Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

मुली कशा पटवाव्या…

मराठी मुलं किंवा मुली तसे जरा फास्टच असतात प्रेमात पडण्याच्या बाबतीत. तशीही प्रत्येकाचीच इच्छा असते  एकदा तरी प्रेमात पडावं. युजवली जवळपास ९० ट्क्के मुलं ही ’तुझं आहे तुज पाशी, परी तु जागा चुकलाशी’ या उक्ती प्रमाणे आपलं ’प्रेम’ कुठे आहे ते ओळखू शकत नाहीत,ते वेळेवर न ओळखल्या मुळे त्या प्रेमाचं कुठे तरी लग्नं ठरतं आणि मग हात चोळत बसावं लागतं.

प्रेम कोणावर करावं हा तर सगळ्यात मोठा कधीही न सुटणारा प्रश्न. सगळ्यात सोपं म्हणजे बालपणीची मैत्रीण.. ही म्हणजे अगदी सेफ असते. पण होतं काय, की ज्या मुलीला ( मुलींच्या बाबतीत मुलाला) लहान पणी शेंबुड पुसतांना आणि चड्डीची नाडी लोंबतांना पाहिलं असतं, मोठा झाल्यावर त्याची / किंवा तिची ती नाक पुसणारी प्रतिमा काही विसरली जात नाही, त्या मुळे सुरवंटाचं फुलपाखरु झालंय हीच गोष्ट दुर्लक्षिली जाते.. ही गोष्ट बहुतेक ९९ ट्क्के लोकांच्या   बाबतीत खरी असते, अगदी एक टक्का लोकंच या सुरवंटाचं फुलपाखरात झालेलं रुपांतर ओळखू शकतात, आणि खरं सांगतो, तेच लोकं खरे शहाणे असतात.

प्रत्येकच मुलगा कॉलेज मधे गेला, की हिंदी सिनेमातल्या हिरो प्रमाणे एखादी सुंदर मुलगी आपल्या प्रेमात पडणार असं त्याला वाटू लागतं. कधी बरोबर ट्रेक ला गेलो, किंवा कधी एकत्र सिनेमाला गेलो की स्वर्गाला हात पोहोचल्या सारखे वाटतात.

जाउ दे.. वर जे लिहिलंय ते माझे विचार आहेत.. पण …बाळ सामंतांची एक कथा वाचली होती.. की मुली कशा पटवाव्या म्हणून.  हा लेख म्हणजे प्रेम करणाऱ्यासाठी एक रेडी रेकनर होऊ शकतो , असं वाटलं म्हणून थोडक्यात इथे त्यातलेच मुद्दे घेउन लिहितोय.  आरडी मधे जशी कंडेन्स्ड कादंबरी असते तसं.

मागच्या वर्षी अवाज ने ५० वर्षं पुर्ण झाल्याबद्दल एक सिलेक्टिव्ह लेख असलेला अंक काढला होता . त्या मधे दरवर्षीचा उत्कृष्ट लेख  त्यात इन्क्लुड केला होता. त्या अंकामध्ये हा लेख वाचण्यात आला.१९६५ सालच्या आवाज मधे आली होतं हे छापून.मुळ लेख आहे १९६५ चा तेंव्हा कालानुरूप थोडे बदल केले आहेत लिहितांना.

आता यात दिलेल्या कलुप्त्या या फार जुन्या काळच्या आहेत.. तरी पण आजही त्या पर्फेक्ट ऍप्लिकेबल आहेत.यातल्या बऱ्याचशा युक्त्या या मराठी कथा कादंबऱ्यांमध्ये वापरलेल्या आहेत, त्या मुळे कदाचित तुम्हाला असंही वाटेल की हे काय… हे तर सगळं माहितीये आम्हाला….
१) बसमधे आपल्या शेजारी बसलेली आणि नेमकं तिकिट काढण्यासाठी तिच्याकडे सुटे पैसे नसणं, आणी तो खविस कंडक्टर सुटे पैसे द्या नाहितर खाली उतरा असं म्हणणार, तेवढ्यात तुम्ही जवळचे सुटे पैसे काढून देता आणि……पुढे तुमच्यावर अवलंबून कुठपर्यंत केस नेता ते.

२)ट्रेनमधे भरपूर मराठी वाचनीय साहित्य घेउन चला, नशिबाने समोर एखादी सुंदरी असली, तर ती नक्कीच तुम्हाला अहो, ते पुस्तक जरा देता का वाचायला म्हणून पुस्तक मागेल, आणि मग ओळख  …. वगैरे….

३) खूप लोकप्रिय सिनेमाची तिन तिकिटे काढावी. सिनेमा हाऊस फुल्ल जाणार आहे याची खात्री करुनच हे काम करा. सिनेमा सुरु व्हायची वेळ झाली की बाहेर कोणाची तरी वाट पहातोय असा आव आणा, आणि सारखं घड्य़ाळाकडे बघत रहा. हाउस फुल्ल चा बोर्ड लागला की दोन सुंदर तरुणी , ज्यांच्याकडे तिकिटं नाहीत अशांना हेरून त्यांना तिकिटं आहे त्याच किमतीत ऑफर करा.. आणि सांगा की आमचा मित्र यायचा होता पण आला नाही म्हणून….

आता इथे दोन तिकिटंएक्स्ट्रॉ कशाला??? तर याचं कारण म्हणजे  मुली एकट्या कधीच सिनेमाला जात नाही्त, एक तर बॉय फ्रेंड तरी असतो,  किंवा एखादी मैत्रीण तरी असतेच.तुम्ही मैत्रिणी बरोबर आलेल्या मुलीचा शोध घ्यायचाय हे ध्यानात ठेवा.. जर एकही मुलगी भेटली नाही , तर तीच तिकिटे.. मी ब्लॅक मधे घेतली आहेत असं म्हणून चढ्या किमतीत कुणाही माणसाला विकून टाका.

४)टॅक्सी साठी उभे आहात, आणि बऱ्याच वेळानंतर टॅक्सी आली की टॅक्सि हायर करुन तिला लिफ्ट ऑफर करा..

५)मुंबईला मरिन लाइन्स वर फिरत असतांना एकदम जोरात पाउस येतो, आणि नेमकी तुमच्या समोर एक सुंदर ललना तयार होऊन कुठे तरी जात असते, जवळपास कुठेच आडोसा नाही, तेंव्हा प्रवास करतांना नेहेमी मोठ्ठी छत्री घेउन चला  काय सांगावं कधी उपयोगी पडेल ते??…..

६) एखादी आपल्या घराच्या आसपास रहाणारी सुंदरी हेरुन ठेवा. तिची रोजची प्रवास करण्याची गाडी हेरुन ठेवा, आणि तुम्ही पण शक्यतो त्याच गाडीने प्रवास करा. एकदा तुम्ही स्टेशनवर उतरलात की शेअर रिक्शा वगैरे साठी ऑफर करु शकता. तिच्या येण्याच्या वेळाचे पण पालन करा. म्हणजे पुढे जमण्याची शक्यता जास्त असेल.

७)मुलींमधले धार्मिक प्रवृत्ती फार वाढीस लागलेली आहे , त्यामुळे सिध्दिविनायक, साईबाबा इत्यादी चलतीच्या देवांच्या मंदिरात जाणं सुरु करा. चेहेऱ्यावर शक्य तेवढे बावळट भाव ठेऊन हातात, फुलांची परडी घेउन रांगेत अशा तर्हेने उभं रहा, की तिच्या नजरेस तुम्ही पडाल.एकदा तिचा विश्वास बसला की तुम्ही इतरांसारखे नाही, तेंव्हा हळूच ओळख वाढवायला हरकत नाही. अरे वा…. तुम्ही पण येता का सिध्दी विनायकाला?? जागृत देवस्थान बरं कां.. असं म्हणत मंदिराच्या कळसालाच बघून हात जोडा आणि पुढे तुमच्याच हातात आहे सगळं….

८)गणपती विसर्जन ,दहीहंडी अशा इव्हेंट्स कधीच चुकवू नका.अशा प्रसंगी मुलींना बाहेर फिरायला खूप आवडतं.

९) टिपीकल मराठमोळ्या मुली या नाटकालाच भेटतातच, इथे पण तशीच दोन तिकिटं एक्स्टॉची आयडिया उपयोगी पडु शकते.

१०)दुचाकी वर लिफ्ट द्या. शक्य होईल तेंव्हा मी तिकडेच जातोय, चला तुम्हाला सोडून देतो, असं म्हणून लिफ्ट द्यावी. हल्ली चेहेरा ओढणीने  झाकून प्रवास करण्याची पद्धत आहे, म्हणजे कोणी ओळखेल याची भिती नसते.

मुलींचे प्रकार  किती तरी   असतात . प्रत्येक प्रकारच्या मुलींशी मैत्री करण्याचे हातखंडे पण वेगवेगळे असतात.

१)स्कॉलर मुली, ज्या केवळ वाचन, अभ्यास यामधेच इंटरेस्ट घेतात त्या.तुम्ही पण शुन्य नंबराचा चष्मा लावून अभ्यासु आहात असा आव आणला, आणि तिला मला ते मेकॅनिक्स फारच जड जातंय हो, किंवा मला सी प्लस जरा समजत नाही, कारण माझं १२वीला व्होकेशनल नव्हतं म्हणून.. वगैरे म्हणावं आणि मदत मागावी.

२)वांड्गमय प्रेमी , अशा मुलींना पुलं , वपु, अशा लेखकांच्या फॅन असतात.यांना गटवायच असेल, तर तुमचं पण त्या विषयातलं ज्ञान भरपूर असायला हवं, जर तुम्हाला पण अशा लेखकांच्या किमान काही पुस्तकांची नावं माहिती असतील तर या प्रकारातल्या मुलींशी गप्पा मारता येतात, आणि तद्नंतर प्रेम पण करता येउ शकतं.

तुम्हाला त्या लेखकांची काही पुस्तकं तरी वाचावीच लागतील, म्हणजे कधीही डिस्कशनचा मुद्दा निघाला की तुम्हाला पण थोडं बोलता येईल त्या विषयावर. आता या मुलींना कसं ….?? तर अगदी सोप्पं आहे,तुम्ही उपरोक्त लेखकाचं एखादं पुस्तक स्वखर्चाने विकत घ्या, आणि नंतर त्याच्या पहिल्या पानावर.. स्नेही.. श्री.. तुमचं नांव.. यांना सप्रेम भेट असं लिहुन खाली त्या लेखकाची सही करा.. ते पुस्तक तिला भेट द्या.. आणि सांगा की हे लेखक माझे चांगले परिचित आहेत.त्यांनी स्वतः भेट दिलेलं हे पुस्तक तिला भेट द्याल, तर तिचा तुमच्यावरचा विश्वास, अन प्रेम नक्कीच सुयोग्य दिशेने वाढू लागेल… . आणि नंतर…….नंतर काय ते सगळं कांही तुमच्याच हातात आहे.

३) कलावंत:- या प्रकारातली जर तुम्हाला आवडणारी मुलगी असेल तर तुम्हाला, कलाकार, नेपथ्यकार, वगैरे प्रकारात प्राविण्य मिळवावे लागेल.एखादा लहानसा रोल पण त्या नाटकातला पदरी पाडुन घेता आला तर ते पण करावं , म्हणजे तालमीच्या वेळेस ऑफिशिअली तिथे जाता येईल.

जर हे शक्य नसेल तर कमीत कमी तुम्हाला एखाद्या नाट्य मंडळाचा सभासद होऊन तिथे तालीमीच्या वेळेस जाणं येणं सुरु ठेवावं लागेल. रात्री उशीर झाला ( तालिमीला) की मी सोडतो ना घरी.. माझ्या बाईक वर … असं म्हणून लिफ्ट देणं.. वगैरे वगैरे.. बरेच प्रकार आहेत. सुज्ञास जास्त सांगणे न लगे..

४)खेळाडु:- तुम्ही शंभर पाऊंड वजनाचे किंवा लेंग्याची नाडी न सांभाळता येणारे असाल तर कठिण आहे. ट्रेकिंग , वगैरे प्रकारात इंटरेस्ट असणं आवश्यक आहे . ट्रेक ला गेल्यावर आपण कचरा वगैरे कसा आपल्या बॅगेत भरुन खाली आणतो, आणि मग ड्स्ट बिन मधे फेकतो आणी निसर्ग वाचवण्यास हात भार लावतो हे रंगवून सांगा. आणि लिंगाणा सर केला होता ना…. तेंव्हा अशी सुरुवात करा…. म्हणजे ह्या प्रकारच्या मुली लवकर मैत्री करतील.

५)चित्रपट प्रेमी:- अशा प्रकारच्या मुलींची अजिबात कमतरता नसते. विद्वान ब्राह्मणा प्रमाणे, कुठल्या चित्रपटात कोणी काम केलं कोणाचं संगीत आहे, हिरोच्या लहान भावाचं नाव, किंवा होरोइनच्या बहिणीचा वाढदिवस वगैरे माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. चित्रपटातल्या हिरो , हिरोइन्स ची नावं अगदी संध्येतल्या चोविस नावाप्रमाणे पाठ असायला हवित.

केंव्हाही कधीही सिनेमा पहाण्याची तयारी आणि एक्स्ट्रा तिकिट यांचा खर्च करण्याची तयारी ठेवावी लागेल. एखादा खूप गाजलेला सिनेमा जेंव्हा रिलिझ होतो तेंव्हा दोन तिकिटं रांगेत उभं राहुन ऍडव्हान्स बुक करुन ठेवावी.. आणि तिला पण चलतेस का म्हणून विचारलं, तर ती १०१ टक्के हो म्हणणार याची खात्री देतो मी. अशा तर्हेने ओळख वाढवा…!

६)वर्गभगिनी:- हिच्या कडे वर्गातल्या बऱ्याच बांधवांचं लक्षं असतं. तेंव्हा तुमचा नंबर इथे लागण जरा कठिणच , पण काही झालं तरीही प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे.. असंही  होऊ शकतं म्हणून प्रयत्न सोडु नये.

७)शेजारीण: – शेजाऱ्यावर प्रम करा हा येशु चा संदेश आहे हे खरं, पण शेजारच्य सुमीची आई पण डोळ्यात तेल घालुन तिच्यावर नजर ठेऊन आहे हे विसरू नका.तसेच इतर शेजारी पण तुमच्यावर नव्हे तर तिच्यावर कायम नजर ठेउन असतात, तेंव्हा तुमची प्रत्येक स्टेप ही कमित कमी दहा लोकं पहाणार आहेत हे लक्षात घेउनच स्टेप्स घ्या.तुम्ही काळजी पूर्वक पणे या प्रश्नाचा ध्यास घेतलात तर हा प्रश्न सुटू शकतो अगदी चुटकी सरशी…

८)कचेरीतली सहकारी:-यावर काही लिहायची गरज आहे असं वाटत नाही.आपण सगळे जाणकार आहातच ,काय?? बरोबर नां?

९) मित्र भगिनी:- हे फारच अवघड  नातं असतं.जर तुम्हाला सुंदर बहीण असेल , तर इतर मुलं तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला सिनेमाचे पास, नाटकाचे पास, वगैरे देतील, तुमच्या घरी येण्यासाठी काहीही करायला तयार असतील. हा प्रकार जरा डेंजरसच असतो. तेंव्हा सांभाळुन..

ओळख कशी वाढवावी??   आजकालच्या तरुणांना याची काहीच गरज नसावी.तरी पण, एकदा ओळख झाली की मग.. थापा मारणे सुरु करणे अतिशय आवश्यक आहे. माझं तुझ्यावर प्राणा पलिकडे प्रेम आहे, लाडके, तु माझी झाली नाहिस तर जीव देईन, चल आपण पळून जाउन लग्न करु, इत्यादी प्रकारचे डायलॉग्ज वेळोवेळी ्बोलत रहाणं प्रेम बहरण्यासाठी अतिशय आवश्यक आहे

भेटण्याच्या जागा? चला प्रेम तर जमलं.. आता भेटायला जागा कुठल्या? या मधे ्खूप जागा असु शकतात. पण ज्या सर्व मान्य जागा आहेत, त्या म्हणजे बागा, आर्ट गॅलरीज, चाळीतली गॅलरी, बस स्टॉप , र्लोकलचा प्लॅटफॉर्म, चाळीचा जीना, बॉक्स.. ( हल्ली हा नसतो, पण पुर्वी बॉक्स हा पण एक क्लास होता सिनेमा चा जिथे केवळ दोघांची बसण्याची सोय असायची) समुद्राचा किनारा, आरे कॉलनी चा छोटा काश्मिर अशा अनेक जागा जाणकार लोकं सांगु शकतील.

मी स्वतःचा अनुभव सांगतो, नागपुरमधला असा एकही बगिचा नाही की जिथुन आम्हाला हाकललेलं नाही.. !!! असो!!! वरचा लेख  तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा आहे.

तर मंडळी आता कामाला लागा लवकर.. !!!

काय वाटेल ते……..

महेंद्र कुलकर्णी
Chapters
वात्रट मुलाची कथा..
मुली कशा पटवाव्या…
ऐसे असावे संसारी
बंदी घातलेली पुस्तकं..
चावट -वात्रट आणि आवाज.
आकाश कंदील.. पुन्हा एकदा..
’भैय्या’च्या लग्नाची गोष्ट…..
लोकं लग्न का करतात?
मी आकाश कंदिल बनवतो, त्याची गोष्टं..
एक कथा- १
एक कथा- २
कथा ३
द्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद
छोटीसी कहानी.. भाग ३ (शेवटचा)
रोमॅंटीक आयडीयाज..
खरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत?
तिच्या मनातलं…
नरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…
प्रेम..
भविष्य..
चवीने खाणार हैद्राबादला…
कौतुक
डायटींग करताय ???
तुका म्हणे..
हर एक दोस्त जरूरी होता है…
दुःख…
तुम्ही मुंबईकर आहात जर…
पुणेरी पगडी…
पुण्याचं रानमळा
गमतीशीर म्हणी..
अब्रू ची किंमत किती आहे हो??
फॉर द पिपल, ऑफ द पिपल, ऍंड बाय द पिपल
नॅशनल शेम!
झपाटलेले…
फुलपाखरु
तिच्या मनातलं…