दशक विसावा - पूर्णनामदशक
॥ श्रीरामसमर्थ ॥
॥ श्रीमत् दासबोध ॥
दशक विसावा : पूर्णनामदशक
समास पहिला : पूर्णापूर्णनिरूपण
॥ श्रीराम ॥
प्राणीव्यापक मन व्यापक । पृथ्वी व्यापक तेज व्यापक ।
वायो आकाश त्रिगुण व्यापक । अंतरात्मा मूळमाया ॥ १ ॥
निर्गुण ब्रह्म तें व्यापक । ऐसें अवघेंच व्यापक ।
तरी हें सगट किं काये येक । भेद आहे ॥ २ ॥
आत्मा आणि निरंजन । येणेंहि वाटतो अनुमान ।
आत्मा सगुण किं निर्गुण । आणि निरंजन ॥ ३ ॥
श्रोता संदेहीं पदिला । तेणें संदेह वाढला ।
अनुमान धरून बैसला । कोण तो कैसा ॥ ४ ॥
ऐका पहिली आशंका । अवघा गल्बला करूं नका ।
प्रगट करून विवेका । प्रत्यये पाहावा ॥ ५ ॥
शरीपाडें सामर्थ्यपाडें । प्राणी व्याप करी निवाडें ।
परी पाहतां मनायेवढें । चपळ नाहीं ॥ ६ ॥
चपळपण येकदेसी । पूर्ण व्यापकता नव्हे त्यासी ।
पाहातां पृथ्वीच्या व्यापासी । सीमा आहे ॥ ७ ॥
तैसेंचि आप आणि तेज । अपूर्ण दिसती सहज ।
वायो चपळ समज । येकदेसी ॥ ८ ॥
गगन आणि निरंजन । तें पूर्ण व्यापक सघन ।
कोणीयेक अनुमान । तेथें असेचिना ॥ ९ ॥
त्रिगुण गुणक्षोभिणी माया । माईक जाईल विलया ।
अपूर्ण येकदेसी तया । पूर्ण व्यापकता न घडे ॥ १० ॥
आत्मा आणि निरंजन । हें दोहिकडे नामाभिधान ।
अर्थान्वये समजोन । बोलणें करावें ॥ ११ ॥
आत्मा मन अत्यंत चपळ । तरी हें व्यापक नव्हेचि केवळ ।
सुचित अंतःकर्ण निवळ । करून पाहावें ॥ १२ ॥
अंतराळीं पाहातां पाताळी नाहीं । पाताळीं पाहातां अंतराळीं नाहीं ।
पूर्णपणें वसत नाहीं । चहुंकडे ॥ १३ ॥
पुढें पाहातां मागें नाहीं । मागें पाहातां पुढें नाहीं ।
वाम सव्य व्याप नाहीं । दशदिशा ॥ १४ ॥
चहुंकडे निशाणें मांडावीं । येकसरीं कैसीं सिवावीं ।
याकारणें समजोन उगवी । प्रत्ययें आपणासी ॥ १५ ॥
सूर्य आला प्रतिबिंबला । हाहि दृष्टांत न घडे वस्तुला ।
वस्तुरूप निर्गुणाला । म्हणिजेत आहे ॥ १६ ॥
घटाकाश मठकाश । हाहि दृष्टांत विशेष ।
तुळूं जातां निर्गुणास । साम्यता येते ॥ १७ ॥
ब्रह्मींचा अंश आकाश । आणी आत्म्याचा अंश मानस ।
दोहींचा अनुभव प्रत्ययास । येथें घ्यावा ॥ १८ ॥
गगन आणि हें मन । कैसे होती समान ।
मननसीळ महाजन । सकळहि जाणती ॥ १९ ॥
मन हें पुढें वावडे । मागें आवघेंचि रितें पडे ।
पूर्ण गगनास साम्यता घडे । कोण्या प्रकारें ॥ २० ॥
परब्रह्मचि अचळ । आणि पर्वतासहि म्हणती अचळ ।
दिनीही येक केवळ । हें कैसें म्हणावें ॥ २१ ॥
ज्ञान विज्ञान विपरितज्ञान । तिनी कैसीं होती समान ।
याचा प्रत्ययो मनन । करून पाहावा ॥ २२ ॥
ज्ञान म्हणिजे जाणणें । अज्ञान म्हणिजे नेणणें ।
विपरितज्ञान म्हणिजे देखणें । येकाचें येक ॥ २३ ॥
जाणणें नेणणें वेगळें केलें । ढोबळें पंचभूतिक उरलें ।
विपरीतज्ञान समजलें । पाहिजे जीवीं ॥ २४ ॥
द्रष्टा साक्षी अंतरात्मा । जीवात्माची होये शिवात्मा ।
पुढें शिवात्मा तोचि जीवात्मा । जन्म घेतो ॥ २५ ॥
आत्मत्वीं जन्ममरण लागे । आत्मत्वीं जन्ममरण न भंगे ।
संभवामि युगे युगे । ऐसे हें वचन ॥ २६ ॥
जीव येकदेसी नर । विचारें जाला विश्वंभर ।
विश्वंभरास संसार । चुकेना कीं ॥ २७ ॥
ज्ञान आणि अज्ञान । वृत्तिरूपें हें समान ।
निवृत्तिरूपें विज्ञान । जालें पाहिजे ॥ २८ ॥
ज्ञानें येवढें ब्रह्मांड केलें । ज्ञानें येवढें वाढविलें ।
नाना विकाराचें वळलें । तें हें ज्ञान ॥ २९ ॥
आठवें देह ब्रह्मांडीचें । तें हें ज्ञान साचें ।
विज्ञानरूप विदेहाचें । पद पाविजे ॥ ३० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पूर्णापूर्णनिरूपणनाम समास पहिला ॥
समास दुसरा : सृष्टीत्रिविधलक्षणनिरूपण
॥ श्रीराम ॥
मूळमाया नस्तां चंचळ । निर्गुण ब्रह्म तें निश्चळ ।
जैसें गगन अंतराळ । चहुंकडे ॥ १ ॥
दृश्य आलें आणि गेलें । परी तें ब्रह्म संचलें ।
जैसें गगन कोंदाटलें । चहुंकडे ॥ २ ॥
जिकडे पाहावें तिकडे अपार । कोणेकडे नाहीं पार ।
येकजिनसी स्वतंत्र । दुसरें नाहीं ॥ ३ ॥
ब्रह्मांडावरतें बैसावें । अवकाश भकास अवलोकावें ।
तेथें चंचळ व्यापकाच्या नांवें । सुन्याकार ॥ ४ ॥
दृश्य विवेकें काढिलें । मग परब्रह्म कोंदाटलें ।
कोणासीच अनुमानलें । नाहीं कदा ॥ ५ ॥
अधोर्ध पाहातां चहुंकडे । निर्गुण ब्रह्म जिकडे तिकडे ।
मन धांवेल कोणेकडे । अंत पाहावया ॥ ६ ॥
दृश्य चळे ब्रह्म चळेना । दृश्य कळे ब्रह्म कळेना ।
दृश्य आकळे ब्रह्म आकळेना । कल्पनेसी ॥ ७ ॥
कल्पना म्हणिजे कांहींच नाहीं । ब्रह्म दाटले ठाईंचा ठाईं ।
वाक्यार्थ विवरत जाई । म्हणिजे बरें ॥ ८ ॥
परब्रह्मायेवढें थोर नाहीं । श्रवणापरतें साधन नाहीं ।
कळल्याविण कांहींच नाहीं । समाधान ॥ ९ ॥
पिप्लीकामार्गें हळु हळु घडे । विहंगमें फळासी गांठी पडे ।
साधक मननीं पवाडे । म्हणिजे बरें ॥ १० ॥
परब्रह्मासारिखें दुसरें । कांहींच नाहीं खरें ।
निंदा आणि स्तुतिउत्तरें । परब्रह्मीं नाहीं ॥ ११ ॥
ऐसे परब्रह्म येकजिनसी । कांहीं तुळेना तयासी ।
मानुभव पुण्यरासी । तेथें पवाडती ॥ १२ ॥
चंचळें होते दुःखप्राप्ती । निश्चळायेवडी नाहीं विश्रांती ।
निश्चळ प्रत्ययें पाहाती । माहानुभाव ॥ १३ ॥
मुळापासून शेवटवरी । विचारणा केलीच करी ।
प्रत्ययाचा निश्चयो अंतरीं । तयासीच फावे ॥ १४ ॥
कल्पनेचि सृष्टी जाली । त्रिविध प्रकारें भासली ।
तिक्षण बुद्धीनें आणिली । पाहिजे मना ॥ १५ ॥
मूळमायेपासून त्रिगुण । अवघें येकदेसी लक्षण ।
पांचा भूतांचा ढोबळा गुण । दिसत आहे ॥ १६ ॥
पृथ्वीपासून च्यारी खाणी । चत्वार वेगळाली करणी ।
सकळ सृष्टीचि चाली येथुनी । पुढें नाहीं ॥ १७ ॥
सृष्टीचें विविध लक्षण । विशद करूं निरूपण ।
श्रोतीं सुचित अंतःकर्ण । केलें पाहिजे ॥ १८ ॥
मूळमाया जाणीवेची । मुळीं सूक्ष्म कल्पनेची ।
जैसी स्थिती परे वाचेची । तद्रूपचि ते ॥ १९ ॥
अष्टधा प्रकृतीचें मूळ । ते हे मूळमायाच केवळ ।
सूक्ष्मरूप बीज सकळ । मुळींच आहे ॥ २० ॥
जड पदार्थ चेतवितें तें । म्हणौन चैतन्य बोलिजेतें ।
सूक्ष्म रूपें संकेतें । समजोन घ्यावीं ॥ २१ ॥
प्रकृती पुरुषाचा विचार । अर्धनारीनटेश्वर ।
अष्टधा प्रकृतीचा विचार । सकळ कांहीं ॥ २२ ॥
गुप्त त्रिगुणाचें गूढत्व । म्हणौन संकेत महत्तत्त्व ।
गुप्तरूपें शुद्धसत्व । तेथेंचि वसे ॥ २३ ॥
जेथून गुण प्रगटती । तीस गुणक्षोभिणी म्हणती ।
त्रिगुणाचीं रूपें समजती । धन्य ते साधु ॥ २४ ॥
गुप्तरूपें गुणसौम्य । म्हणौनि बोलिजे गुणसाम्य ।
सूक्ष्म संकेत अगम्य । बहुतांस कैंचा ॥ २५ ॥
मूळमायेपासून त्रिगुण । चंचळ येकदेसी लक्षण ।
प्रत्ययें पाहातां खूण । अंतरीं येते ॥ २६ ॥
पुढें पंचभूतांचीं बंडें । वाढलीं विशाळें उदंडें ।
सप्तद्वीपें नवखंडें । वसुंधरा हे ॥ २७ ॥
त्रिगुणापासून पृथ्वीवरी । दुसर्या जिनसान्याची परी ।
दोनी जिनस याउपरी । तिसरा ऐका ॥ २८ ॥
पृथ्वी नाना जिनसाचें बीज । अंडज जारज श्वेतज उद्भिज ।
च्यारी खाणी च्यारी वाणी सहज । निर्माण जाल्या ॥ २९ ॥
खाणी वाणी होती जाती । परंतु तैसीच आहे जगती ।
ऐसे होती आणी जाती । उदंड प्राणी ॥ ३० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सृष्टीत्रिविधलक्षणनिरूपणनाम समास दुसरा ॥
समास तिसरा : सूक्ष्मनामाभिधाननिरूपण
॥ श्रीराम ॥
मुळींहून सेवटवरी । विस्तार बोलिला नानापरी ।
पुन्हा विवरत विरत माघारी । वृत्ति न्यावी ॥ १ ॥
च्यारी खाणी च्यारी वाणी । चौर्यासी लक्ष जीवयोनी ।
नाना प्रकारीचे प्राणी । जन्मास येती ॥ २ ॥
अवघे होती पृथ्वीपासूनी । पृथ्वीमधें जाती नासोनी ।
अनेक येती जाती परी अवनी । तैसीच आहे ॥ ३ ॥
ऐसें हें सेंड्याकडिल खांड । दुसरें भूतांचें बंड ।
तिसरें नामाभिधानें उदंड । सूक्ष्मरूपें ॥ ४ ॥
स्थूळ अवघें सांडून द्यावें । सूक्ष्मरूपें वोळखावें ।
गुणापासून पाहिलेच पाहावें । सूक्ष्मदृष्टीं ॥ ५ ॥
गुणाचीं रूपें जाणिव नेणीव । पाहिलाच पाहावा अभिप्राव ।
सूक्ष्मदृष्टीचें लाघव । येथून पुढें ॥ ६ ॥
शुद्ध नेणीव तमोगुण । शुद्ध जाणीव सत्वगुण ।
जाणीवनेणीव रजोगुण । मिश्रित चालिला ॥ ७ ॥
त्रिगुणाचीं रूपें ऐसीं । कळों लागलीं अपैसीं ।
गुणापुढील कर्दमासी । गुणक्षोभिणी बोलिजे ॥ ८ ॥
रज तम आणि सत्व । तिहींचें जेथें गूढत्व ।
तें जाणिजे महत्तत्त्व । कर्दमरूप ॥ ९ ॥
प्रकृती पुरुष शिवशक्ति । अर्धनारीनटेश्वर म्हणती ।
परी याची स्वरूपस्थिती । कर्दमरूप ॥ १० ॥
सूक्ष्मरूपें गुणसौम्य । त्यास बोलिजे गुणसाम्य ।
तैसेंचि चैतन्य अगम्य । सूक्ष्मरूपी ॥ ११ ॥
बहुजिनसी मूळमाया । माहांकारण ब्रह्मांडीची काया ।
ऐसिया सूक्ष्म अन्वया । पाहिलेंचि पाहावें ॥ १२ ॥
च्यारी खाणी पांच भूतें । चौदा सूक्ष्म संकेतें ।
काये पाहणें तें येथें । शोधून पाहावें ॥ १३ ॥
आहाच पाहातां कळेना । गरज केल्यां समजेना ।
नाना प्रकारीं जनाच्या मना । संदेह पडती ॥ १४ ॥
चौदा पांच येकोणीस । येकोणीस च्यारी तेविस ।
यांमधें मूळ चतुर्दश । पाहिलेंचि पाहावें ॥ १५ ॥
जो विवरोन समजला । तेथें संदेह नाहीं उरला ।
समजल्याविण जो गल्बला । तो निरर्थक ॥ १६ ॥
सकळ सृष्टीचें बीज । मूळमायेंत असे सहज ।
अवघें समजतां सज्ज । परमार्थ होतो ॥ १७ ॥
समजलें माणूस चावळेना । निश्चै अनुमान धरीना ।
सावळगोंदा करीना । परमार्थ कदा ॥ १८ ॥
शब्दातीत बोलतां आलें । त्यास वाच्यांश बोलिलें ।
शुद्ध लक्ष्यांश लक्षिलें । पाहिजे विवेकें ॥ १९ ॥
पूर्वपक्ष म्हणिजे माया । सिद्धांतें जाये विलया ।
माया नस्तां मग तया । काये म्हणावें ॥ २० ॥
अन्वये आणी वीतरेक । हा पूर्वपक्षाचा विवेक ।
सिद्धांत म्हणिजे शुद्ध येक । दुसरें नाहीं ॥ २१ ॥
अधोमुखें भेद वाढतो । ऊर्धमुखें भेद तुटतो ।
निःसंगपणें निर्गुणी तो । माहांयोगी ॥ २२ ॥
माया मिथ्या ऐसी कळली । तरी मग भीड कां लागली ।
मायेचें भिडेनें घसरली । स्वरूपस्थिती ॥ २३ ॥
लटके मायेनें दपटावें । सत्य परब्रह्म सांडावें ।
मुख्य निश्चयें हिंडावें । कासयासी ॥ २४ ॥
पृथ्वीमधें बहुत जन । त्यामधें असती सज्जन ।
परी साधूस वोळखतो कोण । साधुवेगळा ॥ २५ ॥
म्हणौन संसार सांडावा । मग साधूचा शोध घ्यावा ।
फिरफिरों ठाइं पाडावा । साधुजन ॥ २६ ॥
उदंड हुडकावे संत । सांपडे प्रचितीचा महंत ।
प्रचितीविण स्वहित । होणार नाहीं ॥ २७ ॥
प्रपंच अथवा परमार्थ । प्रचितीविण अवघें वेर्थ ।
प्रत्ययेज्ञानी तो समर्थ । सकळांमध्यें ॥ २८ ॥
रात्रंदिवस पाहावा अर्थ । अर्थ पाहेल तो समर्थ ।
परलोकींच निजस्वार्थ । तेथेंचि घडे ॥ २९ ॥
म्हणौन पाहिलेंचि पाहावें । आणि शोधिलेंचि शोधावें ।
अवघें कळतां स्वभावें । संदेह तुटती ॥ ३० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सूक्ष्मनामाभिधाननिरूपणनाम समास तिसरा ॥
समास चौथा : आत्मानिरूपण
॥ श्रीराम ॥
सकळ जनास प्रार्थना । उगेंच उदास करावेंना ।
निरूपण आणावें मना । प्रत्ययाचें ॥ १ ॥
प्रत्यये राहिला येकेकडे । आपण धांवतो भलतेकडे ।
तरी सारासाराचे निवाडे । कैसे होती ॥ २ ॥
उगिच पाहातां सृष्टी । गल्बला दिसतो दृष्टीं ।
परी ते राजसत्तेची गोष्टी । वेगळीच ॥ ३ ॥
पृथ्वीमधें जितुकीं शरीरें । तितुकीं भगवंताचीं घरें ।
नाना सुखें येणें द्वारें । प्राप्त होती ॥ ४ ॥
त्याचा महिमा कळेल कोणाला । माता वांटून कृपाळु जाला ।
प्रत्यक्ष जगदीश जगाला । रक्षितसे ॥ ५ ॥
सत्त पृथ्वीमधें वांटली । जेथें तेथें विभागली ।
कळेनें सृष्टि चालिली । भगवंताचे ॥ ६ ॥
मूळ जाणत्या पुरुषाची सत्ता । शरीरीं विभागली तत्वता ।
सकळ कळा चातुर्यता । तेथें वसे ॥ ७ ॥
सकळ पुराचा ईश । जगामध्यें तो जगदीश ।
नाना शरीरीं सावकास । करूं लागे ॥ ८ ॥
पाहातां सृष्टिची रचना । ते येकाचेन चालेना ।
येकचि चालवी नाना । देह धरुनी ॥ ९ ॥
नाहीं उंच नीच विचारिलें । नाहीं बरें वाईट पाहिलें ।
कार्ये चालों ऐसें जालें । भगवंतासी ॥ १० ॥
किंवा नेणणें आडवें केलें । किंवा अभ्यासीं घातलें ।
हें कैसें कैसें केलें । त्याचा तोचि जाणे ॥ ११ ॥
जगदांतरीं अनुसंधान । बरें पाहाणें हेंचि ध्यान ।
ध्यान आणी तें ज्ञान । येकरूप ॥ १२ ॥
प्राणी संसारास आला । कांहीं येक शाहाणा जाला ।
मग तो विवरों लागला । भूमंडळीं ॥ १३ ॥
प्रगट रामाचें निशाण । आत्माराम ज्ञानघन ।
विश्वंभर विद्यमान । भाग्यें कळे ॥ १४ ॥
उपासना धुंडुन वासना धरिली । तरी ते लांबतचि गेली ।
महिमा न कळे बोलिली । येथार्थ आहे ॥ १५ ॥
द्रष्टा म्हणिजे पाहाता । साक्षी म्हणिजे जाणता ।
अनंतरूपी अनंता । वोळखावें ॥ १६ ॥
संगती असावी भल्यांची । धाटी कथा निरूपणाची ।
कांहीं येक मनाची । विश्रांती आहे ॥ १७ ॥
त्याहिमधें प्रत्ययेज्ञान । जाळून टाकिला अनुमान ।
प्रचितीविण समाधान । पाविजेल कैंचें ॥ १८ ॥
मूळसंकल्प तो हरिसंकल्प । मूळमायेमधील साक्षेप ।
जगदांतरीं तेंचि रूप । देखिजेतें ॥ १९ ॥
उपासना ज्ञानस्वरूप । ज्ञानीं चौथा देह आरोप ।
याकारणें सर्व संकल्प । सोडून द्यावा ॥ २० ॥
पुढें परब्रह्म विशाळ । गगनासारिखें पोकळ ।
घन पातळ कोमळ । काये म्हणावें ॥ २१ ॥
उपासना म्हणिजे ज्ञान । ज्ञानें पाविजे निरंजन ।
योगियांचें समाधान । येणें रितीं ॥ २२ ॥
विचार नेहटूनसा पाहे । तरी उपासना आपणचि आहे ।
येक जाये एक आहे । देह धरुनी ॥ २३ ॥
अखंड ऐसी घालमेली । पूर्वापार होत गेली ।
आतां हि तैसीच चालिली । उत्पत्ति स्थिती ॥ २४ ॥
बनावरी बनचरांची सत्ता । जळावरी जळचरांची सत्ता ।
भूमंडळीं भूपाळां समस्तां । येणेंचि न्यायें ॥ २५ ॥
सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें ।
परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ॥ २६ ॥
कर्ता जगदीश हें तों खरें । परी विभाग आला पृथकाकारें ।
तेथें अहंतेचें काविरें । बाधिजेना ॥ २७ ॥
हरिर्दाता हरिर्भोक्ता । ऐसें चालतें तत्वता ।
ये गोष्टीचा आतां । विचार पाहावा ॥ २८ ॥
सकळ कर्ता परमेश्वरु । आपला माइक विचारु ।
जैसें कळेल तैसें करूं । जगदांतरें ॥ २९ ॥
देवायेवढें चपळ नाहीं । ब्रह्मायेवढें निश्चळ नाहीं ।
पाइरी चढोन पाहीं । मूळपरियंत ॥ ३० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मानिरूपणनाम समास चौथा ॥
समास पांचवा : चत्वारजिन्नसनिरूपण
॥ श्रीराम ॥
येथून पाहातां तेथवरी । चत्वार जीनस अवधारीं ।
येक चौदा पांच च्यारी । ऐसें आहे ॥ १ ॥
परब्रह्म सकळांहून वेगळें । परब्रह्म सकळांहून आगळें ।
नाना कल्पनेनिराळें । परब्रह्म तें ॥ २ ॥
परब्रह्माचा विचार । नाना कल्पनेहून पर ।
निर्मळ निश्चळ निर्विकार । अखंड आहे ॥ ३ ॥
परब्रह्मास कांहींच तुळेना । हा येक मुख्य जिनसाना ।
दुसरा जिनस नाना कल्पना । मूळमाया ॥ ४ ॥
नाना सूक्ष्मरूप । सूक्ष्म आणी कर्दमरूप ।
मुळींच्या संकल्पाचा आरोप । मूळमाया ॥ ५ ॥
हरिसंकल्प मुळींचा । आत्माराम सकळांचा ।
संकेत नामाभिधानाचा । येणें प्रकारें ॥ ६ ॥
निश्चळीं चंचळ चेतलें । म्हणौनि चैतन्य बोलिलें ।
गुणसामानत्वें जालें । गुणसाम्य ऐसें ॥ ७ ॥
अर्धनारीनटेश्वर । तोचि शड्गुणैश्वर ।
प्रकृतिपुरुषाचा विचार । शिवशक्ती ॥ ८ ॥
सुद्धसत्वगुणाची मांडणी । अर्धमात्रा गुणक्षोभिणी ।
पुढें तिही गुणांची करणी । प्रगट जाली ॥ ९ ॥
मन माया अंतरात्मा । चौदा जिनसांची सीमा ।
विद्यमान ज्ञानात्मा । इतुके ठाइं ॥ १० ॥
ऐसा दुसरा जिनस । अभिधानें चतुर्दश ।
आतां तिसरा जिनस । पंचमाहाभूतें ॥ ११ ॥
येथें पाहातां जाणीव थोडी । आदिअंत हे रोकडी ।
खाणी निरोपिल्या तांतडी । तो चौथा जिनस ॥ १२ ॥
च्यारी खाणी अनंत प्राणी । जाणीवेची जाली दाटणी ।
च्यारी जिनस येथूनी । संपूर्ण जाले ॥ १३ ॥
बीज थोडें पेरिजेतें । पुढें त्याचें उदंड होतें ।
तैसें जालें आत्मयातें । खाणी वाणी प्रगटतां ॥ १४ ॥
ऐसी सत्ता प्रबळली । थोडे सत्तेचि उदंड जाली ।
मनुष्यवेषें सृष्टी भोगिली । नान प्रकारें ॥ १५ ॥
प्राणी मारून स्वापद पळे । वरकड त्यास काये कळे ।
नाना भोग तो निवळे । मनुष्यदेहीं ॥ १६ ॥
नाना शब्द नाना स्पर्श । नाना रूप नाना रस ।
नाना गंध ते विशेष । नरदेह जाणे ॥ १७ ॥
अमोल्य रत्नें नाना वस्त्रें । नाना यानें नाना शस्त्रें ।
नाना विद्या कळा शास्त्रें । नरदेह जाणे ॥ १८ ॥
पृथ्वी सत्तेनें व्यापिली । स्थळोस्थळीं आटोपिली ।
नाना विद्या कळा केली । नाना धारणा ॥ १९ ॥
दृश्य अवघेंचि पाहावें । स्थानमान सा।म्भाळावें ।
सारासार विचारावें । नरदेहे जालियां ॥ २० ॥
येहलोक आणी परलोक । नाना प्रकारींचा विवेक ।
विवेक आणी अविवेक । मनुष्य जाणे ॥ २१ ॥
नाना पिंडीं ब्रह्मांडरचना । नाना मुळींची कल्पना ।
नाना प्रकारीं धारणा । मनुष्य जाणे ॥ २२ ॥
अष्टभोग नवरस । नाना प्रकारींचा विळास ।
वाच्यांश लक्ष्यांश सारांश । मनुष्य जाणे ॥ २३ ॥
मनुष्यें सकळांस आळिलें । त्या मनुष्यास देवें पाळिलें ।
ऐसें हें अवघें कळलें । नरदेहयोगें ॥ २४ ॥
नरदेह परम दुल्लभ । येणें घडे अलभ्य लाभ ।
दुल्लभ तें सुल्लभ । होत आहे ॥ २५ ॥
बरकड देहे हें काबाड । नरदेह मोठें घबाड ।
परंतु पाहिजे जाड । विवेकरचना ॥ २६ ॥
येथें जेणें आळस केला । तो सर्वस्वें बुडाला ।
देव नाहीं वोळखिला । विवेकबळें ॥ २७ ॥
नर तोचि नारायेण । जरी प्रत्ययें करी श्रवण ।
मननशीळ अंतःकर्ण । सर्वकाळ ॥ २८ ॥
जेणें स्वयेंचि पोहावें । त्यास कासेस नलगे लागावें ।
स्वतंत्रपणें शोधावें । सकळ कांहीं ॥ २९ ॥
सकळ शोधून राहिला । संदेह कैचा तयाला ।
पुढें विचार कैसा जाला । त्याचा तोचि जाणे ॥ ३० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चत्वारजिनसनाम समास पांचवा ॥
समास सहावा : आत्मागुणनिरूपण
॥ श्रीराम ॥
पाहों जातां भूमंडळ । ठाईं ठाईं आहे जळ ।
कित्तेक तें निर्मळ माळ । जळेंविण पृथ्वी ॥ १ ॥
तैसें दृश्य विस्तारलें । कांहींयेक जाणिवेनें शोभलें ।
जाणीवरहित उरलें । कीतीयेक दृश्य ॥ २ ॥
च्यारी खाणी च्यारी वाणी । चौर्यासी लक्ष जीवयोनी ।
शास्त्रीं अवघें नेमुनी । बोलिलें असे ॥ ३ ॥
श्लोक ॥ जलजा नवलक्षाश्च दशलक्षाश्च पक्षिणः । कृमयो रुद्रलक्षाश्च विंशल्लक्षा गवादयः ॥
स्थावरा स्त्रिंशल्लक्षाश्च चतुर्लक्षाश्च मानवाः । पापपुण्यं समं कृत्वा नरयोनिषु जायते ॥
मनुष्यें च्यारी लक्ष । पशु वीस लक्ष ।
क्रिम आक्रा लक्ष । बोलिलें शास्त्रीं ॥ ४ ॥
दाहा लक्ष ते खेचर । नव लक्ष जळचर ।
तीस लक्ष स्थावर । बोलिलें शास्त्रीं ॥ ५ ॥
ऐसी चौर्यासी लक्ष योनी । जितुका तितुका जाणता प्राणी ।
अनंत देह्याची मांडणी । मर्यादा कैंची ॥ ६ ॥
अनंत प्राणी होत जाती । त्यांचें अधिष्ठान जगती ।
जगतीवेगळी स्थिती । त्यास कैंची ॥ ७ ॥
पुढें पाहातां पंचभूतें । पावलीं पष्टदशेतें ।
कोणी विद्यमान कोणी तें । उगीच असती ॥ ८ ॥
अंतरात्म्याची वोळखण । तेचि जेथें चपळपण ।
जाणीवेचें अधिष्ठान । सावध ऐका ॥ ९ ॥
सुखदुख जाणता जीव । तैसाचि जाणावा सद शिव ।
अंतःकर्णपंचक अपूर्व । अंश आत्मयाचा ॥ १० ॥
स्थुळीं आकाशाचे गुण । अंश आत्मयाचे जाण ।
सत्व रज तमोगुण । गुण आत्मयाचे ॥ ११ ॥
नाना चाळणा नाना धृती । नवविधा भक्ति चतुर्विधा मुक्ती ।
अलिप्तपण सहजस्थिती । गुण आत्मयाचे ॥ १२ ॥
द्रष्टा साक्षी ज्ञानघन । सत्ता चैतन्य पुरातन ।
श्रवण मनन विवरण । गुण आत्मयाचे ॥ १३ ॥
दृश्य द्रष्टा दर्शन । ध्येय ध्याता ध्यान ।
ज्ञेय ज्ञाता ज्ञान । गुण आत्मयाचे ॥ १४ ॥
वेदशास्त्रपुराणार्थ । गुप्त चालिला परमार्थ ।
सर्वज्ञपणें समर्थ । गुण आत्मयाचे ॥ १५ ॥
बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध । विचार पाहाणें शुद्ध ।
बोध आणी प्रबोध । गुण आत्मयाचे ॥ १६ ॥
जागृति स्वप्न सुषुप्ति तुर्या । प्रकृतिपुरुष मूळमाया ।
पिंड ब्रह्मांड अष्टकाया । गुण आत्मयाचे ॥ १७ ॥
परमात्मा आणि परमेश्वरी । जगदात्मा आणीई जगदेश्वरी ।
महेश आणी माहेश्वरी । गुण आत्मयाचे ॥ १८ ॥
सूक्ष्म जितुकें नामरूप । तितुकें आत्मयाचें स्वरूप ।
संकेतनामाभिधानें अमूप । सीमा नाहीं ॥ १९ ॥
आदिशक्ती शिवशक्ती । मुख्य मूळमाया सर्वशक्ती ।
नाना जीनस उत्पती स्थिती । तितुके गुण आत्मयाचे ॥ २० ॥
पूर्वपक्ष आणी सिद्धांत । गाणें वाजवणें संगीत ।
नाना विद्या अद्भुत । गुण आत्मयाचे ॥ २१ ॥
ज्ञान अज्ञान विपरीतज्ञान । असद्वृति सद्वृति जाण ।
ज्ञेप्तिमात्र अलिप्तपण । गुण आत्मयाचे ॥ २२ ॥
पिंड ब्रह्मांड तत्वझाडा । नाना तत्वांचा निवाडा ।
विचार पाहाणें उघडा । गुण आत्मयाचे ॥ २३ ॥
नाना ध्यानें अनुसंधानें । नाना स्थिति नाना ज्ञानें ।
अनन्य आत्मनिवेदनें । गुण आत्मयाचे ॥ २४ ॥
तेतीस कोटी सुरवर । आठ्यासी सहश्र ऋषेश्वर ।
भूत खेचर अपार । गुण आत्मयाचे ॥ २५ ॥
भूतावळी औट कोटी । च्यामुंडा छपन्न कोटी ।
कात्यायेणी नव कोटी । गुण आत्मयाचे ॥ २६ ॥
चंद्र सूर्य तारामंडळें । नाना नक्षत्रें ग्रहमंडळें ।
शेष कूर्म मेघमंडळें । गुण आत्मयाचे ॥ २७ ॥
देव दानव मानव । नाना प्रकारीचे जीव ।
पाहातां सकळ भावाभाव । गुण आत्मयाचे ॥ २८ ॥
आत्मयाचे नाना गुण । ब्रह्म निर्विकार निर्गुण ।
जाणणें येकदेसी पूर्ण । गुण आत्मयाचे ॥ २९ ॥
आत्मरामौपासना । तेणें पावले निरंजना ।
निसंदेहे अनुष्ठना । ठावचि नाहीं ॥ ३० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मागुणनिरूपणनाम समास सहावा ॥
समास सातवा : आत्मानिरूपण
॥ श्रीराम ॥
अनुर्वाच्य समाधान जालें । तें पाहिजे बोलिलें ।
बोलिल्यासाठीं समाधान गेलें । हें तों घडेना ॥ १ ॥
कांहीं सांडावें लागत नाहीं । कांहीं मांडावें लागत नाहीं ।
येक विचार शोधून पाहीं । म्हणिजे कळे ॥ २ ॥
मुख्य कासीविश्वेश्वर । श्वेतबंद रामेश्वर ।
मलकार्जुन भीमाशंकर । गुण आत्मयाचे ॥ ३ ॥
जैसीं मुख्य बारा लिंगें । यावेगळीं अनंत लिंगें ।
प्रचित जाणिजेत जगें । गुण आत्मयाचे ॥ ४ ॥
भूमंडळीं अनंत शक्ति । नाना साक्षात्कार चमत्कार होती ।
नाना देवांच्या सामर्थ्यमूर्ती । गुण आत्मयाचे ॥ ५ ॥
नाना सिद्धांचीं सामर्थ्यें । नाना मंत्रांचीं सामर्थ्यें ।
नानामोहरेवल्लींत सामर्थ्यें । गुण आत्मयाचे ॥ ६ ॥
नाना तीर्थांचीं सामर्थ्यें । नाना क्षेत्रांचीं सामर्थ्यें ।
नाना भूमंडळीं सामर्थ्यें । गुण आत्मयाचे ॥ ७ ॥
जितुके कांहीं उत्तम गुण । तितुकें आत्मयाचें लक्षण ।
बरें वाईट तितुकें जाण । आत्म्याचकरितां ॥ ८ ॥
शुद्ध आत्मा उत्तम गुणी । सबळ आत्मा अवलक्षणी ।
बरी वाईट आवघी करणी । आत्मयाची ॥ ९ ॥
नाना साभिमान धरणें । नाना प्रतिसृष्टी करणें ।
नाना श्रापौश्रापलक्षणें आत्मयाचेनी ॥ १० ॥
पिंडाचा बरा शोध घ्यावा । तत्वांचा पिंड शोधावा ।
तत्वें शोधितां पिंड आघवा । कळों येतो ॥ ११ ॥
जड देह भूतांचा । चंचळ गुण आत्मयाचा ।
निश्चळ ब्रह्मावेगळा ठाव कैचा । जेथें तेथें ॥ १२ ॥
निश्चळ चंचळ आणी जड । पिंडीं करावा निवाड ।
प्रत्ययवेगळें जाड । बोलणें नाहीं ॥ १३ ॥
पिंडामधून आत्मा जातो । तेव्हां निवाडा कळों येतो ।
देहे जड हा पडतो । देखतदेखतां ॥ १४ ॥
जड तितुकें पडिलें । चंचळ तितुकें निघोनी गेलें ।
जडचंचळाचें रूप आलें । प्रत्ययासी ॥ १५ ॥
निश्चळ आहे सकळां ठाईं । हें तों पाहाणें नलगे कांहीं ।
गुणविकार तेथें नाहीं । निश्चळासी ॥ १६ ॥
जैसें पिंड तैसें ब्रह्मांड । विचार दिसतो उघड ।
जड चंचळ जातां जाड । परब्रह्मचि आहे ॥ १७ ॥
माहांभूतांचा खंबीर केला । आत्मा घालून पुतळा जाला ।
चालिला सृष्टीचा गल्बला । येणें रितीं ॥ १८ ॥
आत्मा माया विकार करी । आळ घालिती ब्रह्मावरी ।
प्रत्ययें सकळ कांहीं विवरी । तोचि भला ॥ १९ ॥
ब्रह्म व्यापक अखंड । वरकड व्यापकता खंड ।
शोधून पाहातं जड । कांहींच नाहीं ॥ २० ॥
गगनासी खंडता नये । गगनाचें नासेल काये ।
जरी जाला माहांप्रळये । सृष्टीसंव्हार ॥ २१ ॥
जें संव्हारामध्यें सापडले । तें सहजचि नासिवंत जालें ।
जाणते लोकीं उगविलें । पाहिजे कोडें ॥ २२ ॥
न कळतां वाटे कोडें । कळतां आवघें दिसें उघडें ।
म्हणोनी येकांतीं निवाडे । विचार पाहावा ॥ २३ ॥
मिळता प्रत्ययाचे संत । येकांपरीस येकांत ।
केली पाहिजे सावचित । नाना चर्चा ॥ २४ ॥
पाहिल्यावेगळें कळत नाहीं । कळतां कळतां संदेह नाहीं ।
विवेक पाहातां कोठेंचि नाहीं । मायाजाळ ॥ २५ ॥
गगनीं आभाळ आलें । मागुती सवेंचि उडालें ।
आत्म्याकरितां दृश्य जालें । उडेल तैसें ॥ २६ ॥
मुळापासून सेवटवरी । विवेकी विवेकें विवरी ।
तोचि निश्चय थावरी । चळेना ऐसा ॥ २७ ॥
वरकड निश्चय अनुमानाचे । अनुमानें बोलतां काये वेंचे ।
जाणते पुरुष प्रचितीचे । ते तों मानीतना ॥ २८ ॥
उगेंच बोलणें अनुमानाचें । अनुमानाचें कोण्या कामाचें ।
येथें सगट विचाराचें । काम नाहीं ॥ २९ ॥
सगट विचार तो अविचार । कित्येक म्हणती येकंकार ।
येकंकार भ्रष्टाकार । करूं नये ॥ ३० ॥
कृत्रिम अवघें सांडावें । कांहीं येक शुद्ध घ्यावें ।
जाणजाणों निवडावें । सारासार ॥ ३१ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मानिरूपणनाम समास सतवा ॥
समास आठवा : देहेक्षेत्रनिरूपण
॥ श्रीराम ॥
विधीप्रपंचतरु वाढला । वाढतां वाढतां विस्तीर्ण जाला ।
फळें येतां विश्रांती पावला । बहुत गुणी ॥ १ ॥
नाना फळें रसाळें लागलीं । नाना जिनसी गोडीस आलीं ।
गोडी पाहावया निर्माण केलीं । नाना शरीरें ॥ २ ॥
निर्माण जाले उत्तम विषये । शरीरेंविण भोगितां नये ।
म्हणोनी निर्मिला उपाये । नाना शरीरें ॥ ३ ॥
ज्ञानैंद्रियें निर्माण केलीं । भिन्न भिन्न गुणांचीं निर्मिलीं ।
येका शरीरासी लागलीं । परी वेगळालीं ॥ ४ ॥
श्रोत्रैंद्रिंई शब्द पडिला । त्याचा भेद पाहिजे कळला ।
ऐसा उपाये निर्माण केला । इंद्रियांमधें ॥ ५ ॥
त्वचेइंद्रियें सीतोष्ण भासे । चक्षुइंद्रियें सकळ दिसे ।
इंद्रियांमधें गुण ऐसे । वेगळाले ॥ ६ ॥
जिव्हेमधें रस चाखणें । घ्राणामधें परिमळ घेणें ।
इंद्रियांमधें वेगळाल्या गुणें । भेद केले ॥ ७ ॥
वायोपंचकीं अंतःकर्णपंचक । मिसळोनि फिरे निशंक ।
ज्ञानैंद्रियें कर्मैंद्रियें सकळिक । सावकास पाहे ॥ ८ ॥
कर्मैंद्रियें लागवेगीं । जीव भोगीं विषयांलागीं ।
ऐसा हा उपाये जगीं । ईश्वरें केला ॥ ९ ॥
निषय निर्माण जाले बरवे । शरीरेंविण कैसें भोगावे ।
नाना शरीराचे गोवे । याकारणें ॥ १० ॥
अस्तीमांशाचे शरीर । त्यामधें गुणप्रकार ।
शरीरासारिखें यंत्र । आणीक नाहीं ॥ ११ ॥
ऐसीं शरीरें निर्माण केलीं । विषयभोगें वाढविलीं ।
लाहानथोर निर्माण जालीं । येणें प्रकारें ॥ १२ ॥
अस्तीमांशांचीं शरीरें । निर्माण केली जगदेश्वरें ।
विवेकें गुणविचारें । करूनियां ॥ १३ ॥
अस्तिमौंशाचा पुतळा । जेणें ज्ञानें सकळ कळा ।
शरीरभेद वेगळा । ठाईं ठाईं ॥ १४ ॥
तो भेद कार्याकारण । त्याचा उदंड आहे गुण ।
सकळ तीक्ष्ण बुद्धीविण । काये कळे ॥ १५ ॥
सकळ करणें ईश्वराला । म्हणोनी भेद निर्माण जाला ।
ऊर्धमुख होतां भेदाला । ठाव कैंचा ॥ १६ ॥
सृष्टिकर्णीं आगत्य भेद । संव्हारें सहजचि अभेद ।
भेद अभेद हा संवाद । मायागुणें ॥ १७ ॥
मायेमधें अंतरात्मा । नकळे तयाचा महिमा ।
जाला चतुर्मुख ब्रह्मा । तोहि संदेहीं पडे ॥ १८ ॥
पीळ पेंच कडोविकडीं । तर्क तीक्षण घडीनें घडी ।
मनासी होये तांतडी । विवरण करितां ॥ १९ ॥
आत्मत्वें लागतें सकळ कांहीं । निरंजनीं हे कांहींच नाहीं ।
येकांतकाळीं समजोन पाहीं । म्हणिजे बरें ॥ २० ॥
देहे सामर्थ्यानुसार । सकळ करी जगदेश्वर ।
थोर सामर्थ्यें अवतार । बोलिजेती ॥ २१ ॥
शेष कूर्म वऱ्हाव जाले । येवढे देहे विशाळ धरिले ।
तेणें करितां रचना चाले । सकळ सृष्टीची ॥ २२ ॥
ईश्वरें केवढें सूत्र केलें । सूर्यबिंब धावाया लाविलें ।
धुकटाकरवीं धरविलें । अगाध पाणी ॥ २३ ॥
पर्वताऐसे ढग उचलिती । सूर्यबिंबासी अछ्यादिति ।
तेथें सवेंचि वायोची गती । प्रगट होये ॥ २४ ॥
झिडकझिडकुं धांवे वारा । जैसा काळाचा म्हणियारा ।
ढग मारुनी दिनकरा । मोकळे करी ॥ २५ ॥
बैसती विजांचे तडाखे । प्राणीमात्र अवचिता धाके ।
गगन कडकडून तडके । स्थळांवरी ॥ २६ ॥
येहलोकासी येक वर्म केलें । महद्भूतें महद्भूत आळिलें ।
सकळां समभागें चालिलें । सृष्टिरचनेसी ॥ २७ ॥
ऐसे अनंत भेद आत्मयाचे । सकळ जाणती ऐसे कैंचें ।
विवरतां विवरतां मनाचे । फडके होती ॥ २८ ॥
ऐसी माझी उपासना । उपासकीं आणावी मना ।
अगाध महिमा चतुरानना । काये कळे ॥ २९ ॥
आवाहन विसर्जन । हें चि भजनाचें लक्षण ।
सकळ जाणती सज्जन । मी काय सांगों ॥ ३० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे देहेक्षेत्रनिरूपणनाम समास आठवा ॥
समास नववा : स्य्य्क्ष्मनिरूपण
॥ श्रीराम ॥
मृतिकापूजन करावें । आणी सवेंचि विसर्जावें ।
हें मानेना स्वभावें । अंतःकर्णासी ॥ १ ॥
देव पूजावा आणी टाकावा । हें प्रशस्त न वटे जीवा ।
याचा विचार पाहावा । अंतर्यामीं ॥ २ ॥
देव करिजे ऐसा नाहीं । देव टाकिजे ऐसा नाहीं ।
म्हणोनि याचा कांहीं । विचार पाहावा ॥ ३ ॥
देव नाना शरीरें धरितो । धरुनी मागुती सोडितो ।
तरी तो देव कैसा आहे तो । विवेकें वोळखावा ॥ ४ ॥
नाना साधनें निरूपणें । देव शोधायाकारणें ।
सकळ आपुले अंतःकर्णें । समजलें पाहिजे ॥ ५ ॥
ब्रह्मज्ञाचा उपाये । समजल्याविण देतां नये ।
पदार्थ आहे मा घे जाये । ऐसें म्हणावें ॥ ६ ॥
सगट लोकांचे अंतरींचा भाव । मज प्रतक्ष भेटवावा देव ।
परंतु विवेकाचा उपाव । वेगळाचि आहे ॥ ७ ॥
विचार पाहातां तगेना । त्यास देव ऐसें म्हणावेना ।
परंतु जन राहेना । काये करावें ॥ ८ ॥
थोर लोक मरोनि जाती । त्यांच्या सुरता करुनी पाहाती ।
तैसीच आहे हेहि गती । उपासनेची ॥ ९ ॥
थोर व्यापार ठाकेना जनीं । म्हणोनि केली रखतवानी ।
राजसंपदा तयाचेनी । प्राप्त कैची ॥ १० ॥
म्हणोनि जितुका भोळा भाव । तितुका अज्ञानाचा स्वभाव ।
अज्ञानें तरी देवाधिदेव । पाविजेल कैचा ॥ ११ ॥
अज्ञासी ज्ञान न माने । ज्ञात्यास अनुमान न माने ।
म्हणोनि सिद्धांचिये खुणें । पावलें पाहिजे ॥ १२ ॥
माया सांडून मुळास जावें । तरीच समाधान पावावें ।
ऐसें न होतां भरंगळावें । भलतीकडे ॥ १३ ॥
माया उलंघायाकारणें । देवासी नाना उपाय करणें ।
अध्यात्मश्रवणपंथेंचि जाणें । प्रत्ययानें ॥ १४ ॥
ऐसें न करितां लोकिकीं । अवघीच होते चुकामुकी ।
स्थिति खरी आणि लटकी । ऐसी वोळखावी ॥ १५ ॥
खोट्याचे वाटे जाऊं नये । खोट्याची संगती धरूं नये ।
खोटें संग्रहीं करूं नये । कांहींयेक ॥ १६ ॥
खोटें तें खोटेंचि खोटें । खर्यासी तगेनात बालटें ।
मन अधोमुख उफराटें । केलें पाहिजे ॥ १७ ॥
अध्यात्मश्रवण करीत जावें । म्हणिजे सकळ कांहीं फावे ।
नाना प्रकारीचे गोवे । तुटोनी जाती ॥ १८ ॥
सूत गुंतलें तें उकलावें । तैसे मन उगवावें ।
मानत मानत घालावें । मुळाकडे ॥ १९ ॥
सकळ कांहीं कालवलें । त्या सकळाचें सकळ जालें ।
शरीरीं विभागले । सकळ कांहीं ॥ २० ॥
काये तें येथेंचि पाहावें । कैसें तें येथेंचि शोधावें ।
सूक्ष्माचीं चौदा नांवें । येथेंचि समजावी ॥ २१ ॥
निर्गुण निर्विकारी येक । तें सर्वां ठाईं व्यापक ।
देह्यामधें तें निष्कळंक । आहे कीं नाहीं ॥ २२ ॥
मूळमाया संकल्परूप । तें अंतःकर्णाचें स्वरूप ।
जड चेतवी चैतन्यरूप । तें हि शरीरीं आहे ॥ २३ ॥
समानगुण गुणसाम्य । सूक्ष्म विचार तो अगम्य ।
सूक्ष्म साधु जाणते प्रणम्य । तया समस्तांसी ॥ २४ ॥
द्विधा भासतें शरीर । वामांग दक्षिणांग विचार ।
तोंचि अर्धनारीनटेश्वर । पिंडीं वोळखावा ॥ २५ ॥
तोचि प्रकृतिपुरुष जाणिजे । शिवशक्ती वोळखिजे ।
शडगुणईश्वर बोलिजे । तया कर्दमासी ॥ २६ ॥
तयासीच म्हणिजे महत्तत्त्व । जेथें त्रिगुणाचें गूढत्व ।
अर्धमात्रा शुद्धसत्व । गुणक्षोभिणा ॥ २७ ॥
त्रिगुणें चालतें शरीर । प्रतक्ष दिसतो विचार ।
मुळींच्या कर्दमाचें शरीर । ऐसें जाणावें ॥ २८ ॥
मन माया आणि जीव । हाहि दिसतो स्वभाव ।
चौदा नामांचा अभिप्राव । पिंडीं पाहावा ॥ २९ ॥
पिंड पडतां अवघेंचि जातें । परंतु परब्रह्म राहातें ।
शाश्वत समजोन मग तें । दृढ धरावें ॥ ३० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सूक्ष्मनिरूपणनाम समास नववा ॥
समास दहावा : विमलब्रह्मनिरूपण
॥ श्रीराम ॥
धरूं जातां धरितां न ये । टाकूं जातां टाकितां न ये ।
जेथें तेथें आहेच आहे । परब्रह्म तें ॥ १ ॥
जिकडे तिकडे जेथें तेथें । विन्मुख होतां सन्मुख होतें ।
सन्मुखपण चुकेना तें । कांहीं केल्या। ॥ २ ॥
बैसलें माणूस उठोन गेलें । तेथें आकाशचि राहिलें ।
आकाश चहुंकडे पाहिलें । तरी सन्मुखचि आहे ॥ ३ ॥
जिकडेतिकडे प्राणी पळोन जातें । तिकडे आकाशचि भोवतें ।
बळें आकाशाबाहेर । कैसें जावें ॥ ४ ॥
जिकडेतिकडे प्राणी पाहे । तिकडे तें सन्मुखचि आहे ।
समस्तांचें मस्तकीं राहे । माध्यानीं मार्तंड जैसा ॥ ५ ॥
परी तो आहे येकदेसी । दृष्टांत न घडे वस्तुसी ।
कांहीं येक चमत्कारासी । देउनी पाहिलें ॥ ६ ॥
नाना तीर्थें नाना देसीं । कष्टत जावें पाहाव्यासी ।
तैसें न लगे परब्रह्मासी । बैसलें ठाईं ॥ ७ ॥
प्राणी बैसोनीच राहातां । अथवा बहुत पळोन जातां ।
परब्रह्म तें तत्वतां । समागमें ॥ ८ ॥
पक्षी अंतराळीं गेलां । भोवतें आकाशचि तयाला ।
तैसे ब्रह्म प्राणीयाला । व्यापून आहे ॥ ९ ॥
परब्रह्म पोकळ घनदाट । ब्रह्म सेवटाचा सेवट ।
ज्यासी त्यासी ब्रह्म नीट । सर्वकाळ ॥ १० ॥
दृश्या सबाहे अंतरीं । ब्रह्म दाटलें ब्रह्मांडोदरीं ।
आरे त्या विमळाची सरी । कोणास द्यावी ॥ ११ ॥
वैकुंठकैळासस्वर्गलोकीं । इंद्रलोकीं चौदा लोकीं ।
पन्नगादिकपाताळलोकीं । तेथेंचि आहे ॥ १२ ॥
कासीपासून रामेश्वर । आवघें दाटलें अपार ।
परता परता पारावार । त्यास नाहीं ॥ १३ ॥
परब्रह्म तें येकलें । येकदांचि सकळांसी व्यापिले ।
सकळांस स्पर्शोन राहिलें । सकळां ठाईं ॥ १४ ॥
परब्रह्म पाउसें भिजेना । अथवा चिखलानें भरेना ।
पुरामधें परी वाहेना । पुरासमागमें ॥ १५ ॥
येकसरें सन्मुक विमुख । वाम सव्य दोहिंकडे येक ।
आर्धऊर्ध प्राणी सकळीक । व्यापून आहे ॥ १६ ॥
आकाशाचा डोहो भरला । कदापी नाहीं उचंबळला ।
असंभाव्य पसरला । जिकडे तिकडे ॥ १७ ॥
येकजिनसि गगन उदास । जेथें नाहीं दृश्यभास ।
भासेंविण निराभास । परब्रह्म जाणावें ॥ १८ ॥
संतसाधुमहानुभावां । देवदानवमानवां ।
ब्रह्म सकळांसी विसांवा । विश्रांतिठाव ॥ १९ ॥
कोणेकडे सेवटा जावें । कोणेकडे काये पाहावें ।
असंभाव्य तें नेमावें । काये म्हणोनी ॥ २० ॥
स्थूळ नव्हे सूक्ष्म नव्हे । कांहीं येकासारिखें नव्हे ।
ज्ञानदृष्टीविण नव्हे समधान ॥ २१ ॥
पिंडब्रह्मांडनिरास । मग तें ब्रह्म निराभास ।
येथून तेथवरी अवकास । भकासरूप ॥ २२ ॥
ब्रह्म व्यापक हें तो खरें । दृश्य आहे तों हें उत्तरें ।
व्यापेंविण कोण्या प्रकारें । व्यापक म्हणावें ॥ २३ ॥
ब्रह्मासी शब्दचि लागेना । कल्पना कल्पूं शकेना ।
कल्पनेतीत निरंजना । विवेकें वोळखावें ॥ २४ ॥
शुद्ध सार श्रवण । शुद्ध प्रत्ययाचें मनन ।
विज्ञानी पावतां उन्मन । सहजचि होतें ॥ २५ ॥
जालें साधनाचें फळ । संसार जाला सफळ ।
निर्गुण ब्रह्म तें निश्चळ । अंतरीं बिंबलें ॥ २६ ॥
हिसेब जाला मायेचा । जाला निवाडा तत्वांचा ।
साध्य होतां साधनाचा । ठाव नाहीं ॥ २७ ॥
स्वप्नीं जें जें देखिलें । तें तें जागृतीस उडालें ।
सहजचि अनुर्वाच्य जालें । बोलतां न ये ॥ २८ ॥
ऐसें हें विवेकें जाणावें । प्रत्ययें खुणेंसी बाणावें ।
जन्ममृत्याच्या नांवें । सुन्याकार ॥ २९ ॥
भक्तांचेनि साभिमानें । कृपा केली दाशरथीनें ।
समर्थकृपेचीं वचनें । तो हा दासबोध ॥ ३० ॥
वीस दशक दासबोध । श्रवणद्वारें घेतां शोध ।
मनकर्त्यास विशद । परमार्थ होतो ॥ ३१ ॥
वीस दशक दोनीसें समास । साधकें पाहावें सावकास ।
विवरतं विशेषाविशेष । कळों लागे ॥ ३२ ॥
ग्रंथाचें करावेंस्तवन । स्तवनाचें काये प्रयोजन ।
येथें प्रत्ययास कारण । प्रत्ययो पाहावा ॥ ३३ ॥
देहे तंव पांचा भूतांचा । कर्ता आत्मा तेथींचा ।
आणी कवित्वप्रकार मनुशाचा । काशावरुनी ॥ ३४ ॥
सकळ करणें जगदीशाचें । आणी कवित्वचि काय मानुशाचें ।
ऐशा अप्रमाण बोलण्याचें काये घावें ॥ ३५ ॥
सकळ देह्याचा झाडा केला । तत्वसमुदाव उडाला ।
तेथें कोण्या पदार्थाला । आपुलें म्हणावें ॥ ३६ ॥
ऐसीं हें विचाराचीं कामें । उगेंच भ्रमों नये भ्रमें ।
जगदेश्वरें अनुक्रमें । सकळ केलें ॥ ३७ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विमळब्रह्मनिरूपणनाम समास दहावा ॥
॥ दशक विसावा समाप्त ॥