Get it on Google Play
Download on the App Store

नवजीवन 6


अशा अर्थाचे पत्र होते. त्या तरूणीची माता प्रतापला आपल्या जाळयात ओढू पहात होती. बारीक नाजुक जाळे त्याच्याभोवती ती गुंफीत होती. प्रतापशी आपल्या मुलीचे लग्न लागावे असे तिला वाटत होते. त्या मुलीचे वय जरा अधिक होते. परंतु नक्की प्रेम असल्याशिवाय लग्नाच्या भानगडीत पडायचे नाही असे प्रतापने ठरविले होते. एका बडया अधिकार्‍याच्या पत्नीनेही त्याला मोह पाडला होता. ती का स्वत:च्या नवर्‍याजवळ काडीमोड करणार होती? हा का तिच्याशी लग्न करायला तयार झाला असता? तिच्या नवर्‍याचे त्याला एक पत्र आले होते. रस्त्यांची एक नवीन योजना होती. शाळाही बांधायच्या होत्या. त्या कामाची बैठक होती. प्रतापची जमीन त्या बाजूला होती म्हणून त्या अधिकार्‍याने त्याला बोलावले होते. प्रतापशी आपली पत्नी लाडीगोडी करीत आहे याची त्याला कल्पनाही नव्हती. तो अधिकारी उदारमतवादी होता. ‘प्रतिगामी लोकांचा रस्ते करायला विरोध आहे. ते आपल्या जमिनी द्यायला तयार नाहीत. तुम्ही याच.’ असे त्याने प्रतापला आग्रहाने लिहिले होते. परंतु जनतेची थोडीफार सेवा करू पाहणार्‍या या उदार माणसाला घरातील भानगडी माहीत नव्हत्या. प्रतापला अनेक प्रसंग आठवले. त्या अधिकार्‍याची बायको प्रेमवेडी होऊन जीव द्यायला निघाली. आपण तिचे सान्त्वन केले. तिच्या केसांवरुन हात फिरवला. त्याला सारे आठवले. आपल्याला तिच्या नवर्‍याने पाहिले असेल का? त्याला कळले असतील का ते प्रेमप्रकार? तो या विचारात होता. त्याने तिला पत्रही लिहिले होते. ‘तुझा माझा केवळ मैत्रीचा संबंध राहो. इतर विचार मनांत आणू नकोस. पतीशी निष्ठेने राहा. यातच कल्याण आहे.’ त्या पत्राचे तिच्याकडून अजून उत्तर आले नव्हते. तिचे उत्तर येईपर्यंत इकडे लाघवी मातेला काय सांगायचे? आपल्या मुलीसाठी ही पाठीस लागली होती. आणि ही मुलगी दुसर्‍याही कोणाशी प्रेमयाचना करीत होती. त्याला ते कळले होते. म्हणून तर तिच्या आईने ‘कामावर जा, नाही तर इकडे येशील.’ असे लिहिले असावे. नाही तर ती स्वत:ही आली असती. प्रतापला क्षणभर मत्सर वाटला. आपणास सोडून दुसर्‍याकडे त्या तरूणीचे लक्ष जावे याचे त्याला वैषम्य वाटले. परंतु या फंदातून आपण मोकळे होऊ याचा त्याला आनंद झाला. नंतर त्याने इतर पत्रे फोडली. त्याच्या जमिनीच्या व्यवस्थापकाकडून एक पत्र आले होते. त्याने लिहिले होते.

‘घरीच शेती करावी. खंडाने देण्यात अर्थ नाही. घरी करण्यात फायदा आहे. बघा, विचार करा. तुम्ही मागितलेले पाच हजार रूपये मी पाठविले नाहीत. लौकरच पाठवितो. शेतकरी खंडाचे पैसे वेळेवर देत नाहीत. अधिकार्‍यांची मदत घेतल्याशिवाय वसूल करता येत नाहीत.’

अशा हकीगती त्या पत्रात होत्या. आपल्याजवळ शेकडो एकर जमीन आहे याचा त्याला आनंद वाटला. परंतु तो गंभीर झाला. एकाने इतकी जमीन ठेवणे पाप आहे असेही त्याला वाटत असे. त्याने पित्याकडून मिळालेली जमीन कुळांना वाटून दिली होती, आता आईच्या नावाची जमीन त्याला मिळाली होती. ही जमीनही देऊन टाकावी का? परंतु मग पोटाला काय? सरकारी नोकरीची तर त्याला इच्छा नव्हती. सुखात तो वाढला होता. त्याच्या गरजा वाढलेल्या होत्या. खुर्चीच्या सवयी जडल्या होत्या. हे सारे कसे भागवायचे? तारुण्यातील त्याच्या महत्त्वाकांक्षा आता जरा मरगळल्या होत्या. त्याच्या जीवनात सध्या अनिश्चितता होती.

परंतु विचारात रमायला त्याला आज सवड नव्हती. त्याला कोर्टात जाणे प्राप्त होते. तो ज्यूरीपैकी एक होता. केव्हा जायला हवे ते त्याने पाहिले. तो उठून दिवाणखान्यात आला. तेथे कलांचे उत्कृष्ट नमुने होते. तोही अधूनमधून चित्रे काढी. त्याने काढलेली काही चित्रे तेथे होती. काही चित्रे अपुरी होती. परंतु त्याचा हा कलांचा अभ्यासही अलीकडे बाजूला पडला होता. त्याने त्या तरूणीच्या आईला एक चिठ्ठी लिहिली, ‘मी आजारी आहे. रात्री जेवायला आलो तर येईन.’ असे त्याने लिहिले. परंतु ती चिठ्ठी त्याला नीरस वाटली, भावनाहीन वाटली. त्याने ती टरकावली. त्याने पुन्हा दुसरी चिठ्ठी लिहिली. परंतु ती दुसरी त्याला अतिपरिचयाची वाटली. म्हणून तीही टरकावण्यात आली. शेवटी त्याने चिठ्ठी लिहिलीच नाही. ‘आजारी आहे; जमले तर येण्याची खटपट करीन.’ असा निरोप पाठवावा असे त्याला वाटले; परंतु असा निरोप पाठविणे बरे नाही असे वाटून जमले तर, रात्री जावे झाले, असे मनात म्हणाला. चिठ्ठीही गेली नाही, निरोपही नाही.

नवजीवन

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
नवजीवन 1 नवजीवन 2 नवजीवन 3 नवजीवन 4 नवजीवन 5 नवजीवन 6 नवजीवन 7 नवजीवन 8 नवजीवन 9 नवजीवन 10 नवजीवन 11 नवजीवन 12 नवजीवन 13 नवजीवन 14 नवजीवन 15 नवजीवन 16 नवजीवन 17 नवजीवन 18 नवजीवन 19 नवजीवन 20 नवजीवन 21 नवजीवन 22 नवजीवन 23 नवजीवन 24 नवजीवन 25 नवजीवन 26 नवजीवन 27 नवजीवन 28 नवजीवन 29 नवजीवन 30 नवजीवन 31 नवजीवन 32 नवजीवन 33 नवजीवन 34 नवजीवन 35 नवजीवन 36 नवजीवन 37 नवजीवन 38 नवजीवन 39 नवजीवन 40 नवजीवन 41 नवजीवन 42 नवजीवन 43 नवजीवन 44 नवजीवन 45 नवजीवन 46 नवजीवन 47 नवजीवन 48 नवजीवन 49 नवजीवन 50 नवजीवन 51 नवजीवन 52 नवजीवन 53 नवजीवन 54 नवजीवन 55 नवजीवन 56 नवजीवन 57 नवजीवन 58 नवजीवन 59 नवजीवन 60 नवजीवन 61 नवजीवन 62 नवजीवन 63 नवजीवन 64 नवजीवन 65 नवजीवन 66 नवजीवन 67 नवजीवन 68 नवजीवन 69 नवजीवन 70 नवजीवन 71 नवजीवन 72 नवजीवन 73 नवजीवन 74 नवजीवन 75 नवजीवन 76 नवजीवन 77 नवजीवन 78 नवजीवन 79 नवजीवन 80 नवजीवन 81 नवजीवन 82 नवजीवन 83 नवजीवन 84 नवजीवन 85