Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

ग्राम संकल्पना

आंतराश्मयुगात काही ठिकाणी पाचसात घरांचे समूह दिसले, तरी त्या वेळी ग्राम या कल्पनेचा जन्म झाला नव्हता. नवाश्मयुगात बरीच माणसे कायमची एका ठिकाणी राहणार, म्हणजे बरीच घरे एकमेकांशेजारी बांधली जाणार, असे झाल्यावर या सहवासाचा अर्थ व त्यातील प्रश्न समजावयास लागले. या माणसांना ये-जा करण्यास मार्ग हवेत, म्हणजे रस्ते हवेत. नवाश्मयुगातील बर्‍याच मोठ्या कालखंडात रस्ता ही कल्पना ज्ञात नव्हती. 

दोन घरांच्या मध्ये उरणाऱ्या जागेतूनच दळणवळण चाले. हे सोयीचे करण्याचे प्रयत्न क्वचित काही ठिकाणी झालेले दिसतात. आर्पाकिया येथे अशा वाटांवर दगड अंथरले होते, तर खिरोकिटिया येथे मुख्य रस्त्यावर फरसबंदी केलेली होती. परंतु ही उदाहरणे अपवादात्मक होत. यूरोपातील काही वसाहतींत फेडर्झे घरे एका ओळीत बांधून मध्यभागी हेतुत रस्ते ठेवलेले दिसतात. इतरत्र अशी योजनापूर्वक मांडणी सापडत नाही. वाहने नसल्याने खेड्यांना एकमेकांशी जोडणारे रस्ते निर्माण होण्याची शक्यताच नव्हती. 

खेड्यांच्या रक्षणासाठी काही बांधकाम करण्याची व्यवस्था नवाश्मयुगात प्रथम झाली. इ.स.पू. आठव्या सहस्रकात जेरिको येथे एक प्रचंड दगडी तटबंदी उभारण्यात आली होती. पण हेही एकुलते एकच उदाहरण आहे. नवाश्मयुगाच्या अगदी शेवटी शेवटी भूमध्य सागराभोवतालचा प्रदेश व पश्चिम आशिया या भागांतील काही ठिकाणी विटांच्या तटबंद्या बांधण्यात आल्या 

मर्सीनू, हसितकार, ट्रॉय) उत्तर व मध्य यूरोपातील वसाहतींभोवती लाकडी तटबंद्या व खंदक आढळले आहेत कोलोन-लिंडन्थॉल फ्रान्समध्ये काही टेकड्यांच्या माथ्याभोवती असणाऱ्या दगडी भिंती याच काळातील समजतात. 

ही सर्व उदाहरणे फुटकळ आणि काळ व स्थळ या दोन्ही दृष्टींनी एकमेकांपासून दूरची आहेत. म्हणून ग्राम अस्तित्वात आले, तरी ग्राम-योजना व ग्राम-संरक्षण या कल्पनांचे आकलन झाले होते किंवा त्या रुजल्या होत्या, असे निश्चितपणे म्हणता येत नाही.