Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

खंडणीखोर बनवणारी शिक्षणपद्धती

आजच्या म.टा.मध्ये खंडणीखोर शिक्षकाची बातमी वाचनात आली.बेरोजगारीमुळे कमावण्यासाठी त्याने खंडणीखोरीचा सोपा मार्ग शोधला होता .संबंधित शिक्षकाला अटक झाली असून कायद्यानुसार पुढील कारवाई होईलही.परंतु त्याच्यावर अशी वेळ का आली याचा कोणी विचार करणार आहे कि नाही ? सगळाच दोष त्याच्यावर किंवा शासनावर देण्यापेक्षा समाजानेही विचार करण्याची वेळ आली आहे .मुळात सगळ्यात जास्त दोष कुणाला दिला पाहिजे तर तो आपल्या चुकीच्या शिक्षण पद्धतीला व ती राबवणाऱ्या यंत्रणेला .हाताला काम मिळेल असे व्यवसायाभिमुख शिक्षण देण्यापेक्षा आपण अजूनही वास्को -द -गामा च्या पराक्रमाच्या कथा चघळत बसतो.इतिहासाची जाणीव विध्यार्थ्यांना झालीच पाहिजे .त्यातून नवीन काही घडवण्याची प्रेरणा मिळते याबद्दल दुमत नाही .पण ते पोट भरण्यासाठी उपयोगी नाही हे ही तितकेच सत्य आहे .आज सभोवतालच्या जगात काय चालले आहे किंवा उद्या आपल्याला जगण्यासाठी आज काय केले पाहिजे हे आपली शिक्षण पद्धती शिकवत नाही .

शासनानेही `अंदाधुंदपणे`निरुपयोगी अभ्यासक्रमांना व ते शिकवणाऱ्या शिक्षण संस्थांना परवानग्या देऊन `बेरोजगार`तयार करण्याचे कारखानेच काढले आहेत .पुढार्यांच्या सोयीसाठी किंवा पैसे कमावण्यासाठी असे कारखाने निघालेत पण त्यातून तयार झालेली बेरोजगारांची फौज दिशाहीन झाली आहे. .हातात डिग्रीचे चिटोरे आले पण त्याला साजेशी नोकरी नाही .दुसरी कुठली मिळाली तर त्यात कमीपणा वाटतो.नोकरी नसल्यामुळे लग्न होत नाही .घरात ,समाजात हेटाळणी होते.मग अशी मुले वाममार्गाला जातात.त्यामुळेच अशा खंडणीखोरीच्या गुन्ह्यांमध्ये शिकली सवरलेली मुले दिसू लागली आहेत .यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही .परंतु अशा घटनांचे समर्थनही करता येणार नाही.आई जेऊ घालीना आणि बाप भिक मागू देत नाही अशी अवस्था या बेरोजगारांची झाली आहे .समाजाने आता पुढे येउन अशा बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

भारताला महासत्ता बनवण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावू पाहणारी ही `उर्जा `अशी गुन्हेगारीच्या विळख्यात अडकून वाया जाऊ नये यासाठी शासनेही बेरोजगारांकडे केवळ मतपेटी म्हणून न पाहता हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे .नाहीतर देशातील तुरुंग `पदवीधर `गुन्हेगारांनी भरलेले पाहण्याचे दुर्दैव आपल्या नशिबी असेल .