Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण सातवे

**नवकोट नेहपान यांचा राजवाडा**

नगरनायकाच्या आलिशान वाड्यात एका कक्षामध्ये हंसरेखा आणि अजातरिपू नगरनायकांची वाट पाहत उभे होते. इतक्यात नगरनायक यांनी प्रवेश केला. दोघांनी त्यांना कमरेत वाकून हाताची सर्व बोटे आणि पंजा जमिनीला टेकवून नमस्कार केला.

“अच्छा, तर तू आहेस अजातरिपू...” नगरनायक  

“होय हेच आहेत अजातरिपू...” अजातरिपू काही बोलणार त्याआधीच हंसरेखेने उतावीळपणे उत्तर दिले.

“खूपच देखणा आहेस. हंसरेखेची निवड चांगली आहे.” नगरनायक अजातरिपूकडे एकटक पाहत होते.

“ये इकडे समोर ये. मी तुला आलिंगन देऊ इच्छितो.” असे म्हणून नगरनायकांनी आपले हात पुढे केले.

अजातरिपू नगरनायकांच्या आसनाजवळ जाऊ लागला आणि त्याने जेमतेम अर्धे अंतर पार केले असेल अचानक राजवाड्याच्या घुमटातून एक दिपवून टाकणाऱ्या प्रकाशझोतात तो न्हाऊन निघाला आणि पुढच्या क्षणीच अजातरीपुचे शरीर तिथे नव्हते. त्याच्या शरीराच्या जागी एक प्रकारचा पांढरा धूर येत होता.

“अजातरिपू....” हंसरेखा किंचाळली.

“बघ, तू याला महान वैज्ञानिक समजत होतीस. पण हा तर अगदी सामान्य मृत्यूप्रकाशाच्या झोतापासून स्वत:ला वाचवू देखील नाही शकला.” नगरनायक अत्यंत क्रूरपणे हसत म्हणाला.   

“ पण तू असं का केलंस?” हंसरेखा रडत होती.

“कारण तो आपल्या विवाहातील एक लहानशी अडचण होता. मी एखाद्या गोष्टीवर माझे बोट ठेवतो ती वस्तू माझी असते.” नगरनायक

“पण मी वस्तू नाहीये...” हंसरेखा

“ माझ्या ४०० राण्या आहेत त्यातल्या ३७५ च्या वर राण्या अशाच बळजबरीने मी विवाह करून आणल्या आहेत. आणि त्या माझ्यासाठी उपभोगाच्या वस्तूच आहेत. आता तुझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नाहीये.” असे म्हणून नगरनायकाने तिला त्याच्याजवळ येण्याचा इशारा केला.

हळू हळू तिच्या चेहऱ्यावरील भाव बदलू लागले. आता तिने मनात कसलासा विचार केला आणि ती मादक आवाजात मंद स्मित करत म्हणाली.

“नाही तूच माझ्याकडे ये.” काही क्षणांपूर्वी ती रडत होती हे कोणाला खरे वाटले नसते.  

‘‘ठीक आहे. तुझी तशी इच्छा आहे तर हरकत नाही.’ नगरनायक चालत पुढे आला आणि त्याने तिचा हात धरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या हाती काहीच आले नाही. उलट तो तिच्या शरीराच्या आरपार गेला. त्याला पहिले विश्वास बसला नाही त्याने पुन्हा एकदा तिला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु पुन्हा तेच घडले.
“हे मी काय पाहतोय? हे कसं शक्य आहे?” नगरनायक बिथरला होता.  

“ हे शक्य आहे. तू अजातरिपूला मारून हंसरेखेला कधीही मिळवू शकत नाहीस. तू ज्याला मारलेस तो अजातरिपूचा क्लोन होता आणि मी एक थ्रीडी होलोग्राम आहे.” हंसरेखा.

नगरनायक वेड्यासारखा हंसरेखेचा होलोग्राम पकडण्याचा प्रयत्न करत धडपडत राहिला. काही वेळात तो होलोग्राम नष्ट झाला आणि त्याचा होलोग्राफिक प्रोजेक्टर बड जमिनीवर पडला. नगरनायक हे प्रगत तंत्रज्ञान पाहून पुरता भांबावून गेला होता.

क्रमश: