Get it on Google Play
Download on the App Store

जानेवारी ६ - नाम

नाम घेत असताना रुपाचे ध्यान आवश्यक आहे का? वास्तविक, नाम आणि रुप ही भिन्न नाहीतच. पण नाम हे रुपाच्या आधीही असते आणि नंतरही उरते. नाम रुपाला व्यापून असते. राम जन्माला येण्यापूर्वी वाल्मीकींनी रामायण लिहिले, आणि रामाने मागाहून जन्म घेऊन त्यात वर्णन केल्याप्रमाणे आचरण करुन दाखविले. म्हणजे रुप अस्तित्वात येण्यापूर्वी नाम होते, आणि रुप गेल्यानंतर आजही नाम शिल्लक आहे. देशकालाच्या पलीकडे जे कायम टिकते ते सत्य होय. प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रुपे नाहीशी झाली तरी त्यांचे नाव टिकून राहते. म्हणजे नाम हे देशकालाच्या मर्यादेच्या पलीकडे असते; म्हणजे ते रुपापेक्षा जास्त सत्य असते. जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलेच पाहिजे. तेव्हा नाम घेणे ही गोष्ट मुख्य आहे. ते घेत असताना रुपाचेही ध्यान राहिले तर उत्तमच; पण ते तसे न राहिले, तरी नाम घेत असताना रुपाचे स्मरण सूक्ष्मरुपाने असतेच असते. समजा, एक गृहस्थाच्या घरी राम नावाचा गडी आहे. तो गृहस्थ ‘ राम राम ’ असा जप करीत बसला आहे, पण त्याचे लक्ष राम-रुपाकडे नाही, मनात काहीतरी दुसरेच विचार चालू आहेत. अशा वेळी त्याला जर एकदम विचारले की, ‘ तुम्ही कुणाचे नाव घेत आहात? ’ तर अर्थात ‘ रामाचे ’, असेच उत्तर तो देईल. हे उत्तर देताना त्याच्या मनात ‘ दाशरथी राम ’ हीच व्यक्ती असणार. ‘ राम गडी ’ ही व्यक्ती नसणार. याचाच अर्थ असा की, नाम घेत असताना रुपाचे ध्यान सूक्ष्मरुपाने आत जागृत असते. म्हणूनच, रुप ध्यानी येत नाही म्हणून अडून बसू नये. नामस्मरण करण्याचा अट्टाहास ठेवावा, त्यात सर्व काही येते.

एखाद्या माणसाची आणि आपली ओळख असेल तर पहिल्याने त्याचे रुप पुढे येते आणि नंतर नाम येते. पण आपली त्याची ओळख नसेल, आणि आपण त्याला बघितलेला नसेल, तर त्याचे फक्त नाव येते. आज आपल्याला भगवंताची ओळख नाही, म्हणून त्याचे रुप माहिती नाही; परंतु आपल्याला त्याचे नाम घेता येईल. सध्यासुध्दा, त्याचे नाम घेताना त्याची आठवण आपल्याला होते हा आपला अनुभव आहेच. भगवंताचे रुप तरी निश्चित कुठे आहे? एक राम ‘ काळा ’ तर एक राम ‘ गोरा ’ असतो; एक राम ‘ लहान ’ तर एक ‘ मोठा ’ असतो; पण सर्व रुपे एका रामाचीच असतात. भगवंत स्वत: अरुप आहे; म्हणून जे रुप आपण त्याला द्यावे तेच त्याचे रुप असते. यासाठी आपण कोणत्याही रुपामध्ये त्याचे ध्यान केले तरी चालते. नामातून अनंत रुपे उत्पन्न होतात आणि अखेर त्यामध्येच ती लीन होतात. म्हणून भगवंताचे नाम श्रेष्ठ आहे. हे त्याचे नाम तुम्ही आवडीने, अखंड घ्या आणि आनंदात रहा.