Get it on Google Play
Download on the App Store

नवजीवन 75

आणि त्या मातृहीन मुलीने रूपाला ओळखले. रूपाने तिला जवळ घेतले, खेळवले. ती मुलगी रडायची थांबली. रूपाने तिला नेले, तिला दूध पाजले. मुलगी हसू खेळू लागली. थोडया वेळाने रूपाच्या मांडीवर ती निजली. रूपाने तिला निजवले. आणि उषाने आपली शाल त्या चिमण्या जिवाच्या अंगावर घातली. उषाही एक राजकीय कैदी होती. गव्हर्नरवर तिने गोळी झाडली म्हणून तिला सजा. ती उंच सडपातळ होती. ती फार बोलत नसे. परंतु बरोबरच्या एका राजकीय कैद्यावर तिचे प्रेम जडले होते. त्याचे नाव दिनकर. दिनकरने एका गावी शेतकर्‍यांचा सत्याग्रह चालवला होता. जमीनदाराचा खून झाला. तो वास्तविक दुसर्‍याच लोकांनी केला होता. परंतु शेतकरी व त्यांचा म्होरक्या दिनकर यांच्यावर खुनाचा खटला भरला. दिनकरला काळया पाण्याची सजा झाली. उषाला दिनकर आवडे. दिनकर गाणी म्हणू लागला की, उषा टाळया वाजवी. तीही ते चरण गुणगुणे. एकदा ती दिनकरला म्हणाली, ‘मला द्या ती गाणी लिहून, सुंदर गाणी.’

रूपाने काम हाती घेतले. त्या धर्मशाळेत सर्वत्र घाण होती. तिने बादल्या भरून आणल्या फरशी धुऊन टाकली. उषा व आणखीही भगिनी कामाला आल्या.

‘रूपा, मी येऊ मदतीला?’ प्रसन्नने विचारले.

‘तुमचा हात ना दुखतो?’ तिने प्रेमाने प्रश्न केला.

‘तुझ्याबरोबर काम करताना नाही दुखणार. तुझ्याबरोबर काम करणे म्हणजे अमृत!’

‘तुम्ही तिकडे वाचीत बसा. दुपारी मला शिकवा. मला सारे कळले पाहिजे, समजले पाहिजे.’

‘पुष्कळ वर्षे राहायचे आहे इकडे. सारे शिकशील, शहाणी होशील!’

‘तुम्ही मला तुच्छ नाही समजत?’

‘आम्ही क्रांतिकारक कोणाला तुच्छ मानीत नाही. परिस्थितीमुळे कोणाचे पाऊल कधी चुकीचे पडते. म्हणून का कायमचे कोणी वाईट असते?’

‘किती सुंदर तुमचे बोलणे; परंतु काम नका येऊ करायला. तुम्ही अशक्त आहात. ते आले म्हणजे तुमच्यासाठी टॉनिक पाठवायला मी सांगेन.’

असे म्हणून रूपा फरशी धुऊ लागली. सारे स्वच्छ झाले.

दुपारच्या वेळेस प्रताप, किसन आले. किसन पोलीस अधिकार्‍यांना म्हणाला,


‘मलाही कैदी करा. माझ्या पत्नीला हे सतावतात. मी कैद्यांमध्ये राहीन, तिचा सांभाळ करीन.’ त्याची मागणी मान्य करण्यांत आली. त्याच्या पत्नीला आनंद झाला. दोघे काही वर्षे काळया पाण्यावर एकत्र राहून पुन्हा घरी जातील. ‘आता जातील चार वर्षे.’ किसनची पत्नी म्हणाली.

प्रतापच्या नावे तेथे टपाल आले होते. राजाकडे केलेल्या अर्जाचे उत्तर आले होते. रूपाची शिक्षा साधी करण्यात आली होती. रद्द नाही झाली तरी साधी झाली. बरे झाले. आता पुढे काय? प्रतापला रूपाबरोबर राहता आले असते. किसनप्रमाणे त्याला स्वेच्छा कैदी होता आले असते. रूपाला सक्तमजुरी आता नव्हती. अंदमानांत लहानशी झोपडी बांधून दोघे तीन वर्षे राहिली असती. परंतु रूपा आहे का तयार?

नवजीवन

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
नवजीवन 1 नवजीवन 2 नवजीवन 3 नवजीवन 4 नवजीवन 5 नवजीवन 6 नवजीवन 7 नवजीवन 8 नवजीवन 9 नवजीवन 10 नवजीवन 11 नवजीवन 12 नवजीवन 13 नवजीवन 14 नवजीवन 15 नवजीवन 16 नवजीवन 17 नवजीवन 18 नवजीवन 19 नवजीवन 20 नवजीवन 21 नवजीवन 22 नवजीवन 23 नवजीवन 24 नवजीवन 25 नवजीवन 26 नवजीवन 27 नवजीवन 28 नवजीवन 29 नवजीवन 30 नवजीवन 31 नवजीवन 32 नवजीवन 33 नवजीवन 34 नवजीवन 35 नवजीवन 36 नवजीवन 37 नवजीवन 38 नवजीवन 39 नवजीवन 40 नवजीवन 41 नवजीवन 42 नवजीवन 43 नवजीवन 44 नवजीवन 45 नवजीवन 46 नवजीवन 47 नवजीवन 48 नवजीवन 49 नवजीवन 50 नवजीवन 51 नवजीवन 52 नवजीवन 53 नवजीवन 54 नवजीवन 55 नवजीवन 56 नवजीवन 57 नवजीवन 58 नवजीवन 59 नवजीवन 60 नवजीवन 61 नवजीवन 62 नवजीवन 63 नवजीवन 64 नवजीवन 65 नवजीवन 66 नवजीवन 67 नवजीवन 68 नवजीवन 69 नवजीवन 70 नवजीवन 71 नवजीवन 72 नवजीवन 73 नवजीवन 74 नवजीवन 75 नवजीवन 76 नवजीवन 77 नवजीवन 78 नवजीवन 79 नवजीवन 80 नवजीवन 81 नवजीवन 82 नवजीवन 83 नवजीवन 84 नवजीवन 85