दशक पंधरावा - आत्मदशक
॥ श्रीरामसमर्थ ॥
॥ श्रीमत् दासबोध ॥
दशक पंधरावा : आत्मदशक
समास पहिला : चातुर्य लक्षण
॥ श्रीराम ॥
अस्तिमांशांचीं शरीरें । त्यांत राहिजे जीवेश्वरें ।
नाना विकारीं विकारे । प्रविण होइजे ॥ १ ॥
घनवट पोंचट स्वभावें । विवरोन जाणिजे जीवें ।
व्हावें न व्हावें आघवें । जीव जाणे ॥ २ ॥
येंकीं मागमागों घेणें । येकां न मागतांच देणें ।
प्रचीतीनें सुलक्षणें । ओळखावीं ॥ ३ ॥
जीव जीवांत घालावा । आत्मा आत्म्यांत मिसळावा ।
राहराहों शोध घ्यावा । परांतरांचा ॥ ४ ॥
जानवें हेंवडकारें जालें । ढिलेपणें हेवड आलें ।
नेमस्तपणें शोभलें । दृष्टीपुढें ॥ ५ ॥
तैसेंचि हे मनास मन । विवेकें जावें मिळोन ।
ढिलेपणें अनुमान । होत आहे ॥ ६ ॥
अनुमानें अनुमान वाढतो । भिडेनें कार्यभाग नासतो ।
याकारणें प्रत्यये तो । आधीं पाहावा ॥ ७ ॥
दुसर्याचें जीवीचें कळेना । परांतर तें जाणवेना ।
वश्य होती लोक नाना । कोण्या प्रकारें ॥ ८ ॥
आकल सांडून परती । लोक वश्यकर्ण करिती ।
अपूर्णपाणें हळु पडती । ठाईं ठाईं ॥ ९ ॥
जगदीश आहे जगदांतरीं । चेटकें करावीं कोणावरी ।
जो कोणी विवेकें विवरी । तोचि श्रेष्ठ ॥ १० ॥
श्रेष्ठ कार्ये करी श्रेष्ठ । कृत्रिम करी तो कनिष्ठ ।
कर्मानुसार प्राणी नष्ट । अथवा भले ॥ ११ ॥
राजे जाती राजपंथें । चोर जाती चोरपंथें ।
वेडें ठके अल्पस्वार्थें । मूर्खपणें ॥ १२ ॥
मूर्खास वाटे मी शहाणा । परी तो वेडा दैन्यवाणा ।
नाना चातुर्याच्या खुणा । चतुर जाणे ॥ १३ ॥
जो जगदांतरे मिळाला । तो जगदांतरचि जाला ।
अरत्रीं परत्रीं तयाला । काय उणें ॥ १४ ॥
बुद्धि देणें भगवंताचें । बुद्धिविण माणुस काचें ।
राज्य सांडून फुकाचे । भीक मागे ॥ १५ ॥
जें जें जेंथें निर्माण जालं । तें तें तयास मानलें ।
अभिमान देऊन गोविलें । ठाईं ठाईं ॥ १६ ॥
अवघेच म्हणती आम्ही थोर । अवघेचि म्हणती आम्ही सुंदर ।
अवघेचि म्हणती आम्ही चतुर । भूमंडळीं ॥ १७ ॥
ऐसा विचार आणितां मना । कोणीच लाहान म्हणविना ।
जाणते आणिती अनुमाना । सकळ कांहीं ॥ १८ ॥
आपुलाल्या साभिमानें । लोक चालिले अनुमानें ।
परंतु हें विवेकानें । पाहिलें पाहिजे ॥ १९ ॥
लटिक्याचा साभिमान घेणें । सत्य अवघेंच सोडणें ।
मूर्खपणाचीं लक्षणें । ते हे ऐसीं ॥ २० ॥
सत्याचा जो साभिमान । तो जाणावा निराभिमान ।
न्याये अन्याये समान । कदापि नव्हे ॥ २१ ॥
न्याये म्हणिजे तो शाश्वत । अन्याये म्हणिजे तो अशाश्वत ।
बाष्कळ आणि नेमस्त । येक कैसा ॥ २२ ॥
येक उघड भाग्य भोगिती । येक तश्कर पळोन जाती ।
येकांची प्रगट महंती । येकांची कानकोंडी ॥ २३ ॥
आचारविचारेंविण । जें जें करणें तो तो सीण ।
धूर्त आणि विचक्षण । तेचि शोधावे ॥ २४ ॥
उदंड बाजारी मिळाले । परी ते धूर्तेंचि आळिले ।
धूर्तांपासीं कांहीं न चले । बाजार्यांचें ॥ २५ ॥
याकारणें मुख्य मुख्य । तयांसी करावे सख्य ।
येणेंकरितां असंख्य । बाजारी मिळती ॥ २६ ॥
धूर्तासि धूर्तचि आवडे । धूर्त धूर्तींच पवाडे ।
उगेंचि हिंडती वेडे । कार्येंविण ॥ २७ ॥
धूर्तासि धूर्तपण कळलें । तेणें मनास मनपण मिळालें ।
परी हें गुप्तरूपें केलें । पाहिजे सर्वे ॥ २८ ॥
समर्थाचें राखतां मन । तेथे येती उदंड जन ।
जन आणि सज्जन । आर्जव करिती ॥ २९ ॥
वोळखीनें वोळखी साधावी । बुद्धीनें बुद्धि बोधावी ।
नीतिन्यायें वाट रोधावी । पाषांडाची ॥ ३० ॥
वेष धरावा बावळा । अंतरीं असाव्या नाना कळा ।
सगट लोकांचा जिव्हाळा । मोडूं नये ॥ ३१ ॥
निस्पृह आणि नित्य नूतन । प्रत्ययाचें ब्रह्मज्ञान ।
प्रगट जाणतां सज्जन । दुल्लभ जगीं ॥ ३२ ॥
नाना जिनसपाठांतरें निवती सकळांचीं अंतरें ।
चंचळपणें तदनंतरें । सकळां ठाईं ॥ ३३ ॥
येके ठाईं बैसोन राहिला । तरी मग व्यापचि बुडाला ।
सावधपणें ज्याला त्याला । भेटि द्यावी ॥ ३४ ॥
भेटभेटों जरी राखणें । हे चातुर्याचीं लक्षणें ।
मनुष्यमात्र उत्तम गुणें । समाधान पावे ॥ ३५ ॥
इति श्रीदासबोचे गुरुशिष्यसंवादे चातुर्यलक्षणनाम समास पहिला ॥
समास दुसरा : निःस्पृह व्याप
॥ श्रीराम ॥
पृथ्वीमधें मानवी शरीरें । उदंड दाटलीं लाहान थोरें ।
पालटती मनोविकारें । क्षणाक्षणा ॥ १ ॥
जितुक्या मूर्ती तितुक्याच प्रकृती । सारिख्या नस्ती आदिअंतीं ॥
नेमचि नाहीं पाहावें किती । काये म्हणोनी ॥ २ ॥
कित्येक म्लेंच होऊन गेले । कित्येक फिरंगणांत आटले ।
देशभाषानें रुधिले । कीतीयेक ॥ ३ ॥
मऱ्हाष्टदेश थोडा उरला । राजकारनें लोक रुधिला ।
अवकाश नाहीं जेवायाला । उदंड कामें ॥ ४ ॥
कित्येक युद्धप्रसंगी गुंतले । तेणें गुणें उन्मत्त जाले ।
रात्रंदिवस करूं लागले । युद्धचर्चा ॥ ५ ॥
उदिम्यास व्यासंग लागला । अवकाश नाहींसा जाला ।
अवघा पोटधंदाच लागला । निरंतर ॥ ६ ॥
शडदर्शनें नाना मतें । पाषांडें वाढली बहुतें ।
पृथिवीमधें जेथ तेथें । उपदेसिती ॥ ७ ॥
स्मार्थीं आणि वैष्णवी । उरलीं सुरलीं नेलीं आघवी ।
ऐसी पाहातां गथागोवी । उदंड जाली ॥ ८ ॥
कित्येक कामनेचे भक्त । ठाइं ठाइं जालें आसक्त ।
युक्त अथवा अयुक्त । पाहातो कोण ॥ ९ ॥
या गल्बल्यामधें गल्बला । कोणीं कोणीं वाढविला ।
त्यास देखों सकेनासा जाला । वैदिक लोक ॥ १० ॥
त्याहिमधें हरिकीर्तन । तेथें वोढले कित्येक जन ।
प्रत्ययाचें ब्रह्मज्ञान । कोण पाहे ॥ ११ ॥
या कारणें ज्ञान दुल्लभ । पुण्यें घडे अलभ्य लाभ ।
विचारवंतां सुल्लभ । सकळ कांहीं ॥ १२ ॥
विचार कळला सांगतां नये । उदंड येती अंतराये ।
उपाय योजितां अपाये । आडवे येती ॥ १३ ॥
त्याहिमधें तो तिक्षण । रिकामा जाऊं नेदी क्षण ।
धूर्त तार्किक विचक्षण । सकळां माने ॥ १४ ॥
नाना जिनस उदंड पाठ । वदों लागला घडघडाट ।
अव्हाटचि केली वाट । सामर्थ्यबळें ॥ १५ ॥
प्रबोधशक्तीचीं अनंत द्वारें । जाणें सकळांची अंतरें ।
निरूपणें तदनंतरें । चटक लागे ॥ १६ ॥
मतें मतांतरें सगट । प्रत्यये बोलोन करी सपाट ।
दंडक सांडून नीट । वेधी जना ॥ १७ ॥
नेमकें भेदकें वचनें । अखंड पाहे प्रसंगमानें ।
उदास वृत्तिच्या गुमानें । उठोन जातो ॥ १८ ॥
प्रत्यये बोलोन उठोन गेला । चटक लागली लोकांला ।
नाना मार्ग सांडून त्याला । शरण येती ॥ १९ ॥
परी तो कोठें आडळेना । कोणे स्थळीं सांपडेना ।
वेष पाहातां हीन दीना । सारिखा दिसे ॥ २० ॥
उदंड करी गुप्तरूपें । भिकार्यासारिखा स्वरूपें ।
तेथें येशकीर्तिप्रतापें । सीमा सांडिली ॥ २१ ॥
ठाइं ठाइं भजन लावी । आपण तेथून चुकावी ।
मछरमतांची गोवी । लागोंच नेदी ॥ २२ ॥
खनाळामधें जाऊन राहे । तेथें कोणीच न पाहे ।
सर्वत्रांची चिंता वाहे । सर्वकाळ ॥ २३ ॥
अवघड स्थळीं कठीण लोक । तेथें राहणें नेमक ।
सृष्टीमधें सकळ लोक । धुंडीत येती ॥ २४ ॥
तेथें कोणाचें चालेना । अनुमात्र अनुमानेना ।
कट्ट घालीन राजकारणा । लोक लावी ॥ २५ ॥
लोकीं लोक वाढविले । तेणें अमर्याद जाले ।
भूमंडळीं सत्त चाले । गुप्तरूपें ॥ २६ ॥
ठाइं ठाइं उदंड ताबे । मनुष्यमात्र तितुकें झोंबे ।
चहुंकडे उदंड लांबे । परमार्थबुद्धी ॥ २७ ॥
उपासनेचा गजर । स्थळोस्थळूं थोर थोर ।
प्रत्ययानें प्राणीमात्र । सोडविले ॥ २८ ॥
ऐसे कैवाडे उदंड जाणे । तेणें लोक होती शाहाणे ।
जेथें जेथें प्रत्यये बाणे । प्राणीमात्रासी ॥ २९ ॥
ऐसी कीर्ति करून जावें । तरीच संसारास यावें ।
दास म्हणे हें स्वभावें । संकेतें बोलिलें ॥ ३० ॥
इति श्रीदासबोधे गुफ़ुशिष्यसंवादे निस्पृहव्यापनाम समास दुसरा ॥
समास तिसरा : श्रेष्ठ अंतरात्मा
॥ श्रीराम ॥
मुळापासून सैरावैरा । अवघा पंचीकर्ण पसारा ।
त्यांत साक्षत्वाचा दोरा । तोहि तत्त्वरूप ॥ १ ॥
दुरस्त्या दाटल्या फौजा । उंच सिंहासनीं राजा ।
याचा विचार समजा । अंतर्यामी ॥ २ ॥
देहमात्र अस्तिमांशांचें । तैसेंचि जाणावें नृपतीचें ।
मूळापासून सृष्टीचें । तत्वरूप ॥ ३ ॥
रायाचे सत्तेनें चालतें । परन्तु अवघीं पंचभूतें ।
मुळीं आधिक जाणिवेचे तें । अधिष्ठान आहे ॥ ४ ॥
विवेके बहुत पैसावले । म्हणौन अवतारी बोलिले ।
मनु चक्रवती जाले । येणेंचि न्यायें ॥ ५ ॥
जेथें उदंड जाणीव । तेचि तितुके सदेव ।
थोडे जाणिवेने नर्देव । होती लोक ॥ ६ ॥
व्याप आटोप करिती । धके चपेटे सोसिती ।
तेणें प्राणी सदेव होती । देखतदेखतां ॥ ७ ॥
ऐसें हें आतां वर्ततें । मुर्ख लोकांस कळेना तें ।
विवेकीं मनुष्य समजतें । सकळ कांहीं ॥ ८ ॥
थोर लाहान बुद्धीपासी । सगट कळेना लोकांसी ।
आधीं उपजलें तयासी । थोर म्हणती ॥ ९ ॥
वयें धाकुटा नृपती । वृद्ध तयास नमस्कार करिती ।
विचित्र विवेकाची गती । कळली पाहिजे ॥ १० ॥
सामान्य लोकांचे ज्ञान । तो अवघाच अनुमान ।
दीक्षादंडकाचें लक्षण । येणेंचि पाडें ॥ ११ ॥
नव्हें कोणास म्हणावें । सामान्यास काये ठावें ।
कोणकोणास म्हणावें । किती म्हणोनी ॥ १२ ॥
धाकुटा भाग्यास चढला । तरी तुछ्य करिती तयाला ।
याकारणें सलगीच्या लोकांला । दूरी धरावें ॥ १३ ॥
नेमस्त कळेना वचन । नेमस्त नये राजकारण ।
उगेचि धरिती थोरपण । मूर्खपणें ॥ १४ ॥
नेमस्त कांहींच कळेना । नेमस्त कोणीच मानिना ।
आधी उपजलें त्या थोरपणा । कोण पुसे ॥ १५ ॥
वडिलां वडिलपण नाहीं । धाकुट्यां धाकुटपण नाहीं ।
ऐसे बोलती त्यांस नाहीं । शाहाणपण ॥ १६ ॥
गुणेविण वडिलपण । हें तों आवघेंच अप्रमाण ।
त्याची प्रतीत प्रमाण । थोरपणीं ॥ १७ ॥
तथापि वडिलांस मानावें । वडिलें वडिलपण जाणावें ।
नेणतां पुढें कष्टावें । थोरपणीं ॥ १८ ॥
तस्मात वडिल अंतरात्मा । जेथें चेतला तेथें महिमा ।
हें तों प्रगटचि आहे आम्हा । शब्द नाहीं ॥ १९ ॥
याकारणें कोणी येकें । शाहाणपण सिकावें विवेकें ।
विवेक न सिकतां तुकें । तुटोन जाती ॥ २० ॥
तुक तुटलें म्हणिजे गेलें । जन्मा येऊन काये केलें ।
बळेंचि सांदीस घातलें । आपणासी ॥ २१ ॥
सगट बायेका सिव्या देती । सांदीस पडिला ऐसें म्हणती ।
मूर्खपणाची प्राप्ती । ठाकून आली ॥ २२ ॥
ऐसें कोणीयेकें न करावें । सर्व सार्थकचि करावें ।
कळेना तरी विवरावें । ग्रंथांतरीं ॥ २३ ॥
शाहाण्यास कोणीतरी बाहाती । मुर्खास लोक दवडून देती ।
जीवास आवडे संपत्ति । तरी शाहाणें व्हावें ॥ २४ ॥
आहो या शाहाणपणाकारणें । बहुतांचे कष्ट करणें ।
परंतु शाहाणपण शिकणें । हें उत्तमोत्तम ॥ २५ ॥
जों बहुतांस मानला । तो जाणावा शाहाणा जाला ।
जनीं शाहाण्या मनुष्याला । काये उणें ॥ २६ ॥
आपलें हित न करी लोकिकीं । तो जाणावा आत्मघातकी ।
या मुर्खायेवढा पातकी । आणिक नाहीं ॥ २७ ॥
आपण संसारीं कष्टतो । लोकांकरवी रागेजोन घेतो ।
जनामध्यें शाहाणा तो । ऐसें न करी ॥ २८ ॥
साधकां सिकविलें स्वभावें । मानेल तरी सुखें घ्यावें ।
मानेना तरी सांडावें । येकिकडे ॥ २९ ॥
तुम्ही श्रोते परम दक्ष । अलक्षास लावितां लक्ष ।
हें तों सामान्य प्रत्यक्ष । जाणतसा ॥ ३० ॥
इति श्रीदासबोधे गुफ़ुशिष्यसंवादे श्रेष्ठ अंतरात्मानिरूपणनाम समास तिसरा ॥
समास चौथा : शाश्वतब्रह्मनिरूपण
॥ श्रीराम ॥
पृथ्वीपासून जालीं झाडें । झाडापासून होती लांकडें ।
लांकडें भस्मोन पुढें । पृथ्वीच होये ॥ १ ॥
पृथ्वीपासून वेल होती । नाना जिनस फापावती ।
वाळोन कुजोन मागुती । पृथ्वीच होये ॥ २ ॥
नाना धान्यांचीं नाना अन्नें । मनुष्यें करिती भोजनें ।
नाना विष्ठा नाना वमनें । पृथ्वीच होये ॥ ३ ॥
नाना पक्षादिकीं भक्षिलें । तरी पुढें तैसेंचि जालें ।
वाळोन भस्म होऊन गेलें । पुन्हा पृथ्वी ॥ ४ ॥
मनुष्यें मरतांच ऐका । क्रिमि भस्म कां मृत्तिका ।
ऐशा काया पडती अनेका । पुढें पृथ्वी ॥ ५ ॥
नाना तृण पदार्थ कुजती । पुढें त्याची होये माती ।
नाना किडे मरोन जाती । पुढें पृथ्वी ॥ ६ ॥
पदर्थ दाटले अपार । किति सांगावा विस्तार ।
पृथ्वीवांचून थार । कोणास आहे ॥ ७ ॥
झाड पाले आणि तृण । पशु भक्षितां होतें सेण ।
खात मूत भस्म मिळोन । पुन्हा पृथ्वी ॥ ८ ॥
उत्पत्तिस्थितिसंव्हारतें । तें तें पृथ्वीस मिळोन जातें ।
जितुकें होतें आणि जातें । पुन्हा पृथ्वी ॥ ९ ॥
नाना बीजांचिया रासी । विरढोने लागती गगनासी ।
पुढें सेवटीं पृथ्वीसी । मिळोन जाती ॥ १० ॥
लोक नाना धातु पुरिती । बहुतां दिवसां होये माती ।
सुवर्णपाषाणाची गती । तैसीच आहे ॥ ११ ॥
मातीचें होते सुवर्ण । आणी मृत्तिकेचे होती पाषाण ।
माहा अग्निसंगें भस्मोन । पृथ्वीच होये ॥ १२ ॥
सुवर्णाचें जर होतें । जर सेवटीं कुजोन जातें ।
रस होऊन वितुळतें । पुन्हा पृथ्वी ॥ १३ ॥
पृथ्वीपासून धातु निपजती । अग्निसंगें रस होती ।
तया रसाची होये जगती । कठीणरूपें ॥ १४ ॥
नाना जळासी गंधी सुटे । तेथें पृथ्वीचें रूप प्रगटे ।
देवसेंदिवस जळ आटे । पुढें पृथ्वी ॥ १५ ॥
पत्रें पुष्पें फळें येती । नाना जीव खाऊन जाती ।
ते जीव मरतां जगती । नेमस्त होये ॥ १६ ॥
जितुका कांहीं जाला आकार । तितुक्यास पृथ्वीचा आधार ।
होती जाती प्राणीमात्र । सेवट पृथ्वी ॥ १७ ॥
हें किती म्हणौन सांगावें । विवेकें अवघेचि जाणावें ।
खांजणीभाजणीचें समजावें । मूळ तैसे ॥ १८ ॥
आप आळोन पृथ्वी जालू । पुन्हां आपींच विराली ।
अग्नियोगें भस्म जाली । म्हणोनियां ॥ १९ ॥
आप जालें तेजापासुनी । पुढें तेजें घेतलें सोखुनी ।
तें तेज जालें वायोचेनी । पुढें वायो झडपी ॥ २० ॥
वायो गगनीं निर्माण जाला । पुढें गगनींच विराला ।
ऐसें खांजणीभाजणीला । बरें पाहा ॥ २१ ॥
जें जें जेथें निर्माण होतें । तें तें तेथें लया जातें ।
येणें रितीं पंचभूतें । नाश पावती ॥ २२ ॥
भूत म्हणिजे निर्माण जालें । पुन्हां मागुतें निमालें ।
पुढें शाश्वत उरलें । परब्रह्म तें ॥ २३ ॥
तें परब्रह्म जों कळेना । तो जन्ममृत्यु चुकेना ।
चत्वार खाणी जीव ना । होणें घडे ॥ २४ ॥
जडाचें मूळ तें चंचळ । चंचळाचें मूळ तें निश्चळ ।
निश्चळासी नाहीं मूळ । बरें पाहा ॥ २५ ॥
पूर्वपक्ष म्हणिजे जालें । सिद्धांत म्हणिजे निमालें ।
पक्षातीत जें संचलें । परब्रह्म तें ॥ २६ ॥
हें प्रचितीनें जाणावें । विचारें खुणेंसी बाणावें ।
विचारेंविण सिणावें । तेंचि मूर्खपणें ॥ २७ ॥
ज्ञानी भिडेने दडपला । निश्चळ परब्रह्म कैंचें त्याला ।
उगाच करितो गल्बला । मायेंमधें ॥ २८ ॥
माया निशेष नासली । पुढें स्थिति कैसी उरली ।
विचक्षणें विवरिली । पाहिजे स्वयें ॥ २९ ॥
निशेष मायेचें निर्शन । होतां आत्मनिवेदन ।
वाच्यांश नाहीं विज्ञान । कैसें जाणावें ॥ ३० ॥
लोकांचे बोलीं जो लागला । तो अनुमानेंच बुडाला ।
याकारणें प्रत्ययाला । पाहिलेंच पाहावें ॥ ३१ ॥
इति श्रीदासबोधे गुफ़ुशिष्यसंवादे शाश्वतब्रह्मनिरूपणनाम समास चौथा ॥
समास पांचवा : चंचळ लक्षण
॥ श्रीराम ॥
दोघां ऐसीं तीन चालती । अगुणी अष्टधा प्रकृती ।
अधोर्ध सांडून वर्तती । इंद्रफणी ऐसीं ॥ १ ॥
पणतोंडें भक्षितो पणजा । मूल बापास मारी वोजा ।
चुकार्या गेला राजा । चौघां जणांचा ॥ २ ॥
देव देवाळयामधें लपाला । देऊळ पूजितां पावे त्याला ।
सृष्टिमधें ज्याला त्याला । ऐसेंचि आहे ॥ ३ ॥
दोनी नामें येकास पडिलीं । लोकीं नेमस्त कल्पिलीं ।
विवेकें प्रत्ययें पाहिलीं । तों येकचि नाम ॥ ४ ॥
नाहीं पुरुष ना वनिता । लोकीं कल्पिलें तत्त्वता ।
त्याचा बरा शोध घेतां । कांहींच नाहीं ॥ ५ ॥
स्त्री नदी पुरुष खळाळ । ऐसें बोलती सकळ ।
विचार पाहातां निवळ । देह नाहीं ॥ ६ ॥
आपण आपणास कळेना । पाहों जातां आकळेना ।
काशास कांहींच मिळेना । उदंडपणें ॥ ७ ॥
येकलाचि उदंड जाला । उदंडचि येकला पडिला ।
आपणासी आपला । गल्बला सोसवेना ॥ ८ ॥
येक असोन फुटी पडिली । फुटी असोन स्थिति येकली ।
विचित्र कळा पैसावली । प्राणीमात्रीं ॥ ९ ॥
वल्लिमधें जल संचरे । कोरडेपणें हें वावरे ।
वोलेवांचून न थिरे । कांहीं केल्यां ॥ १० ॥
झाडांमधें केलीं आळीं । झाडें धांवती निराळीं ।
कित्येक झाडें अंतराळीं । उडोन जाती ॥ ११ ॥
भूमीपासून वेगळीं जालीं । परी तें नाहींत वाळलीं ।
निराळींच बळावलीं । जेथतेथें ॥ १२ ॥
देवाकरितां चालती झाडें । देव नस्तां होती लाकडें ।
नीटचि आहे कुवाडें । सर्वथा नव्हे ॥ १३ ॥
झाडापासून झाडें होती । तेहि अंतरीक्ष जाती ।
मुळानें भेदिली जगती । कदापि नाहीं ॥ १४ ॥
झाडास झाडें खातपाणी । घालून पाळिलीं प्रतिदिनीं ।
बोलकीं झाडें शब्दमथनीं । विचार घेती ॥ १५ ॥
होणार तितुकें आधींच जालें । मग कल्पकल्पून बोलिलें ।
जाणतयासी समजलें । सकळ कांहीं ॥ १६ ॥
समजलें तरी उमजेना । उमजलें तरी समजेना ।
प्रत्ययेंविण अनुमानेना । सकळ कांहीं ॥ १७ ॥
सर्वत्रांचा वडिल कोण । हेचि पाहावी वोळखण ।
भेटे आपणास आपण । जगदांतरें ॥ १८ ॥
अंतरनिष्ठांची उंच कोटी । बाहेरमुद्र्याची संगती खोटी ।
मूर्ख काये समजेल गोष्टी । शाहाणे जाणती ॥ १९ ॥
अंतरें राखतां राजी । भलत्यास भलताच नवाजी ।
अंतरें न राखतां भाजी । मिळणार नाहीं ॥ २० ॥
ऐसें वर्ततें प्रत्यक्ष । अलक्षीं लावावें लक्ष ।
दक्षास भेटतां दक्ष । समाधान होतें ॥ २१ ॥
मनास मिळतां मन । पाहोन येती निरंजन ।
चंचळचक्र उलंघून । पैलाड जाती ॥ २२ ॥
येकदा जाऊन पाहोन आले । मग तें सन्निध देखिलें ।
चर्मचक्षी लक्षिलें । न वचे कदा ॥ २३ ॥
नाना शरीरीं चंचळ । अखंड करी चळवळ ।
परब्रह्म तें निश्चळ । सर्वां ठाईं ॥ २४ ॥
चंचळ धांवे येकीकडे । वोस पडे दुसरेकडे ।
चंचळ पुरे सर्वांकडे । हें तो घडेना ॥ २५ ॥
चंचळ चंचळास पुरेना । आवघें चंचळ विवरेना ।
निश्चळ अपार अनुमाना । कैसें येतें ॥ २६ ॥
गगनीं चालिली हवावी । कैसी पावेल पार पदवी ।
जातां मधेंचि विझावी । हा स्वभावचि तिचा ॥ २७ ॥
मनोधर्म येकदेशी । कैसा आकळिल वस्तुसी ।
निर्गुण सांडून अपेसी । सर्व ब्रह्म म्हणे ॥ २८ ॥
नाहीं सारासार विचार । तेथें अवघा अंधकार ।
खरें सांडून खोटें पोर । नेणतें घेतें ॥ २९ ॥
ब्रह्मांडाचें माहाकारण । तेथून हें पंचीकर्ण ।
माहावाक्याचें विवर्ण । वेगळें असे ॥ ३० ॥
महत्तत्त्व महद्भूत । तोचि जाणावा भगवंत ।
उपासना हे समाप्त । येथून जाली ॥ ३१ ॥
कर्म उपासना आणि ज्ञान । त्रिकांड वेद हें प्रमाण ।
ज्ञानाचें होतें विज्ञान । परब्रह्मी ॥ ३२ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चंचळलक्षणनिरूपणनाम समास पांचवा ॥
समास सहावा : चातुर्य विवरण
॥ श्रीराम ॥
पीतापासून कृष्ण जालें । भूमंडळीं विस्तारलें ।
तेणेंविण उअमजलें । हें तों घडेना ॥ १ ॥
आहे तरी स्वल्प लक्षण । सर्वत्रांची सांठवण ।
अद्धम आणी उत्तम गुण । तेथेंचि असती ॥ २ ॥
महीसुत सरसाविला । सरसाऊन द्विधा केला ।
उभयेता मिळोन चालिला । कार्येभाग ॥ ३ ॥
स्वेतास्वेतास गांठीं पडतां । मधें कृष्ण मिश्रित होतां ।
इहलिकसार्थकता । होत आहे ॥ ४ ॥
विवरतां याचा विचार । मूर्ख तोचि होये चतुर ।
सद्यप्रचित साक्षात्कार । परलोकींचा ॥ ५ ॥
सकळांस जे मान्य । तेंचि होतसे सामान्य ।
सामान्यास अनन्य । होईजेत नाहीं ॥ ६ ॥
उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा । अदृष्टीची गुप्त रेखा ।
चत्वार अनुभव रारिखा । होत नाहीं ॥ ७ ॥
चौदा पिड्यांचे पवाडे । सांगती ते शाहाणे कीं वेडे ।
ऐकत्यानें घडे कीं न घडे । ऐसें पाहावें ॥ ८ ॥
रेखा तितुकी पुसोन जाते । प्रत्यक्ष प्रत्यया येतें ।
डोळेझांकणी करावी तें । कायेनिमित्य ॥ ९ ॥
बहुतांचे बोलीं लागलें । तें प्राणी अनुमानीं बुडालें ।
मुख्य निश्चये चुकलें । प्रत्ययाचा ॥ १० ॥
उदंडाचें उदंड ऐकावें । परी तें प्रत्ययें पाहावे ।
खरेंखोटें निवडावें । अंतर्यामीं ॥ ११ ॥
कोणासी नव्हे म्हणों नये । समजावे अपाये उपाये ।
प्रत्यये घ्यावा बहुत काये । बोलोनियां ॥ १२ ॥
माणुस हेंकाड आणी कच्चें । मान्य करावें तयाचें ।
येणेंप्रकारें बहुतांचें । अंतर राखावें ॥ १३ ॥
अंतरीं पीळ पेच वळसा । तोचि वाढवी बहुवसा ।
तरी मग शाहाणा कैसा । निवऊं नेणें ॥ १४ ॥
वेडें करावें शाहाणें । तरीच जिणें श्लाघ्यवाणें ।
उगेंच वादांग वाढविणें । हें मूर्खपण ॥ १५ ॥
मिळोन जाऊन मेळवावें । पडी घेऊन उलथावें ।
कांहींच कळों नेदावें । विवेकबळें ॥ १६ ॥
दुसर्याचे चालणें चालावें । दुसर्याचे बोलणीं बोलावें ।
दुसर्याचे मनोगतें जावें । मिळोनियां ॥ १७ ॥
जो दुसर्याच्या हितावरी । तो विपट कहिंच न करी ।
मानत मानत विवरी । अंतर तयाचें ॥ १८ ॥
आधीं अंतर हातीं घ्यावें । मग हळुहळु उकलावें ।
नाना उपायें न्यावें । परलोकासी ॥ १९ ॥
हेंकाडास हेंकाड मिळाला । तेथें गल्बलाचि जाला ।
कळहो उठतां च्यातुर्याला । ठाव कैंचा ॥ २० ॥
उगीच करिती बडबड । परी करून दाखविणें हें अवघड ।
परस्थळ साधणें जड । कठिण आहे ॥ २१ ॥
धके चपेटे सोसावे । नीच शब्द साहात जावे ।
प्रस्तावोन परावे । आपले होती ॥ २२ ॥
प्रसंग जाणोनि बोलावें । जाणपण कांहींच न घावें ।
लीनता धरून जावें । जेथतेथें ॥ २३ ॥
कुग्रामें अथवा नगरें । पाहावीं घरांचीं घरें ।
भिक्षामिसें लाहानथोरें । परीक्षून सोडावीं ॥ २४ ॥
बहुतीं कांहींतरी सांपडे । विचक्षण लोकीं मित्री घडे ।
उगेच बैसतां कांहींच न घडे । फिर्णें विवरणें ॥ २५ ॥
सावधपणें सर्व जाणावें । वर्तमान आधींच घ्यावें ।
जाऊं ये तिकडे जावें । विवेकें सहित ॥ २६ ॥
नाना जिनसपाठांतरें । निवती सकळांचीं अंतरें ।
लेहोन देतां परोपकारें । सीमा सांडावी ॥ २७ ॥
जैसें जयास पाहिजे । तैसें तयास दीजे ।
तरी मग श्रेष्ठचि होइजे । सकळां मान्ये ॥ २८ ॥
भूमंडळीं सकळांस मान्य । तो म्हणों नये सामान्य ।
कित्येक लोक अनन्य । तया पुरुषासी ॥ २९ ॥
ऐसीं चातुर्याचीं लक्षणें । चातुर्यें दिग्विजये करणें ।
मग तयास काये उणें । जेथतेथें ॥ ३० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चातुर्यविवरणनाम समास सहावा ॥
समास सातवा : अधोर्धनिरूपण
॥ श्रीराम ॥
नाना विकाराचें मूळ । ते हे मूळमायाच केवळ ।
अचंचळीं जे चंचळ । सूक्ष्मरूपें ॥ १ ॥
मूळामाया जाणीवेची । मुळींच्या मुळ संकल्पाची ।
वोळखी शडगुणैश्वराची । येणेंचि न्यावें ॥ २ ॥
प्रकृतिपुरुष शिवशक्ति । आर्धनारीनटेश्वर म्हणती ।
परी ते आवघी जगज्जोती । मूळ त्यासी ॥ ३ ॥
संकल्पाचें जें चळण । तेंचि वायोचें लक्षण ।
वायो आणी त्रिगुण । आणी पंचभूतें ॥ ४ ॥
पाहातां कोणीयेक वेल । त्याच्या मुळ्या असती खोल ।
पत्रें पुष्पें फळें केवळ । मुळाचपासी ॥ ५ ॥
याहिवेगळे नाना रंग । आकार विकार तरंग ।
नाना स्वाद अंतरंग । मुळामध्यें ॥ ६ ॥
तेंचि मूळ फोडून पाहातां । कांहींच नाहीं वाटे आतां ।
पुढें वाढतां वाढतां । दिसों लागे ॥ ७ ॥
कड्यावरी वेल निघाला । अधोमुखें बळें चालिला ।
फांपावोन पुढें आला । भूमंडळीं ॥ ८ ॥
तैसीं मुळमाया जाण । पंचभूतें आणी त्रिगुण ।
मुळीं आहेत हें प्रमाण । प्रत्ययें जाणावें ॥ ९ ॥
अखंड वेल पुढें वाढला । नाना विकारीं शोभला ।
विकारांचा विकार जाला । असंभाव्य ॥ १० ॥
नाना फडगरें फुटलीं । नाना जुंबाडें वाढली ।
अनंत अग्रें चालिलीं । सृष्टीमधें ॥ ११ ॥
कित्येक फळें तीं पडती । सवेंचि आणीक निघती ॥
ऐसीं होती आणि जाती । सर्वकाळ ॥ १२ ॥
येक वेलचि वाळले । पुन्हां तेथेंचि फुटले ।
ऐसे आले आणि गेले । कितीयेक ॥ १३ ॥
पानें झडती आणि फुटती । पुष्पें फळें तेणेंचि रितीं ।
मध्यें जीव हे जगती । असंभाव्य ॥ १४ ॥
अवघा वेलचि कर्पतो । मुळापासून पुन्हा होतो ।
ऐसा अवघा विचार जो तो । प्रत्यक्ष जाणावा ॥ १५ ॥
मूळ खाणोन काढिलें । प्रत्ययेज्ञानें निर्मूळ केलें ।
तरी मग वाढणेंचि राहिलें । सकळ कांहीं । १६ ॥
मुळीं बीज सेवटीं बीज । मध्यें जळरूप बीज ।
ऐसा हा स्वभाव सहज । विस्तारला ॥ १७ ॥
मुळामधील ज्या गोष्टी । सांगताहे बीजसृष्टी ।
जेथील अंश तेथें कष्टी । न होतां जातो ॥ १८ ॥
जातो येतो पुन्हा जातो । ऐसा प्रत्यावृत्ति करितो ।
परंतु आत्मज्ञानी जो तो । अन्यथा न घडे ॥ १९ ॥
न घडे ऐसें जरी म्हणावें । तरी कांहींतरी लागे जाणावें ।
अंतरींच परी ठावें । सकळांस कैचें ॥ २० ॥
तेणेंसींच कार्यभाग करिती । परंतु तयास नेणती ।
दिसेना ते काये करिती । बापुडे लोक ॥ २१ ॥
विषयेभोग तेणेंचि घडे । तेणेंविण कांहींच न घडे ।
स्थूळ सांडून सूक्ष्मीं पवाडे । ऐसा पाहिजे ॥ २२ ॥
जें आपलेंचि अंतर । तद्रूपचि जगदांतर ।
शरीरभेदाचे विकार । वेगळाले ॥ २३ ॥
आंगोळीची आंगोळीस वेधना । येकीची येकीस कळेना ।
हात पाये अवेव नाना । येणेंचि न्यायें ॥ २४ ॥
अवेवाचें अवेव नेणे । मा तो परांचें काये जाणे ।
परांतर याकारणें । जाणवेना ॥ २५ ॥
येकाचि उदकें सकळ वनस्पती । नाना अग्रेंभेद दिसती ।
खुडिलीं तितुकींच सुकती । येर ते टवटवीत ॥ २६ ॥
येणेंचि न्यायें भेद जाला । कळेना येकाचें येकाला ।
जाणपणें आत्मयाला । भेद नाहीं ॥ २७ ॥
आत्मत्वीं भेद दिसे । देहप्रकृतिकरितां भासे ।
तरी जाणतचि असे । बहुतेक ॥ २८ ॥
देखोन ऐकोन जाणती । शाहाणे अंतर परीक्षिती ।
धूर्त ते अवघेंच समजती । गुप्तरूपें ॥ २९ ॥
जो बहुतांचें पाळण करी । तो बहुतांचें अंतर विवरी ।
धूर्तपणें ठाउकें करी । सकळ कांहीं ॥ ३० ॥
आधी मनोगत पाहतीं । मग विश्वास धरिती ।
प्राणीमात्र येणें रितीं । वर्तताहे ॥ ३१ ॥
स्मरणामगें विस्मरण । रोकडी प्रचित प्रमाण ।
आपलें ठेवणें आपण । दुकताहे ॥ ३२ ॥
आपलेंच आपणा स्मरेना । बोलिलें तें आठवेना ।
उठती अनंत कल्पना । ठाउक्या कैंच्या ॥ ३३ ॥
ऐसें हें चंचळ चक्र । कांहीं नीट कांहीं वक्र ।
जाला रंक अथवा शक्र । तरी स्मरणास्मरणें ॥ ३४ ॥
स्मरण म्हणिजे देव । विस्मरण म्हणिजे दानव ।
स्मरणविस्मरणें मानव । वर्तती आतां ॥ ३५ ॥
म्हणोनि चेवी आणि दानवी । संपत्ति द्विधा जाणावी ।
प्रचित मानसीं आणावी । विवेकेंसहित ॥ ३६ ॥
विवेकें विवेक जाणावा । आत्म्यानें आत्मा वोळखावा ।
नेत्रें नेत्रचि पाहावा । दर्पणींचा ॥ ३७ ॥
स्थूळें स्थूळ खाजवावें । सुक्ष्में सुक्ष्म समजावें ।
खुणेनें खुणेसी बाणावें । अंतर्यामीं ॥ ३८ ॥
विचारें जाणाव विचार । अंतरें जाणावे अंतर ।
अंतरें जाणावे परांतर । । हौनियां ॥ ३९ ॥
स्मरणामाजीं विस्मरण । हेंचि भेदाचें लक्षण ।
येकदेसी । परिपूर्ण । होत नाहीं ॥ ४० ॥
पुढें सिके मागें विसरे । पुढें उजेडे मागें अंधारें ।
पुढें स्मरे मागें विस्मरे । सकळ कांहीं ॥ ४१ ॥
तुर्या जाणावी स्मरण । सुषुप्ती जाणावी विस्मरण ।
उभयेता शरीरीं जाण । वर्तती आतां ॥ ४२ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अधोर्धनिरूपणनाम समास सातवा ॥
समास आठवा : सूक्ष्मजीवनिरूपण
॥ श्रीराम ॥
रेणूहून सूक्ष्म किडे । त्यांचें आयुष्य निपटचि थोडें ।
युक्ति बुद्धि तेणेंचि पाडें । तयामधें ॥ १ ॥
ऐसे नाना जीव असती । पाहों जातां न दिसती ।
अंतःकर्णपंचकाची स्थिती । तेथेंचि आहे ॥ २ ॥
त्यांपुरतें त्यांचें ज्ञान । विषये इंद्रियें समान ।
सूक्ष्म शरीरें विवरोन । पाहातो कोण ॥ ३ ॥
त्यास मुंगी माहा थोर । नेणोंचालिला कुंजर ।
मुंगीस मुताचा पूर । ऐसें बोलती ॥ ४ ॥
तें मुंगीसमान शरीरें । उदंड असती लाहानथोरें ।
समस्तांमध्यें जीवेश्वरें । वस्ति कीजे ॥ ५ ॥
ऐसिया किड्यांचा संभार । उदंड दाटला विस्तार ।
अत्यंत साक्षपी जो नर । तो विवरोन पाहे ॥ ६ ॥
नाना नक्षत्रीं नाना किडे । त्यांस भासती पर्वतायेवढे ।
आयुष्यहि तेणेंचि पाडें । उदंड वाटे ॥ ७ ॥
पक्षायेवढें लाहान नाहीं । पक्षायेवढें थोर नाहीं ।
सर्प आणि मछ पाहीं । येणेंचि पाडे ॥ ८ ॥
मुंगीपासून थोरथोरें । चढतीं वाढतीं शरीरें ।
त्यांची निर्धारितां अंतरें । कळों येती ॥ ९ ॥
नाना वर्ण नाना रंग । नाना जीवनाचे तरंग ।
येक सुरंग येक विरंग । किती म्हणौनि सांगावे ॥ १० ॥
येकें सुकुमारें येकें कठोरें। निर्माण केलीं जगदेश्वरें ।
सुवर्णासारिखीं शरीरें । दैदिप्यमानें ॥ ११ ॥
शरीरभेदें आहारभेदें । वाचाभेदें गुणभेदें ।
अंतरीं वसिजे अभेदें । येकरूपें ॥ १२ ॥
येक त्रासकें येकमारकें। पाहो जातां नाना कौतुकें ।
कितीयेक आमोलिकें । सृष्टीमध्यें ॥ १३ ॥
ऐसीं अवघीं विवरोन पाहे । ऐसा प्राणी कोण आहे ।
आपल्यापरतें जाणोन राहे । किंचितमात्र ॥ १४ ॥
नवखंड हे वसुंधरा । सप्तसागरांचा फेरा ।
ब्रह्मांडाबाहेरील नीरा । कोण पाहे ॥ १५ ॥
त्या नीरामध्यें जीव असती । पाहों जातां असंख्याती ।
त्या विशाळ जीवांची स्थिती । कोणजाणे ॥ १६ ॥
जेथें जीवन तेथें जीव । हा उत्पत्तीचा स्वभाव ।
पाहातां याचा अभिप्राव । उदंड असे । ॥ १७ ॥
पृथ्वीगर्भीं नाना नीरें । त्या नीरामधें शरीरें ।
नाना जिनस लाहानथोरें । कोण जाणें ॥ १८ ॥
येक प्राणी अंतरिक्ष असती । तेहीं नाहीं देखिली क्षिती ।
वरीच्यावरी उडोन जाती । पक्ष फुटल्यानंतरें ॥ १९ ॥
नाना खेचरें आणि भूचरें । नाना वनचरें आणि जळचरें ।
चौर्यासि योनीप्रकारें । कोण जाणे ॥ २० ॥
उष्ण तेज वेगळे करुनी । जेथें तेथें जीवयोनी ।
कल्पनेपासुनी होती प्राणी । कोण जाणे ॥ २१ ॥
येक नाना सामर्थ्यें केले । येक इच्छेपासून जाले ।
येक शब्दासरिसे पावले । श्रापदेह ॥ २२ ॥
येक देह बाजीगिरीचे । येक देह वोडंबरीचे।
येक देह देवतांचे । नानाप्रकारें॥ २३॥
येक क्रोधापासून जाले । येक तपा पासून जन्मले ।
येक उश्रापें पावले । पूर्वदेह ॥ २४ ॥
ऐसें भगवंताचें करणें । किती म्हणौन सांगणें ।
विचित्र मायेच्या गुणें । होत जातें ॥ २५ ॥
नाना अवघड करणी केली । कोणीं देखिली ना ऐकिली ।
विचित्र कळा समजली । पाहिजे सर्वें ॥ २६ ॥
थोडें बहुत समजलें। पोटापुरती विद्या सिकलें ।
प्राणी उगेंच गर्वें गेलें । मी ज्ञाता म्हणोनी ॥ २७॥
ज्ञानी येक अंतरात्मा । सर्वांमधें सर्वात्मा ।
त्याचा कळावया महिमा । बुद्धि कैंची ॥ २८॥
सप्तकंचुक ब्रह्मांड । त्यांत सप्तकंचुक पिंड ।
त्या पिंडामधें उदंड । प्राणी असती ॥ २९ ॥
आपल्य देहांतील न कळे । मा तें अवघें कैंचें कळे ।
लोक होती उतावळे । अल्पज्ञानें ॥ ३० ॥
अनुरेणाऐसें जिनस । त्यांचे आम्ही विराट पुरुष ।
आमचें उदंडचि आयुष्य । त्यांच्या हिसेबें ॥ ३१ ॥
त्यांच्या रिती त्यांचे दंडक । वर्तायाचे असती अनेक ।
जाणे सर्वहि कौतुक । ऐसा कैंचा ॥ ३२ ॥
धन्य परमेश्वराची करणी । अनुमानेना अंतःकरणीं ।
उगीच अहंता पापिणी । वेढा लावी ॥ ३३ ॥
अहंता सांडून विवरणें । कित्येक देवांचे करणें ।
पाहातां मनुष्याचें जिणें । थोडें आहे ॥ ३४ ॥
थोडें जिणें अर्धपुडी काया । गर्व करिती रडाया ।
शरीर आवघें पडाया । वेळ नाहीं ॥ ३५॥
कुश्चीळ ठाईं जन्मलें । आणि कुश्चीळ रसेंचि वाढलें।
यास म्हणती थोरलें । कोण्या हिसेबें ॥३६॥
कुश्चीळ आणि क्ष्णभंगुर । अखंड वेथा चिंतातुर ।
लोक उगेच म्हणती थोर । वेडपणें ॥ ३७ ॥
कायामाया दों दिसांची । आदिअंतीं अवघी ची ची ।
झांकातापा करून उगीचि । थोरीव दाविती ॥ ३८॥
झांकिलें तरी उपंढर पडे । दुर्गंधी सुटे जिकडे तिकडे ।
जो कोणी विवेकें पवाडे । तोचि धन्य ॥ ३९ ॥
उगेंचि कायसा तंडावें । मोडा अहंतेचें पुंडावें ।
विवेकें देवास धुंडावें । हें उत्तमोत्तम ॥ ४०॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सूक्ष्मजीवनिरूपणनाम समास आठवा ॥
समास नववा : पिंडोत्पत्तिनिरूपण
॥ श्रीराम ॥
चौंखाणीचे प्राणी असती । अवघे उदकेंचि वाढती ।
ऐसे होतीआणी जाती । असंख्यात ॥ १ ॥
तत्वांचें शरीर जालें । अंतरात्म्यासगट वळलें ।
त्यांचें मूळ जों शोधिलें । तों उदकरूप ॥ २ ॥
शरत्काळींचीं शरीरें । पीळपीळों झिरपती नीरें ।
उभये रेतें येकत्रें । मिसळती रक्तीं ॥ ३ ॥
अन्नरस देहरस । रक्तरेतें बांधे मूस ।
रसद्वयें सावकास । वाढों लागे ॥ ४ ॥
वाढतां वाढतां वाढलें । कोमळाचें कठीण जालें।
पुढें उदक पैसावलें । नाना अवेवीं ॥ ५॥
संपूर्ण होतां बाहेरी पडे । भूमीस पडतां मग तें रडे ।
अवघ्याचें अवघेंच घडे । ऐसें आहे ॥ ६ ॥
कुडी वाढे कुबुद्धि वाढे । मूळापासून अवघें घडे ।
अवघेंचि मोडे आणि वाढे । देखतदेखतां ॥ ७ ॥
पुढें अवघियांचें शरीर । दिवसेंदिवस जालें थोर ।
सुचों लागला विचार । कांहीं कांहीं ॥ ८ ॥
फळामधें बीज आलें । तेणें न्यायें तेथें जालें ।
ऐकतां देखतां उमजलें । सकळ कांहीं ॥ ९ ॥
बीजें उदकें अंकुरती । उदक नस्तां उडोन जाती ।
येके ठाईं उदक माती । होतां बरें ॥ १० ॥
दोहिंमधें असतां बीज । भिजोन अंकुर सहज ।
वाढतां वाढतां पुढें रीझ । उदंड आहे ॥ ११ ॥
इकडे मुळ्या धावा घेती । तिकडे अग्रें हेलावती ।
मुळें अग्र द्विधा होती । बीजापासून ॥ १२ ॥
मुळ्या चालिल्या पाताळीं । अग्रें धावतीं अंतराळीं ।
नाना पत्रीं पुष्पीं फळीं । लगडलीं झाडें ॥ १३ ॥
फळावडिल सुमनें । सुमनांवडिल पानें ।
पानांवडिल अनुसंधानें । काष्ठें आघवीं ॥ १४ ॥
काष्ठांवडिल मुळ्या बारिक। मुळ्यां वडिल तें उदक ।
उदक आळोन कौतुक । भूमंडळाचें ॥ १५ ॥
याची ऐसी आहे प्रचिती । तेव्हां सकळां वडिल जगती ।
जगतीवडिल मूर्ती। आपोनारायायेणाची ॥१६ ॥
तयावडिल अग्निदेव । अग्निवडिल वायेदेव ।
वायेदेवावडिल स्वभाव । अंतरात्म्यांचा ॥ १७ ॥
सकळांवडिल अंतरात्मा। त्यासि नेणे तो दुरात्मा ।
दुरात्मा म्हणिजे दुरी आत्मा । अंतरला तया ॥ १८ ॥
जवळी असोन चुकलें। प्रत्ययास नाहीं सोकलें ।
उगेंचि आलें आणी गेलें । देवाचकरितां ॥ १९ ॥
म्हणौन सकळांवडिल देव । त्यासी होतां अनन्यभाव ।
मग हे प्रकृतीचा स्वभाव । पालटों लागे ॥ २० ॥
करी आपुला व्यासंग। कदापि नव्हे ध्यानभंग ।
बोलणें चालणें वेंग । पडोंच नेदी ॥ २१ ॥
जें वडिलीं निर्माण केलें । तें पाहिजे पाहिलें ।
काये काये वडिलीं केलें । कीती पाहावें ॥ २२ ॥
तो वडिल जेथें चेतला । तोचि भाग्यपुरुष जाल ।
अल्प चेतनें तयाला । अल्पभाग्य ॥ २३ ॥
तया नारायेणाला मनीं । अखंड आठवावें ध्यानीं ।
मग ते लक्ष्मी तयापासूनी । जाईल कोठें ॥ २४ ॥
नारायेण असे विश्वीं । त्याची पूजा करीत जावी ।
याकारणें तोषवावी । कोणीतरी काया ॥ २५ ॥
उपासना शोधून पाहिली । तों ते विश्वपाळिती जाली ।
न कळे लीळा परीक्षिली । न वचे कोणा ॥ २६ ॥
देवाची लीळा देवेंविण । आणीक दुसरा पाहे कोण ।
पाहणें तितुकें आपण । देवचि असे ॥ २७ ॥
उपासना सकळां ठाईं । आत्माराम कोठें नाहीं ।
याकारणें ठाइं ठाइं । रामे आटोपिलें॥ २८ ॥
ऐसी माझी उपासना । आणितां नये अनुमाना ।
नेऊन घाली निरंजना । पैलिकडे ॥ २९ ॥
देवाकरितां कर्में चालती । देवाकरितां उपासक होती ।
देवाकरितां ज्ञानी असती । कितियेक ॥ ३० ॥
नाना शास्त्रें नाना मतें । देवचि बोलिला समस्तें ।
नेमकांनेमक वेस्तावेस्तें । कर्मानुसार ॥ ३१ ॥
देवास अवघें लागे करावें । त्यांत घेऊं ये तितुकें घ्यावें ।
अधिकारासारिखें चालावें । म्हणिजे बरें ॥ ३२ ॥
आवाहन विसर्जन । ऐसेंचि बोलिलें विधान ।
पूर्वपक्ष जाला येथून । सिद्धांत पुढें ॥ ३३ ॥
वेदांत सिद्धांत धादांत । प्रचित प्रमाण नेमस्त ।
पंचिकर्ण सांडून हित । वाक्यार्थपाहावा ॥ ३४ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पिंडोत्पत्तिनिरूपणणनाम समास नववा ॥
समास दहावा : सिद्धांतनिरूपण
॥ श्रीराम ॥
गगनीं अवघेंचि होत जातें । गगनाऐसें तगेना तें ।
निश्चळीं चंचळ नाना तें । येणेंचि न्यायें ॥ १ ॥
अंधार दाटला बळें। वाटे गगन जालें काळें ।
रविकिर्णें तें पिवळें । सवेंचि वाटे ॥ २ ॥
उदंड हिंव जेव्हां पडिले । गमे गगन थंड जालें।
उष्ण झळेनें वाळलें। ऐसें वाटे ॥ ३ ॥
ऐसें जें कांहीं वाटलें । तें तें जालें आणि गेलें ।
आकाशासारिखें तगलें । हें तों घडेना ॥ ४ ॥
उत्तम जाणिवेचा जिनस । समजोन पाहे सावकास ।
निराभास तें आकाश । भास मिथ्या ॥ ५ ॥
उदक पसरे वायो पसरे । आत्मा अत्यंतचि पसरे ।
तत्वें तत्व अवघेंचि पसरे । अंतर्यामीं ॥ ६ ॥
चळतें आणि चळेना तें । अंतरीं अवघेंच कळतें ।
विवरणेंचि निवळतें । प्राणिमात्रासी ॥ ७ ॥
विवरतां विवरतां शेवटीं । निवृत्तिपदीं अखंड भेटी ।
जालियानें तुटी । होणार नाहीं ॥ ८ ॥
जेथें ज्ञानाचें होतें विज्ञान । आणि मनाचें होतें उन्मन ।
तत्वनिर्शनीं अनन्य। विवेकें होतें ॥ ९ ॥
वडिलांस शोधून पाहिलें । तों चंचळाचें निश्चळ जालें ।
देवभक्तपण गेलें । तये ठाइं ॥ १० ॥
ठाव म्हणतां पदार्थ नाहीं। पदार्थमात्र मुळीं नाहीं ।
जैसें तैसें बोलों कांहीं । कळावया ॥ ११ ॥
अज्ञानशक्ति निरसली। ज्ञानशक्ति मावळली ।
वृत्तिशून्यें कैसी जाली । स्थिती पाहा ॥ १२ ॥
मुख्य शक्तिपात तो ऐसा । नाहीं चंचळाचा वळसा ।
निवांतीं निवांत कैसा । निर्विकारी ॥ १३ ॥
चंचळाचीं विकार बालटें । तें चंचळचि जेथें आटे ।
चंचळ निश्चळ घनवटे । हें तों घडेना ॥ १४ ॥
माहावाक्याचा विचारु । तेथें संन्याशास अधिकारु।
दैवीकृपेची जो नरु । तोहि विवरोन पाहे ॥ १५ ॥
संन्यासी म्हणिजे शडन्यासी । विचारवंत सर्व संन्यासी ।
आपली करणी आपणासी । निश्चयेंसीं ॥ १६ ॥
जगदीश वोळल्यावरी । तेथें कोण अनुमान करी ।
आतां असो हें विचारी। विचर जाणती ॥ १७ ॥
जे जे विचारी समजले । ते ते निःसंग होऊन गेले ।
देहाभिमानी जे उरले। ते देहाभिमान रक्षिती ॥ १८ ॥
लक्षीं बैसले अलक्ष । उडोन गेला पूर्वपक्ष ।
हेतुरूपें अंतरसाक्ष । तोहि मावळला ॥ १९ ॥
आकाश आणि पाताळ । दोनी नामें अंतराळ ।
काढितां दृश्याचें चडळ । अखंड जालें ॥ २० ॥
तें तों अखंडचि आहे । मन उपाधी लक्षून पाहे।
उपाधिनिरासें साहे । शब्द कैसा ॥ २१ ॥
शब्दपर कल्पनेपर । मन बुद्धि अगोचर ।
विचारें पाहावा विचार। अंतर्यामीं ॥ २२ ॥
पाहातां पाहातां कळों येतें । कळलें तितुकें वेर्थ जातें ।
अवघड कैसें बोलावें तें । कोण्या प्रकारें ॥ २३ ॥
वाक्यार्थवाच्यांश शोधिला। अलक्षीं लक्ष्यांश बुडाला ।
पुढें समजोन बोला । कोणीतरी ॥ २४ ॥
शाश्वतास शोधीत गेला । तेणें ज्ञानी साच जाला ।
विकार सांडून मिळाला । निर्विकारीं ॥ २५ ॥
दुःस्वप्न उदंड देखिलें । जागें होतां लटिकें जालें ।
पुन्हां जरी आठवलें । तरी तें मिथ्या ॥ २६ ॥
प्रारब्धयोगें देह असे । असे अथवा नासे ।
विचार अंतरीं बैसे । चळेना ऐसा ॥ २७ ॥
बीज अग्नीनें भाजलें । त्याचें वाढणें खुंटलें ।
ज्ञात्यास तैसे जालें । वासनाबीज ॥ २८ ॥
विचारें निश्चळ जाली बुद्धि । बुद्धिपासीं कार्यसिद्धि ।
पाहातां वडिलांची बुद्धि । निश्चळीं गेलीं ॥ २९ ॥
निश्चळास ध्यातो तो निश्चळ । चंचळास ध्यातो तो चंचळ ।
भूतास ध्यातो तो केवळ । भूत होये ॥ ३० ॥
जो पावला सेवटवरी । तयास हें कांहींच न करी ।
अंतरिनिष्ठा बाजीगरी । तैसी माया ॥ ३१ ॥
मिथ्या ऐसें कळों आलें । विचारानें सदृढ जालें ।
अवघें भयेंचि उडालें । अकस्मात ॥ ३२ ॥
उपासनेचें उत्तिर्ण व्हावें । भक्तजनें वाढवावें ।
अंतरीं विवेकें उमजावें । सकळ कांहीं ॥ ३३ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सिद्धांतनिरूपणनाम समास दहावा ॥
॥ दशक पंधरावा समाप्त ॥