Get it on Google Play
Download on the App Store

बोलून-चालून गाढवच!

बिरबलाला तंबाखू खाण्याचा नाद होता. हुक्की आली, ती तो मधूनच तंबाखूची चिमूट तोंडात टाकून बराच वेळ ती चघळत असे.

एकदा तो आणि बादशहा परप्रांतात गेले होते. सांयकाळच्या वेळेस ते फिरायला म्हणून गावाबाहेर गेले तेव्हा त्यांना वाटेत एक तंबाखूचे शेत दिसले. त्यात तंबाखूची रोपटी चांगलीच तरारून उठली होती. अशातच एक गाढव तेथून चालले असता मधूनच ते गाढव तंबाखूच्या झाडाचा वास घेई आणि न खाताच पुढे निघून जाई. असे त्याने दोन-चार वेळा केले, बिरबलाला टोमणा देण्याच्या हेतूने बादशहा म्हणाला, ''बिरबल, बघितलंस ना? तो गाढवसुद्धा तंबाखूला तोंड लावीत नाही.''

तेव्हा बिरबल म्हणाला, ''महाराज, अहो ते बोलून-चालून गाढवच. त्याला तंबाखू खाण्याची मजा काय कळणार?''

बिरबलाने आपल्याला फिरवून टोमणा मारल्याचे पाहून बादशहा फारच केविलवाणा झाला.