Get it on Google Play
Download on the App Store

शिकवणारे आणि घडवणारे शिक्षक

 गोष्ट तशी दहा-पंधरा वर्षापूर्वीची आहे. मी नववी-दहावीत असेन. गावात शाळा नव्हती म्हणून वडिलांनी मामाच्या गावी शिकायला पाठवलेलं. पण हे गाव खरोखरच ‘मामाचं गाव’ होतं आणि तिथली शाळाही. कारण माझ्यासारखी इतरही बरीच मुली-मुलं मामाच्या घरी राहून शिकत होती. शाळा गावातल्याच एका कुलकर्णी नावाच्या माणसानं चालवलेली होती. तिचं नाव ‘श्रीसमर्थ माध्यमिक विद्यालय’.

गाव तसं लहान होतं. दोन-तीन हजार लोकवस्तीचं. शाळाही त्याला शोभेल अशी साधीशीच होती. ती एका मारवाडय़ाच्या जुन्या वाडय़ात भरायची. हा वाडा मातीचा होता. त्यामुळे चार-पाच दिवसांत आमचे पाय मातीनं माखू लागायचे. मग आम्ही शनिवारी शाळा सफाईची मोहीम राबवायचो. काही मुलं जवळच्या हापश्यावरून बादली-बादलीनं पाणी आणायची, काही आसपासच्या गोठय़ातून, मळ्यातून शेण आणायची आणि त्या त्या वर्गातल्या मुली आपापले वर्ग शेणानं सारवून घ्यायच्या. रविवारी सुट्टी. त्यामुळे दिवसभरात वर्ग छान सुकायचा. सोमवारी वर्गात एक छान सुगंध दरवळत असायचा.

शाळेतल्या शिक्षकांपैकी एक-दोन गावातले आणि दोन-तीन आसपासच्या गावातले होते. ते पायीच ये-जा करायचे. साकळगावाहून येणारे गाडेकर गुरुजी हिंदी हा विषय शिकवायचे. फार छान शिकवायचे. ‘हिंदी’च्या पाठय़पुस्तकात ‘बाढम् का निमंत्रण’ असा एक पाठ होता. तो त्यांनी इतकी मस्त शिकवला की, तो आम्हाला जवळपास तोंडपाठ होऊन गेला. त्यातला ‘कहाँ गोता मारू साब?’ या विधानात आम्ही ‘कहाँ गोटा मारू साब?’ असा बदल करून तो आमचा आवडता डायलॉग करून घेतला.

 

गणित-भूमिती शिकवणा-या शिक्षकांचं नाव होतं, अशोक जोगदंड. ते शेजारच्या येणोरे या गावाहून यायचे. अतिशय शांत आणि सज्जन माणूस. त्यांचा आवाज कधीही वाढत नसे. त्यांचं मोठं नवल होतं. बाकी सगळे शिक्षक हातात पाठय़पुस्तक घेऊन शिकवायचे. पण हे शिक्षक गणित-भूमिती हातात न घेता, प्रकरणच्या प्रकरणं शिकवायचे. त्यात कधीही गडबड व्हायची नाही. आम्हाला वाटायचं, रोज घरून येताना पाठय़पुस्तक वाचून येत असावेत. जोगदंड मास्तरांची मुलगी आमच्या वर्गातच होती, पण तिला विचारणार कसं? दुसरी गोष्ट म्हणजे, जोगदंड मास्तर इतके साधेसुधे होते की, विचारता सोय नाही. त्यांच्या कपडय़ांना कधीही इस्त्री नसायची. कधी कधी तर शर्ट-पँट उसवलेलीही असे. त्यावर घरीच पत्नीनं कशीतरी ओबडधोबड टीप मारलेली असे. पायात कायम चप्पल आणि हाता-पायाला कुठे तरी चिखल लागलेलाच. कारण ते थेट शेतातूनच शाळेत आलेले असायचे. म्हणजे शाळेत आले की, शिक्षक, बाहेर पडले की, शेतकरी अशाच भूमिकेत ते असत. शिकवायचे मात्र उत्कृष्ट. पण आम्ही विद्यार्थी तसे मठ्ठच. त्यांनी शिकवलेलं समजलेलं असलं तरी काही गणितं ‘सर, हे नीट समजलं नाही, जरा परत सांगता का?’ म्हणत आम्ही सोडवून घेत असू. हा प्रकार वर्गातील चार-पाच मुलं आलटूनपालटून करत. त्यामुळे त्यांनी आम्ही सोडवायला दिलेली जवळपास सर्व गणितं आम्ही त्यांच्याकडूनच सोडवून घेत असू. या आमच्या कटात त्यांच्या मुलीचाही समावेश असे. हा प्रकार त्यांना समजत असावा, पण त्यांनी कधी तसं दाखवलं नाही.

तिसरे शिक्षक हे शाळेतल्या सर्व मुला-मलींचे अतिशय आवडते शिक्षक होते. त्यांचं नाव एस.पी. सर. ते शाळेचे मुख्याध्यापकही होते. त्यांचं व्यक्तिमत्त्व रूबाबदार होतं. वाचनही दांडगं होतं. त्यांच्या हातात सतत पुस्तक असायचं. त्यातले उतारे ते आम्हाला वाचून दाखवायचे, त्या लेखकाबद्दल माहिती सांगायचे. एस.पी. सर आम्हाला मराठी आणि विज्ञान हे दोन विषय शिकवायचे. फार सुंदर शिकवायचे. त्यांच्या तासाला आम्ही सर्वात खूश असायचो. कारण ते मराठीतल्या अनेक लेखकांबद्दल, त्यांच्या पुस्तकांबद्दल सांगायचे. त्या एवढय़ाशा खेडेगावात आम्हाला पाठय़पुस्तक विकत घ्यायचीच मारामार मग कथा-कादंबऱ्या कुठून घेणार? ग्रंथालय नावाची गोष्ट गावातल्या कुणाच्या खिजगणतीत नसल्यानं त्या संस्थेची आम्हाला ओळखही नव्हती. पण एस.पी. सरांच्या घरी मात्र खूप पुस्तकं होती. ते ती आम्हाला कधीकधी वाचायलाही देत.

 

 

..तर एस. पी. सर एकदा ‘युवकभारती’मधला ‘उपास’ हा धडा शिकवत होते. तो पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेला होता. पण हे देशपांडे कोण हे आम्हाला काही माहीत नव्हतं. त्यामुळे एस. पी. सरांनी सुरुवातीलाच सांगितलं. म्हणाले, ‘महाराष्ट्रातल्या ज्या माणसाला पु.ल. देशपांडे हे नाव माहीत नाही, तो मूर्ख आहे असं खुशाल समजावं.’ ‘मूर्ख’ हे विशेषण आधीच आमच्यासाठी खूप अपमानजनक झालं होतं. कारण आमची शाळा, श्रीसमर्थ. त्यामुळे रोज प्रार्थनेबरोबर स्वामी समर्थाचे चार श्लोक म्हणावे लागायचे. शिवाय जांबसमर्थ हे त्यांचं जन्मगाव आमच्यागावाशेजारीच. त्यामुळे रामदास स्वामींबद्दल खूप प्रेम आणि आदर. पण त्यांनी मूर्खाची बत्तीस लक्षणं लिहून ठेवली आणि आम्हाला शालेयवयात त्याचा मोठा मनस्ताप झाला. सालं, रोज आमच्या वर्गातल्या एकाकडून तरी काही ना काही चूक व्हायचीच. मग एस.पी.सर त्यांच्या धीरगंभीर आवाजात म्हणायचे, ‘राजे! आपल्याला रामदास स्वामींनी सांगितलेली बत्तीस लक्षणं जशीच्या तशी लागू पडतात. इतक्या परफेक्ट मॅचिंगबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन.’

हे अभिनंदन ज्याच्या वाटय़ाला यायचं त्याचे पुढचे दोन-तीन दिवस फार वाईट जायचे. बिचारा एकदम कानकोंडा होऊन जायचा. पण आमच्यापैकी कुणीही त्याला चिडवायचं नाही, कारण उद्या-परवा ती पाळी आमच्यातल्या कुणावरी तरी यायचीच. पण एवढं सोडलं तर बाकी एस.पी. सर आमच्यावर प्रेमही तेवढंच करायचे. त्यामुळे ते आमचे लाडकेच आणि आम्हीही त्यांचे.

पुढे मी बारावीनंतर पुण्यात शिकायला आलो. एस.पी. कॉलेजमध्ये इंग्रजी शाखेत गेलो. पण तिथल्या तीन वर्षात एकही शिक्षक मला एक दिवसापुरताही आवडला नाही. सारे आपले येणार तो-यात, शिकवणार तो-यात आणि जाणार तेही तो-यातच. दोन शिक्षिका तर फारच फॅशनेबल आणि नखरेल होत्या. विभागप्रमुखही आग्यावेताळ म्हणावे असेच. पाठय़पुस्तकंही या शिक्षकांसारखीच रटाळ. तेव्हा मला पडलेला प्रश्न अजूनही सुटलेला नाही. माझ्या शाळेतल्या शिक्षकांना तशा पाहिल्या तर कुठल्याच सुविधा नव्हत्या. सकाळी नऊ ते चार या वेळात पाच-सहा वर्गाना शिकवावं लागे. खाजगी संस्था असल्याने त्यांचे पगारही वेळेवर व्हायचे नाहीत. कॉलेजातल्या शिक्षकांना मात्र सुविधांचा सुकाळ. पगार भरपूर. एसी केबिनपासून प्यूनपर्यंत सारं दिमतीला. शिवाय दिवसभरात फक्त एक नाही तर दोन लेक्चर्स. पण तीही ते धड शिकवत नसत. या कॉलेजातल्या शिक्षकांमुळे नुकसान काही झालं नाही हे खरं, पण शाळेतल्या शिक्षकांसारखं प्रेम आणि आदर त्यांच्याबद्दल कधी वाटला नाही.

http://ramjagtap.blogspot.com