अद्वैत
आम्हां आनंद झाला आम्हां आनंद झाला । देवोचि देखिला देहामाजी ॥१॥
देखणें उडालें पाहणें लपालें । देवें नवल केलें देहामाजी ॥२॥
मागें पुढें देव रिता ठाव कोठें । ह्र्दयींच भेटे देहीं देव ॥३॥
चोखा म्हणे देव देखिला पंढरी । उभा भीमातीरीं विटेवरीं ॥४॥