Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

एकदा तरी प्रेमात पडावं

एकदा तरी प्रेमात पडावं

एकतर्फी का होईना....

कोणाच्यातरी स्वप्नांत उगाच रमावं

द्विपक्षी जमले तर त्यांच्यासारखे भाग्यवान तेच

असो....

सगळेच काही भाग्यवान नसतात

मात्र एकतर्फीसाठी  भाग्य लागत नाही..

खयाली पुलाव झिंदाबाद

नैसर्गिक आकर्षण कमाल असते बुआ

आवडणारी व्यक्ती सतत दिसत राहते अवती भवती..

भास वगैरे infatuation वगैरे... मनातल्या मनात इमले मात्र जन्मोजन्मीचे

तिची लागताच चाहूल होणारी धडधड उडणारा थरकाप

उगाच तिच्याबद्दल पाल्हाळ ऐकण्याची थोर कौतुके

तिच्या आवडी निवडी पासून ते तिला येणाऱ्या रागांची यादी

तिला नावडणाऱ्या व्यक्तीविषयी उगाच मनकवडा जळफळाट

तिला आनंदी पाहून सुखावणारे ते क्षण मोलाचे

तर उदास पाहून उगाच होणारी मनाची घालमेल.. नाजूक हळहळ...

कोणी विचारले नाही तरी हळूच काढला जातो तिचा विषय.. कान टवकारले जातात.. टिपले जातात संदर्भ... मग मनाचा राजा आणि ती महाराणी

मनातल्या मनात उगाच वैचारिक कल्लोळ मग काशाच काय.. मन तिच्यात.. लक्ष विचलित धड अभ्यासात.. कामात.. कसलाच व्यवहारी शहाणपणा

केवळ निर्भेळ प्रेमाचे एकसुरी विचार एकलकोंडे

खुदकन हसणं गुलाबी पत्र चमचमीत रंग डोळ्यात एककल्ली नजर तीच्यात हरवलेली सांगू कि नको हे तर फारच दूरवर

मात्र एक मन म्हणत तस काही नाहीये दुसरे तर तिचंच झालेलें

जगासमोर मला प्रेमा-बिमावर विश्वास नाहीये म्हणत सेफ साईड घेत एकसुरी तिच्यात रुतलेले विचार

एखादा दिवस दिसली नाही तर होणारी तगमग.. दूरवरून येत असेल तर खुश...

सातवे असमान पार..

काही म्हणा एकदा तरी प्रेमात पडावं.. स्वतःला आराश्याशिवाय निरखून पाहावं डोळसपणे

रोज होणारी कंटाळवाणी कामे तिच्या झुरून कधी पूर्ण होतात कळत नाही

सहज सुंदर लाघव रूप आपलंच आपल्याला दिसावं कळतपणे

तासनतास तिच्या विचारात मग्न व्हावे...  

स्वार्थ ... परमार्थ .... कर्त्यव्य... हक्क...  यांच्या पलीकडे जाऊन आपण आपलं दोघांचंच जग बसवावं. जाणो  प्रत्यक्षात उतरेल

मात्र सकस आठवणींचा गोतावळा आपल्या मनाच्या कप्प्यात रुंजी घालत राहतो....

romanticism वगैरे म्ह्णतात  हल्ली ....

मात्र त्या भावविश्वाला नाव देऊ नये...

नाव असलेली प्रत्येक गोष्ट नामशेष होते 

म्हणून अशी भावना कालातीत राहावी हीच सद्भावना..

असो उगाच अशा झुरेशमारांची मनोवैज्ञानिक चिकित्सा वगैरे आजन्म चालूच राहते... मागता येणारे खोचक सल्ले पण भेट मिळत असतात.

उगाच carrer वगैरे म्हणायच्या गोष्टी

आवडणारी तीच असेल जर सोबत तर दुसरा नेपोलियन सुद्धा बनेन ...जगज्जेता

तिच्यासाठी वाट्टेल ते.... त्याग सुद्धा ...

तिचा त्याग तिच्यासाठीच... फारच क्लेशदायक...

मात्र मखमली आठवणीत कुठेतरी बोचणारी सुई एकतर्फीत वेगळीच जादू असते ...

आधीच जगणं पण नवीन वाटते उगाचच निसर्ग सुंदर दिसतो..

तारे.. ग्रह.. चंद्र वगैरे कवितेत उतरतात. यमक जुळवल जातं

हल्ली तर Day वगैरे साजरे होतात.. Friendship.. Chocolate.. black & white.. Traditional.. Mismatch आणि सगळ्यात शेवटी उगाच उसणा मागून आणल्यागत Valentine day...

कळत नाही बुआ मला प्रेम व्यक्त करायला अमुक एक दिवस कशासाठी दिखावा कि अंधानुकरण सैरभैर झालेल्यांचे

माझ्यासाठी ती आणि तिच्यासाठी मी आयुष्यभराचे valentine

हे सगळं मनातल्या मनात गोड गोंडस रक्तिमा काळजातला वगैरे वगैरे

मनाची चलबिचल विचारांची गल्लत उगाच अकाली प्रौढत्वाचे द्वंद्व का कशासाठी कोणासाठी कळत कळत तिच्यासाठी नाव गाव पता काहीच नाहीमात्र तिच्या आठवणीत संपूर्णपणे रुतलेला मनाचा हळवा कोपरा मधाळ सौदर्याची उगाच वर्णने

डोळे ... कान ... नाक...  केस ... ओठ  ...त्वचा अशा उपमांसोबत

साहित्यात नवा शब्दकोश तयार व्हावा विशेषणांचा महापूर मनातले मांडे मनात खोलवरकाही म्हणा एकतर्फीत मनाचा राजा तोच प्रजा व्यवस्था तीच ती राणी उगाच स्वप्नाच्या हिंदोळ्यात रात्रं-दिवस ... भानावर येईपर्यंत

वेळ.. काळ.. वेग.. ठप्प विचार चालू.. काम बंद.. शिक्षण बंद..

मंद.. मंद.. व्यवहार उगाच गोड हसणं

एकट्याशीच भक्तिभावाने देवाला साकडे घालणे... देव.. देवी.. कुलदैवते पालथी करणे

आवडते स्वप्नपूर्तीसाठी आशावादी.. आशाळभूत.. कृतीशून्य..  हवालदिल..

 

 

भूषण वर्धेकर

१४-०२-२००६

वडगाव बुद्रुक

पुणे