Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण सतरावे

बाबा नेमीनाथ थोडावेळ थांबले आणि पुढे सांगू लागले.

“हळूहळू संपूर्ण दहा वर्षे निघून गेली. त्यावेळीही जमीनदारी सुरळीत चालू होती. वैजयंतीने आता पंचविशी पार केली होती. तिचे रूप आणि तारुण्य पूर्णतः परिपक्व झाले होते. संन्यासी कालीमलनाथ आता खूपच जीर्ण झाले होते. काही काळापासून त्यांना देवीची पूजा देखील करता येत नव्हती. आता कलीमलनाथ यांनी आपल्या एका तरुण शिष्याला त्यांच्या मदतीसाठी पाचारण केले होते.

तो तरुण खूप देखणा होता. त्याचे व्यक्तिमत्व आकर्षक होते. खांद्यापर्यंत लांब दाट काळे कुरळे केस, मोठे मोठे डोळे गुलाबाच्या फुलासारखे रक्तरंजित आणि कोमल ओठ, उभा चेहरा, रुंद भरदार छाती. उंच बांधा, सडपातळ शरीर. गौर वर्ण. त्यांचे नाव डामरनाथ कापालिक होते.

डामरनाथ कापालिक यांनी बालवयातच संन्यास घेतल्यानंतर तंत्रसाधनेचा कठोर मार्ग अवलंबला. त्यांनी अनेक कठोर सराव केले होते, भयंकर शव साधनासरावाच्या बळावर त्यांनी अनेक दुर्मिळ सिद्धी देखील प्राप्त केल्या होत्या. ते चामुंडा देवीचे निस्सीम भक्त होते. त्यांच्या पूजेच्या वेळी ते पूर्णपणे तन्मय आणि आत्मलीन होत असत.

त्या दिवशी संध्याकाळी एकाग्र चित्ताने डामरनाथ सुगंधित कापूर प्रज्वलित करून चामुंडा देवीची आरती करत होते. त्यांचे भान हरपले होते. आरती संपल्यावर मंदिरात वैजयंतीला पाहून त्यांच्या भुवया उंचावल्या आणि म्हणाले

"या मंदिरात महिलांच्या प्रवेशावर बंदी आहे ना?

"का ?" मंदिराच्या कोपऱ्यात बसलेल्या वृद्ध कलिमलनाथ यांनी प्रश्न विचारला.

"गुरूदेव...?" हातात पूजेचे ताट घेऊन मंदिराच्या दारात उभ्या असलेल्या वैजयंतीकडे बघून डामरनाथ कापालिक म्हणाले

"तुम्ही स्वत: शिकवले होते की तंत्र साधनेत स्त्रियांना काही स्थान नाही. त्यांच्या सहवासाने साधनेच्या मार्गातून पतन होण्याची शक्यता आहे."

“तुझं बरोबर आहे डामरनाथ. परंतु स्त्रीचे मातृशक्तीच्या रूपात चिंतन करणे म्हणजे नि:स्वार्थी साधनेचा अभ्यास होय. जर तू हि परीक्षा उत्तीर्ण झाला नाहीस, तर मी समजेन की तू पूर्ण संन्यासी झाला नाहीस. तुझ्या आध्यात्मिक साधनेमध्ये अजूनही काही त्रुटी शिल्लक आहे. वैजयंती देवी ही स्वतः कात्यायनी आहे. ती स्वतः मातृस्वरूप शक्तीचा एक अंश आहे."

"गुरुदेव, तुमची आज्ञा शिरसावंद्य आहे." पूजा संपवून चामुंडा देवीला साष्टांग नमस्कार करून डामरनाथ हळूहळू चालत मंदिरातून बाहेर पडले. त्याने पुन्हा वैजयंतीकडे वळून देखील पाहिले नाही.

मंदिराच्या दरवाजातून बाहेर पडणाऱ्या गोऱ्यापान रंगाच्या आणि सुगंधित शरीराच्या तरुण डामरनाथाकडे वैजयंती  एकटक पाहत होती आणि तिने स्वतःलाच एक प्रश्न विचारला,

"देखण्या तरुणाने संसार त्यागून संन्यास का बरे घेतला असेल? तो इथे का आला असावा?"

असा विचार करत मंदिराच्या पायऱ्या संथ गतीने उतरत वैजयंती कलिकेसह वाड्याकडे परतली.

क्रमश: