Get it on Google Play
Download on the App Store

कृपाची जन्मकथा

गौतम महर्षींना शरद्वान नावाचा एक पुत्र होता. त्याला जन्मतःच धनुर्विद्या अवगत होती. त्याची वेदाध्ययनात बुद्धी फारशी चालत नसे. तपश्‍चर्येच्या जोरावर जसे वेदांचे ज्ञान आत्मसात केले जाते, तसेच शरद्वानाने तपश्‍चर्या करून सर्व अस्त्रांची प्राप्ती करून घेतली. या त्याच्या कठोर तपश्‍चर्येमुळे व धनुर्विद्येतील प्रावीण्यामुळे इंद्राला आपल्या आसनाची काळजी वाटू लागली. त्याच्या तपात अडथळा आणण्यासाठी इंद्राने जानपदी नावाच्या अप्सरेची नेमणूक केली. ती जानपदी शरद्वानाच्या आश्रमापाशी जाऊन त्याला वश करून घ्यायचा प्रयत्न करू लागली. आपल्या तपसामर्थ्यामुळे बराच काळ शरद्वानाने आपल्या मनाला आवर घातला; पण कालांतराने तो जानपदीच्या मोहाला बळी पडला. त्या दोघांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली. ते जुळे त्यांनी गवताच्या बेटात ठेवले व जानपदी परत इंद्रलोकाला गेली. शरद्वान पुन्हा आपल्या कामाला लागला. राजा शंतनू एकदा शिकारीसाठी अरण्यात गेला असता त्याच्या सैनिकाला गवताच्या बेटामध्ये ते जुळे दिसले. त्या जुळ्याजवळ धनुष्यबाणही होता. ही कोणातरी धनुर्धारी माणसाची मुले असली पाहिजेत, हे ध्यानात घेऊन सैनिकांनी त्यांना राजा शंतनूकडे नेले. ते धनुष्यबाणही त्याला दाखवले. राजाच्या मनात कृपा निर्माण झाली व ते जुळे घेऊन तो राजवाड्यात गेला. त्याने त्यांचा सांभाळ केला. त्याने मुलाचे नाव कृप व मुलीचे नाव कृपी असे ठेवले.
आपल्या मुलांचा सांभाळ राजा शंतनू करीत आहे हे शरद्वानास अंतर्ज्ञानाने समजले. लगेच तो शंतनूकडे आला आणि त्याने कृपाला आपले गोत्र तसेच इतर महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्याला धनुर्विद्येची दीक्षा दिली. धनुर्विद्येतील सर्व गूढ गोष्टी त्याला शिकवल्या. कृप थोड्याच काळात धनुर्विद्येत आचार्यपदाला पोचला. कौरव, पांडव, यादव कुळातील अनेक वीरांनी कृपाचार्यांपासून धनुर्विद्येचे शिक्षण घेतले.