Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

सांबाची सूर्योपासना

सांब हा कृष्ण व जांबवती यांचा मुलगा होय. तो महाबलवान व दिसायला अतिशय सुंदर होता. स्वभावाने मात्र तो अत्यंत गर्विष्ठ होता. एकदा दुर्वास ऋषी हिंडत हिंडत द्वारकेस आले. त्यांचे शरीर अतिशय कृश व रूपही फारसे चांगले नव्हते. गर्विष्ठ सांबाने त्यांची नक्कल केली. त्यांच्याकडे बघून वेडावून दाखवले. त्यामुळे संतप्त होऊन दुर्वासांनी शाप दिला, की तुला स्वतःच्या रूपाचा गर्व आहे, कुरूप म्हणून तू माझी थट्टा केलीस तर तूही कुरूप, कुष्ठरोगी होशील. सांबाला शापाचे गांभीर्य कळले तरी त्याने फारसे मनाला लावून घेतले नाही, की वागणुकीतही काही बदल केला नाही. याच वेळी त्रैलोक्‍यात सतत संचार करणारे नारदमुनी द्वारकेत आले. नारदमुनी सर्वांना वंदनीय होते; पण सांबाने मात्र आपल्या स्वभावानुसार त्यांचा अपमान केला. या उद्धटाला धडा शिकवून त्याला नम्र बनवायचे, असे नारदांनी ठरवले. ते श्रीकृष्णांना म्हणाले,"सांब हा रूपाने अद्वितीय आहे. तुमच्या सोळा सहस्र नारी त्याच्या दर्शनासाठी उत्सुक असतात." एवढे बोलून नारद द्वारकेतून निघून गेले.
कृष्णाचा नारदाच्या बोलण्यावर विश्‍वास बसला नाही. पुन्हा काही दिवसांनी जेव्हा नारद द्वारकेत आले तेव्हा कृष्ण अंतःपुरात होता. नारदांनी सांबाला बळेच सांगितले,"सांबा, तुझे वडील तुला हाक मारीत आहेत."
नारदांवर विश्‍वास ठेवून सांब कृष्णाकडे गेला असता सर्व स्त्रिया सांबाकडे पाहत राहिल्या. हे पाहून श्रीकृष्ण रागावले. त्यांनी सांबाला शाप दिला, की तुझ्या रूपाकडे पाहून या स्त्रिया मोहित झाल्य.त्याला तू जबाबदार आहेस. तेव्हा तू कुरूप, कुष्ठरोगी होशील. वडिलांनी दिलेला शाप ऐकताच सांबाला दुर्वासांनी पूर्वी दिलेल्या शापाची आठवण झाली. शापानुसार सांब विद्रूप दिसू लागला. मग पश्‍चात्ताप होऊन तो पित्याला म्हणाला,"आपण मजवर प्रसन्न व्हावे, या दोषापासून मी मुक्त होईन असे करावे." त्या वेळी कृष्णांनी त्याला सूर्योपासना करण्याचा उपदेश केला, तसेच त्यांनी त्याला नारदांना शरण जाण्यास सांगितले. नारदांनी सांबाला सूर्यमाहात्म्य ऐकवले. मग पित्याची आज्ञा घेऊन सांब चंद्रभागा नदीच्या तीरी गेला व त्याने सूर्याची प्रखर उपासना केली. आपले रूप परत मिळवले. तेथे त्याने सूर्याची प्रतिष्ठापना करून सांबपूर नावाचे नगर वसवले. भजन-कीर्तनाची व्यवस्था करून ते नगर प्रजेला अर्पण केले व आपण द्वारकेस गेला.