रावणकथा
धोब्याच्या वचनानुसार श्रीरामांनी सीतेचा त्याग केला. ते एकटेच पृथ्वीचे राज्य करू लागले. एकदा श्रेष्ठ मुनी अगस्ती राजसभेत आले असता श्रीरामांनी त्यांना विचारले,"देवांना पीडा देणारा लंकापती रावण- ज्याला मी मारले- तो व त्याचे भाऊ कुंभकर्ण, तसेच इतर बांधव हे खरे होते तरी कोण?" यावर अगस्ती म्हणाले,"राजा, सर्व जगाची निर्मिती करणारा ब्रह्मदेव याच्या मुलाचा मुलगा विश्रवा हा वेदशास्त्रसंपन्न होता. त्याला मंदाकिनी व कैकसी नावाच्या दोन पत्नी होत्या. त्यापैकी मंदाकिनीने कुबेराला जन्म दिला. त्याने शंकराची आराधना करून लोकपालपद मिळवले. कैकसी ही दैत्यकन्या असून तिने रावण, कुंभकर्ण व बिभीषण यांना जन्म दिला. यातील बिभीषण हा सदाचरणी असून रावण व कुंभकर्ण अधार्मिक वृत्तीचे बनले." एकदा कुबेर पुष्पक विमानात बसून मातापित्यांच्या दर्शनासाठी ते राहत होते त्या आश्रमात गेला. दोन्ही मातांना मोठ्या नम्र भावाने त्याने वंदन केले. यानंतर कैकसी रावणास म्हणाली,"बघ, याच्यापासून काही शीक. शंकरांची तपस्या करून त्याने लंकेचा निवास, हे विमान, राज्य, धन प्राप्त करून घेतले." यावर रावण म्हणाला,"यात काय विशेष? मी तपस्या करून त्रैलोक्याचे राज्य संपादन करीन." मग रावण, बिभीषण व कुंभकर्ण यांनी पर्वतावर जाऊन उग्र तप केले.
ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन रावणास फार मोठे राज्य दिले. मग रावणाने कुबेराचे राज्य, विमान बळकावले. त्याने ऋषीमुनी, देव यांनाही त्रास दिला. सर्व देव ब्रह्मदेव शंकरांना घेऊन भगवान विष्णूकडे गेले. आपण अयोध्येचा राजा दशरथ याच्या पोटी अवतार घेऊन रावणाचा वध करू, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानुसार सारे घडले. आपण मानवदेहधारी भगवान असून लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न आपलेच अंश आहेत.