कालिका मूर्ती (Other)


मराठी लेखक
                                   १                         मानवी सभ्यतेच्या सुरूवातीपासूनच मानव शक्तीच्या शोधात आहे आणि जर ती शक्ती चमत्कारिक असेल, अद्भुत असेल, दिव्य असेल, तर त्या शक्तीला प्राप्त करण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. अश्या शोधात माणूस पहाड, जंगल, गुहांमध्ये कित्येक वर्षांपासून भटकतोय. मग त्याची भावना चांगली असो किंवा वाईट. इतिहास साक्षी आहे, कि माणसाने अश्या शक्ती प्राप्त केल्या आहेत. कारण अश्या शक्तींच अस्तित्व जवळ जवळ सगळ्याच युगात राहिले आहे. जर रामायण आणि महाभारताच्या कहाण्या, चरित्र खरे आहेत, तर अश्या अद्भुत चमत्कारिक शक्तींच अस्तित्व सुध्दा खरं आहे आणि याचा पुरावा आपल्याला जगातील अनेक जागांवर मिळतो.                                     ही कथा सुध्दा अशाच एका चमत्कारिक शक्तीची आहे, ती शक्ती ज्याला कोणाला प्राप्त होईल, त्याच या संपूर्ण जगावर, निसर्गावर, वर्तमान आणि भविष्यावर पूर्ण नियंत्रण असेल. थोडक्यात ती व्यक्ती देवा इतकीच श्रेष्ठ बनेल. पण ती अद्भुत शक्ती कुठे मिळेल? कशी मिळेल? कोणाला मिळेल? या प्रश्नांची उत्तरे फक्त वेळच देऊ शकेल.                                        चारी बाजुंंना घनदाट जंगल. अशा त्या जंगलातून एक मध्यमवयीन गृहस्थ जीव मुठीत धरून पळत होता.  त्या गृहस्थाच्या हातात एक कागद होता. त्याला त्याच्या जीवाची पर्वा नव्हती, पण तो कागद त्याला त्याच्या हाती लागू द्यायचा नव्हता जो त्याचा पाठलाग करत होता. पळता पळता तो गृहस्थ अचानक एका ठिकाणी येऊन थांबला, कारण त्याला पुढे जायला रस्ता नव्हता. त्याच्या समोर एक खोल दरी होती. अचानक त्या गृहस्थाच्या मागून एक आवाज आला, "माणूस कितीही पळाला, तरी तो मृत्यू पासून वाचू शकत नाही, प्रोफेसर राजीव अभ्यंकर." प्रो. अभ्यंकरांनी मागे वळून पाहिलं. त्यांच्या समोर एक तांत्रिक उभा होता. गळ्यात कवट्यांची माळ, अंगात काळे कपडे आणि हातात त्रिशूळ असा त्याचा पेहराव होता. तो तांत्रिक पुढे म्हणाला, "आता मृत्यू पासून वाचण्याचा तुमच्याकडे एकच पर्याय आहे, तो म्हणजे तो कागद आणि ती डायरी माझ्या हवाली करा. तो कागद आणि ती डायरी या दोन गोष्टी मला त्या अद्भुत, चमत्कारिक शक्ती पर्यंत पोहोचवू शकतात. ज्याची आम्ही कित्येक वर्षांपासून वाट पाहत  आहोत. ती शक्ती एकदा मला मिळाली, कि या संपूर्ण पृथ्वीवर माझ राज्य असेल." प्रो. अभ्यंकर: काळभैरव, भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले आहे, कि जेव्हा कलियुग येईल, तेव्हा माणूस प्राचीन रहस्ये जाणण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. आता मला समजलं कि काही रहस्य ही रहस्यच राहिलेली चांगली असतात. जर आज माझ्या नशिबात मरण लिहिलेलं असेल, तर मी माझा जीव देईल पण त्या प्राचीन रहस्याची माहिती तुझ्या हातात देऊन येणाऱ्या पिढ्यांच भविष्य नष्ट नाही होऊ देणार. एवढं बोलून प्रो. अभ्यंकर हसले आणि काळभैरवला काही समजण्याच्या आतच त्यांनी त्या खोल दरीत स्वत:ला झोकून दिलं. मृत्यूला सामोरं जातांनाही प्रो. अभ्यंकरांच्या चेहऱ्यावर विजयाचं हसू होत.                          *****************                                 २५ वर्षांनंतर                       सकाळचे ८ वाजले होते. राहुल एका कंपनीत इंटरव्ह्यू द्यायला आला होता. हा त्याचा पहिलाच इंटरव्ह्यू असल्याने तो जरा नर्व्हस होता. इंटरव्ह्यू साठी केलेली सगळी तयारी आठवण्याचा तो प्रयत्न करत होता. अचानक त्याचा मोबाईल व्हायब्रेट झाला. त्याने मोबाईलवर नजर टाकली. एक अननोन नंबर होता. राहुलने त्याकडे दुर्लक्ष केले आणि फोन कट केला. पण त्याला पुन्हा त्याच नंबरवरून फोन आला, त्याने पुन्हा कट केला. असं तीन-चार वेळा झालं. शेवटी वैतागून राहुलने फोन उचलला, "हॅलो?" पलिकडून एक अनोळखी आवाज आला, "राहुल अभ्यंकर?" राहुल: हो, पण तुम्ही कोण? "ते महत्त्वाचे नाही. मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. २५ वर्षांपूर्वी तुझे वडील प्रोफेसर राजीव अभ्यंकरांचा मृत्यू झाला होता." राहुल: हो, त्यांचा मृत्यू कार अॅक्सिडेंट मध्ये झाला होता. पण तुम्ही कोण? हे सगळं तुम्ही मला का विचारता आहात? आणि तुमचा माझ्या वडीलांशी काय संबंध? "त्यांचा मृत्यू कार अॅक्सिडेंट मध्ये नव्हता झाला." राहुल: म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे कि मला जे लहानपणापासून सांगितलं गेलं आहे ते खोटं आहे? "अर्थात, प्रो. अभ्यंकर एक आर्कियोलॉजिस्ट होते. ते एका प्राचीन रहस्यावर काम करत होते. तुझ्या रूमवर मी तुझ्यासाठी एक पार्सल ठेवलं आहे. त्या पार्सल मध्ये त्या प्राचीन रहस्यापर्यंत पोहोचायचा मार्ग आहे, ज्यावर प्रो. अभ्यंकर काम करत होते. मी तुला यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही. बाकीची उत्तरे तुला त्या पार्सल मध्येच मिळतील. गुड लक." आणि फोन कट झाला. राहुलच्या डोक्यात आता विचारांचं चक्र सुरू झालं होतं. मनात अनेक प्रश्नांनी थैमान घातले होते.                        ********************                  राहुल आपल्या मोटरसायकल वरून त्याच्या रूमवर पोहोचला. दरवाज्याजवळच त्याला एक सीलबंद पार्सल पडलेल दिसलं. ते पार्सल त्याने उघडलं. त्यातून एक कागद आणि एक डायरी बाहेर काढली. त्या कागदावर एका मंदिराच चित्र होतं. वरच्या बाजूला मोठ्या अक्षरात कालिकापूरम् असं लिहिलं होतं. त्याने डायरी उघडली. त्या डायरीची सुरूवात अशी होती, "जेव्हा माणसाला एखादी गोष्ट प्राप्त करण्याची तीव्र इच्छा असते, तेव्हा दिवस वर्षांमध्ये कधी बदलतात कळत नाही. मी सुद्धा माझ्या शोधाच्या अगदी जवळ पोहोचलो आहे. काही दिवसांनंतर मी त्या प्राचीन रहस्याला सर्व जगासमोर घेऊन येईल. आणि हे सिद्ध करेल कि या जगात अशा अनेक अगम्य गोष्टी आहेत ज्यांची कल्पना मानव करू शकत नाही." त्यानंतरची डायरीची पाने मात्र अनेक चित्रविचित्र खाणाखुणांनी भरलेली होती ज्याचा राहुलला काहीच बोध होत नव्हता. त्याने पुन्हा एकदा त्या मंदिराच्या चित्रावर नजर टाकली आणि अचानक त्याच्या डोक्यात एक विचार चमकून गेला. त्याने ताबडतोब आपल्या मोबाईलवर एक नंबर डायल केला. ४-५ रिंग नंतर पलिकडून फोन उचलला गेला, "हॅलो." राहुल: सुयश, तु आता कुठे आहेस? सुयश: मी घरी. का रे? काय झालं? राहुल: तयारी कर. आपल्याला आताच्या आता कालिकापूरम् ला जायचं आहे. सुयश: काय? कालिकापूरम्? पण का? राहुल: मी १५ मिनिटात तुझ्याकडे येतो. एवढं राहुलने फोन ठेवला.                      ******************                बरोबर १५ मिनिटात राहुल आपली मोटरसायकल घेऊन सुयशच्या घरी पोहोचला. सुयश आपली कार घेऊन तयार होता. सुयश: आतातरी सांगशील कि आपण तिथे का जातो आहे? राहुल: हो, पण पहिले हे सांग कि तिथे पोहोचायला किती वेळ लागेल? सुयश: माझ्या माहितीप्रमाणे ४ तास. राहुल: ठिक आहे, सांगतो सगळं. बस गाडीत. दोघेही जण कारमध्ये बसले. कार कालिकापुरम् च्या दिशेने निघाली होती. प्रो. अभ्यंकर कोणत्या प्राचीन रहस्यावर काम करत होते? राहुलला फोन करणारा हा रहस्यमयी माणूस कोण होता? त्याने पाठवलेल्या पार्सलमधील चित्राचा आणि त्या डायरीचा अर्थ काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळणार होती.                                                                   क्रमशः READ ON NEW WEBSITE