Get it on Google Play
Download on the App Store

तपती आख्यान

सूर्याला तपती नावाची एक कन्या होती. ती दिसायला सुंदर तसेच उग्र तपश्‍चर्या केल्यामुळे विद्वानही होती. तिच्या सौंदर्याच्या, ज्ञानाच्या बाबतीत तिला शोभेल असा पती मिळवण्याचा विचार सूर्य करीत होता. ऋक्षपुत्र संवरण हा सामर्थ्यशाली राजा असून तो रोज सूर्योपासना करीत असे. असा हा धर्मज्ञ संवरण राजा तपतीला योग्य आहे असे सूर्याला वाटले.
एकदा राजा संवरण पर्वतावर शिकारीसाठी गेला असता, तहानभुकेने व्याकूळ झालेल्या त्याच्या घोड्याचे प्राण गेले. त्यानंतर पायीच हिंडत असता त्याला तपती दृष्टीस पडली. तिचे सौंदर्य, तेज पाहून तू कोण आहेस, असे त्याने विचारले. पण काहीच न बोलता ती सूर्यलोकात निघून गेली. त्यामुळे संवरण राजा मूर्च्छा येऊन जमिनीवर पडला. काही वेळाने शुद्ध आल्यावर डोळे उघडताच पुन्हा त्याला तपती समोर दिसली. आपण येथेच गांधर्व विवाह करू, असे त्याने सुचवल्यावर ती म्हणाली,"तुझे जर माझ्यावर प्रेम असेल तर माझ्या वडिलांजवळ मला मागणी घाल." इतके बोलून ती पुन्हा अंतरिक्षात अंतर्धान पावली. संवरण राजा पुन्हा जमिनीवर कोसळला. राजाचा शोध घेत त्याचा मंत्री तेथे आला. राजाला त्याने शुद्धीवर आणले. राजाने त्याला व सर्व सैन्याला परत पाठवले व आपण आपले पुरोहित ऋषी वसिष्ठ यांचे स्मरण करून सूर्योपासना सुरू केली. तपाच्या बाराव्या दिवशी तपतीने राजाचे मन हिरावून घेतले आहे असे अंतर्ज्ञानाने जाणून वसिष्ठ तेथे आले. राजाशी बोलून ते स्वतः सूर्याकडे गेले व तपतीस घेऊन आले व दोघांचा विवाह करून दिला. राजाने आपण सर्व राज्यकारभार अमात्यांवर सोपवून बारा वर्षे तपतीसह तेथेच पर्वतावर वास्तव्य केले. पण या काळात त्याच्या राज्यात दुष्काळाचे संकट आले, प्रजेची दुर्दशा झाली. ते पाहून वसिष्ठ राजा संवरणाला व तपतीला घेऊन पुन्हा राज्यात आले. मग सर्व सुरळीत होऊन राजा संवरणाने अनेक वर्षे तपतीसह सुखाने राज्य केले. तपती व संवरणाचा मुलगा म्हणजे कुरू. हा कुरुवंश पुढे विस्तार पावला. अर्जुन हा कुरुवंशातील श्रेष्ठ वीर. त्याचा महाभारतात तापत्य (तपतीचा वंशज) असा उल्लेख आहे.