प्रकरण दुसरे
**नेहपान ग्रह पाषाणउद्यान**
त्या मोठ्या सोहळ्यातून काढता पाय घेऊन अजातरिपू आणि हंसरेखा नेहपान ग्रहाच्या दक्षिण गोलार्धात स्थित असलेल्या अजातरिपुने स्वत: निर्माण केलेल्या विशालकाय पाषाण उद्यानात एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बसले होते.
“अजातरिपू” हंसरेखा
“हं....” अजातरिपू
“मला वाटतय कि आता आपण लग्न करायला हवं, मी आता तुझ्या शिवाय राहु शकत नाही..”
“ हंसरेखा फक्त ३ वर्ष थांब! मी अजूनही लग्न करण्याच्या योग्य वयात आलो नाहीये. आता मी ९७ वर्षाचा आहे आणि माझा वैज्ञानिक प्रकल्प आता अगदी अखेरच्या टप्प्यावर आहे. ज्या दिवशी तो पूर्ण होईल त्या दिवशी मला या ग्रहावरील सर्वात महान वैज्ञानिक हि पदवी मिळेल नंतर काय..माझ्या क्लाउडवर हवे तेवढे कुपन. आपण खुशाल लग्न करू शकतो.”
“अरे, माझ्याकडे पुरेसे कुपन आहेत क्लाउडवर आधीच. माझं वय देखील वाढत जातंय. १२१ वर्षाची झाल्ये मी. बाबा गेली ३० वर्ष लग्न कर लग्न कर म्हणून मागे लागले आहेत. बर अजातरिपू तुझा प्रकल्प नक्की काय आहे ते मला सांगितलं नाहीस.”
“तू विचारलस तरी कुठे? चल आज मी तुला माझी प्रयोगशाळा दाखवतो.”
अजातरिपूने तिचा हात धरला आणि तो तिला पाषाण उद्यानाच्या प्रवेशद्वारापाशी घेऊन आला. तेथे त्याचे निष्कासयान त्यांची वाट पाहत होते. ते दोघे त्या निष्कासयानात जाऊन बसले.
क्रमश: