Get it on Google Play
Download on the App Store

शंकर

राजा जनमेजयाने वैशंपायन ऋषींना विचारले,"नंदी या साधारण पशूच्या अंगी एवढी विलक्षण शक्ती कोठून आली? तसेच शंकराचे ते वाहन कसे झाले?" यावर वैशंपायन ऋषी म्हणाले,"शिरवी नावाचा एक महान तपस्वी ऋषी होता. तो एके दिवशी इंद्राला भेटायला गेला असता त्याचा अपमान झाला. इंद्राला शासन करेल असा पुत्र आपल्याला लाभावा या हेतूने त्याने घोर तप केले. ब्रह्मदेव प्रसन्न झाले व त्यांनी तुला इंद्र, विष्णू व महादेव यांच्यापेक्षाही पराक्रमी पुत्र मिळेल असा वर दिला. त्याप्रमाणे शिरवी ऋषींच्या शेंडीतून अत्यंत तेजस्वी असा चतुष्पाद पशू पडला. ब्रह्मदेवांनी त्याचे नाव नंदिकेश्‍वर ठवले. तो वरुण, अग्नी व वायू यांचे प्रतीक असल्याचे सांगितले. भूक लागली म्हणून पित्याच्या सांगण्यावरून नंदी क्षीरसागरातील दूध पिऊ लागला. विष्णूचे दूत तसेच स्वतः विष्णू यांनाही तो आवरेना. साठ दिवस युद्ध झाल्यावरही तो हरेना म्हणून विष्णूच त्याच्यावर प्रसन्न होऊन द्वापरयुगात मी तुझे पालन करीन, असे त्यांनी आश्‍वासन दिले. पुढे पुन्हा भूक लागल्यावर पित्याच्या सांगण्यावरून नंदी इंद्राच्या नंदनवनातील तृण खाऊ लागला. तेव्हा इंद्राशी त्याचे युद्ध झाले. त्याच्या शेपटीच्या झटक्‍याने इंद्र कैलासावर शंकरांच्या पुढ्यात पडला. नंदीने इंद्राच्या सिंहासनाचा चक्काचूर केला. इंद्राच्या विनंतीनुसार शंकराचे सैन्य नंदीवर चालून गेले. पण नंदीपुढे सैन्यच काय; खुद्द शंकरही हताश झाले. त्याची अचाट शक्ती पाहून त्यांनी त्याच्यावर कृपा केली. तेव्हा नंदी शंकरांना म्हणाला,"आज तुझ्यासारखा याचक भेटला याचा मला आनंद होतो. तू माझ्याकडे काहीतरी माग." यावर शंकराने त्याला आपले वाहन हो, असे मागणे मागितले. मोठ्या संतोषाने नंदीने ते मान्य केले. शंकरांनी त्याचा स्वीकार करून त्याला सतत आपल्याजवळ ठेवण्याचे तसेच आपल्या अगोदर तुझे दर्शन घेतले जाईल असे सांगितले."तू आपल्या उदरात क्षीरसागरातील दूध, नंदनवनातील गवत व सर्व शस्त्रे साठवलीस म्हणून तुझ्या शेणाचे भस्म मी सर्वांगाला लावत जाईन," असेही शंकर म्हणाले. याप्रमाणे शंकर व नंदी यांचा सहवास घडून आला. सर्व देवांनी शंकराचे नाव पशुपती असे ठेवले. हे कळल्यावर शिरवी ऋषीलाही आनंद झाला.