Get it on Google Play
Download on the App Store

अलंकार आणि वस्त्रे

उपजीविका कष्टसाध्य आणि एकूण जीवन अस्थिर असले, तरी मानवाची उपजत सौंदर्यदृष्टी व अभिरुची निरनिराळ्या प्रकाराने व्यक्त झालेली दिसते. त्यांतला सगळ्यांत महत्त्वाचा प्रकार म्हणजे अलंकरण. आपले शरीर सुशोभित करण्याची तीव्र इच्छा मानवाला सतत आहे. यासाठी चित्रविचित्र रंगांचे विलेपन ही सगळ्यात आरंभीची पायरी होय. अश्मयुगातील काही सांगाडेही गेरूने रंगविलेले आहेत. त्यांवरून अश्मयुगीन माणूस अंगाला रंग लावीत असावा, असा कयास करता येतो

दुसरा प्रकार म्हणजे, प्राण्यांची हाडे, दात, नखे किंवा वाळक्या बिया यांना भोके पाडून त्यांच्या माळा करून गळ्यात घालणे हा होता. आंतराश्मयुगीन अवशेषांत असे ताइतासारखे वापरलेले दात व हाडे खूप सापडतात. 

तिसरा प्रकार म्हणजे रंगीत वा चमकदार दगड घेऊन त्यांचे मणी, लोलक आणि ताईत तयार करणे व त्यांच्या माळा अंगाभोवती गुंडाळणे हा होता. चंद्रकोरीच्या, कुऱ्हाडीच्या किंवा पक्ष्याच्या आकाराचे ताईत सापडतात. पण बहुतेक ताईत हे तोड्याच्याच स्वरूपाचे समजावयास हवेत.

अलंकारांकडे इतके लक्ष होते, की वस्त्रप्रावरणाकडे विशेष लक्ष देण्याची अश्मयुगीन माणसाला जरूरच भासली नसावी, इतका पुरावा मिळतो. अश्मयुगातील वस्त्रांचे प्रत्येक्ष अवशेष उपलब्ध नाहीत.उपलब्ध  चित्रणातून तो सहसा वस्रहीनच दिसतो. क्वचित काही मूर्तींवर केसाळ असे कपडे दाखविले आहेत. त्यावरून अतिशीत प्रदेशात जनावरांची कातडी लपेटून घेण्यात येत, पण इतरत्र वस्त्रांची जरूर भासत नव्हती. ही वस्त्रे शिवण्यासाठी वा ती बांधून घेण्यासाठी उपयोगी असे भोके पाडण्याचे दगडी टोचे व हाडांची दाभणे अवशेषांत मिळतात. जनावरांच्या केसांचा लोकरीचा कपड्यासाठी विणून उपयोग करीत किंवा काय, ते सांगता येत नाही.