Get it on Google Play
Download on the App Store

नवजीवन 4

ती तेथून निघून गेली. बाळंतपण आता जवळ येत होते. ती जवळच्या एका खेडयात गेली. तेथे एका सुईणीकडे ती बाळंत झाली. तिचे बाळ आजारी पडले. त्याला दवाखान्यात ठेवण्यात आले. तेथे ते मेले! संपला संसार! ती पुन्हा शहरात आली. जवळचे सारे पैसे संपले होते. ती बेकार होती. निराधार होती. जंगलखात्यातील एका गार्डाकडे ती राहिली. काम करण्यासाठी म्हणून राहिली. तो गार्ड विवाहित होता; तरीही तो रूपाला त्रास देऊ लागला. तो गोडबोल्या होता, कारस्थानी होता. हुशार होता. शेवटी त्याने तिच्याशी व्यभिचार केलाच. त्याच्या बायकोने त्या दोघांना एकान्तात पाहिले. तिने रूपाला बदडले. तिला तेथून हाकलून देण्यात आले. ती आपल्या मामाकडे गेली. तो बुकबाईंडर होता. तो दारूडया होता. त्याची बायको धोबीकाम करी. रूपा तिला मदत करू लागली. परंतु फारच कष्ट तेथे पडत. ती रडकुंडीस येई. शेजारी एक विद्यार्थी राहात होता. तो हिला छळू लागला. त्याची आई रूपाला शिव्या देई व म्हणे, ‘तू चहाटळ आहेस. तू छिनाल आहेस. तू माझ्या बाळयाला मोह पाडतेस, तू डोळे मिचकावतेस, थेर करतेस. लाज नाही वाटत? ती तेथून गेली. एका ग्रंथकाराने तिच्यावर प्रेम केले. परंतु तिला त्याचा तिटकारा येई. एका दुकानदारावर रूपाचे प्रेम बसले. त्यानेही तिच्याजवळ लग्न लावायचे कबूल केले. परंतु त्याने शेवटी हातावर तुरीच दिल्या. ती एकटी राहिली. एके दिवशी पोलिस तिला म्हणाले, ‘सरकारी परवानगी काढ नि दुकान थाट. वेश्याव्यवसाय सुरू कर. मोठमोठे तुझ्याकडे लाळ घोटीत येतील.’ ती विचार करू लागली. तिला आता अनेक सवयी जडल्या होत्या. ती दारूही पिई, सिगारेटी ओढी. दु:ख विसरण्यासाठी ती दारू पिऊ लागली. तिला स्वास्थितीची लाज वाटे, दु:ख होई. ते सारे विसरायला एकच दारूचा उपाय होता!

रूपाच्या समोर आता दोनच मार्ग होते. एक मार्ग म्हणजे मोलमजुरी करायची, काबाडकष्ट करायचे. आणि तिची आई गुप्तपणे चोरटे भोग भोगी. तसे मिळाले तर भोगायचे. दुसरा मार्ग उघड सुखाचा होता. तेथे काबाडकष्ट नव्हते, सुखाचा सनदशीर राजरोस मार्ग. तिला कोणी म्हणत, ‘हाच मार्ग घे. कशाचा तोटा पडणार नाही. तुला हवे ते घेता येईल. वस्त्रे, भूषणे सारे काही.’ आणि एके दिवशी ती वेश्यागारात गेली. तिचे ते पतित जीवन सुरू झाले. मानवजातीविरूध्द, ईश्वराविरूध्द बंड म्हणून जणू तिने मार्ग उचलला. समाज हे जीवन सहन करतो तरी कसे? सरकारनेही ते कायदेशीर ठरविले आहे. सरकारला प्रजेच्या सुखाची किती काळजी! डॉक्टरांनी वेश्यांना मधूनमधून तपासायचे, निरोगी म्हणून प्रशस्तिपत्रे द्यायची! आणि दुर्दैवी स्त्रियांतील दहांपैकी नऊजणी शेवटी वाईट रोगांना बळी पडतात. त्यांना अकाली वार्धक्य येते. काय ते जीवन! दिवसा तीन प्रहरपर्यंत झोप काढायची आणि रात्रभर जागरण. तिसरे प्रहरी उठावे. तोंडाला पावडरी लावाव्या. खिडक्यातून डोकावत बसावे. केसांना, अंगाला सुगंधी तेले लावायची. सतरांदा आरशात बघायचे. ओठांना रंगवायचे. ते तलम      झिरझिरीत पोषाख. दिव्यांचा लखलखाट, आणि मग माणसांची जाये सुरू होते. गाणे-बजावणे चालते. सारे तेथे लाळ घोटीत येतात. व्यापारी, कारकून, पुजारी, हिंदु, मुसलमान, ख्रिस्ती, ज्यू, सारे तेथे लालसावलेले येत असतात. श्रीमंत येतात, गरीब येतात; हाडकुळे येतात, लठ्ठंभारती येतात; आजारी येतात, धट्टेकट्टे येतात; सुरूप येतात, कुरूप येतात; विवाहित येतात, अविवाहित येतात; विद्वान येतात, अविद्वान येतात; दारूडे येतात नि बिनदारूडे येतात! जो येईल त्याच्याजवळ बसायचे, हसायचे, त्याला भोगायचे! सकाळपर्यंत हे असे जीवन. केवढी ही समाजसेवा! म्हणून सरकार काळजी घेते, लायकीची प्रशस्तिपत्रे देते नि म्हणते, चालवा नीट कारखाना!

नवजीवन

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
नवजीवन 1 नवजीवन 2 नवजीवन 3 नवजीवन 4 नवजीवन 5 नवजीवन 6 नवजीवन 7 नवजीवन 8 नवजीवन 9 नवजीवन 10 नवजीवन 11 नवजीवन 12 नवजीवन 13 नवजीवन 14 नवजीवन 15 नवजीवन 16 नवजीवन 17 नवजीवन 18 नवजीवन 19 नवजीवन 20 नवजीवन 21 नवजीवन 22 नवजीवन 23 नवजीवन 24 नवजीवन 25 नवजीवन 26 नवजीवन 27 नवजीवन 28 नवजीवन 29 नवजीवन 30 नवजीवन 31 नवजीवन 32 नवजीवन 33 नवजीवन 34 नवजीवन 35 नवजीवन 36 नवजीवन 37 नवजीवन 38 नवजीवन 39 नवजीवन 40 नवजीवन 41 नवजीवन 42 नवजीवन 43 नवजीवन 44 नवजीवन 45 नवजीवन 46 नवजीवन 47 नवजीवन 48 नवजीवन 49 नवजीवन 50 नवजीवन 51 नवजीवन 52 नवजीवन 53 नवजीवन 54 नवजीवन 55 नवजीवन 56 नवजीवन 57 नवजीवन 58 नवजीवन 59 नवजीवन 60 नवजीवन 61 नवजीवन 62 नवजीवन 63 नवजीवन 64 नवजीवन 65 नवजीवन 66 नवजीवन 67 नवजीवन 68 नवजीवन 69 नवजीवन 70 नवजीवन 71 नवजीवन 72 नवजीवन 73 नवजीवन 74 नवजीवन 75 नवजीवन 76 नवजीवन 77 नवजीवन 78 नवजीवन 79 नवजीवन 80 नवजीवन 81 नवजीवन 82 नवजीवन 83 नवजीवन 84 नवजीवन 85