Get it on Google Play
Download on the App Store

श्लोक ५१ ते १००

मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी ।
प्रपंचीक नाही जयाते उपाधी ॥
सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५१ ॥

क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे ।
न लिंपे कदा दंभ वादे विवादे ॥
करी सूखसंवाद जो ऊगमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५२ ॥

सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकी ।
सदा सर्वदा सत्यवादी विवेकी ॥
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५३ ॥

सदा सेवि आरण्य तारुण्यकाळी ।
मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी ॥
चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५४ ॥

नसे मानसी नष्ट आशा दुराशा ।
वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा ॥
ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५५ ॥

दिनाचा दयाळू मनाचा मवाळू ।
स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू ॥
तया अंतरी क्रोध संताप कैचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५६ ॥

जगी होइजे धन्य या रामनामे ।
क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमें ॥
उदासीनता तत्त्वता सार आहे ।
सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥ ५७ ॥

नको वासना वीषयी वृत्तिरूपे ।
पदार्थी जडे कामना पूर्वपापे ॥
सदा राम निष्काम चिंतीत जावा ।
मना कल्पनालेश तोहि नसावा ॥ ५८ ॥

मना कल्पना कल्पिता कल्पकोटी ।
नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी ॥
मनी कामना राम नही जयाला ।
अती आदरे प्रीति नाहि तयाला ॥ ५९ ॥

मना राम कल्पतरू कालधेनू ।
निधी सार चिंतामणी काय वानू ॥
जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता ।
तया साम्यता कायसी कोण आता ॥ ६० ॥

उभा कल्पवृक्षातळू दुःख वाहे ।
तया अंतरी सर्वदा तेचि आहे ॥
जनीं सज्जनीं वाद हा वाढवा ।
पुढे मागता शोक जीवी धरावा ॥ ६१ ॥

निजध्यास तो सर्व तूटोनी गेला ।
बळे अंतरी शोक संताप ठेला ॥
सुखानंद आनंद भेदे बुडाला ।
मना निश्चयो सर्व खेदे उडाला ॥ ६२ ॥

घरी कामधेनू पुढे ताक मागे ।
हरीबोध सांडोनि वेवाद लागे ॥
करी सार चिंतामणी काचखंडे ।
तया मागता देत आहे उदंडे ॥ ६३ ॥

अती मूढ त्या दृढ बुद्धी असेना ।
अती काम त्या राम चित्ती वसेना ॥
अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा ।
अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा ॥ ६४ ॥

नको दैन्यवाणे जिणे भक्तिऊणे ।
अती मूर्ख त्या सर्वदा दुःख दूणे ॥
धरी रे मना आदरे प्रीति रामी ।
नको वासना हेमधामी विरामी ॥ ६५ ॥

नव्हे सार संसार हा घोर आहे ।
मना सज्जना सत्य शोधूनि पाहे ॥
जनीं वीष खाता पुढे सूख कैचे ।
करी रे मना ध्यान या राघवाचे ॥ ६६ ॥

घनश्याम हा राम लावण्यरूपी ।
महाधीर गंभीर पूर्णप्रतापी ॥
करी संकटी सेवकांचा कुडावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६७ ॥

बळे आगळा राम कोदंडधारी ।
महाकाळ विक्राळ तोही थरारी ॥
पुढे मानवा किंकरा कोण केवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६८ ॥

सुखानंदकारी निवारी भयाते ।
जनीं भक्तिभावे भजावे तयाते ॥
विवेके त्यजावा अनाचार हेवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६९ ॥

सदा रामनामे वदा पूर्णकामे ।
कदा बाधिजेना पदा नित्य नेमे ॥
मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७० ॥

जयाचेनि नामे महादोष जाती ।
जयाचेनि नामे गती पाविजेती ॥
जयाचेनि नावे घडे पुण्यठेवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७१ ॥

न वेचे कदा ग्रंथची अर्थ काही ।
मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही ॥
महाघोर संसारशत्रू जिणावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७२ ॥

देहेदंडणेचे महादुःख आहे ।
महादुःख ते नाम घेता न राहे ॥
सदाशीव चिंतीतसे देवदेवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७३ ॥

बहुतांपरी संकटे साधनांची ।
व्रते दान उद्यापने ती धनाची ॥
दिनाचा दयाळू मनी आठवावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७४ ॥

समस्तांमधे सार साचार आहे ।
कळेना तरी सर्व शोधूत पाहे ॥
जिवा असंशयो वाऊगा तो त्यजावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७५ ॥

नव्हे कर्म ता धर्म ना योग काही ।
नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही ॥
म्हणे दास विश्वास नामी धरावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७६ ॥

करी काम निष्काम या राघवाचे ।
करी रूप स्वरूप सर्वां जिवांचे ॥
करी छंद निर्द्वंद्व हे गूण गाता ।
हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होता ॥ ७७ ॥

अहो ज्या नरा रामविश्वास नाही ।
तया पामरा बाधिजे सर्व काही ॥
महाराज तो स्वामि कैवल्यदाता ।
वृथा वाहणे देहसंसारचिंता ॥ ७८ ॥

मना पावना भावना राघवाची ।
धरी अंतरी सोडि चिंता भवाची ॥
भवाची जिवा मानवा भूलि ठेली ।
नसे वस्तुची धारणा व्यर्थ गेली ॥ ७९ ॥

धरा श्रीवरा त्या हरा अंतराते ।
तरा दुस्तरा त्या परा सागराते ॥
सरा वीसरा त्या भरा दुर्भराते ।
करा नीकरा त्या खरा मत्सराते ॥ ८० ॥

मना मत्सरे नाम सांडू नको हो ।
अती आदरे हा निजध्यास राहो ॥
समस्तांमधे नाम हे सार आहे ।
दुजी तूळणा तूळिताही न साहे ॥ ८१ ॥

बहू नाम या रामनामी तुळेना ।
अभाग्या नरा पामरा हे कळेना ॥
विषा औषधा घेतले पार्वतीशे ।
जिवा मानवा किंकरा कोण पूसे ॥ ८२ ॥

जेणे जाळिला काम तो राम ध्यातो ।
उमेसी अती आदरे गूण गातो ॥
बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे ।
परी अंतरी नामविश्वास तेथे ॥ ८३ ॥

विठोने शिरी वाहिला देवराणा ।
तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा ॥
निवाला स्वये तापसी चंद्रमौळी ।
जिवा सोडवी राम हा अंतकाळी ॥ ८४ ॥

भजा राम विश्राम योगेश्वरांचा ।
जपू नेमिला नेम गौरीहराचा ॥
स्वये नीववी तापसी चंद्रमौळी ।
तुम्हां सोडवी राम हा अंतकाळी ॥ ८५ ॥

मुखी राम विश्राम तेथेचि आहे ।
सदानंद आनंद सेवोनि आहे ॥
तयावीण तो शीण संदेहकारी ।
निजधाम हे नाम शोकापहारी ॥ ८६ ॥

मुखी राम त्या काम बाधू शकेना ।
गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना ॥
हरीभक्त तो शक्त कामास भारी ।
जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥ ८६ ॥

बहू चांगले नाम या राघवाचे ।
अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे ॥
करी मूळ निर्मूळ घेता भवाचे ।
जिवा मानवा हेचि कैवल्य साचे ॥ ८८ ॥

जनीं भोजनीं नाम वाचे वदावे ।
अती आदरे गद्यघोषे म्हणावे ॥
हरीचिंतने अन्न सेवीत जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥ ८९ ॥

न ये राम वाणी तया थोर हाणी ।
जनीं व्यर्थ प्राणी तया नाम कोणी ॥
हरीनाम हे वेदशास्त्री पुराणी ।
बहू आगळे बोलिली व्यासवाणी ॥ ९० ॥

नको वीट मानू रघूनायकाचा ।
अती आदरे बोलिजे राम वाचा ॥
न वेचे मुखी सापडे रे फुकाचा ।
करी घोष त्या जानकीवल्लभाचा ॥ ९१ ॥

अती आदरे सर्वही नामघोषे ।
गिरीकंदरी जाईजे दूरि दोषे ॥
हरी तिष्ठतू तोषला नामघोषे ।
निशेषे हरामानसी रामपीसे ॥ ९२ ॥

जगी पाहता देव हा अन्नदाता ।
तया लागली तत्त्वता सार चिंता ॥
तयाचे मुखी नाम घेता फुकाचे ।
मना सांग पा रे तुझे काय वेचे ॥ ९३ ॥

तिन्ही कोप जाळू शके कोप येता ।
निवाला हरू तो मुखे नाम घेता ॥
जपे आदरे पार्वती विश्वमाता ।
म्हणोनी म्हणा तेचि हे नाम आता ॥ ९४ ॥

अजामेळ पापी वदे पुत्रकामे ।
तया मुक्ति नारायणाचेनि नामे ॥
शुकाकारणे कुंटणी राम वाणी ।
मुखे बोलिता ख्याति जाली पुराणी ॥ ९५ ॥

महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळी ।
जपे रामनामावळी नित्यकाळी ॥
पिता पापरूपी तया देखवेना ।
जनीं दैत्य तो नाम मूखे म्हणेना ॥ ९६ ॥

मुखी नाम नीही तया मुक्ति कैची ।
अहंतागुणे यातना ते फुकाची ॥
पुढे अंत येईल तो दैन्यवाणा ।
म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा ॥ ९७ ॥

हरीनाम नेमस्त पाषाण तारी ।
बहू तारिले मानवी देहधारी ॥
तया रामनामी सदा जो विकल्पी ।
वदेना कदा जीव तो पापरूपी ॥ ९८ ॥

जगी धन्य वाराणसी पुण्यराशी ।
तयेमाजि आता गती पूर्वजांसी ॥
मुखे रामनामावळी नित्यकाळी ।
जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी ॥ ९९ ॥

यथासांग रे कर्म तेही घडेना ।
घडे धर्म ते पुण्यगाठी पडेना ॥
दया पाहता सर्व भूती असेना ।
फुकाचे मुखी नाम तेही वसेना ॥ १०० ॥

 

मनाचे श्लोक

समर्थ रामदास स्वामी‎
Chapters
श्लोक १ ते ५० श्लोक ५१ ते १०० श्लोक १०१ ते १४०