाबीत, आणि हुंडा, कुलशील या गोष्टीचा व्यावहारिक बाबींत समावेश होऊन मुलगी पाहण्याची गोष्ट शारीरिक बाबींत जमा होते. लग्ननिश्चयाच्या या पंचांगात वरपक्षाची वधूपक्षाने खातरजमा करून द्यावयाची असते आणि या त्रिविध विचारामुळे मुलीची व मुलीच्या बापाची कशी त्रेधा उडते, हेच वाचकांनी आता क्रमश: पहावयाचे आहे.

ज्या गृहस्थाच्या घरी आपल्याला जावयाचे असते, त्याच्या आणि आपल्या सामान्य ओळखीचा एखादा 'पित्त्या' गाठून त्यांच्यामार्फत प्रथम चंचुप्रवेश करून घ्यावयाचा असतो. 'नमन' आणि 'प्रास्ताविक विलास' वगैरे झाल्यावर आपला 'पित्त्या' मूळ विषयाला सुरुवात करतो. त्या वेळी तो मुलीच्या बापाबद्दल थोडक्यात माहिती देऊन आपल्या बाळासाहेबांकरिता हे आले आहेत असे सांगतो. आपला दुभाषी वरील माहिती सांगत असताना मुलीच्या बापाने नवरबापाच्या तोंडाकडे अगदी गरिबीच्या, सौजन्याच्या, आशेच्या आणि कुलीनतेच्या मुद्रेने पहावयाचे असते.

वधूपक्षाच्या दुभाष्यामार्फत या अर्जाची सुनावणी होताच वरपक्षाकडून त्या विनंतीच्या अकल्पितपणाबद्दल आश्चर्य दाखविण्यासाठी पहिले छूट यंदा आम्हाला कर्तव्य नाही, असा जबाब मिळतो. बाजारात तिन्ही त्रिकाळी भरपूर मागणी असल्यामुळे आणि इतर कोणत्याही कारणाने भाव उतरण्याची धास्ती नसल्यामुळे आपला माल पडून राहणार नाही, अशी मुलाच्या बापाची खात्री असते! पाय धरणीचा पाया एकदोन अंशांनी वर चढविण्यासाठीच ही चढेल बेपर्वाई तो दाखवीत असतो. मुलीच्या बापाला या ओढून आणलेल्या चंद्रबळाची जाणीव असते; तरीसुध्दा त्याने हा जमाव ऐकून कमालीची केविलवाणी निराशा तोंडावर पसरून आपल्या 'पित्त्या'कडे पहावयाचे असते. यानंतर मध्यस्थाने व मुलीच्या बापाने हुंडयाची साधारण कल्पना देऊन व आसपासची उदाहरणे सांगून 'यंदा कर्तव्य असल्या'ची आवश्यकता पटवून द्यावी लागते. मात्र हुंडयाची कल्पना मुद्दाम सांगावयाची असली, तरी ती ओघाओघाच्या स्वरूपानेच करून द्यावी लागते. अशा प्रकारे बरीचशी मिनतवारी झाली, म्हणजे हे 'कर्तव्यशून्य' महात्मे अंमळ धडपणे बोलू लागतात, आणि हे वरपांगी अवसान लक्षात येत असताही मुलीच्या बापाला आर्जवाचे सोंग आणावे लागते. 'गरजवंताला अक्कल नाही' म्हणतात, ते काही खोटे नाही!

वर सांगितलेल्या म्हणीची आठवण होताच आम्हा पौर्वात्यांचा आणि पाश्चात्य इंग्रजांच्या आचारविचार-कल्पनांत जे दक्षिणोत्तर अंतर आहे, ते ध्यानात आल्यावाचून राहत नाही. इकडे आम्ही 'गरजवंताला अक्कल नाही' असे म्हणतो, तर तिकडे इंग्रज लोक 'गरज ही शोधकतेची आई आहे!' असे म्हणून त्याबरहुकूम गरजेचा मारा चुकवितात. आणि उलट 'अक्कलवंताला गरज नसते!' असा आमच्या म्हणीचा व्यत्यास सिध्द करून दाखवितात. आमच्या हाडीमासी खिळलेला दुबळा दैववाद, आणि इंग्रजांचा पराक्रमी प्रयत्नवाद इतक्या उठावणीने अन्यत्र कोठेही दिसून येणार नाही. त्यांच्या- आमच्या आचारधर्मातही हाच फरक! सभामंडपांतून, देवळांतून आदरबुध्दी व्यक्त करण्यासाठी आम्ही शरीराचे तळाचे टोक उघडे टाकतो, तर ते वरचे टोक उघडे टाकतात. फार कशाला, ज्या लग्नविषयक बाबतीबद्दल मी प्रस्तुत लिहित आहे, तीतसुध्दा आमच्याकडे मुलीच्या बापाने मुलाकडे धाव घ्यावयाची आणि त्यांच्याकडे मुलाने मुलीच्या बापापुढे तोंड वेंगाडावयाचे असते.

'यंदा आम्हास कर्तव्य नाही!' हे उत्तर वरपक्षाच्या तोंडी इतके बसून गेलेले असते की, ते उच्चारताना बोलणारा त्यातल्या शब्दांची मुळीच परवा करीत नाही! अशा चढेलपणाच्या बेदरकारीपणामुळे कधीमधी या वाक्यात मौजेचे फेरफार घडून येतात. माझे मित्र तिंबूनाना यांच्या ठकीचे लग्न जुळविण्यासाठी गेली दोन वर्षे मी तिंबूनानांबरोबर देशोधडी खेटे घालीत असता एका ठिकाणी मला खालील चमत्कार पाहावयास सापडला-

एका गरीब गृहस्थाच्या घरी त्याच्या 'उपवधू' भावाबद्दल गळ घालण्याकरिता मी व तिंबूनाना उभयता गेलो होतो. या गृहस्थाची व माझी साधारणत: ओळख होती; परंतु त्याच्या घरी जाण्याइतका मोठेपणा मी त्याला त्यापूर्वी कधीच दिलेला नव्हता! मला पाहताच सानंद लगबगीने उठून तो म्हणाला, ओहोहो! या बाळकराम! आज कोणीकडे पायधूळ झाडली ही?

आम्ही आत शिरताच, त्या धांदली यजमानाने एका मूळच्या चौकोनी, पण जुनेपणामुळे कोपरे फाटून जवळजवळ लंबवर्तुळ होत आलेल्या सतरंजीवरील केर एका बुरणुसाने झाडून आम्हा दोघांना लोडवजा ठेवलेल्या वळकटीजवळ मोठया मानाने नेऊन बसविले. तिंबूनानांना वळकटीशी टेकून बसवून मी सतरंजीवर शक्य तितकी भोकांची वेटे चुकवून बसण्याचा प्रयत्न केला. वळकटीतल्या कापसाचाही सपाट पसरटपणा जाऊन हजारो गुठळयांमुळे ठिकठिकाणी त्यांचे संघ निर्माण झाले होते. वळकटीच्या या उंचसखल पृष्ठभागाशी आपल्या सपाट पृष्ठभागांचा कसा तरी सलोखा सांभाळून तिंबूनाना स्वस्थ बसण्यासाठी सारखे चळवळ करीत होते. जवळच एक जुनाट आरामखुर्ची उपयोगशून्यतेमुळे स्वत:च आराम घेत पडून आपल्या नावाची सार्थकता करीत होती. तिच्या तुटलेल्या वेताचे जाळे अजागळ मनुष्याच्या शेंडीप्रमाणे- पण- अधोमुख- लोंबकळत असून, बसावयाच्या जागी एक पायमोडका पाट आडवा टाकलेला होता. सतरंजीच्या त्या बेटांमधून निघून, हिंदू व इंग्रजी अशा दोन्ही आसनांच्या त्या जुनाट संगमाचा फायदा घ्यावा असेही माझ्या मनात एकदा येऊन गेले; परंतु मी स्वीकारलेल्या पोक्त कामाच्या मोठेपणाला अशी हुच्चपणाची थोरपालट शोभणार नाही, म्हणून तो बेत रहित केला.

नमस्कार चमत्कार होऊन हवापाणी वगैरे अनावश्यक बाबतींबद्दल बरेच बोलणे होईपर्यंत तो गृहस्थ माझ्याशी इतक्या अदबीने व आर्जवाने बोलत होता की, मला मिळत असलेल्या या सन्मानाचा तिंबूनानांवर काय परिणाम होत आहे, हे पाहण्यासाठी त्यांच्याकडे चार-सहा वेळा नजर टाकल्यावाचून मला राहवेना! पुढे मी आमच्या येण्याचे कारण सांगितले मात्र, आणि सारा मनु एकदम पालटला! त्राटिका नाटकात कमलेशी लगट करणार्‍या पुराणिकाप्रमाणे, सदरील गृहस्थाने अंगविक्षेपांच्या एकदोन हेलकाव्यांमध्ये गादी काबीज करून तिंबूनानांना तेथून पदच्युत केले! त्या गृहस्थाचा मूळचा भाटीसारखा गोल चेहेरा महत्त्वनिदर्शनासाठी लागलाच नाना फडणिसाच्या चेहेर्‍यासारख्या लंबोत्तर झाला. त्याची मानी दृष्टी आमच्यासारख्या क्षुद्र जीवांवरून निघून स्वत:च्या मालकीच्या त्या मोडक्या खुर्चीकडे वळली. तो विचाराने ओथंबलेले जड नि:श्वास टाकू लागला. फाटकी सतरंजी, वळकटीची बेबंदशाही, मोडकी खुर्ची, अंगठे तुटलेल्या वहाणा, स्वत:चे काळे-मिचकुट धोतर, घरात मावेनासे झालेले दारिद्रय, वगैरे ऐहिक गोष्टीचा क्षणैक विसर पडून तो उच्च विचारात भरार्‍या मारू लागला! अखेर त्याला मृत्यूलोकाच्या वस्तीची आठवण करून देण्यासाठी मी विचारले, मग काय मानस आहे तुमचा?

फारच मोठा सुस्कारा टाकून चिरमुटलेल्या व काळयाकुट्ट ओठांचे वर्तुळ करून, भुवया आडव्या-तिडव्या उडवून मान किंचित उजवीकडे कलती करून तो प्राणी प्रत्येक शब्दानंतर विसावा घेत घेत म्हणाला, या जन्मी आम्हास कर्तव्य नाही!

वाचकहो! वरपक्षाला स्वत:चे किती विस्मरण पडते, याची तुम्हीच कल्पना करा!

देशकालपरत्व जगाच्या पाठीवर निरनिराळया बाबतीबद्दल चालीरीतीचे जे विचित्र वैधर्म्य दिसून येते, त्यात मानवी लग्नवैचित्र्याइतके चमत्कारिक दुसरे काहीच सापडणार नाही! एकाच काळी, एकाच देशात एकीकडे एका पुरुषाला अनेक बायका करता येतात, तर दुसरीकडे एकाच स्त्रीला अनेक पती करता येतात! एकीकडे श्रीकृष्ण परमात्मा सोळा सहस्त्र एकशे आठ तरुणींच्या अंत:पुरात गुजगोष्टी करीत बसले आहेत, तो दुसरीकडे पाच नवऱ्यांचा संसार सांभाळून सती द्रौपदी अबलाजातीला ललामभूत होऊन बसत आहे. इकडे ब्राह्मणकन्या देवयानीला अत्रिय ययातीच्या गळयात अडकविणारे कचाचे वचन तर तिकडे 'द्वारकेचा राणा' अस्वलाच्या पोरीशी लग्न लावून मोकळा होत आहे! श्रीकृष्ण परमात्म्याच्या या पशुवृत्तीतसुध्दा 'बसू विला'च्या सुधारणेची परमावधि दिसून येते, हे माझ्या धर्माभिमानी बंधूंनी अवश्य लक्षात ठेवावे. 'बसू विला'च्या मसुद्याचे वाचन झाले, त्या वेळी कौन्सिलमध्ये भगवान् हजर असते तर त्या बिलाला उचलून धरण्यासाठी त्यांनी आपले चारी हात वर केले असते अशी माझी खात्री आहे. एका हिंदू धर्मानेच विवाहविधीचे आठ सामान्य प्रकार नमूद केले आहेत; याखेरीज वैयक्तिक स्वातंत्र्याची परवानगी होती ती वेगळीच!

लग्नविषयक प्रत्येक निर्णयाची अशीच विविध रूपं चालू काळीसुध्दा दिसून येतात. हिंदुस्थानच्या त्रिकोणी तुकडयावर लग्नसंबंधाने वधूवरांना सात जन्म जोडून टाकण्यात येते, तर आमच्या विरुध्द भूपृष्ठावरील अमेरिकन लोकांत सात-सात दिवसांच्या कराराने लग्न लावण्यापर्यंत मजल येऊन ठेपली आहे. हिंदू धर्माला पिढया तुटलेलीसुध्दा सगोत्र वधुवरे पसंत नाहीत, तर मुसलमान, पारशी यांना चुलत बहीणभावंडांचा विवाहही मान्य होतो. महाराष्ट््रांतच पाहा ना, कोकणस्थाला मामाच्या गोत्राची वधू खपत नाही, तर सारस्वत, कायस्थप्रभृति ज्ञातीत मामाच्या मुलीला वधूत्वाचा प्रथम मान देण्यात येतो. पांढरपेशा ज्ञातीत मुलीचा हुंडा द्यावा लागतो, तर कुणब्यामाळयांत मुलाला पदरमोड करावी लागते. आमच्याकडे आठ वर्षाच्या मुलीला चोवीस वर्षाचा नवरा पहावा लागतो, आणि काही गुजराती जातीत आठ वर्षाच्या मुलाच्या गळयात चोवीस वर्षाच्या मुलीची घोरपड बांधण्याची वहिवाट आहे. वैवाहिक चारित्र्याची यापुढची पायरी म्हणजे मुलामुलांची, किंवा मुली-मुलींचीच लग्ने लावणे हीच होय, असे वाटत नाही का?

आमच्याकडे लग्ननिश्चयाची विशिष्ट जातिपरत्वे ठळक पुसट स्वरूपाची पण सामान्यत: सार्वत्रिक अशी अंगे पाच आहेत, हे मागे सांगितलेच आहे. कुलशील पाहणे, गोत्र जमणे, पत्रिका जमणे, मुलगी पाहणे आणि हुंडा ठरविणे असा या पंचांगांचा सामान्य अनुक्रम देता येईल.

कुलशीलाच्या बाबतीचा बहुतेक उल्लेख वधूपक्षीय दुभाषी आपल्या प्रास्ताविक, भाषणातच करीत असतो. मात्र कुलशीलतेच्या शाब्दिक बडबडीवरून वरपक्ष आपल्या कुळाशी समानगुण अशा कुळाची अपेक्षा करीत असतो, असे मात्र वाचकांनी सुतराम् समजू नये! लग्नखर्चाच्या नक्की रकमेचे अंदाजपत्रक कळण्यासाठीच वरपक्षाची ही धडपड असते. वधूपक्ष बराचसा दरिद्री दिसला, म्हणजे वरपक्ष 'यंदा आम्हास कर्तव्य नाही' याच निश्चयाला चिकटून बसतो.

यानंतर गोत्र जमते की नाही हे पहावयाचे असते. सगोत्र वधूवरे असून मुळीच चालावयाचे नाही, हा या बाबतीत मुख्य नियम आहे. याशिवाय काही गोत्रांचे परस्परांशी पटत नाही. अशी न पटणारी गोत्रेही अर्थात परस्परांना वर्ज्य! काही पोटजातीत तर मामाच्याही गोत्राला पटेल, असे प्रतिगोत्र पहावे लागते. कोकणस्थांसारख्या कमी गोत्रांच्या जातीत बापाच्या गोत्राशी आणि मामाच्या गोत्रांशी दुहेरी सलोखा सांभाळून असणारी गोत्रे हुडकून काढताना फारच यातायात पडल्यास नवल नाही. गोत्रागोत्रांचे परस्परांचे न पटण्याचे कारण माझ्या मते, त्या त्या गोत्रांच्या कुलपति ऋषींतील प्राक्कालीन तंटयातच असले पाहिजे. अर्बुद गाईच्या विनिमयालासुध्दा कबूल न होणार्‍या वसिष्ठाची गाय ज्या विश्वामित्राने अखेर दरोडा घालून नेली, त्याच विश्वामित्राच्या कुळातील कन्या, मग तिच्याबरोबर एक सोडून छप्पन गाई आंदण मिळाल्या म्हणून पत्करावयाला कोणता वसिष्ठगोत्रोत्पन्न तरुण तयार होईल? आम्हा आर्याच्या या ऋषिकालीन गोत्रजा'द' वैराच्या चिकाटीकडे पाहिले म्हणजे 'रोमिओ ऍंड ज्युलिएट'मधील सरदार घराण्यांचे, शिरक्याभोसकल्यांचे, किंवा 'या अहमदशहाच्या आज्याने माझ्या काकाचा खून केला', म्हणून जळफळणार्‍या राणा भीमदेवाचे द्राविडी प्राणायामाचे वैरसुध्दा कमकुवत वाटू लागते!

गोत्रानंतर पत्रिकेच मान असतो. काही दिवसांपूर्वी माझे पत्रिकेचे ज्ञान इतके मर्यादित होते की, आमच्या घरच्या कार्यातून नेहमी पत्रिका जमविणार्‍या आबाभटजींनासुध्दा त्या बाबतीत माझ्यापेक्षा जास्त कळत असे, असे म्हटले तरी चालेल. पण गतवर्षी तिंबूनानांच्या ठकीचे लग्न जमविण्याच्या खटाटोपाने, हल्ली मी पत्रिका जमत नसल्यास तीमध्ये बामालूम फेरफारच्या लबाडया करण्याइतके ज्ञान संपादन केले आहे. गोत्र जमविताना काळाच्या बाबतीत जी दूरवर नजर फेकावयाची असते, तीच दूरदृष्टी पत्रिका जमविताना स्थलाच्या बाबतीत वापरावयाची असते. युगांतरीच्या वसिष्ठवामदेवांचे तंटे अद्यापि चालू ठेवण्यासाठी जसे गोत्रभेदाकडे पाहण्याचे आम्ही व्रत पत्करले आहे, तसे पत्रिकेच्या वाटाघाटीत आमच्यापासून आणि परस्परांपासूनही कोटयवधी कोसांवर भटकणार्‍या ग्रहगोलांचे हाडवैर चालावयाचे आहे. फरक एवढाच की, पहिल्या वैराची जबाबदारी सार्‍या कुळावर असते. आणि दुसरे फक्त व्यक्तिपर असते.

पत्रिका जमविण्याचा प्रकार अंमळसा विश्वविद्यालयाच्या परीक्षांप्रमाणेच आहे. सर्वोत्कृष्ट पत्रिका जमविण्यास एकंदर 36 गुण जमावे लागतात; परंतु असा योग क्वचितच येतो, म्हणून कमीत कमी 18 गुण मिळाले तरी चालेल, अशी सवलत ठेवण्यात आली आहे. मात्र हे शेकडो पन्नास गुण मिळविताना एखाद्या पत्रिकेच्या पोटविषयात नापास होऊन चालत नाही. हे पोटविषय आठ असून त्यांच्या गुणांची आकडेवारी ठरलेली आहे; ती येणेप्रमाणे- वर्णगुण 1 वश्यगुण 2, तारागुण 3, योनिगुण 4, ग्रहगुण 5, गणगुण 6, राशिगुण 7, आणि नाडीगुण 8. यांतील प्रत्येकाच्या बारकाया सांगू लागलो, तर आधीच आवाक्याबाहेर घसरत चाललेला हा लेख भलतीकडे वाढेल; म्हणून केवळ ग्रहापुरतेच लक्ष देण्याचे ठरविले आहे.

ग्रहांची आपसात तंटे करण्याची शक्ती इतकी जबर आहे की, आम्ही हिंदू लोकांनीसुध्दा त्यांच्याकडून धडे घेतले पाहिजेत! वस्तुत: त्यांना भांडण्याचे कोणतेच कारण दिसत नाही. मंगळाखेरीज बाकीच्या कंगालांजवळ आमच्या पृथ्वीप्रमाणे वातावरणाचे पांघरुणसुध्दा नाही! आकाशातल्या पोलीस लोकांनी या भटक्या मंडळींवर उडाणटप्पूचा खटला भरला, तर त्यापैकी एकालाही उदरनिर्वाहाचे योग्य साधन दाखविता येणार नाही. नाही म्हणावयाला, आम्हा हिंदूंवर कडी करण्यासाठी आमच्याप्रमाणेच काळया रंगाच्या आणि उघडया अंगाच्या शनीने मात्र, अन्नवस्त्राची तरतूद न करता, अडीअडचणीच्या वेळेसाठी हातात दोन सलकडी ठोकून ठेविली आहेत!

ही ग्रहांची सांपत्तिक स्थिती झाली, परंतु अशा स्थितीतही त्यांची भांडणे सारखी चाललेलीच आहेत. तसेच, आठ परदेशी आणि नऊ चुली, या म्हणीप्रमाणे आमच्या पूर्वजांनी ग्रहांचा तंटेखोरपणा लक्षात घेऊन, पत्रिकेत नऊ ग्रहांसाठी बारा घरे बांधून ठेविली, तरी त्यांना सुखासमाधानाने राहता येत नाही! एखाद्या वेळी सारे ग्रह दोनतीन घरांतच दाटीदाटीने वसति करून व बाकीची घरे ओसाड पाडून पत्रिकेला विजापूर हंपीसारख्या उजाड पडलेल्या प्राचीन शहराचे वैभव आणतात; तर एखाद्या वेळी, इंग्लिशमनप्रमाणे एकेका घरात एकेकजण राहून पत्रिकेला लोणावळे, महाबळेश्वर यांसारख्या हवेशीर ठिकाणांचा नकाशा बनवितात. पण असे दूरदूर राहिल्यामुळे ग्रहांतली भांडणे कमी होतात, असे मात्र मुळीच नाही! एकाच घरात असलेले ग्रह परस्परांवर ज्या प्रमाणे सहजच पुरी नजर ठेवून असतात, त्याप्रमाणे ते दूरदूर असले तरीसुध्दा त्रिपाद, द्विपाद किंवा एकपाद अशा प्रकारच्या वाकडया नजरेने एकमेकांकडे पहावयास सोडीत नाहीत. ग्रहांच्या शुभमित्रभावाची कारणेही अनादिसिध्द असून आता त्रिकालबाधित अशीच आहेत. उदाहरणार्थ, चंद्राने गुरुपत्नीशी केलेला गर्ह्य प्रकार गुरूने आकल्पान्त विसरणे शक्य नाही. ग्रहांच्या शत्रुमित्रत्वाचा जोर त्यांच्या राहत्या घराच्या परिस्थितीवरच अवलंबून असतो. तथापि कमीअधिक प्रमाणावर त्यांचे तंटे अव्याहत चालूच असतात. दहाबारा वर्षांखाली आपल्याकडे काही ठिकाणी रक्ताचा पाऊस पडल्याची भुमका उठली होती. पुष्कळांनी त्या गोष्टीची भाकडकथेत जमा केली; परंतु माझी मात्र अजून अशीच समजूत आहे की त्या वेळी सप्तग्रहीसारखा ग्रहसंमीलनाचा एखादा योग असावा. ग्रहांचा स्वभाव लक्षात घेतला, म्हणजे वरील गोष्टींत अशक्य असे काहीच वाटत नाही. त्यातल्या त्यात, मंगळाची वागणूक इतर ग्रहांहून फारच हेकडपणाची असते. आधी त्याचा ताळमेळ पाहून मग बाकीच्या मंडळीचा सलोखा जमवावा लागतो. युरोपियन पुराणांतरी मंगळाला वीरसाधिपती म्हटले आहे, ते फारच अनुरूप आहे. इतर ग्रहांप्रमाणे हा शिपाईगडी भटाभिक्षुकांच्या मध्यस्थीने दाने, जप, वगैरे अटींवर तहनाम्याला कधीच तयार होत नाही. सर्व ग्रहांचे स्थानानुरूप परस्परसंबंध लक्षात घेऊन, वधूवरांच्या दोन पत्रिकांवरून लग्न निश्चित करताना बिचार्‍या जोशीबुवांना सर्व राष्ट्रांचे हिताहितसंबंध डोळयांसमोर ठेवून दोन राष्ट्रांचा तह घडवून आणणार्‍या मुत्सद्याइतकीच सावधगिरी बाळगावी लागते.

पत्रिका पाहण्याच्या व गोत्र जमविण्याच्या या धार्मिक खटोटापाचा फोलपणा दाखविण्यासाठी सुधारक लोक पुढील सारांशाचा युक्तिवाद करीत असतात. युरोपियन किंवा इतर लोकांमधील वैवाहिक संबंध, गोत्रांकडे लक्ष दिल्यावाचून आणि ग्रहांच्या गुणधर्माऐवजी वधूवरांचे गुणधर्म पाहून, घडवून आणलेले असतात, तरीही त्यांची वैवाहिक स्थिती आमच्याइतकी, किंबहुना आमच्याहूनही अधिक सुखावह होत असते; त्याचप्रमाणे आमचे ज्योति:शास्त्र स्वत:च ओरडत असते की, जन्मवेळेची नोंद घेण्यात एका क्षणाची चुकामूक झाल्यास पत्रिकेत जमीनअस्मानाचे फरक घडून येतात, आणि आमच्याकडे तर मुलाच्या जन्मकाळासंबंधी जन्मवर्षच काय ते साधारणत: बरोबर सांगता येते! अर्थात् मुलाच्या जन्मानंतर दोनचार वर्षातच पत्रिका तयार करण्याचा सुयोग आला, तरच जन्मशक तरी बिनचूक हाती लागण्याचा संभव- पुढे तोही नेमका सापडणे दुरापास्तच! आता आईबापे मुलाचा जन्ममाससुध्दा एखादे वेळी नेमका सांगतात; परंतु हे केवळ अपवादात्मक आहे. कधी कधी मुलाचा जन्म दिवसाच्या कोणत्या वेळी झाला, याचा अंदाज लागून वर्ष-वार-तिथी ही सारी अंतरतात. पुराणांतरी श्रीरामचंद्र, श्रीकृष्ण, वगैरे पुण्यपुरुषांच्या जन्मवेळा याच सूक्ष्मपात्रदर्शक तत्त्वावर नमूद करून ठेविलेल्या आहेत. महिना, तिथी, वार, घटका, पळे, वगैरे सूक्ष्मतम कालभेद 'चारदशांश स्थळांपर्यंत' बिनचूक देऊन, पुराणमुनींनी वर्षांच्या बाबतीत ठोकळमानाने शतकाचे तर नावच नको, सहस्त्रकाचा किंवा दशसहस्त्रकाचासुध्दा उडता उल्लेख केलेला नाही! (मथुरेच्या कारागृहात असतांही, श्रीकृष्णाच्या गुप्त जन्माचा बेचूक काल वसुदेवाने कसा माहीत करून घेतला, हे कोडे मात्र माझ्या मनाला सारखे डाचत असते.) हल्लीही खेडेगावांतून मुलाच्या जन्मकालासंबंधी हीच पुराणरीती प्रचलित आहे. गाई गोठणीवर आल्या असतील, गडयाची न्याहरी शेतावर गेली नव्हती किंवा मामंजी असे पोथी वाचून उठले असतील यासारख्या वारेमाप गोष्टींच्या नियमितपणावरूनच बाबूची किंवा बगीची पत्रिका तयार करावी लागते. यामुळे अगदी दहा वर्षांच्या मुलाचा जन्मकाल ठरवितानासुध्दा कालिदास, भवभूति, होमर यांसारख्या ऐतिहासिक विभूतींच्या जन्मकालाबद्दल परस्पर हवाला देण्यात येतो. आमच्या गावच्या म्हाळसाकाकूंच्या नार्‍याची जन्मवेळ विचारली, म्हणजे त्या म्हणतात की, खालच्या आळीतल्या रखमाकाकूंच्या गोंद्याची पाचवी होती, त्या दिवशी असा पडत्या प्रहरी माझा नार्‍या झाला. आणि रखमाकाकूंना विचारले, तर त्या म्हाळसाकाकूंच्या नार्‍याचा हवाला देतात!

अशा रीतीने, आमच्याकडील कुडमुडया जोशीबुवांवर, त्रैराशिकांतील दोनच राशी हाती पडल्यामुळे बावचळलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणे, येन केन प्रकारेण पत्रिका तयार करण्याचा अनेक वेळा प्रसंग येतो, आणि अशा अंदाजपत्रिकांवरूनच मुलांच्या लग्नकाळी धुमाकूळ घालायचा असतो!

पत्रिका पाहण्याच्या बाबतीत काही बाप इतका फाजील चौकसपणा दाखवितात, की स्वत:च्या दुष्कृत्याप्रमाणे मुलाची पत्रिकाही कधी चारचौघांपुढे मांडीत नाहीत! आणि 'सांगून आलेल्या मुलीची' पत्रिका स्वत: किंवा स्वत:च्या विश्वासातील ज्योतिषाच्या साहाय्याने त्या गुप्त पत्रिकेशी ताडून पाहतात. परंतु गरजवंतांच्या सोईसाठी हे येथे सांगून ठेवतो की, अशा अडचणीच्या प्रसंगी क्वचित त्या जोशीबुवांस 'नक्कलफी' देऊन हस्तगत करून घेता येते. कधी कधी तर, वधूपक्षाचे आणि वरपक्षीय जोशीबुवांचे अशाच ऐहिक मार्गाने सख्य जमून येताच, पहिल्या मुकाबल्यास एकमेकांशी मुळीच न पटून घेणार्‍या उभय पत्रिकांतील ग्रहांचेही पुढे सख्य होते. ग्रहांचा आमच्यावर जसा परिणाम होत असतो, तसा आमचाही ग्रहांवर होत असतो, यात मुळीच संशय नाही!

त्याचप्रमाणे गोत्रांच्या अडचणींतून सफै पार होण्यासाठी आमच्या धार्मिक कामधेनूने सवड ठेविली आहे. आपली मुलगी एखाद्या भिन्नगोत्रीय मुलाला दत्तक देऊन अगदी सगोत्र वधूवरांचासुध्दा विवाह घडवून आणता येतो. आमच्या धर्मातल्या निर्बंधाचा कडकपणा आणि त्यातून मोकळीक मिळविण्याचे मार्ग, ही दोन्ही मानवी मतीला खरोखर कुंठीत करून सोडणारी आहेत!

या तीन कलमांतून पसार झाल्यानंतर मुलगी पाहण्यावर मजल येऊन ठेपते. या वधूपरीक्षेत साधारणत: गाय, म्हैस किंवा घोडी घेताना दाखविण्याइतकीच व्यावहारिक अपूज्यबुध्दी दाखवायची असते. मात्र ही परीक्षा नवर्‍या मुलाच्या बापाने किंवा दुसर्‍या कोणीतरी करावयाची असते. स्वत: वराचा यात काहीएक संबंध असता कामा नये! आणि ते गैर आहे, असे धर्मलंड सुधारकांखेरीज कोण म्हणणार? उघडच आहे. गाय किंवा घोडी घेताना ज्याप्रमाणे गडयाला किंवा मोतद्दाराला विशेष अधिकार नसतो, त्याप्रमाणे या बाबतीत मुलालाही फाजील उठाठेवी करावयाचा हक्क रूढीने दिलेला नाही. वधूपरीक्षेच्या धोरणात आमच्या पूर्वजांची व्यवहारकुशलता ओतप्रोत दिसून येते. अशी रूढी नसती तर प्रत्येक नवर्‍यामुलाने 'मला ही बायको नको', 'मला ती आवडत नाही' असा पोरखेळ चालवून विवाह जमविण्याचे काम दुष्कर करून ठेविले असते. लग्न जमविण्याच्या सार्‍या भानगडीत हा एवढाच भाग काय तो सुकर आहे, असा माझा सार्वत्रिक अनुभव आहे. इंग्लंडातील बॅरिस्टरांच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांप्रमाणेच पाहण्यास आणलेली मुलगीही सहसा नापास होत नाही! परंतु, बॅरिस्टरच्या परीक्षेस बसण्याची पात्रता येण्यासाठी ज्याप्रमाणे आधी चांगलाच हात सोडावा लागतो, त्याप्रमाणे वरसंशोधनाच्या बाबतीत हुंडयासाठी पिशवीचे तोंड अगदी मोकळे सोडावे तेव्हाच वरपक्षाचे इतर बाबतीत कुरकूर करणारे तोंड बंद होते! या कार्यक्रमात हुंडा ही अनुक्रमाने शेवटची व महत्त्वाच्या दृष्टीने अगदी पहिली बाब आहे. याबाबतीत प्रतिपक्षाचे तडजोडीने समाधान करणे शक्य नाही. 'करणी' ही हुंडयाची अर्धांगी असून 'पोषाख' हे या सुवर्णमय जोडप्याचे पिल्लू होय! साधारणत: मॅट्रिक्युलेशन पास झालेल्या मुलाची किंमत सुमारे एक हजार रुपये असून भिन्नभिन्न जातिपरत्वे ती वाढत जाते; परंतु मुलगा घरचा फारच गरीब- अगदी अन्नास मोताद- असा असला, तर मात्र त्याच्या शिक्षणासाठी, म्हणजे आणखी चार वर्षे दरमहा फक्त पंचवीस-तीस रूपये द्यावे लागतात. शिक्षणाच्या मानाने ही रक्कम हजार रुपयांपासून पुढे दोन तीन हजारांपर्यंत उडया मारीत जाते. काही काही जातींतून या हुंडयाच्या दडपशाहीमुळे मुली आजन्म अविवाहित ठेवण्यापर्यंत पाळी येऊन ठेपली आहे. हुंडा देण्याची चाल ऋषिकालीन असून 'एक गाय' देण्यापासून तिची सुरुवात झालेली आहे. कोणी किती हुंडा द्यावा याबद्दल सामान्य नियम कधीच घालता येणार नाही. परंतु या बाबतीत पिढीजाद सुशिक्षित गरिबांतच विशेष हावरटपणा- अगदी निर्दय हावरटपणा दिसून येतो. कॉलेजांतील विद्यार्थ्यांना स्वत:ची किंमत सोळाशे सतराशे सांगण्यात काहीच वाटत नाही. मग घरची स्थिती कुबेराच्या उलट टोकाशी असली तरी हरकत नाही! अबदागिरीच्या जहागीरदारापेक्षा चौपदरीच्या जहागीरदारालाच उलट जास्त अवसान येत असते. हुंडयाची वाटाघाट चालविताना साधारण बाजारहाटातली 'वेपारी' भाषाच वापरण्यात येते. ठरावीक रक्कम उकळून घेण्याची अनेक कारणे सांगण्यात येतात. कोणी कुळाचाराची सबब पुढे आणितात, तर कोणी मुलाच्या विद्वत्तेचे गोडवे गातात. कोणाला चारपाच मुलींसाठी स्वत: दिलेल्या रकमेची, स्वत:च्या एकाच मुलाच्या हुंडयात भरपाई करून घ्यावयाची असते, तर कोणाला मुलाच्या शिक्षणाचा सारा खर्च वसूल करावयाचा असतो. एका गृहस्थाने तर मुलाच्या शिक्षणाच्या खर्चाचे इतक्या बारकाईने व बिनचूक टिपण ठेवले होते की मनुष्याच्या यत्किंचित् कृत्यांचा जमाखर्च ठेवणार्‍या चित्रगुप्तानेसुध्दा त्यापासून जमाखर्चपध्दतीचे धडे घ्यावे! एक पैशाच्या दुध्या पेन्सिलीपासून तो कॉलेजच्या फीपर्यंत सर्व रकमांची त्याने नोंद ठेविली होती. याशिवाय एकविसाव्या वर्षापासून मुलाला दरमहा किती पगार मिळू शकला असता, त्याचा अंदाज बांधून 'प्रमोशन'सकट त्या रकमेची जमेकडे भरती केली होती. सदर रकमेला मारवाडी दृष्टीने चक्रवाढव्याजाची जोड देऊन या सर्व आकडेमोडीसाठी कारकुनाच्या मेहनतीबद्दल- ती कामगिरी स्वत:च पत्करल्यामुळे व साधारण कारकुनापेक्षा आपली लायकी बरीच जास्त असल्याची त्याची दृढ समजूत असल्यामुळे पगाराचे मान वाढणे अर्थातच स्वाभाविक होते- दरमहा पन्नास रुपयांनी या कारभाराला मदत करण्यात येत असे. अर्थात लग्नमितीपर्यंत या रकमेचा फुगारा वाढत राहून तत्पूर्वी पूर्ण हिशेब होणे अशक्य होते; आणि त्यामुळे या व्यावहारिक अपूर्णांकाकडे पाहण्याचीसुध्दा एखाद्या मुलीच्या बापाची छाती होत नसे! सरते शेवटी, मुलगा वयाच्या दृष्टीने 'टाईमबार' झाल्यामुळे, त्याचा भाव उतरून सलग रकमेच्या भरपाईबद्दल म्हातार्‍याची पूर्ण निराशा झाली. आणि त्याच निराशेच्या भरात त्याने चार आण्यांची अफू खाऊन जीव दिला. म्हातार्‍याने मृत्यूपत्र करून ठेविले नसल्यामुळे, मुलाप्रीत्यर्थ आपण खाल्लेल्या अफूचे चार आणे त्या रकमेत जमा करण्यास त्याने सांगितले होते किंवा नाही हे समजण्यास आता मार्ग नाही!

हुंडा वसूल करून घेण्याचे वरपक्षाचे अनेक मार्ग आहेत; परंतु ते सारे सर्रहा जहाल असून, 'दाराशी धरणे येणे', 'पायाशी कपाळ फोडून घेणे', 'उपासमारीने ऋणकर्‍याच्या दारी जीव देणे' यांसारखे त्राग्याचे नेभळट उपाय, या हमखास उपायांमुळे तुच्छ वाटतात. 'टाच', 'जप्ती', 'हुकूमनामा' यांसारख्या सरळ मार्गाचीसुध्दा इतकी किंमत वाटेनाशी होते. वराच्या गळयात माळ पडण्यापूर्वी हुंडयाची रक्कम हातात पडली नाही, तर वरपक्ष कधी वधूच्या गावापर्यंत आलेल्या आपल्या गाडया नदीजवळ थोपवून धरून फिरविण्याची धमकी घालतो, तर कधी, सीमान्तपूजनाच्या वेळी अडून बसतो; कधी मुलाचा बाप ऐन वेळी लग्न फिसकटविण्याचा दम भरतो, तर कधी नवरामुलगा मुहूर्ताच्या वेळी लग्नालाच उभा राहात नाही. अशा वेळी अवघड मार्‍यात सापडलेला मुलीचा बाप आपल्या स्थावर जंगम मिळकतीची वाटेल त्या पडत्या भावाने वासलात लावून एकदाचा कसा तरी त्या विश्वामित्राच्या जाचातून अब्रूनिशी बाहेर पडतो.

मुलाच्या लग्नाच्या वेळी हवा तसा जबरदस्त हुंडा हव्या तशा अरेरावीने वसूल करून घेता येतो, यामुळेच आमच्याकडे पुत्रजन्मामुळे बेचाळीस कुळांचा उध्दार होतो, असे समजण्याची वहिवाट पडली असावी. पुत्रजन्मामुळे स्वत:च्या पिढयांचा उध्दार होत नसला तरी निदान व्याहीपक्षाच्या बेचाळीस पिढया ठार बुडविता तरी येतात, हे खास! एक मुलगा झाल्याबरोबर त्याची आईबापे हुंडयाच्या रकमेवर काय काय गोष्टी करावयाच्या, याचा विचार करू लागतात. हल्लीप्रमाणे प्रमाणाबाहेर हुंडा घेण्याची चाल पौराणिक काळीही प्रचलित असती, तर भारतीय युध्दासारखा प्रचंड अनर्थ बिनबोभाट टळला असता, अशी माझी खात्री आहे. कारण शंभर राजबिंडया मुलांचा हुंडा येण्याची खात्री असल्यावर, हस्तिनापुराच्या टीचभर राज्यासाठी, असल्या कुलक्षयकर युध्दाला धृतराष्ट्राने कधीही संमती दिली नसती! तेवढया हुंडयावर त्याने तसली छप्पन राज्ये फरोक्त घेतली असती. परंतु, दुर्दैवाने हुंडयाची चाल त्या वेळी जोरात नव्हती. पेशवाईत मात्र हुंडयाचे मान बर्‍याच वाढत्या प्रमाणावर असावे, असे मानण्यास भरपूर पुरावा आहे. कारण, एरवी, गोपिकाबाईसारखी महत्त्वाकांक्षी स्त्री, माधवरावसाहेब लहान असतानाही पानपतावर जावयास निघाले असता, त्यांना आड आलीच नसती! लग्न झालेल्या अर्थात हुंडयाची भरपाई करून चुकलेल्या विश्वासरावांस गिलच्यांवर चालून जाण्यास मनमोकळेपणे परवानगी देऊन, कुमार श्री. माधवरावसाहेब व नारायणरावसाहेब या उभयता स्वारियांनी मोहिमेवर चालोन जाणे, यासाठी बाळहट्ट घेतलिया वरी बाईंनी पुढे होवोन, बहुतां प्रकारी खातरजमा केलियाहि मूलपणाने मनास आले नाहीसे जाणोन, अखेरीस जीवेभावे आणभाक केली जे, पोरबुध्दी न करोन श्रीमंत मुलांनी वाडियांतच राहणेचे करावे.* श्रीमती

  • ज्या ऐतिहासिक कागदपत्रांतून प्रस्तुत उतारा घेण्याचे धाडस केले आहे, त्याची अस्सल प्रत कोरी असतानाच वाण्याच्या दुकानी पुडी बांधण्यात कामास आली. आमच्या ऐतिहासिक कागदपत्रांची कोण ही शोकदायक दुर्दशा ! -बाळकराम


गोपिकाबाईसाहेबांना धोरणी व मुत्सद्दी म्हणतात ते उगीच नाही! दुसरी एखादी बाई असती तर सोन्यासारखी- सारखीच का? अगदी भरोभर सोन्याच्या मोलाची- दोन्ही पोरे पानपतावर तोफेच्या तोंडी देऊन, एवढया थोरल्या हुंडयाला आचवली असती! याप्रमाणे पेशवाईत हुंडयाचे मान कितपत होते हे ठरविण्यासाठी ऐतिहासिक कागदपत्रे चाळत आहे. श्रीशिवछत्रपतींनी एकामागून एक पाचसहा लग्ने केली, याचे कारण माझ्या मते त्यांच्या तुटपुंज्या खजिन्यातच सापडणार आहे! छत्रपतींसारखा जावई मिळत असताना ते बिजवर किंवा तिजवर आहेत अशा क्षुल्लक कारणांमुळे, त्यांना भरपूर हुंडा द्यावयास मागेपुढे कोण पाहणार! या बाबतीत सत्यही माझ्या तर्काबरहुकूमच असल्यास शिवछत्रपतींच्या आधारावर मी बिजवर तिजवरांना भरहुंडा देण्याची वहिवाट पाडण्यासाठी सार्‍या महाराष्ट्रभर जारीने चळवळ सुरू करणार आहे.

वरील शेवटल्या शेवटल्या शब्दावरून मी हुंडयाच्या चालीला उचलून धरणारांपैकी आहे हे वाचकांच्या लक्षात आलेच असेल. मी या मताचा असण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एकच येथे दिले असता वाचकांचे समाधान होण्यासारखे आहे. हिंदुस्थानसारख्या कमी व्यापाराच्या देशात, लोक स्थावर मिळकतीला पिढयान्पिढया चिकटून असतात, आणि अशा प्रकारचे संपत्तीचे एकस्थायित्व अर्थशास्त्राच्या दृष्टीने, देशाच्या समृध्दीला मोठे घातक आहे. आता मुलीचा हुंडा देण्यासाठी दरसाल हजारो लोकांना घरेदारे विकून मोकळे व्हावे लागते, ही गोष्ट मशहूर आहे. आणि यामुळे आमच्या देशातला पैसा या हातातून त्या हातात सारखा खेळत राहतो. आता यात अगदी अडल्या वेळी सौदा केल्यामुळे व्यक्तिश: प्रत्येकाचा थोडासा तोटा होत असेल हे खरे; परंतु देशकल्याणासाठी स्वार्थत्यागाला तयार असणे हे प्रत्येक देशभक्ताचे कर्तव्य आहे!

अशा या उपयुक्त चालीला देखील जारीने आळा घालण्याचे काही जातींतील लोकांनी प्रयत्न केल्याचे ऐकिवात आहे; परंतु सनातनाभिमानी पक्षाकडून अशा प्रयत्नांची चांगलीच पिछेहाट होते, ही त्यातल्या त्यात संतोषाची गोष्ट आहे. पांढरपेशांतील एका जातीने तर स्वज्ञातीय परिषदेत हुंडा न घेण्याचा ठराव करून लोकांकडून त्याबरहुकूम शपथाही घेवविल्या. या जातीचे उपरिनिर्दिष्ट प्रयत्न काही लोकांच्या हाडी खिळलेल्या हुंडेबाजीमुळे सफै फसून अखेर सनातन रूढीचा विजय झाला, हे सांगण्यास मला अत्यंत संतोष वाटत आहे! कारण या शपथा घेणारांपैकी एक पुढारी सभासदाने त्याच वर्षी मुलाचा चरचरीत हुंडा घेऊन, तत्समर्थनार्थ असे कारण सांगितले की, काय करावे, व्याही ऐकेनात; ते म्हणाले, निदान पंधराशे तरी आपण घ्याच! अरेरे, काय करणार बिचारा अशा प्रसंगात! अगदीच इलाज नाही! कित्येक ग्रामकंटकांनादेखील नाटकवाल्यांच्या हट्टामुळे अत्याग्रहामुळे 'फुकट पास' पत्करावे लागतात, तो तरी अशातलाच दुधर प्रसंग!

मुलीच्या पक्षाने मुलाला हुंडा द्यावयाचा सार्वत्रिक प्रघात आहे, कोठे कोठे याच्या उलट प्रकार असल्याचेही वर नमूद केलेच आहे. पैकी गुजरातेतील 'भाटेले' नावाच्या एका लहानशा पोटभेदाची प्रमुखत्वाने आठवण होते. या जातीत बायको मिळविण्यासाठी इतका जबरदस्त भुर्दंड भरावा लागतो की, एखाद्या घरात चारपाच भाऊ असतील, तर त्यातील फार तर एखाद दुसर्‍याचेच लग्न होऊ शकते. कधी कधी तर त्यांच्यात 'साटीलोटी' करण्याचे बादरायण मासले आढळून येतात. एखाद्या गुलाबदासाला कानजीच्या मुलीशी लग्न करावयाचे असले, म्हणजे तो आपल्या मामेबहीणीची किंवा मावसभावाची मुलगी तिसर्‍याच एखाद्या भिकाभाईच्या भावास देतो, भिकाभाई मोबदल्याखातर आपली मुलगी नरोत्तमाच्या काकाला देतो, नरोत्तम मग आपली आतेमेहुणी कानजीच्या मामेभावाला देववितो, आणि कानजीचा मामेभाऊ, आपला वशिला लावून, कानजीची मुलगी गुलाबदासाला देववून हा पंचक्रोशीचा वळसा पुरा करितो! सामान्यत: ही सर्व जात निर्धन असल्यामुळे, तिच्यात रोखीच्या सरळ देण्याघेण्याऐवजी, अशा प्रकारच्या 'नातवाने-तवाने' देण्याघेण्याचीच जारीने वहिवाट दिसून येते.

हुंडा घेण्यास तयार नसलेला असा आणखी एक सर्वजातिसामान्य वरांचा वर्ण आहे, त्याचाही येथेच उल्लेख करावा लागेल. पन्नाशीच्या आणि साठीच्या पलीकडले नवरमुलगे या वर्गात मोडतात. असे नवरमुलगे बहुधा हुंडा द्यावयालाच तयार असतात, आणि यामुळेच, कधी कधी फारच सुंदर स्त्रिया या वर्गातील उदारधींच्या वाटयास येतात. एक सत्तर वर्षाचा कोवळा नवरमुलगा तर हुंडा घेण्याच्या इतका विरुध्द होता की, त्याचा तरुण नातू हुंडयावाचून लग्न करण्यास कबूल होईना. तेव्हा आजोबांना स्वत:ला जरी लग्न कर्तव्य नव्हते, तरी केवळ हुंडयाची घातक रूढी मोडण्याविषयी समाजाला योग्य उदाहरण घालून द्यावे, व यथाशक्ती सामाजिक सुधारणा घडवून आणावी, या स्तुत्य हेतूने नातवाला सांगून आलेल्या मुलीशी आजोबाने स्वत:चे लग्न केले!

याप्रमाणे वरसंशोधनाचा साधारण कार्यक्रम आहे, आणि याच कारणांमुळे कन्याजन्माची बातमी ऐकल्याबरोबर कित्येकांना मरणप्राय दु:ख होत असते. काही काही जातींत मुलीला 'सात जन्मांची वैरीण!' समजण्यापर्यंत पाळी येऊन ठेपली आहे. इतकेच नाही, तर मुलीच्या जन्मवृत्ताने धक्का बसून बापाचे मरण झाल्याचे कोणी सांगितल्यास मला त्यात काहीच आश्चर्य वाटणार नाही! उलटपक्षी, उपवर मुलीच्या आकस्किम मरणाने बापाच्या मनास आनंद वाटल्यास तोही क्षम्यच आहे!

चारपाच वर्षांखाली आमच्याकडे एक प्रसिध्द ज्योतिषी आले होते. 'चेहेरा पाहून कुंडली मांडण्याबद्दल' त्यांची मोठी ख्याती असे. त्यांची भेट होण्यापूर्वी 'चेहेरा पाहून कुंडली मांडण्याबद्दल' माझी कल्पना अगदीच निराळी होती. त्यांना चेहेर्‍यावरून बावळट मनुष्याची परीक्षा करून त्याची कुंडली मात्र बिनधोक मांडताना, व साधारणत: चलाख चेहेर्‍याचा मनुष्य दिसला, की अळंटळं करताना पाहून, 'चेहेरा पाहून कुंडली पाहण्याचा' खोल अर्थ लक्षात येऊन, माझी पहिली भ्रामक कल्पना दूर झाली. असो. सदरहू जोशीबुवांनी आमच्या आळीतल्या एका गृहस्थाबद्दल, त्यांना त्या वर्षी महान लाभयोग असल्याचे भाकित केले होते. गृहस्थमजकुरांचा प्राक्कालीन इतिहास व वकूब आम्हाला पूर्णपणे माहीत असल्यामुळे, त्यांच्या भावी लाभयोगाची आम्हाला कल्पनाच करता येईना! अखेर मुदतीचे वर्ष संपावयाला दोनचार दिवसच उरले होते, तोच एके दिवशी सदर इसम आमच्याकडे येऊन अस्पष्ट शब्दांनी सांगू लागले की, आमच्या चिटकीला प्लेग झाला की हो!

अविवाहित चिटकी बाराचौदा वर्षांची होती. दोनतीन दिवसांतच, कवडीसुध्दा हुंडा घेतल्यावाचून यमाने चिटकीला पदरात घेतले, आणि जोशीबुवांचे भविष्य खरे झाले!

त्याचप्रमाणे तिंबूनानांच्या ठकीचे लग्न जमविण्यासाठी, मी व तिंबूनाना पुणे मुक्कामी काही दिवस तळ देऊन राहिलो होतो. आम्हा दोघांचे परममित्र श्रीयुत भांबुराव हे त्यांची 'मंडळी' गरोदर असल्यामुळे गावीच राहिले होते. त्यांच्या 'मंडळीं'चे ते पहिलेच बाळंतपण असल्यामुळे आम्हीही भांबुरावांना घरीच राहण्याचा आग्रह केला होता. काही दिवसांनंतर एकदा रात्रौ आम्ही बोलत बसलो असता भांबुरावांकडून थाडदिशी तार येऊन थडकली, की "I am ruined, letter follows- माझा सर्वस्वी सत्यानाश झाला; मागाहून सविस्तर माहितीचे पत्र येत आहे.

अरेरे! बिचार्‍या भांबुरावावर प्रसंग कोसळला! एकुलती एक बायको आणि तिचा असा शेवट व्हावा! आम्ही सडया स्वारीनिशी निघालेले असल्यामुळे, असल्या महत्त्वाच्या व भयंकर तारेच्या योग्यतेप्रमाणे एकदम अट्टाहासाने रडावयास आमच्याबरोबर कोणी बायकामंडळीही नव्हती. मृताची बातमी ऐकून रडावे असे बायकांनीच! तरी मी आपल्याकडून रडक्या सुरात वहिनींचे गुण आठवीत दोनचारदा नाक शिंकरीत व मधूनमधून जमिनीवर हात टेकीत, सुरेल रडण्याचा प्रयत्न केला; पण माझे रडणे किती झाले तरी मर्दानी; त्यात जनाची थाटाची झाक कुठून येणार? अशा रडण्याचे हसे व्हावयाचीच भीती विशेष! तिंबूनाना मात्र निर्विकार चेहेर्‍याने स्वस्थ बसून राहिले होते. शाबास त्यांची!

विकारहेतौ सति विक्रियन्ते येषा न चेतांसि त एक वीश:!

शेवटी तो दिलदार दोस्त ताडकन् उठून उभा राहिला आणि निश्चयाच्या गंभीर वाणीने म्हणाला, बाळक्या! प्रसंग येऊ नये, आला! पण आता आपणच भांबूला धीर दिला पाहिजे. उद्याच्या उद्या भांबूला तार ठोक. म्हणावे, Don't fear! Thaki is- भिऊ नको! ठकी आहे.' माझी ठकी मी त्याला देईन. मी आणि भाऊ काही दोन नाहीत. प्रसंगी उपयोगी पडत नाही तो मैत्र कशाचा?

सकाळी ठरल्याप्रमाणे मी तार करावयास जाणार, तोच डाकवाल्याने भांबुरावाकडील पत्र हाती दिले. त्यात पुढील मजकूर होता:-

काल रात्रौ सौ.ची सुखरूप सुटका झाली. बाळंतीण खुशाल आहे. परंतु मुलगी झाली आहे. तिंबूनाना आज तीन वर्षे ज्या वनवासात दिवस काढीत आहेत, त्याची आठवण झाली म्हणजे धीर खचतो. झोपेतूनसुध्दा सारखा दचकून जागा होत असतो. वगैरे वगैरे.

आम्हा दोघांनाही फारच वाईट वाटले. तिंबूनानांना तर विशेष खेद झाला. उघडच आहे, कन्यादानासारख्या स्वार्थत्यागाने स्नेहाची कसोटी दाखविण्याची आयती चालून आलेली संधी जावी, यापुरते दुर्दैव ते कोणते? नंतर त्याच दिवशी आम्ही भांबुरावाला दुखवटयाची पत्रे, सहानुभूतिपर तारा वगैरे पाठवून कर्तव्यातून मोकळे झालो.

वाचकहो! कन्याजन्माचे दु:ख इतके जबरदस्त आहे! अशाच कारणामुळे एकदा तिंबूनाना सर्वस्वी व मी अंशत: कसे संकटात सापडलो होतो, ते सांगून हा लांबलेला लेख आटोपता घेतो.

गेल्या साली आम्ही ठकीच्या लग्नाच्या पहिल्या मोहिमेवर असताना एके दिवशी सायंकाळी बोलण्यावरून बोलणे निघून, मुलीच्या लग्नकालीन वयाबद्दल बराच वादविवाद झाला. सदरहू वादात आम्ही दोघे अमर्याद वयोमानाची तरफदारी करीत असून, प्रतिपक्ष अष्टवर्षा भवेत्कन्या या सूत्राचे समर्थन करीत होता. त्याच दिवशी रात्रौ आम्हाला आमच्या एका स्नेह्याकडे वरातीबरोबर मिरवायला जावे लागले. आमच्या ह्या स्नेह्याच्या जातीत वरात घरी आल्यावर नवीन जोडप्याच्या हातून शिष्टमंडळीस साखर देवविण्याची वहिवाट आहे. तीबरहुकूम क्रमाक्रमाने तिंबूनानांनाही वधुहस्ते साखर देवविण्यात आली. बिचार्‍या नानांच्या डोक्यात संध्याकाळच्या वादातले मुद्दयाचे शब्द अजून सारखे घोळत होते; आणि त्या नादाच्या भरातच त्यांनी नववधूला 'अष्टकन्या सौभाग्यवती भव' असा आशीर्वाद दिला.

वाचकहो! या आशीर्वादामुळे- आशीर्वाद कसला, शापच तो! त्या ठिकाणी ताबडतोब केवढा गोंधळ उडाला याची तुम्हाला कल्पना करता येणार नाही! त्या जातीत कन्याप्राप्तीमुळे आईबापांच्या घरादाराचे वाटोळे होण्याचा खात्रीचा संभव असतो. आणि तिंबूनानांच्या तोंडून ते अभद्र शब्द असल्या मंगल प्रसंगी निघालेले! मग काय विचारता! बायकामंडळींत रडारड सुरू होऊन पोक्त्यापुरवत्या बाया नवर्‍यामुलीला पोटाशी धरून कुरवाळू लागल्या. इकडे पुरुषमंडळी रागाने लाल होऊन आमच्याशी लगट करून दंगल करू लागली. तिंबूनाना एखाद्या निर्ढावलेल्या 'डांबिसा'प्रमाणे कावर्‍याबावर्‍या नजरेने इकडे तिकडे पाहत होते. मी मधूनमधून ओरडत होतो की, अंगाला हात लावू नका. कायदेशीर इलाज करा! पण माझे म्हणणे त्या गर्दीत ऐकतो कोण? अखेर मोकळया हाताने धक्काबुक्की सुरू होऊन माझी व तिंबूनानांची कणिक चांगलीच तिंबून निघण्याचा रंग दिसू लागला. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट इतकीच की, प्रतिपक्षीय तीस-चाळीस इसमांची प्रत्येकी आमच्यावर हात चालविण्याची अनिवार इच्छा असल्यामुळे आम्हाला काही तडाखे मुखत्यारामार्फत घ्यावे लागले! कारण गर्दीमुळे, आम्हा दोघांपर्यंत सर्वांचेच हात पुरणे शक्य नव्हते. अर्थात हे मुखत्यार प्रतिपक्षांतलेच होते. तिंबूनाना शक्य तितका मारा चुकवून एखाद्या वीराप्रमाणे गर्जू लागले की 'बाळक्या! पळ, धूम ठोक!' शेवटी पागोटयाचा मांडवास अहेर करून आम्ही मांडव परतण्याचा समारंभ पार पाडला, आणि पळता पळता आमचे राहते बिऱ्हाड एकदाचे गाठले. घरी आल्यावर, माझा अपराध नसतानाही उगीचच्या उगीच मी मार खाल्ल्याबद्दल तिंबूनाना माझ्यावर रागावू लागले. शेवटी त्यांची समजूत घालण्यासाठी मी म्हणालो, नाना! उगीच का बरे संतापता? मी हौशीने का मार खाल्ला इतका?

तिसर्‍या दिवशी 'तिंबूनाना विरुध्द क्ष' या खटल्यात ज्या अर्थी तिंबूनाना हे आरोपी नंबर एक होते, व ज्या अर्थी मी साक्षीदार नंबर एक होतो, त्या अर्थी दुसर्‍या दिवशी अकरा वाजता कोर्टात हजर होण्याविषयी आम्हाला 'समाने' लागली. खटल्यातील न्यायाधीश दुर्दैवाने त्याच जातीचे असून त्यांनाही दोन-चार मुली होत्या. त्यामुळे तिंबूनानांच्या तोंडच्या मुक्ताफळांची त्यांना बरोबर किंमत ठरविता येऊन त्यांनी पुढीलप्रमाणे शिक्षा ठोठावली-

आरोपी तिंबूनाना, तुमच्यावर हा आरोप शाबीद झालेला आहे ... म्हणून मी तुम्हाला, विविधज्ञानविस्तारातील 'क्रितो व फिदो', ज्ञानप्रकाशांतील 'स्थानिक सहकारी पतपेढयां'संबंधी सारे अग्रलेख व 'ब्रह्मज्ञानदीप' हे आध्यात्मिक गद्यनाटक वाचण्याची, 'मानापमान' नाटकातील प्रत्येक पदाचा अन्वयार्थ लावण्याची शिक्षा फर्मावितो. हे सर्व वाचन होईपर्यंत तुम्हाला पुण्यातल्या एखाद्या खाणावळीत जेवावे लागेल. आणि दर आठवडयास 'विकएंड' तिकिट काढून सदर्न मराठा रेल्वेच्या तिसर्‍या वर्गातून पुण्याहून मिरजेपर्यंत प्रवास करावा लागेल. यापेक्षा कमी शिक्षा तुम्हाला करताच येत नाही.

बिचारे तिंबूनाना खटल्याचा हा निकाल ऐकताच डोळे पांढरे करून बेशुध्दच पडले! मी फारच गयावया करून नानांची तरफदारी करू लागलो. तेव्हा न्यायाधीशसाहेबांना थोडीशी दया येऊन त्यांनी आम्हाला वरिष्ठ कोर्टात अपील लावण्याची परवानगी दिली.

अपील चालते वेळी, आम्ही प्रतिपक्षाचे भावी नुकसान भरून देण्याचा न्यायमूर्तीसमोर कबूलजाब लिहून दिला. यदाकदाचित् नानांची बत्तीशी वठून त्या मुलीला आठ मुली झाल्याच, तर त्यापैकी नानांनी चौघींचा हुंडा देण्याचे व एकीशी बिनहुंडयाने स्वत: लग्न करण्याचे व एकीशी त्याच शर्तीवर मी लग्न करण्याचे कबूल करून त्या अर्थाचा करारनामा कोर्टासमक्ष प्रतिपक्षाच्या सुपूर्द केला. तेव्हा न्यायमूर्तींनी दयाळूपणाने पहिली भयंकर शिक्षा रद्द करून, तिच्या मानाने काहीच नाही अशी, म्हणजे तीन वषर्े सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड एवढयावर नानांची मुक्तता केली. त्यासरशी आनंदाच्या भरात येऊन नाना बेछूटपणाने नाचू लागले. त्यांच्या तशा वर्तनाने कोर्टाची बेअदबी होण्याची मला भीती वाटू लागली, व त्यांचा आनंद आटोक्यात आणण्यासाठी मी म्हटले, नाना, ठकीचे लग्न जमले नाही, तोपर्यंत तीन वर्षे तरी तुम्हाला कैदेत कसे राहता येईल?

हे ऐकताच तिंबूनाना काळेठिक्कर पडून न्यायमूर्तींकडे पाहू लागले. न्यायमूर्तींची मुद्रा प्रसन्नशी पाहून मी मोठया अदबीने, मुलीचे लग्न जमेपर्यंत कैदीला जामिनावर सोडण्याबद्दल तोंडी अर्ज केला; परंतु न्यायाधीशसाहेब पाच हजारांचा जातमुचलका मागू लागले; तेव्हा मी पुन्हा मोठया विनयाने म्हटले, साहेब, असा भारी जातमुचलका घेण्याचे कारणच नाही. कैदी हे काही जातेपळते नाहीत. सद्य:स्थितीत त्यांना फरारी होता येणे शक्यच नाही! कारण, तिंबूनाना म्हणजे काही एखादे कळकळीचे लोकसेवक, मार्मिक लेखक किंवा प्रतिभाशाली कवीही नाहीत, की त्यामुळे त्यांचे नाव मेल्यानंतरच प्रसिध्द होईल, आणि जिवंतपणी त्यांना लोकांच्या नजरेआड एखाद्या कानाकोपर्‍यातच पडून राहावे लागेल. साहेब, प्रस्तुत कैदी हे हिंदूसमाजाचे घटक असून एका उपवर मुलीचे बाप आहेत! आज त्यांचे नाव त्यांच्या आसपासच्या आबालवृध्दांच्या आणि बायकापोरांच्या तोंडी सारखे गाजत आहे. भोवताली चालणार्‍या चर्चेवरून त्यांना वाटेल त्या वेळी हुडकून काढता येईलच. अशा मनुष्याला गुप्त रीतीने राहता येणे आमच्या समाजात तरी शक्य नाही! शिवाय, मुलीचे लग्न जमलेच, तर चर्चा कमी होऊन त्याची चारचौघांत बोलवा कमी होईल खरी; पण हुंडयाच्या रकमेची भरपाई करण्यासाठी दरोबस्त स्थावरजंगम मिळकतीचे खरेदीखत लिहून देण्यासाठी त्यांना रजिस्टर-कचेरीत यावे लागणारच; आणि तेथेच त्यांना त्या वेळी गिरफदार केले म्हणजे झाले.

न्यायमूर्तींना माझे म्हणणे तंतोतंत पटून त्यांनी तिंबूनानांना मोकळे सोडले आणि आम्ही ठकीचे लग्न जमविण्याच्या उद्योगाला लागलो.

प्रस्तुत लेखातील वरसंशोधनाचा कार्यक्रम पाहून हे काम किती बिकट आहे, याची वाचकांस थोडी तरी अटकळ आलीच असेल. आमच्याकडे मुली खंडोबाला वाहण्याच्या, किंवा त्यांची निदान कटयारीशी लग्ने लावण्याच्या चाली, उपवर मुलींच्या वैतागलेल्या बापांनी प्रथम पाडल्या असाव्यात, असा माझा समज आहे. श्रीयुत देवलांची 'वल्लरी' म्हणते की, देवा, नको रे हा मेला पोरीचा जन्म! याबद्दल मला काहीच सांगता येण्यासारखे नाही! परंतु एवढे मात्र मी खात्रीने सांगू शकतो की, 'मेला' हा शब्द वापरण्याची पुरुषांनाही सवलत दिली तर प्रत्येक उपवर मुलीचा बाप अट्टाहासाने म्हणेल की,-

देवा, नको रे हा मेला पोरीच्या बापाचा जन्म!