Android app on Google Play

 

जानेवारी ७ - नाम

नामाचे प्रेम का येत नाही, हा प्रश्न बहुतेकजण विचारतात. पण थोडासा विचार केला तर असे लक्षात येईल की, हा प्रश्नच बरोबर नाही. मूल न झालेल्या बाईने, ‘ मुलाचे प्रेम कसे येईल? ’ असे विचारण्यासारखाच हा प्रश्न आहे. मूल झाले की प्रेम त्याच्याबरोबरच येत असते. तेव्हा, ‘ मुलाचे प्रेम कसे येईल ’ हा प्रश्न करण्याऐवजी, ‘ मूल कसे होईल ’ याचाच विचार करणे बरोबर ठरेल. आपणसुध्दा प्रश्न करायचाच असेल तर ‘ नामाचे प्रेम कसे येईल ’ असा करण्याऐवजी, ‘ मुखी नाम कसे येईल ’ असा प्रश्न करणे बरोबर होईल. मुखी नाम यायला वास्तविक आडकाठी कोणाची आहे? दुसर्‍या कोणाचीही नसून आपली स्वत:चीच आहे. वास्तविक, एकदा नाम घ्यायचे ठरवून सुरुवात केली की झाले. पण तसे होत नसेल तर, दोष दुसर्‍या कोणाचा नसून आपला स्वत:चाच आहे. म्हणून नाम घेणे हे आपले काम आहे; मग त्याच्या पाठोपाठ येणे हा प्रेमाचा धर्मच आहे. जसे आईच्या बाबतीत, मूल आणि प्रेमाचा पान्हा ही निराळी असूच शकत नाहीत, तसे नाम आणि त्याचे प्रेम ही एकमेकांना सोडून राहूच शकत नाहीत. ह्यावरुन एक गोष्ट अशी ठरली की, ‘ प्रेम का येत नाही ’, याचे उत्तर आमच्याजवळ आहे, आणि ते म्हणजे, ‘ नाम घेत नाही म्हणून. ’ यावर कोणी असे म्हणेल की, आम्ही नाम घेतोच आहोत, तरीही प्रेम का येत नाही? हे विचारणे ठीक. पण आता आम्ही जे नाम घेतो आहोत, त्याचा विचार केला तर काय दिसेल? पोटी जन्माला आलेल्या मुलाबद्दल जसा कळवळा असतो, तसा नामाबद्दल आपल्या ठिकाणी कळवळा नसतो. सर्व संतांनी किंवा आपल्या गुरुने, नाम घ्यावे असे सांगितल्यामुळे आपण ते घेतो, किंवा दुसरे काही करायला नाही म्हणून घेतो, इतकेच. अर्थात, तसे घेतले तरी आज ना उद्या आपले काम होईलच. पण ‘ प्रेम का येत नाही ’, असा प्रश्न विचारण्यापूर्वी, आपण नाम किती आस्थेने घेतो, हा प्रश्न स्वत:ला विचारणे जरुर आहे. एखाद्या बाईला फार दिवसांनी मूल झाले तर त्याच्याबाबतीत तिची जी स्थिति होते ती नामाच्या बाबतीत आपली होणे जरुर आहे.

आपल्या देहाची वाढ जशी आपल्याला नकळत होते, तशी आपली पारमार्थिक उन्नतीही आपल्याला नकळत झाली पाहिजे. ती कळली तर सर्व फुकट जाण्याचा संभव असतो. परमार्थात ‘ मिळविण्यापेक्षा ’ मिळविलेले ‘ टिकविणे ’, हेच जास्त कठीण आहे. ज्याला ‘ मी काही तरी झालो ’ असे वाटते तो काहीच झालेला नसतो. अशा माणसाने फारच सांभाळले पाहिजे.