Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

निवासस्थाने

अश्मयुगीन निवासस्थानांचे स्वरूप तत्कालीन हवामानावर अवलंबून होते. . गुंफा वा प्रस्तरालय यांसारखी ठिकाणे निवासासाठी वापरीत.  निवासाला गुहा वा कपाऱ्या निवडताना त्यांची तोंडे वाऱ्याच्या दिशेला येणार नाहीत अशी काळजी घेतली जात असे.गुहा बरीच खोल असेल, तर मुखाच्या भागातच वस्ती होई. तथापि फार खोलातली जागा टाळलेली दिसते. या आतल्या भागाचा चित्रकामाला वा काही पूजाअर्चा यांसारख्या विधींना उपयोग होत असावा. त्यांना ‘मंदिरे’ किंवा ‘पूजास्थाने’ अशीही नावे यामुळे दिली जातात. 

माणसाने उभारलेल्या आसऱ्या- चे स्पष्ट अवशेष उत्तरपुराणाश्मयुगातच प्रथम मिळतात. तेही एका विशिष्ट भागातच आणि एका विशिष्ट समाजगटाशी निगडित आहेत. आग्नेय यूरोपात चेकोस्लोव्हाकियात व्हिस्टोनीस, ऑस्ट्रोव्हा व पेट्रोव्हिज; दक्षिण रशियात डॉन नदीवरील गागारिनो येथे व सायबेरियात टिमोनोव्हका येथे हे अवशेष मिळतात. पहिल्या दोघांचा संबंध ग्रेव्हॅटियन लोकांशी आहे आणि भीमगज या अजस्र प्राण्याची शिकार हाच त्यांचा मुख्य व्यवसाय असल्याने या लोकांना त्याच्या पाठोपाठ विरळ जंगलात येऊन राहणे भाग पडले. स्वाभाविकच त्यांनी काही आश्रयस्थाने बांधली. यांना घरे म्हणण्यापेक्षा तंबू वा झोपड्या म्हणणे अधिक सोयीचे ठरेल.

नव्या जीवनपद्धतीत स्थिर वस्ती ही समाजाची गरज झाल्याने जास्त टिकाऊ निवासस्थाने आवश्यक झाली. स्वाभाविकच चिवट व बळकट सामान कौशल्याने वापरण्यात येऊ लागले. लव्हाळे, बांबू, कातडी यांच्या ऐवजी आता मोठाले लाकडी ओंडके, दगड, कच्च्या विटा यांचा उपयोग होऊ लागला. कालांतराने घरांमध्ये एकच दालन ठेवण्याऐवजी त्याच्या खोल्या पाडण्यात येऊ लागल्या. सायप्रसमधील खिरोकिटिया येथील वर्तुळाकार घरात पोटमाळा काढलेला होता. त्याला पक्क्या खांबांचा आधार होता, तरीही जिना मात्र पक्का नव्हता. तेथे साध्या शिडीचाच उपयोग केलेला असावा.

यूरोप, चीन, भारत व ईजिप्त या ठिकाणी नवाश्मयुगीनांनी बांधलेली घरे बरीचशी निराळी आहेत. यूरोप- मध्ये गृहरचनेस लाकडाचाच उपयोग होत गेला. आयताकार वा चौरस घरे भक्कम लाकडी किंवा बांबूच्या सांगाड्याभोवती बांधीत. भिंती आणि बहुधा छपरेही फळ्यांची केलेली असत. क्वचित त्यांवर गवत पसरीत, ईजिप्तमध्ये फायूम  येथे बांबू व तट्ट्या यांच्या झोपड्या वापरीत असावेत असे दिसते. यानंतरच्या मेरिम्डीयन समाजाने अशा झोपड्यांची छपरे घुमटाकार बनवून त्यांवर चिखल थापण्यास आरंभ केला. चीन व भारत या दोन्ही ठिकाणी सामान्यपणे लाकूड व गवत यांच्या वर्तुळाकार वा चौकोनी झोपड्या वापरलेल्या दिसतात.