Android app on Google Play

 

जानेवारी १३ - नाम

नाम हा सत्कर्माचा पाया आहे तसाच कळसही आहे. भगवंताच्या स्मरणात केलेले कर्मच सत्कर्म या सदरात पडू शकते; भगवंताच्या विस्मरणात केलेले कर्म सत्कर्म ठरु शकत नाही. समजा, एखादा मनुष्य नुसते तोंडाने ‘ राम राम ’ म्हणतो आहे परंतु भगवंताच्या स्मरणात नाही, तर मग ‘ राम, राम ’ म्हणण्याची त्याची क्रिया सत्कर्म म्हणता येईल का? वास्तविक, नाम हे स्वत:सिध्द असल्याने ते जाणता वा अजाणता म्हटले तरी ते सत्कर्म याच सदरात पडते, कारण ‘ जेथे माझे नाम तेथे मी पुरुषोत्तम ’ असे भगवंताचेच वचन आहे. म्हणून नामाचा उच्चार आणि भगवंत या दोन गोष्टी निराळ्या असूच शकत नाहीत. मुखाने नाम म्हणणार्‍याचे लक्ष भगवंताकडे असो वा नसो, ते सत्कृत्य याच सदरात पडते. इतर कर्मे आणि नाम घेण्याचे कर्म यांत जो मोठा फरक आहे तो हाच की, इतर कर्मांना पुर्णत्व किंवा सत्यत्व नामाने येते, तर उलटपक्षी नाम आणि अपूर्णत्व या गोष्टी एकत्र संभवतच नाहीत. म्हणून नाम भगवंताच्या स्मरणात घेतले किंवा कसे हा प्रश्नच उदभवत नाही. किंबहुना, नाम मुखी आले की सत्कर्मे होऊच लागतात. मूल झाले की मुलाच्या आईला पान्हा फुटणे, मुलाचे लाड करणे, त्याच्यावर सर्वतोपरी प्रेम करणे, या गोष्टी जशा न शिकविता सहजच होतात, तशीच स्थिती नाम घेणाराची सकर्माच्या बाबतीत होते. इतकेच नव्हे तर, त्या आईला जर म्हटले की तू मुलाला जवळ ठेव, पण त्याच्यावर प्रेम वगैरे काही करु नकोस, तर ते जसे तिला शक्य नाही, त्याचप्रमाणे नाम घेणाराला सत्कर्मे टाळू म्हटले तरी टाळता येणार नाहीत. सत्कर्मे फळाला आली असे केव्हा म्हणता येईल, तर भगवंताचे नाम मुखी येईल तेव्हाच.

परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवले आहे की, " तू माझा व्हावास असे तुला वाटते आहे ना? मग तू प्रपंच अती दक्षतेने कर, प्रयत्नाला कधी मागे पाहू नकोस, पण फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस, आणि मी जे सांगतो ते औषध घे, ते तुला सर्व रोगांतून मुक्त करील; आणि ते औषध जर कोणते असेल तर ते माझे ‘ नाम ’ हे होय. " त्या नामाचा खरोखर तुम्ही अभ्यास करा. तुम्ही सर्वांनी असा निश्चय करा, की नामाशिवाय जगणे हे खरे नाही. नामाशिवाय जगू नये असे मला खरोखर मनापासून वाटते. नामावरची निष्ठा कसे काम करते हे निष्ठेने नाम घेणारालाच कळेल. नामाचे प्रेम ज्याला लागले त्याच्या मागे परमात्मा उभा राहिला हे अगदी सत्य, सत्य, त्रिवाचा सत्य सांगतो. म्हणून आवडीने आणि प्रेमाने भगवंताचे नाम घ्या, एकदा तरी त्याला कळकळीने ‘ रामा ! ’ अशी हाक मारा, की भगवंताला तुम्हाला येऊन भेटावेसे वाटले पाहिजे.