अध्याय ९ वा
श्रीवेंकटेशाच्या विवाहाकरिता सर्व देव वेंकट पर्वतावर आले. देवांनी विश्वकर्म्यास मंडप घालण्यास सांगितल्याचे वृत्त आठव्या अध्यायात आहे.
यानंतर ब्रह्मदेवांनी श्रीवेंकटेशास मंगलस्नान करण्यास सांगितले असता देव विचार करू लागले. येथे अठ्याऐंशी हजार ऋषि व तेहत्तीस कोटी देव वगैरे जमा झाले आहेत तेव्हा यांच्या व्यवस्थेकरिता कामे वाटून दिली पाहिजेत.
नंतर वसिष्ठ ऋषीस पौरोहित्य करण्यास सांगितले. शंकरांनी देव व ऋषीचे स्वागत करावे षडाननाने बोलावून योग्य ठिकाणी त्यांना बसवावे त्याला मदनाने मदत करावी. वरुणाने जलपुरवठा करावे. यमाने दुष्टांना शासन करावे. वायूने सुगंधी पदार्थ पुरवावेत. अष्टवसूंनी भांडी घासावीत. नवग्रहांनी पाने मांडावीत.
इतक्यात श्रीवेंकटेश पूर्वपत्नी लक्ष्मीच्या स्मरणाने दुःखी झाले. दुःख का असे देवांनी विचारताच देवांनी कारण सांगितले असता सर्वांनी थोडासा विनोद केला. त्यावेळी देव म्हणाले, ती आल्यावाचून कार्यसिद्धि होणार नाही. नंतर सूर्यास बोलावून श्रीवेंकटेशांनी सांगितले, तू करवीरास जा. तेथे द्वारात उभा राहून रडण्याचे सोंग कर म्हणजे लक्ष्मी तुझी चौकशी करील व तुजबरोबर येईल. एकदा इकडे आल्यावर मी तिची समजूत करीन.
सूर्याने त्याप्रमाणे करताच श्रीलक्ष्मी धावत आली व तिने सूर्याची चौकशी केली. सूर्याने श्रीवेंकटेशाची पहिल्यापासून सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून महालक्ष्मी घाबरून रथावरून ताबडतोब श्रीवेंकटगिरीवर आली. देवांनी प्रेमभराने स्वागत करून सर्व हकीकत सांगितली असता देवी म्हणते आता माझी गरज काय? नवीन कपडा मिळाला असता जुन्यास कोण विचारतो ! देवांनी महालक्ष्मीचे समाधान केले. रामावतारातील आठवण करून वेदवतीबरोबर लग्न केले पाहिजे ही इच्छा तिला सांगताच तिला समाधान वाटले.
सोन्याच्या कढ्यात सुगंधी पाणी तापवून सर्वांनी मंगलस्नाने केली. चौकन्हाण वगैरे झाले. मंगलवाद्यांचे गजर सुरू झाले. नंतर श्रीदेवास केशरकस्तुरीचा मळवट भरून उत्तम कपडे नसविले. इकडे पुण्याहवाचनादिकांची तयारी होऊन वसिष्ठ ऋषीने कुलदेवतेची स्थापना करविली. मंडपदेवतांचे स्थापन झाले.
ब्रह्मदेवांनी सर्वांना भोजनाचे आमंत्रण दिले. इतक्यांच्या भोजनव्यवस्थेस पैसा अमाप लागणार म्हणून कुबेरांकडून कागद लिहून कर्ज आणविले. देवांनी साक्षी घातल्या. कारण हे कलियुग आहे. त्याप्रमाणे वागले पाहिजे. पैसा येताच सर्व साहित्य गरुडाकडून आणवून सर्व सिद्धता केली. स्वामीतीर्थात अग्निदेवांनी उत्तम अन्न शिजविले. आकाशगंगेत खीर, देवतीर्थात सर्व भाज्या शिजविल्या. स्वयंपाक झाल्यानंतर पांडूतीर्थापासून मल्लिकार्जुनापर्यंत पाने मांडली. शंकरांनि सर्वांचे स्वागत करून भोजनास बसविले. श्रीवेंकटेशांनी पंक्तीत फिरून सर्वांचा समाचार घेऊन सर्वांना संतुष्ट केले. भोजनोत्तर पान, तांबूल, दक्षिणा वगैरे वाटण्यात आली.
नंतर ब्रह्मदेव, इंद्र, शंकर, लक्ष्मीसह श्रीवेंकटेश भोजनास बसले. सर्वांची भोजने होईपर्यंत सुर्य मावळला. सर्वांनी रात्र तेथेच काढली.
दुसरे दिवशी सकाळी सर्वांनी आपापले आन्हिक उरकून आपापल्या वाहनावरून विवाहास जाण्यास सर्व देव तयार झाले. तो समारंभ फार अपूर्व झाला. इतकी गर्दी झाली की, कित्येकांचे कितीएक पदार्थ हरवले. कोणाची कोणास भेट होईना.
नारायणपुरास विवाहास जात असताना वाटेत श्रीशुकाचार्यांचा आश्रम लागतो. देव येत आहेत हे ऐकताच त्यांना फार आनंद झाला. ते स्वतः सामोरे गेले. स्वागत करून आपल्या आश्रमात त्यांना भोजन दिले. श्रीभगवान हे भक्तिप्रिय आहेत; त्यांना इतर कशाचीही गरज नाहि हे येथे दाखविले आहे. आम्हास सोडून एकट्या देवासच भोजन दिल्यामुळे इतर देवांना वगैरे राग आला. श्रीशुकाचार्यास शाप देण्यास तयार झाले असता श्रीवेंकटेशांनी सर्वांचे समाधान केले. तो दिवस व रात्र श्रीशुकाचार्यांच्या आश्रमात घालविली व नंतर देव आपापल्या ऐश्वर्यासह मिरवत नारायणपुरास निघाले. यापुढील चरित्र पुढील अध्यायात पाहू.
श्रीहरिराजप्रसन्न ॥ जयजयाजी पुराणपुरुषोत्तमा ॥ अज अजित निर्वाणधामा ॥ सच्चिदानंदा सर्वोत्तमा ॥ तुझा महिमा अगम्य ॥१॥
तुझी अगाधलीला जगत्पती ॥ वेदशास्त्रांसि नव्हे गणती ॥ मी मानव अल्पमती ॥ केवि स्तवन करू तुझे ॥२॥
जरी महायज्ञ करोन ॥ तुझे करावे आराधान ॥ तरी दरिद्री अत्यंत दीन ॥ कैसे करवेल निर्धारी ॥३॥
की तीर्थयात्रा कराव्या अगाध ॥ देह पाहिजे दृढ सुबद्ध ॥ किंवा नसता द्रव्यसंबंध ॥ तेही न घडे सर्वथा ॥४॥
अथवा वेदशास्त्र पढून ॥ करावे तुझे आराधान ॥ कलियुगी अल्पायुषी पूर्ण ॥ ज्ञान हीन असा आम्ही ॥५॥
याकारणे साधु थोर थोर ॥ तेही करोनि ठेले दृढ विचार ॥ सर्वामाजी नाम सार ॥ तुझे जपावे सर्वदा ॥६॥
तेणे जन्ममरणांची पंगती ॥ प्राणियांच्या सर्व तुटती ॥ परी कलियुगामाजी श्रीपती ॥ पापमति आम्ही असो ॥७॥
फुकाचे नाम तुझे सार ॥ तेही न घडे साचार ॥ मन बुद्धि चित्त अहंकार ॥ विषयपर सर्वदा ॥८॥
दश इंद्रिये आणि मन ॥ भजनी तत्पर जाहलियाविण ॥ सिद्धि न पावेची साधन ॥ ते आमुचेनि न साधे ॥९॥
आम्ही केवळ पतीत दीन ॥ तू दिनबंधु पतीत पावन ॥ ब्रीद तुझे गाजले पूर्ण ॥ ब्रह्मांडभरी जगदीशा ॥१०॥
तरी आम्ही असो विषयासक्त ॥ आम्हासि पुरवोनी विषय पदार्थ ॥ तुझे चरणी स्थिरावे चित्त ॥ ऐसे करी नारायणा ॥११॥
तू सर्वव्यापका जगज्जीवन ॥ दृश्यादृश्य पदार्थ पूर्ण ॥ स्थावर जंगमात भरून ॥ उरोनि असशी शेवटी ॥१२॥
माझे मन अस्थिर चंचळ ॥ ज्या पदार्थाकडे जाईल ॥ त्या त्या पदार्थामाजी सकल ॥ तू घननीळ व्यापक ॥१३॥
सर्वाघटी तूचि असता ॥ कासया पाहिजे मनाची स्थिरता ॥ हेचि ज्ञान स्थिरावे चित्ता ॥ जगन्नाथा ऐसे करी ॥१४॥
पदार्थ मात्र सर्वही जाणा ॥ तुझे रूप भासो नारायणा ॥ भक्तवत्सला रमारमणा ॥ सर्वदा करी ऐसेची ॥१५॥
असो आता हे बोल ॥ वेंकटेशविजय ग्रंथ निर्मळ ॥ आठ अध्याय रसाळ ॥ श्रीगोपाळे बोलाविले ॥१६॥
अष्टमाध्यायाचे अंती ॥ सर्वदेवांसहित अमरपती ॥ सदाशिव आणि प्रजापती ॥ वेंकटाद्रीसी पातले ॥१७॥
विश्वकर्म्यासि आज्ञापून ॥ मंडप रचविला शोभायमान ॥ गतकथाध्यायी वर्तमान ॥ इतुके जाहले निर्धारी ॥१८॥
यावरी सूत वक्ता निपुण ॥ सांगे शौनकादिका लागून ॥ म्हणे ऐका पुढील अनुसंधान ॥ चित्त देवोनि निर्धारी ॥१९॥
सर्वदेवासहित वेंकटेश ॥ सभेसी बैसला आदिपुरुष ॥ परमेष्ठी आणि महेश ॥ दोही भागी बैसले ॥२०॥
यावरी कमळासन बोलत ॥ मंगळस्नान करोनि त्वरित ॥ पुण्याहवाचन करावे यथार्थ ॥ विलंब आता कसया ॥२१॥
परी येथे मिळाले बहुत जन ॥ तेत्तिस कोटी पावले देवगण ॥ अठ्याऐंशी सहस्त्र ऋषि पूर्ण ॥ शिष्यासहित पातले ॥२२॥
आता यासर्वालागून ॥ यथास्थित व्हावया मानपान ॥ तरी एथे कार्य वाटिल्या वाचोन ॥ सर्वथाही न होय ॥२३॥
सर्वव्यापका जगज्जीवना ॥ कोणा योग्य कोण कारण ॥ हे न कळे आम्हा लागून ॥ तू नारायण जाणसी ॥२४॥
मग बोलावोनि ऋषिवसिष्ठ ॥ पुरोहित नेमिला श्रीवैकुंठे ॥ यजुः शाखापूर्वक स्पष्ट ॥ स्वस्तिवाचन करावे ॥२५॥
देव आणि ऋषीलागून ॥ शंकरे करावे स्वये नमन ॥ सर्वदेवांचे आवाहन ॥ शिखिवाहन करावे ॥२६॥
आलियासि देऊन अभ्युत्थान ॥ बैसवावे माने करून ॥ हे कार्य मन्मथालागून ॥ सांगता झाला तेधवा ॥२७॥
पाकसिद्धीचे कार्य ॥ स्वये करावे धनंजये ॥ स्वाहा स्वधांसहित पाहे ॥ तेचि कार्य करावे ॥२८॥
लागेल जितुके उदक ॥ तितुके पुरवावे रसनायके ॥ दुष्ट दंडनार्थ देख ॥ वैवस्तासी सांगीतले ॥२९॥
सर्वांसि सुगंध पदार्थ ॥ वायूने पुरवावे यथार्थ ॥ धन वस्त ब्राह्मणाते ॥ किन्नरेशे देइजे ॥३०॥
दीपिका पाजळोनी सतेज ॥ स्वये धरावे उडुराजे ॥ अष्टवसु मिळोनि सहज ॥ भांडशुद्धी करावी ॥३१॥
नवग्रह मिळोनि देखा ॥ पात्रे मांडावी सकळिका ॥ योग्यानुसार निजभक्तसखा ॥ कार्यसर्वांसी वाटिले ॥३२॥
यावरी हिरण्यगर्भ बोले वचन ॥ म्हणे स्वामी शीघ्र उठोन ॥ करावे की मंगलस्नान ॥ पुण्याह वाचन करावया ॥३३॥
ऐसे विधाता बोलता ॥ तो रमा आठवली जगन्नाथा ॥ वियोगानळे तत्वता ॥ नाठवे सर्वथा आन काही ॥३४॥
अंतरी जाहला सद्गदित ॥ नेत्री अश्रुधारावाहत ॥ स्फुंडस्फुंदोनी वैकुंठनाथ ॥ रडो लागला ते काळी ॥३५॥
कमळोद्भव म्हणे मुरारी ॥ का शोक आरंभिला ये अवसरी ॥ काय कारण मधुकैटभारी ॥ मज निर्धारी सांग आता ॥३६॥
मग बोले शेषशायी ॥ सर्वसिद्ध जाहले ये समयी ॥ परी रमा येथे आली नाही ॥ न गमे पाही तियेविण ॥३७॥
जैसे प्राणविणे शरीर ॥ की नासिके वाचोनि वक्र ॥ फळेविण तरुवर ॥ जीवनाविणे सरिता जेवी ॥३८॥
की अलंकार गळसरीविणे ॥ की बुबुळावाचोनि नयन ॥ तैसे महालक्ष्मी वाचोन ॥ शोभा नयेचि मजलागी ॥३९॥
भृगूने दीधली लाथ ॥ तेव्हा रुसोनि गेली करवीराते ॥ वियोग न सोसवे माते ॥ मी वैकुंठाते त्यागिले ॥४०॥
वियोगानळे आहळत ॥ बहुत श्रमलो आजिपर्यंत ॥ आता उत्साह मांडला बहुत ॥ परी तियेवाचोनि व्यर्थ हे ॥४१॥
असो तिचे आठवोनि गुण ॥ शोक करी जगन्मोहन ॥ याजवरी तो पंचवदन ॥ बोलता काय जाहला ॥४२॥
म्हणे जगदात्मया वैकुंठराया ॥ का शोक मांडिलाशि वाया ॥ तिजवरी एवढी तुझी माया ॥ तरी लग्न कासया आरंभिले ॥४३॥
लक्ष्मी गेली त्यागोन ॥ म्हणोनि आरंभिले हे लग्न ॥ पुन्हा शोक करिसी तिये कारण ॥ जगन्नाथा नवल हे ॥४४॥
स्त्रियांचे स्वभाव नारायणा ॥ पुरुषासि जाहलीया दुसरे लग्न ॥ तरी मत्सर उपजे मुळीहून ॥ समाधान न वाटे ॥४५॥
श्रीनिवास म्हणे धूर्जटी ॥ तुम्हासी न कळे ही गोष्टी ॥ लक्ष्मी न आलिया शेवटी ॥ कार्य सर्वथा न होय ॥४६॥
मग सूर्यासि बोलावून ॥ आज्ञापिता जाहला जगन्मोहन ॥ म्हणे तू करवीरालागून ॥ आताचि जावे निर्धारी ॥४७॥
तेथे असे क्षीराब्धिसुता ॥ तिसी बोलावोनि आणी आता ॥ ती आलियाविणे सर्वथा ॥ समाधान न वाटे ॥४८॥
भृगूने लाथ दिली म्हणोन ॥ ती मजवरी गेली रुसोन ॥ तै पासून माझे मन ॥ उदास असे सर्वदा ॥४९॥
तरी तू जावोनि तेथवरी ॥ समजाऊनी आणावी बरी ॥ यावरी तो तमारी ॥ बोलता काय जाहला ॥५०॥
आधीच गेली रुसून ॥ तुम्ही आरंभिले दुसरे लग्न ॥ हे ऐकोनि वर्तमान ॥ कैसी समजेल जगन्माता ॥५१॥
यावरी बोले जगत्पती ॥ तुजवरी सर्वांहूनि तिची प्रीति ॥ तरी नानाप्रकारे करोनि युक्ती ॥ एथवरी आणी भास्करा ॥५२॥
मी सांगतो तैसे करावे ॥ शीघ्रचि करवीर पुरा जावे ॥ महाद्वारी उभे रहावे ॥ मग आरंभावे शोकाते ॥५३॥
दीर्घस्वरे करून ॥ करू लागावे रुदन ॥ मग ते इंदिरा घाबरोन ॥ पुसेल येवोनि तुजलागी ॥५४॥
काय संकट पडले म्हणोन ॥ इंदिरा पुसेल तुजकारण ॥ तू काही न करिता अनुमान ॥ इतुकेच सांग तिजप्रती ॥५५॥
म्हणावे तुझ्याविरहे करोन ॥ वैकुंठ त्यागिले नारायणे ॥ वेंकटाद्रिवरी येवोन ॥ राहिलासे उदास ॥५६॥
तेथे होवोनि व्यथा भारी ॥ जर्जर जाहला असे मुरारी ॥ या व्यथेतून निर्धारी ॥ वाचे की न वाचे कळेना ॥५७॥
ऐसे तियेसी सांगोन ॥ पुन्हा करावे दीर्घरुदन ॥ मग ती अविलंबे करून ॥ येईल तुज समागमे ॥५८॥
एकदा एथे आलियावरी ॥ मग मी समजावीन निर्धारी ॥ ऐशा प्रकारे मधुकैटभारी ॥ सूर्यालागी बोधिले ॥५९॥
तमांतके आज्ञा वंदोन ॥ रथी बैसला न लगता क्षण ॥ मनोवेगे करून ॥ करवीरपुरा पातला ॥६०॥
उभा राहोनी महाद्वारी ॥ चंडकिरण रुदन करी ॥ जगन्माता घाबरली ॥ आली झडकरी त्यापाशी ॥६१॥
बाळकाचे रुदन ऐकोन ॥ माता धावे कार्य टाकोन ॥ तैसे तरणीचे रुदन पाहोन ॥ त्रिभुवन जननी धावली ॥६२॥
म्हणे भास्करा अवधारी ॥ काय दुःख जाहले भारी ॥ कोणे दुर्जने निर्धारी ॥ पीडा केली तुजलागी ॥६३॥
जगज्जननी ऐसे बोलोन ॥ स्वकरे पुशिले नेत्रींचे जीवन ॥ कृपाकरे करोन ॥ कुरुवाळी वदन प्रीतीने ॥६४॥
यावरी बोले सविता ॥ जगन्माते ऐक आता ॥ तू रुसोनि आलियावरी जगत्पिता ॥ वियोग सर्वथा न सोसवे ॥६५॥
परम उदासीन होऊन ॥ टाकून दीधले वैकुंठभुवन ॥ सेविता जाहला कानन ॥ महादुःखे करोनिया ॥६६॥
वेंकटाद्रीवरी आदिपुरुष ॥ वास केला काही दिवस ॥ तेथे व्यथा जाहली विशेष ॥ तेन सांगवेची जननिये ॥६७॥
जर्जर जाहला दारुण ॥ न जाय पळमात्र उदकपान ॥ अत्यंत तंद्रीव्यापून ॥ ऊर्ध्वश्वास लागला ॥६८॥
पुन्हा वदन दृष्टी पडेल ॥ हा भरवसा नाही वहिला ॥ यालागी पातलो ये वेळा ॥ माउलीपाशी सांगावया ॥६९॥
ऐसे ऐकता जगत्रयजननी ॥ परम घाबरी अंतःकरणी ॥ तात्काळ रथारूढ होऊनी ॥ पवनवेगे चालिली ॥७०॥
वेंकटाद्रीसमीप येत ॥ मिळाजे जेथे देव समस्त ॥ रथाखाली उतरत ॥ जगन्माता ते काळी ॥७१॥
आली देखोनि विश्वजननी ॥ आनंदले सुधापानी ॥ तात्काळ उठोनि अवघे जणी ॥ लागले चरणी इंदिरेच्या ॥७२॥
येता देखोनि इंदिरेप्रती ॥ तात्काळ उठिला श्रीपती ॥ चारीभुजा पसरोनि निश्चिती ॥ आलिंगिले सप्रेमे ॥७३॥
म्हणे प्राणवल्लभे तुजविण ॥ मी झालो परदेशी दीन ॥ दिशा शून्य तुज वाचोन ॥ झाल्या मज निर्धारे ॥७४॥
आलिंगिता कमळेसी ॥ पुष्ट जाहला ह्रषीकेशी ॥ अवघे वर्तमान इंदिरेसी ॥ कथन केले ते काळी ॥७५॥
जगन्माता मग हसोन ॥ विनोदे हरीसी बोले वचन ॥ मिळाल्या वरी वस्त्र नूतन ॥ काय कारण जीर्णाचे ॥७६॥
घृत सापडले सद्यस्तप्त ॥ संचित आज्य कोण सेवित ॥ नूतन स्त्री आली तुम्हाते ॥ कासया माते आणिले ॥७७॥
सूर्याहाती असत्य ॥ बोलवूनि आणविले माते ॥ तुमची माया ब्रह्मादिकाते ॥ न कळेची जाण सर्वथा ॥७८॥
अंतरी हर्ष परिपूर्ण ॥ बाहेर विनोदे बोले रुसोन ॥ यावरी जगदात्मा वचन ॥ काय बोलता जाहला ॥७९॥
तुझ्या इच्छामात्रे करोन ॥ ब्रह्मांड घडामोडी होय पूर्ण ॥ मज देऊन तुवाच सगुणपण ॥ नाना अवतार धरविले ॥८०॥
येरवी मी अव्यय निर्विकार ॥ मी नेणे काही विचार ॥ आता विवाह जो होणार ॥ हेही इच्छा तुझीच की ॥८१॥
रामावतारी मजलागून ॥ वल्लभे तू कथिलेसी पूर्ण ॥ की वेदवती लागून ॥ लग्न केले पाहिजे ॥८२॥
तेव्हा मी एक पत्नीव्रत ॥ म्हणोनि न पुरले मनोरथ ॥ आता तो समय प्राप्त ॥ जाहला सत्य प्रियकरे ॥८३॥
तू केवळ माझी ज्ञानकळा ॥ अंतर खूण जाणोनी सकळा ॥ व्यर्थ रुसणे ये वेळा ॥ प्राणवल्लभे कासया ॥८४॥
ऐसे श्रीनिवास बोलता ॥ संतोषली लोकमाता ॥ वचन दीधले प्राणनाथा ॥ सत्य केले पाहिजे ॥८५॥
ऐकोनि तिचे वचन ॥ परम हर्षला नारायण ॥ मग करावया मंगलस्नान ॥ सिद्ध जाहला श्रीहरी ॥८६॥
सुवर्णकढया अपार ॥ ठेविते झाले सत्वर ॥ नानातीर्थांचे निर्मळ नीर ॥ आणोनिया भरियेले ॥८७॥
जातवेदे न लगता क्षण ॥ सिद्ध केले जळ तापवून ॥ मग पंच कलश ठेऊन ॥ सूत्र गुंडाळिले सावित्री ॥८८॥
मांडिला रत्नखचित चौरंग ॥ वरी बैसविला भक्तभवभंग ॥ सुवर्णवाटीत अभंग ॥ सुगंध तैल आणविले ॥८९॥
आपुल्या हस्ते क्षीराब्धिसुता ॥ अभ्यंग मर्दन करी तत्वता ॥ सूत्रात बैसवोनि जगन्नाथा ॥ मज्जनाशी आरंभिले ॥९०॥
मुख्यस्त्रिया सहा जण ॥ इंदिरा माता स्वये जाण ॥ दुसरी अपर्णा सती पूर्ण ॥ सावित्री आणि सरस्वती ॥९१॥
पाचवी गायत्री तत्वता ॥ सहावी अरुंधती वसिष्ठकांता ॥ या स्त्रिया मिळोनिया समस्ता ॥ करविती मज्जन ते काळी ॥९२॥
वाद्ये वाजती अपार ॥ कृष्णचरित्र गाती किन्नर ॥ देवांगना परिकर ॥ नृत्य करिती स्वानंदे ॥९३॥
उदक घालिती पाचजणी ॥ अंग घासी मन्मथजननी अरुंधती आरती वोवाळोनी ॥ आशीर्वाद देतसे ॥९४॥
म्हणे जगदात्मया नारायणा ॥ दीर्घायुष्य होई जगद्भूषणा ॥ भाग्यवान पुत्रवान होऊन ॥ चिरकाळ नांदावे ॥९५॥
असो गजरे जाहलिया मज्जन ॥ तडित्प्राय पीत वसन ॥ स्वहस्ते कमळा आपण ॥ नेसविती जाहली ते काळी ॥९६॥
सर्वांगी केशराची उटी ॥ कस्तूरी तिलक ललाटी ॥ वैजयंती माळा कंठी ॥ दहा बोटी मुद्रिका ॥९७॥
सूर्यप्रभे समान ॥ कौस्तुभ तेज विराजमान ॥ मुकुट कुंडले दैदीप्यमान ॥ मनमोहन गौरविला ॥९८॥
मग वसिष्ठ भृगु जमदग्नी ॥ कश्यपात्रि आदि मिळोनी ॥ यजुर्वेदोक्त मंत्रे करोनि ॥ स्वस्तिवाचन पै केले ॥९९॥
वसिष्ठ म्हणे नारायणा ॥ करावे कुलदैवत स्थापना ॥ तू देवाधिदेव सनातन ॥ दैवत तूझे कोणते ॥१००॥
हरि म्हणे कुलदैवत ॥ शमी वृक्ष होय यथार्थ ॥ त्याची पूजा करोनिया निश्चित ॥ दैवत स्थापन करावे ॥१॥
मग शमी पाशी येऊन ॥ करोनी यथासांग पूजन ॥ श्रीवराहासमीप जाण ॥ मंडप दैवत स्थापिले ॥२॥
प्रार्थोनिया वराहरूपासी ॥ पूर्वस्थळा आले वेगेसी ॥ मग बोले ह्रषीकेशी ॥ चला आता सत्वर ॥३॥
निघावे सर्वत्वरे करोन ॥ जाऊ नारायणपुरालागून ॥ यावरी तो चतुरानन ॥ काय बोलता जाहला ॥४॥
स्वस्तिवाचन करोन ॥ उपोषित न जावे एथोन ॥ देवऋषि आदि करोन ॥ क्षुधाक्रांत जाहले ॥५॥
सारोनिया भोजन विधी ॥ मग गमन करावे कृपानिधी ॥ तरी सर्वदेवविधी यथासांग होईल ॥६॥
हरि विचारी अंतरी ॥ यासि करावी कैशीपरी ॥ भक्तपाळपूतनारी ॥ काय करिता जाहला ॥७॥
अश्वत्थाखाली संपूर्ण ॥ विचारासि बैसले चवघेजण ॥ वेंकटेश आणि विधि ईशान ॥ वैश्रवण चवथा जाणपा ॥८॥
हरि म्हणे विधीसी ॥ भोजन आधी करावयासी ॥ द्रव्यानूकूल्या आम्हापाशी ॥ नसे काहीच साक्षेप ॥९॥
द्रव्यावाचोनि निश्चय ॥ कलियुगी नव्हे कोणतेही कार्य ॥ द्रव्यप्राप्तीसी उपाय ॥ करावा काय यावरी ॥११०॥
द्रव्याविणे न होय सार्थ ॥ द्रव्याविणे नव्हे परमार्थ ॥ द्रव्याविणे प्रतिष्ठावंत ॥ सर्वथा नव्हे कलियुगी ॥११॥
वयोवृद्ध तपोवृद्ध सत्य ॥ जरी ज्ञानवृद्ध जाहला यथार्थ ॥ तरी धनवृद्धाचे द्वारी तिष्ठत ॥ किंकर होऊनि सर्वदा ॥१२॥
द्रव्य असलिया संचित ॥ त्यासी मानिती सर्व आप्त ॥ स्त्रिया आणि सुत॥ आदर बहुत करती पै ॥१३॥
द्रव्य नसलिया पदरी ॥ स्त्रिया पुत्र अपमानिती भारी ॥ प्राण जाय ऐसे कठिणोत्तरी ॥ निर्भार्सिती सर्वस्वे ॥१४॥
कलीमाजी द्रव्याविण ॥ पुरुषास नसे किंचितमान ॥ द्रव्यहीन तो मूर्ख जाण ॥ जिताचि प्रेतासारिखा ॥१५॥
विद्या जवळी बहुत असे ॥ परी तयासी कोणी न पुसे ॥ तो बोलता म्हणती पिसे ॥ लागले असे यासी ॥१६॥
यालागी कमळासन ॥ कैसे करावे यासि प्रयत्न ॥ विधि म्हणे कुबेरापासून ॥ द्रव्य मागोनि घेईजे ॥१७॥
यावरी बोले वैश्रवण ॥ अवघे द्रव्य तुझेचि पूर्ण ॥ मी तुझा सेवक होऊन ॥ द्रव्य रक्षण करितसे ॥१८॥
द्रव्य घ्यावयासी नारायण ॥ तू स्वतंत्र आहेसी जगन्मोहना ॥ मग इंदिरा मनरंजन ॥ काय बोलता जाहला ॥१९॥
म्हणे पूर्वयुगी साचार ॥ म्या घेतले नाना अवतार ॥ तेवेळी कुबेराचे भांडार ॥ स्वतंत्रपणे आणविले ॥१२०॥
परी आता असे कलियुग ॥ वेगळा असे हा प्रसंग ॥ युगानुसार कार्यभाग ॥ केला पाहिजे वैश्रवणा ॥२१॥
शिवमित्र बोले लवलाहे ॥ जरी युगानुसार करावे कार्य ॥ पत्रलिहोनि स्वये ॥ देईसत्वर श्रीहरी ॥२२॥
लिहोनि या ऋणपत्र ॥ साक्ष घालोनि देई सत्वर ॥ द्रव्य देतो निर्धार ॥ लग्नाकारणे तुझिया ॥२३॥
मग जगदात्मा श्रीकरधर ॥ लिहोनि दीधले तात्काळ पत्र ॥ पत्राभिप्राय विचित्र ॥ ऐका चतुर पंडित हो ॥२४॥
धनको नाम वैश्रवणविशेष ॥ ऋणको नाम श्रीनिवास ॥ आत्मकार्यालागी द्रव्यास ॥ घेतले असे तुजपाशी ॥२५॥
चवदा लक्ष निष्क ॥ राममुद्रांकित सुरेख ॥ कल्याणार्थ देख ॥ घेतले असे निर्धारी ॥२६॥
आजिपासोनि यथार्थ ॥ सहस्त्र वर्षापर्यंत ॥ द्रव्य पोहोचेल समस्त ॥ संशय यात असेना ॥२७॥
ऐसे लिहोनिया पत्र ॥ साक्ष घाली चतुर्वक्र ॥ दुसरी साक्ष त्रिपुरहर ॥ घालिता जाहला तेकाळी ॥२८॥
श्रोते म्हणती नवलपूर्ण ॥ जगदात्मा आदि नारायण ॥ षड्गुणैश्वर्य संपन्न ॥ उणे काय तयाते ॥२९॥
ज्याने कृपेने निर्धार ॥ सुदाम्यासि दिधले सुवर्णनगर ॥ उपमन्यूशी क्षीरसागर ॥ दीधला जाण निजकृपे ॥१३०॥
ऐसे जगदात्मा भगवान् ॥ कुबेरापाशी घेतले ऋण ॥ कुबेर मागतो पत्रलिहोन ॥ हे आश्चर्य वाटतसे ॥३१॥
मेघ चातकासि मागे जीवन ॥ दाता दरिद्रियासी मागे दान ॥ चकोरासि रोहिणीरमण ॥ म्हणे मज तृप्त करा तुम्ही ॥३२॥
तैसा ज्याचा सेवक कुबेर ॥ त्यापाशी ऋण मागे श्रीधर ॥ ही गोष्ट निर्धार ॥ घडेल ऐसे न वाटे ॥३३॥
हाचि संदेह मनी धरोन ॥ श्रोते पुसती आदरे करोन ॥ यासि प्रत्युत्तर संपूर्ण ॥ वीर देता जाहला ॥३४॥
म्हणे जगन्निवास मुरारी ॥ जो भक्तजनांचा साहाकारी ॥ त्यासी ऋण घ्यावयासि निर्धारी ॥ संकट काय असे पै ॥३५॥
परी समयाभिप्राय उत्तम ॥ दावीतसे पुरुषोत्तम ॥ कलियुगी जनांचे कार्य परम ॥ ऐसे होणार शेवटी ॥३६॥
मम वर्त्मानुवर्त ते म्हणोन ॥ गीतेत बोलिले मधुसूदन ॥ लोकसंग्रहार्थ नारायण ॥ नाना चरित्र दावितसे ॥३७॥
मायामयवेष निर्धारी ॥ जैसे गारुडी विद्या दाविती भारी ॥ किंवा नटवेषधारी ॥ नाना लाघव दाविती ॥३८॥
तैसा वैकुंठीचा राणा ॥ दावी नाना कौतुक करोन ॥ येरवी तो अव्यक्तनिर्गुण ॥ त्यासी संकट कायसे ॥३९॥
ऐसे सांगता उत्तर ॥ जाहला एकचि जयजयकार ॥ श्रोते म्हणती चरित्र ॥ बोले पुढे रसाळ ॥१४०॥
असो ऐसे पत्रलिहोन ॥ कुबेरासि दिधले साक्ष घालोन ॥ मग स्वर्गीहूनी वैश्रवण आणवी धन अविलंबे ॥४१॥
द्रव्य येतांची जनार्दन ॥ गरुडादिकांसि आज्ञा करोन ॥ सर्वसाहित्य न लगता क्षण ॥ आणविले होते काळी ॥४२॥
बोलावोनि वीतिहोत्रासी ॥ आज्ञापिले ह्रषीकेशी ॥ म्हणे घेऊनि स्वाहा स्वधेसी ॥ पाकसिद्धि करावी ॥४३॥
मग धनंजय बोलत ॥ निर्मावया सर्व पदार्थ ॥ पात्रे पाहिजेत असंख्यात ॥ आणोनि त्वरित देइजे ॥४४॥
हरि म्हणे तुमचे कार्य असेल ॥ तरी पात्रे मिळतील पुष्कळ ॥ आमचे कार्यासि ये वेळे ॥ पात्र एकही न मिळेची ॥४५॥
आमुचे कार्याचे उठाउठी ॥ कोणासि आगत्य न दिसे पोटी ॥ करावया आला वेठी ॥ तुम्ही सर्वही दिसतसे ॥४६॥
ज्याचे घरी कार्य असे ॥ त्याचे आगत्य दुसर्यासि नसे ॥ ऐसे बोलोनि त्रिभुवनाधीश ॥ पुन्हा सांगत अग्नीसी ॥४७॥
स्वामितीर्थामाजी जाण करावे वेगे उत्तमान्न ॥ वियद्गगेत परमान्न ॥ करावे पूर्ण वेगेसी ॥४८॥
देवतीर्थी शाखा बहुत ॥ तुंबरतीर्थी निर्मावे घृत ॥ नाना भक्ष्य उत्पन्नार्थ ॥ कुमारतीर्थ योजावे ॥४९॥
पांडुतीर्थामाजी सत्वर ॥ करावे नाना रस प्रकार ॥ ऐसे अग्नीपती श्रीधर ॥ सांगता जाहला ते काळी ॥१५०॥
आज्ञा वंदोनी देख ॥ अग्नीने सिद्ध केला पाक ॥ षण्मुखाप्रती कमळानायक ॥ बोलता काय जाहला ॥५१॥
म्हणे देव आणि ऋषी लागून ॥ सर्वांसि द्यावे आमंत्रण ॥ अवश्य म्हणोनी शिखिवाहन ॥ करिता जाहला तैसेची ॥५२॥
देवद्विज सर्वही ॥ शीघ्र पातले लवलाही ॥ त्यांचे पूजन विधी सर्वही ॥ शंकर स्वये करितसे ॥५३॥
पांडूतीर्थापासून सत्य ॥ मर्यादा श्रीशैल्य पर्यंत ॥ पात्रे मांडिली पै यथार्थ ॥ द्विजवरांसी जेवावया ॥५४॥
हरि म्हणे अनर्पित अन्न ॥ ब्राह्मणांसी न वाढावे पूर्ण ॥ एथे अहो बलनृसिंह जाण ॥ असे पुरातन साक्षात ॥५५॥
करोनी त्यांचे पूजन ॥ नैवेद्य अर्पावे परिपूर्ण ॥ विधीने तैसेचि करोन ॥ वाढावयासी घेतले ॥५६॥
अक्षता धूप दीप परिमळ ॥ अर्पोनि पूजिले द्विज सकळे ॥ मग भोजनासी बैसले ॥ ऋषीश्वर सर्वही ॥५७॥
पंच भक्ष परमान्न ॥ साठि शाखा सुवास गहन ॥ दधि मधु घृत पूर्ण ॥ सर्वांसी समान वाढिले ॥५८॥
विप्रांचिये पंक्ती प्रती ॥ स्वये येवोनि श्रीपती ॥ परामर्श घेतसे प्रीती ॥ जगन्नाथ ते काळी ॥५९॥
विप्रांसि म्हणे भगवान ॥ स्वामी सावकाश कीजे भोजन ॥ उशीर झाला म्हणोन ॥ कोप मनी न करावा ॥१६०॥
तेथे सुवास करोनी नीर ॥ भोजन कर्त्यासि वारंवार ॥ स्वये रसनायक साचार ॥ पुरविता झाला ते काळी ॥६१॥
असो जाहलिया भोजन ॥ आचवले सकळ ब्राह्मण ॥ त्रयोदश गुणी विडे देऊन ॥ दक्षिणा हरि स्वये देत ॥६२॥
एकैक निष्क जाणा ॥ दीधली ब्राह्मणांसी दक्षिणा ॥ विप्र परम आनंदोन ॥ मंत्राक्षता दिधल्या ॥६३॥
सर्व देवांसहित एक पंक्ती ॥ भोजनासि बैसले रमापती ॥ ब्रह्मा इंद्र कैलासपती ॥ सहित निश्चिती बैसले ॥६४॥
देवस्त्रिया समवेत ॥ एकपंक्ती बैसले समस्त ॥ भोजन सारिले यथार्थ ॥ षड्रस पक्वान्ने ते काळी ॥६५॥
सर्वांचे जाहले भोजन ॥ तो अस्तास गेला चंडकिरण ॥ रात्रीमाजी सर्वजणे ॥ शयन केले तेथेची ॥६६॥
सवेचि उगवला मित्र ॥ सिद्ध जाहले सर्वत्र ॥ आपापली वाहने विचित्र ॥ घेऊनिया निघाले ॥६७॥
विधि म्हणे जगदुद्धारा ॥ चलावे आता नारायणपुरा ॥ गरुडारूढा होऊनि सत्वरा ॥ भुवनसुंदरा निघावे ॥६८॥
तात्काळ उठोनी श्रीधर ॥ गरूडारूढ जाहला सत्वर ॥ नंदीवरी कर्पूरगौर ॥ सव्यभागी चालतसे ॥६९॥
वामभागी कमळासन ॥ हंसारूढ करी गमन ॥ पुढे चाले सहस्त्रनयन ॥ ऐरावतारूढ पै ॥१७०॥
तेहतीस कोटी देवसमग्र ॥ निजवाहनी बैसोनि सत्वर ॥ मागूनि चालती निर्धार ॥ वाद्ये अपार वाजती ॥७१॥
मंडित वस्त्राल्कार ॥ देवस्त्रिया निघाल्या समग्र ॥ जैसे विद्युल्लतांचे भार ॥ वाहनारूढ चालती ॥७२॥
भोवते दाटले ऋषिसुरवर ॥ मध्यमंडळी श्रीकरधर ॥ गरुडारूढ जगदुद्धार ॥ मिरवत जात ते काळी ॥७३॥
जैसा पूर्णिमेचा चंद्र ॥ तैसे हरीवर शोभे छत्र ॥ दोही बाही चामर ॥ विराजमान दिसती ॥७४॥
पुढे वाद्यगजर होत ॥ तेणे आकाश दुमदुमित ॥ मंद मंद चाले रमानाथ ॥ देवांगना नाचती ॥७५॥
प्रळयी फुटला सागर ॥ तैसे चालिले देवऋषिभार ॥ दाटी जाहली अपार ॥ मंडप घसणी होतसे ॥७६॥
स्त्रिया बाळक वृद्ध तरुण ॥ आदिकरोनी थोर लहान ॥ स्थळ नसे तिळ प्रमाण ॥ भरोनिया चालिले ॥७७॥
कितीएक चरण चाली चालती ॥ अडखळोनी भूमीवरी पडती ॥ सवेचि सावरोनि उठती ॥ मग चालती त्वरेने ॥७८॥
कित्येकांचे हरवले पदार्थ ॥ म्हणोनिया शोक करित ॥ ठायी ठायी कलह अद्भुत ॥ स्त्रियांमाजी होतसे ॥७९॥
ऐसियामाजी एक ब्राह्मण ॥ स्त्रीपुत्र संगे घेऊन ॥ जात असता पंथे करून ॥ तो अपूर्व वर्तले ॥१८०॥
स्त्रियेचे काखेत होता बाळ ॥ मस्तकावरी असे गाठोळ ॥ चालत असता वेल्हाळ ॥ पतीसहित ते काळी ॥८१॥
मागे रथी बैसोनिया ॥ धावत पातल्या देवस्त्रिया ॥ दाटी जाहली लवलाह्या ॥ चुकवोनि घेतले पतीते ॥८२॥
हेनाथ नाथ म्हणोन ॥ आक्रोश करी हाक फोडोन ॥ पडली तेथे मूर्च्छा येउन ॥ कोणासी कोणी न पुसती ॥८३॥
असो ऐसे मिरवत ॥ चालिले हो कमळानाथ ॥ जो पद्मोद्भवाचातात ॥ दीननाथ जगद्गुरु ॥८४॥
पद्मवतीतीर्थासमीप ॥ आला विरिंचीचा बाप ॥ ज्यावरोनी कोटी कंदर्प ॥ वोवाळोनि टाकावे ॥८५॥
तो शुकयोगींद्र वसे तेथ ॥ बैसला असता पर्णकुटीत ॥ आला कळला रमाकांत ॥ आनंद चित्ती न समाये ॥८६॥
सामोरा आला धावोन ॥ हरीप्रती करोनी वंदन ॥ म्हणे जगदात्मा तू आदिनारायण ॥ तुझे दर्शन दुलर्भ ॥८७॥
जय अनंतकोटीब्रह्मांडनायका ॥ हे दयार्णवा विश्वव्यापका ॥ भवरोगवैद्या मुरांतका ॥ सृष्टिपालका दीनबंधो ॥८८॥
नमो भक्तकामकल्पद्रुमा ॥ नमो अज अजित आत्मारामा ॥ अपर्णापति ह्रदयविश्रामा ॥ पूर्णकामा सर्वेशा ॥८९॥
नमो दशावतार चक्रचाळका ॥ नमो सर्वदुष्ट दैत्यांतका ॥ वेदवंद्या वेदपालका ॥ वेदस्थापका दीनबंधो ॥१९०॥
तुझे करावयास्तवन ॥ शक्त नव्हे विधि सहस्त्रनयन ॥ मी केवळ दीन ब्राह्मण ॥ केवि स्तवन करू तुझे ॥९१॥
ऐसे ऐकतांची स्तवन ॥ तोषिला इंद्रिराप्राणजीवन ॥ शुकाचार्यासि बोले वचन ॥ म्हणे कासया स्तवन आरंभिले ॥९२॥
काय इच्छा असे मानसी ॥ ते सांग आता शीघ्र मजसी ॥ शुकाचार्य म्हणे ह्रषीकेशी ॥ परिस माझी विज्ञापना ॥९३॥
नाना तपे आचरती दारुण ॥ त्यासी दुर्लभ तुजे चरण ॥ अनायासे करोन ॥ आलासि आश्रमा समीप ॥९४॥
तरी माझे आश्रमी श्रीहरी ॥ उतरोनिया क्षणभरी ॥ कंदमूळ भोजन निर्धारी ॥ करोनि जाई गोविंदा ॥९५॥
तू षङ्गुणैश्वर्य संपन्न ॥ तुज काय पदार्थ असे न्यून ॥ परी माझे मनोरथ पूर्ण ॥ करी आता वेंकटेशा ॥९६॥
हरी म्हणे त्वरे करून ॥ जातसो आम्ही लग्नाकारण ॥ आमुच्या संगे बहुतजन ॥ देव ऋषी असती ॥९७॥
त्या सर्वांसी सोडून ॥ एकलेचि करिता नये भोजन ॥ यावरी तो बादरायण सूनु ॥ बोलता काय जाहला ॥९८॥
अनंत ब्रह्मांडांच्या कोटी ॥ हरि आहेति तुझ्या पोटी ॥ तू भक्षिलिया जगजेठी ॥ सर्वसृष्टी तृप्त होय ॥९९॥
ऐशी ऐकोनि शुकाची मात ॥ बकुलामाता हरीशी म्हणत ॥ शुकयोगींद्राचे वचनाते ॥ मान्य करी वेंकटेशा ॥२००॥
ऐकता मातेचे वचन ॥ अवश्य म्हणोनि नारायण ॥ गरुडाखाली उतरोन ॥ शुकाश्रमात पातला ॥१॥
आला देखोनि जगजेठी ॥ शुकाचा आनंद न माय सृष्टी ॥ तृणासनी उठाउठी ॥ लक्ष्मीसहित बैसविला ॥२॥
जन्म आरभ्य आचरले तप ॥ त्याचे फळ जाहले अमूप ॥ जो विरिंचीचा बापा ॥ वैकुंठाधिप घरा आला ॥३॥
ऐसे बोलोनी व्यासनंदन ॥ पद्मतीर्थी केले स्नान ॥ अमृती बीज कांडोन ॥ तंडुल केले मुष्टिभरी ॥४॥
त्याचे केले उत्तमान्न ॥ तिंतिणीचा रस काढून ॥ बृहती फळ मिश्रकरून ॥ रस तयाचा केला पै ॥५॥
मग आपुल्या स्वहस्ते ॥ पूजन करोनि श्रीहरीते ॥ नैवेद्य अर्पिला भक्तियुक्ते ॥ कमळपत्रात वाढोनिया ॥६॥
हरीशी म्हणे बादरायणि ॥ येता श्रमलासि चक्रपाणी ॥ आता मजवरी कृपा करोनी ॥ करी भोजन सावकाश ॥७॥
भक्तवत्सल जगज्जीवन ॥ आवडीने करी भोजन ॥ भक्तप्रिय नारायण ॥ बिरुद साच केले हो ॥८॥
नावडे काही पक्वान्न ॥ नावडे लौकिक मान अभिमान ॥ मुख्यभक्तीच कारण ॥ नावडे पूर्ण आन काही ॥९॥
नावडे दुर्योधनाची तूपसाखर ॥ विदुराची आवडे कण्या भाकर ॥ द्रौपदीचे शाखापत्र ॥ राजीवनेत्रे भक्षिले ॥२१०॥
भिल्लिणीचे उच्छिष्ट फळ ॥ आवडीने सेवी तमाळनीळ ॥ मुष्टीभरी पोहे स्वीकारिले ॥ सुदामयाचे गोविंदे ॥११॥
धर्माघरी उच्छिष्ट काढी ॥ पार्थाची धूतली घोडी ॥ थोरपणाची प्रौढी ॥ श्रीनिवास न पाहे ॥१२॥
भक्ताकारणे दशावतार ॥ घिरट्या घेत जगदुद्धार ॥ प्रल्हादासाठी विष दुर्धर ॥ सोसी श्रीधर निजांगे ॥१३॥
ऐसाहा भक्त कैवारी ॥ शुकाची भक्तिपाहोनि भारी ॥ तापसान्न भक्षी मुरारी ॥ अत्यादरे करोनिया ॥१४॥
ऐसा जेविला जगज्जीवन ॥ गुंफेबाहेर सर्वजन ॥ तेही जाहले क्रोधायमान ॥ शुकावरी ते काळी ॥१५॥
म्हणे शुके केले अनुचित ॥ समीप असता आम्ही समस्त ॥ एकल्या हरीसी बोलावोनि त्वरित ॥ भोजनासी दीधले ॥१६॥
आम्हा सर्वत्र ब्राह्मणांसी ॥ द्यावे होते भोजनासी ॥ अपमानिले आम्हांसी ॥ म्हणोनिया क्रोधावले ॥१७॥
शुकासि शापावया सत्वर ॥ सिद्ध जाहले धरामर ॥ हे जाणोनिया श्रीधर गुंफेबाहेर पातला ॥१८॥
मनी विचारी नारायण ॥ शापदेतील शुकालागून ॥ निज भक्ताचे रक्षण ॥ केले पाहिजे मजलागी ॥१९॥
बाहेर येऊनी श्रीनिवास ॥ फुंकारोनि सोडिला श्वास ॥ तेणे सर्वांची क्षुधानिःशेष ॥ शांत जाहली तात्काळी ॥२२०॥
सर्वाघटी आत्माराम ॥ व्यापक एकचि परब्रह्म ॥ यालागी क्षुधा दुर्गम ॥ शांत जाहली सर्वांची ॥२१॥
आश्चर्य करिती सर्वविप्र ॥ म्हणती सूत्रधारी सर्वेश्वर ॥ भक्तरक्षणार्थ साचार चमत्कार केला हा ॥२२॥
आम्ही सर्वही कोपून ॥ शाप देऊ शुका कारण ॥ हे जाणोनि जनार्दने ॥ नवल विंदाण केले हे ॥२३॥
फुंकारासरसी साचार ॥ सर्वांची क्षुधा जाहली दूर ॥ आनंदमय सर्वत्र ॥ शुकाचार्यासी बोलती ॥२४॥
म्हणती योगींद्रा तू धन्य ॥ तुज वश्य जाहला नारायण ॥ तुझ्या योगे करोन ॥ आम्ही धन्य जाहलो ॥२५॥
आम्हासी न दीधले भोजन ॥ म्हणोनि शापित होतो तुज लागून ॥ त्याकारणे क्षुधाहरण केली आमुची मुकुंदे ॥२६॥
आता आम्ही जाहलो संतुष्ट ॥ ऐसे बोलोनि ब्राह्मण वरिष्ठ ॥ सर्वही वंदिती श्रीवैकुंठ ॥ प्रेमभावे करोनिया ॥२७॥
मग ते दिवसी ह्रषीकेशी ॥ शुकाश्रमी क्रमिली ती निशी ॥ प्रातःकाळी नवमी दिवसी ॥ पुढे निघाले सत्वर ॥२८॥
निजभारेशी मधुसूदन ॥ मिरवत जातसे रमारमण ॥ इकडे नृपमंदिरी वर्तमान ॥ झाले तेचि परिसिजे ॥२९॥
ती कथा परमसुंदर ॥ पुढील अध्यायी मनोहर चिद्धनानंदे कुडचीवीर ॥ वर्णीलसाचार आदरे ॥२३०॥
वैकुंठवासा विश्वंभरा ॥ शेषाद्रि निलयाजगदुद्धारा ॥ पुढेइतिहास परात्पर ॥ बोलवी आता निजकृपे ॥३१॥
इति श्रीवेंकटेशविजयसुंदर ॥ संमतपुराण भविष्योत्तर ॥ श्रवण करोत पंडित चतुर ॥ नवमाध्याय गोड हा ॥२३२॥९ एकंदर ओवी संख्या ॥१५३५॥