Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

नातं, मैत्री आणि प्रेम

नातं, मैत्री आणि प्रेम

एका कंपनीत काम करायचे

नातं एकटेच राब राब राबायचं

मैत्री कधी निस्वार्थीपणे तर

कधी स्वार्थ साधून काम करायचं

प्रेमाची तर वेगळीच गोष्ट

कधी स्वच्छंदीपणे कधी मुक्तपणे तर कधी कामात लक्ष कधी दुर्लक्ष

 

नात्याला कबाडकष्ट करायची

सवयच असते

मैत्रीच मात्र वेगळं चालायचं

कामाचं स्वरुप पाहून राबायचं

नाहीतर मन मारुन काम करायचं

प्रेमाचा अजब खेळ साधलं तर सुत नाहीतर मानगुटीवरचं भूत

 

नात्याला ओव्हरटाईमचा भारी शौक

मोबदल्याची फिकीर नाही

मैत्री मात्र मनासारखं असेल तर झोकून देऊन काम करायचं

प्रेमाची गोष्टच न्यारी,

लिमीटेड ड्युटी प्यारी

स्वतःचे ओव्हरटाईमचे रिकामे रकाने

नात्याचीच सारी मक्तेदारी

 

आता मात्र एक सिस्टीम आली,

काळ बदलला

नातं तसंच राहीलं बुरसटलेलं रांधत

मैत्रीने पलटी मारत सगळे हेवेदावे हेरले

प्रेम मात्र गुलछबू, आपल्याच धुंदीत

कधीतरी फसायचं तर कधी फसवलं जायचं

 

काळानुरुप कंपनीत आधुनिकता आली

मैत्री आणि प्रेम पुर्णपणे बदलून गेले

कल्लोळाच्या धामधुमीत कलुषित झाले

नातं मात्र कृश होत गेलं, खोलवर रुतल्यानं अधिक दृढ झालं

मैत्रीचा गोंधळ उडतो प्रेमाची धांदल, त्रेधातिरपीट

नातं मात्र अजागळपणे सगळ्यांना संभाळून घेतं

 

एकविसावे शतक उजाडले

मैत्री प्रेम अनेक सौदेबाजीत अडकले

नातं मात्र खंबीरपणे उभारत होतं, निपचितपणे साथ देत होतं

मैत्रीला प्रमाची हुरहुर वाटे

प्रेमाला मैत्री कधी कधी हवीहवीशी वाटे

 

नातं आता वृद्ध झालं सगेसोयरांनी समृद्ध

प्रेमाचा विचका झाला मैत्रीचा इस्कोट

तरीही दोघातला छंदी-फंदी पणा कमी नाही झाला

 

 

कंपनी पण थकली नात्यासकट उतारवयात खंगली

प्रेम मात्र दुरावलं मैत्रीलाही सोडवत नव्हतं मनोमनी मांडे खात होतं

नातं मात्र अविचल. .  राग, लोभ, द्वेष,मत्सर गिळतं होतं

 

कंपनी मृत्युशय्येवर टेकली नातं मात्र गोतावळ्यात अडकलं

मैत्री संस्मरणीय क्षणांत रमलं. . हुसमुसलं

प्रेम मात्र विस्मरणात. .  ईतरांसाठी नकळतपणे केलेल्या ओव्हरटाईमचा हिशेब चाळत बसलेलं. . एकटं. .  एकलकोंडं . .

 

भूषण वर्धेकर, दौंड