Get it on Google Play
Download on the App Store

19 जीवनाची अपरिहार्यता

कुणाला कसला तर कुणाला कसला छंद नाद असतो . एखाद्याला चार मित्र जमून गप्पा हाणीत बसायला आवडते. कुणी पत्ते कॅरम इत्यादी बैठे खेळ खेळत बसतात. कुणाला नाटक सिनेमा बघायला आवडते तर कुणाला नाटक करण्याचा छंद असतो. कुणी नाटक कादंबऱ्या लघुकथा अशी हलकी पुस्तके वाचतो तर कुणी धार्मिक ग्रंथ वाचतो  तर कुणी विद्वज्जड  पुस्तके वाचतो.
एखाद्याला देवदर्शन पूजाअर्चा भजन कीर्तन पुराण इत्यादींमध्ये आवड असते. कुणाला प्रवासामध्ये रुची असते .कुणाला समाजकार्यामध्ये रुची असते . कुणाला राजकारण अर्थकारण आवडते .ही यादी हवी तेवढी लांब करता येईल .व्यक्ती तितक्या प्रकृती .पिंडे पिंडे मतर्भिन:

असे का? हे सर्व काय आहे? याचा विचार कुणी केला आहे का ?
पोटापाण्याचा व्यवसाय मग ती नोकरी असो किंवा धंदा असो काही हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या व्यक्ती सोडता प्रत्येकाला करावाच लागतो .त्यामध्ये बऱ्यापैकी वेळ जातो .
उरलेला वेळ घालविण्यासाठी काही ना काही छंद प्रत्येकजण आपल्या मागे लावून घेत असतो .लावून घेत असतो असे म्हणण्यापेक्षा आपोआपच छंद निर्माण होतात हे जास्त योग्य ठरेल .
ही गोष्ट स्वाभाविक होत असते. प्रत्येकजण या जगात येताना काही ना काही बरोबर घेऊन येत असतो .त्यामुळेच मनुष्यांमध्ये विविधता दिसते .

वेळ कसा घालवायचा ही मोठी समस्या प्रत्येकापुढे असते .आणि तरीही प्रत्येक जण मला वेळ पुरत नाही म्हणून बोलताना आढळतो .अशी आपल्याला समस्या आहे हेच प्रत्येकाला कळत नसते. आहे की नाही गंमत !
आपण काहीही न करता स्वस्थ बसून पाहा .तुम्हाला मेंदूमध्ये कितीही चक्रे फिरत असली तरीही हातांनी काहीतरी केल्याशिवाय स्वस्थ बसवणार नाही. आत किंवा बाहेर काहीतरी केल्याशिवाय आपण स्वस्थ बसूच शकत नाही . मी म्हणजेच आत आणि/ किंवा बाहेर सतत हालचाल . ही समज आली तरी पुरे . तीही काहीही न करता जेव्हा आपोआप यायची तेव्हाच येते .ही वस्तुस्थिती आहे. हे वास्तव आहे.यासाठी आपण काही करायचे असे नाही . फक्त आपण व इतरही कसे वेळ घालवीत आहेत ते फक्त पाहा . वेळ घालविणे ही मोठी समस्या आहे हे लक्षात आले तरी पुरे .आपली  हालचाल समाधान मिळविण्यासाठी, आनंद मिळविण्यासाठी, असते .समाधान मिळविण्याचे, आनंद मिळविण्याचे, मार्ग भिन्न असू शकतात नव्हे असतातच . समाधान मिळविण्याच्या एकाच मार्गात आपण जास्त वेळ राहू शकत नाही .हेही एक सत्य आहे. एक आवडणारी गोष्ट सतत करून पाहा लेखन चिंतन मनन भजन पूजन वाचन बैठे मैदानी खेळ करमणूक इत्यादी .आपण थोड्याच वेळात कंटाळतो हे सत्य आहे .आपल्याला दुसरे काहीतरी करावे असे वाटते . ज्याप्रमाणे लहान मुले एकाच खेळण्यात जास्त वेळ रमत नाहीत. त्याना दुसरे खेळणे लागते. तसेच हे आहे. समाधान म्हणजे काय अापण ज्या अपेक्षा ठेवतो त्या अपेक्षांची पूर्ती म्हणजे समाधान होय. अपेक्षांची पूर्ती समाधान देते सुख देते. अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर दुःख होते .

अपेक्षा आपण निर्माण केलेल्या असतात त्या आपल्यावर दुसऱ्या कुणी लादलेल्या नसतात. किंवा असे म्हणूया की अपेक्षा आतून आपोआप निर्माण होत असतात. सुख दुःख दुसऱ्या मुळे निर्माण झाले असे अापण म्हणतो समजत असतो . प्रत्यक्षात सुख दुःखाचे निर्माते आपण असतो .
अपेक्षा आपण निर्माण करतो असे मी आत्ताच म्हटले परंतु हेही बरोबर नाही .वर उल्लेख केल्याप्रमाणे अपेक्षा आपोआपच अस्तित्वात येत असतात .
लहानपणापासून कुटुंबात, मित्रमंडळीत, शेजारी पाजारी, शाळेत, पुस्तके, सामाजिक माध्यमे, इत्यादीतून आपल्यावर संस्कार होत असतात .हे संस्कार कळत नकळत होत असतात .त्यातून प्रत्येकाचा एक पिंड गाभा निर्माण होत असतो.
त्यातून आपोआपच  प्रेरणा अपेक्षा निर्माण होत असतात.
प्रत्यक्षात आपण काही निर्माण करीत नसतो सर्व काही आपोआप  होत असते .
आपण करतो असे वाटणे हेही आपोआप स्वयंभू असते .
हा गाभा हा पिंड स्थिर नसतो .त्यामध्ये सतत बदल होत असतो .बदल ही सृष्टीची स्वाभाविकता आहे .
कृपया आत डोकावून पाहा .विश्वातून जगातून आपल्यावर आपटत असणाऱ्या अनेक प्रेरणांना अापण जबाब देत असतो.हा जबाब कळत नकळत असतो .
प्रत्येक प्रेरणेचा कमी जास्त प्रमाणात आपल्या मनावर ठसा राहात असतो .हा ठसा हाच संस्कार .हा ठसा  मनाच्या पूर्वीच्या धारणेवर अवलंबून असतो.
ही धारणा आपोआप निर्माण होत असते. झालेली असते. बदलत असते.
कालचा मी आज नसतो. आजचा मी उद्या नसतो .
मी केले .मी करतो हाही एक भास आहे .
माझ्याकडून असे असे झाले हा वाक्प्रचार  जास्त बरोबर आहे .
जर प्रत्येकजण त्याच्या त्याच्या धारणेनुसार वर्तन करीत असेल तर हे चूक किंवा हे बरोबर असे कसे म्हणता येईल?
चूक किंवा बरोबर हेही आपण आपल्या धारणेनुसार म्हणत असतो. थोडक्यात सर्व काही योग्य बरोबर चालले आहे. जग बरोबर चालत नाही असे वाटते तो भास आहे . जग हे असेच चालायचे हीच ती जीवनाची अपरिहार्यता . राम कृष्ण ख्रिस्त मोहम्मद बुद्ध यापासून अगदी परवा परवाच्या महात्मा गांधींपर्यंत अनेक जणांनी या जगाला ठीक करण्याचे प्रयत्न त्यांच्या त्याच्या धारणेनुसार केले . जग मानसिकदृष्ट्या आहे तिथेच आहे असे मला वाटते. वैज्ञानिकदृष्टय़ा खूप प्रगती झाली आहे .ती पुढेही होत राहील .परंतु मनुष्याचा गाभा तोच आहे .तो बदललेला नाही .हीच ती जीवनाची अपरिहार्यता . याची जर आतून आपोआपच समज आली तर अापोआपच साक्षित्व निर्माण होईल. ही समजही आपोआपच समजातून यायची आहे . यालाच काही जण परमेश्वरी वरदहस्त किंवा परमेश्वराची कृपा असे संबोधतात .साक्षित्व म्हणजे निवडशून्य  जागृतता. साक्षित्व म्हणजे  क्षणोक्षणी आपण व इतर कसे वर्तन करीत आहेत त्याची समज सतत क्षणोक्षणी अनुभवत राहणे होय. जीवनाची अपरिहार्यता एकदा लक्षात आली की सर्व काही सोपे होऊन जाते .ही अपरिहार्यता जेव्हा लक्षात यायची असते तेव्हाच येते.

*आणू म्हणून काही आणता येत नाही .*
*धरू म्हणून काही धरता येत नाही.*
*सोडू म्हणून काही सोडता येत नाही .*
*आपण काहीही करायचे नसते .काही करायचे नाही किंवा काही करायचे, हेही करायचे नसते. याचा अनुभव हेच साक्षीत्व.*

निरनिराळ्या तत्त्वचिंतकांची संतांची काही वचने पुढील प्रमाणे आहेत .

"राम हमारा जप करे हम बैठे आराम "
                 

"सर्व काही विठ्ठलचरणी अर्पण करावे "
                   

"ही तो परमेश्वराची इच्छा "
              

"तो सर्व काही करतो त्याच्या इच्छेशिवाय झाडाचे पानही हलू शकत नाही "
              

"सुख दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत "
                 

" मूलतः आपण आनंदस्वरूप आहोत. सुखानंद व दु:खानंद, दोन्हींमध्येही आनंदच आहे" 
              

"प्रत्येक प्राणीमात्र कमीजास्त  शुद्ध पाणी असलेले डबके आहे प्रत्येकात परमेश्वराचे प्रतिबिंब  पडलेले आहे ."
                 

 "आपण सर्व परमेश्वरस्वरूप आहोत."
                 

 "आपण कोण हे ओळखणे हेच जीविताचे अंतिम ध्येय आहे ."
                

 "प्रत्येक प्राणिमात्र कळत नकळत त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे "
                    

"हे विश्व ही माया आहे "
                

"माया म्हणजे जी नाही ती" 
            

 "जो न बोलेल तो शहाणा"
         

"याचा व्यत्यास जो बोलेल तो मूर्ख हे बरोबर नाही "
             

"बरोबर किंवा चूक यांच्या पलीकडील विचार पाहिजे "
                

"द्वंद्वांच्या  पलीकडे जाणे म्हणजे सत्य होय."
                 

"द्वंद्वातीत होणे हे जीवनाचे अंतिम ध्येय आहे "

मी  माझ्या मताने एक छानपैकी गोष्ट लिहायला बसलो.आणि हे वरील चिंतन लिहून बसलो .

हीच ती जीवनाची अपरिहार्यता .

*आपल्या हातात काही आहे असे वाटणे हेही अपरिहार्य आहे .*

*आपल्या हातात काही नाही असे वाटणे भासणे अनुभवणे  हेही अपरिहार्य आहे .*

*मी करतो हेही बरोबर आहे आणि "तो" करतो हेही बरोबर आहे *

"काही चूक वाटणे हेही बरोबर आहे. "

"सर्व बरोबर वाटणे हेही बरोबर आहे. "

"सर्व बरोबर वाटणे हे चूक आहे हेही बरोबर आहे "

"सर्व चूक वाटणे हेही बरोबर आहे." 

*गुरोस्तु मौनम् व्याख्यानं शिष्यास्तु छिन्न संशय: हेच खरे ."

                 
                 
                  


 

विचारतरंग

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Chapters
1 अनाग्रह योग  2 अपेक्षा 3 अहंकार (निरहंकार) 4 आनंदाची गुरुकिल्ली  5 आपण कशाच्या शोधात आहोत ? 6 आपण कसे ऐकतो व कसे ऐकले पाहिजे 7 आपण कुठे असतो ? 8 एक होता ससा व एक होते कासव 9 साधू 10 एकनाथ महाराज 11 कंटाळा 12 क्रोध 13 क्षणभंगुर 14 खरा बलवान कोण 15 खरे स्वातंत्र्य 16 गुरूची आवश्यकता आहे काय 17 चक्रवर्ती 18 जादूचा चेंडू 19 जीवनाची अपरिहार्यता 20 ज्ञात व अज्ञात 21 ज्ञानसागर 22 टीका 23 तुझे रूप चित्ती राहो तुझे मुखी नाम 24 तू माझा सांगाती 25 दिवा स्वप्न व कठोर परिश्रम 26 दुःख क्लेश इत्यादी 27 दृष्टिकोन - काका कालेलकर 28 देवदास 29 देैव व प्रयत्न 30 द्वेष मत्सर असूया राग इत्यादी विषयी- 31 धर्म 32 धारणा 34 नार्सिसस 35 निरहंकारी शंकराचार्य 36 परमेश्वर 37 पोकळी 38 प्रतिक्रिया 39 प्रार्थना एकाग्रता व ध्यान 40 प्रेम 41 फूटपटया 42 बदल 43 बदला बद्दल 44 बहिर्मन व अंतर्मन 45 बोधकथा 46 भगवान 47 भीति 48 भूतकथा 49 मानसिक गोंधळा विषयी 50 मी कोण? 51 मृत्यूची भीती 52 मोह व भीति 53 राष्ट्राभिमान 54 रिकामपणाची बडबड 55 विश्वास 56 शरण जाणे 57 शांततेचे महत्त्व (आजोबा व त्यांचा नातू ) 58 शिक्षण ज्ञान व सत्य 59 शिस्त 60 श्रद्धा 61 संकट 62 संत उमर आणि भटका माणूस 63 सत्य व असत्य 64 संबंधमयता 65 समज व समंजसपणा 66 समर्थन ६७ समस्या ६८ साधू व विंचू ६९ सुख व दुःख ७० स्मरण ७१ स्वनिरीक्षण व जागृतता ७२ स्वर्ग आणि नरक ७३ स्वशॊध ७४ स्वावलंबन ७५ हिमनग ७६ कलियुग ७७ दिव्य दृष्टी ७८ काळोख ७९ मीचे दृढीकरण