Get it on Google Play
Download on the App Store

सिनेमा पॅरॅडीसो

नॉस्टॅल्जिया म्हणजे भूतकाळाच्या आठवणीत रमणे एक विशेष भावना आहे. सर्वच लोकांना ह्या भावनेचा अनुभव असला तरी काही लोकांना भूतकाळाविषयी विशेष आत्मीयता असते. आपले जुने प्रेम, घर ह्यांच्याबद्दल लोकांना आत्मीयता तर असतेच पण काही लोकांना अत्यंत साध्या साध्या गोष्टींची आठवण सुद्धा येऊन भावना आवरता येत नाहीत. एखाद्या अगरबत्तीचा सुगंध, फुलांचा वास, किंवा माजघरातील दिव्याच्या वातीची आठवण, एखादे पक्वान्न आणि अत्यंत सध्या सरळ गोष्टी ह्या भावना ट्रिगर करू शकतात. असो, ज्यांना अनुभव आहे त्यांना १००% ठाऊक आहे कि मला काय म्हणायचे आहे.

माझा एक जवळचा मित्र नेहमीच ह्या चित्रपटाची स्तुती करायचा. त्याच्या गाडीत ह्या चित्रपटाचे संगीत नेहमीच असायचे. त्याच्या मते खूप वर्षे आधी दूरदर्शन २ चॅनेल ने आपले स्लॉट्स एका ऑस्ट्रेलियन कंपनीला भाड्याने दिले. त्यांनी अनेक सुरेख अश्या मालिका निर्माण केल्या. त्यातील एक मालिका होती ती म्हणजे डिरेक्टर्स कट. ह्यांत काही भारतीय दिग्दर्शकांना आपल्या आवडीचे कथानक घेऊन टेलिफिल्म बनविण्यास सांगितले होते. मी दुर्दैवाने ह्यातील एकच भाग पहिला तो म्हणजे रागेश्वरी आणि आशुतोष राणा ह्यांची एक प्रेमकथा. दिल ने सुना असे त्याचे नाव असावे बहुतेक. पण माझ्या मित्राचा आवडता भाग म्हणजे जन्नत टॉल्किज. मजेशीर गोष्ट म्हणजे त्यांनी तो भाग पहिला सुद्धा नव्हता. मिलिंद सोमण आणि भक्ती बर्वे ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या टेलिफिल्म चा फक्त शेवटचा सिन त्याने पहिला होता आणि त्याने खूप मेहनत घेऊन ती टेलिफिल्म मिळवण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्याला कुणी तरी सांगितले कि मूळ इटालियन आणि खूप लोकप्रिय अश्या सिनेमा परडीजो चा तो हिंदी रिमेक होता. तेंव्हा पासून तो ह्या चित्रपटाचे गुण गात असे.

मी तो चित्रपट हल्लीच पहिला आणि का तो चित्रपट इतका हृदयस्पर्शी आहे हे तात्काळ समजले.

सिनेमा पॅरॅडीसो हा एक इटालियन चित्रपट आहे. IMDB २५० मध्ये तो ५० व्या क्रमांकावर आहे. चित्रपटाच्याबद्दल लिहिण्याच्या आधी इटालियन समाजाबद्दल थोडे लिहिणे आवश्यक आहे. इटली हे एक असे राष्ट्र आहे ज्याचा इतिहास अत्यंत जुना आणि खूप गौरवशाली आहे. मानवी इतिहासातील सर्वांत मोठे साम्राज्य रोम ह्याच प्रदेशांतील. उच्च दर्जाची कला ह्याच प्रदेशांत फळाला आली. चीन, भारतीय ज्ञान हे अरब लोकांनी युरोप मध्ये नेले ते आम्हाला ठाऊक आहे पण इटली हे त्या ज्ञानाचा युरोपिअन दरवाजा होता. ख्रिस्तोफर कोलंबस हा इटालियन होता. मी जास्त खोलात जात नाही कारण इटालियन इतिहास अतिशय विस्तृत आणि फार मनोरंजक आहे.

पण एक काळ असा होता (१४-१५ वे शतक) जेंव्हा इटली म्हणजे सिटी-स्टेट्स चा समूह होता. नेपल्स, मिलान, व्हेनिस, फ्लोरेन्स इत्यादी. व्हेनिस हे शहर विशेष समृद्ध होते. आधुनिक बँकिंग क्षेत्राचा पाया इथेच घेतला गेला. शहराचे मेयर किंवा प्रमुख नेते नेहमीच कला क्षेत्राला खूप महत्व द्यायचे. इटालियन कलेचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे perfection आणि attention to details. समजा व्हेनिस शहरात एक नाटक चालले आहे. नाटकाच्या कथेत खजिन्याने भरलेली पेटी असे एक प्रॉप आहे. पेटी कधी उघडली जात नाही. बहुतेक ठिकाणी अशी पेटी हि रिकामीच ठेवली जाईल. पण व्हेनिस मध्ये नाही. व्हेनिस मध्ये बंद पेटीत सुद्धा खरा खजिना असल्याशिवाय नाटक सुरू करत नसत. हा खजिना त्यांत आहे ह्याची खातरजमा शहरातील प्रतिष्ठित लोक आधी करत असत. तसेच कलाकारांचा पोशाख, हातातील हत्यारे इत्यादी सर्व काही खरे असले पाहिजे असा इटालियन समाजाचा हट्ट होता.

हे विचित्र वाटले तरी हा इटालियन स्वभाव तुम्हाला त्यांच्या सर्व गोष्टीत सापडेल. उदाहरण म्हणजे कातड्याच्या हॅन्डबॅग्स. बहुतेक लोकांना बॅग बाहेरून झकपक वाटली कि झाले. पण इटालियन लोकांचे तसे नाही. त्यांनी बनविलेल्या हॅन्डबॅग्स चा आतील भाग आणि शिवण सुद्धा परफेक्ट असते. तीच गोष्ट त्यांच्या सूट्स आणि पादत्राणांची. आतील न दिसणारी शिवण आणि मटेरियल नेहमीच परफेक्ट. इटालियन लॅम्बोर्गिनी स्पोर्ट्स कार मी पहिली नाही तरी ट्रॅक्टर पहिला आहे. इंजिन ओपन केले तर आतील यंत्रणा सुद्धा अगदी व्यवस्थित आणि सुबक. तेच फर्निचर चे घ्या. लाकूड चांगले वापरले म्हणून होत नाही, ते जोडण्यासाठी वापरले जाणारे सांधे, खिळे इत्यादी सुद्दा चांगले असले पाहिजेत. इटालियन फर्निचर मध्ये तुम्हाला हे गुण हमखास सापडतील. (इटालियन कातड्याचा उद्योग सध्या भारतीय आणि बांगलादेशी मुस्लिम लोकांच्या हाती आहे, इटालियन व्यक्ती फक्त Quality control चे काम करतात).

इटालियन खाद्यपदार्थ मला जरी आवडत नसले तरी जगप्रसिद्ध आहे. तिथे सुद्धा तुम्हाला इटालियन स्वभाव दिसेल. Bruschetta हि एक इटालियन डिश आहे. खरे तर एक अत्यंत छोटा टोस्ट त्यावर तुळशीची पाने, टोमॅटोचे तुकडे, थोडे ऑलिव्ह तेल आणि चवीनुसार मिरी आणि मीठ ! आम्ही भारतीय असल्या पदार्थाना मसाला पापड सारख्या क्षुल्लक पदार्थांच्या पंक्तीत बसवू फार तर पण इटालियन लोकांसाठी हे मोठे आहे. इटालियन ब्रेड आणि वाईन्स बद्दल लिहायला लागले तर खूप वेळ लागेल.

आता येऊ चित्रपटाच्या कथानकाकडे. द्वितीय महायुद्ध संपले आहे अशी चित्रपटाची पार्शवभूमी आहे. इटली अर्थांत मुसोलिनीच्या मार्फत हिटलरच्या बाजूने लढत होता त्यामुळे त्यांचा पराभव झाला होता. इटालियन गांव, अर्थव्यवस्था समाज व्यवस्था सर्व काही कोलमडले होते. हळू हळू काळ बदलला आणि १९८८ पर्यंत इटली पुन्हा एक समृद्ध राष्ट्र बनला.

साल्वाडोर विटी आपल्या बिछान्यात आपल्या प्रेयसी सोबत झोपला आहे आणि त्याला एक फोन येतो. दुसऱ्या बाजूला त्याची आई आहे ती त्याला सांगते कि आल्फ्रेडोचे निधन झाले आहे. साल्वाडोर श्रीमंत आणि अत्यंत लोकप्रिय चित्रपट निर्देशक आहे. त्याची प्रेयसी दिवसागणिक बदलते आणि सिसिली मधील जियानकाल्डो गांवात जाऊन त्याला ३० वर्षे झाली आहेत. त्याची प्रेयसी त्याला विचारते कि हा आल्फ्रेडो कोण आहे ? साल्वाडोर झोपायचा प्रयत्न करतो पण निद्रादेवी त्याला हुलकावणी देते. आणि अपेक्षेप्रमाणे आम्ही भूतकाळांत जातो.

द्वितीय महायुद्ध संपले आहे आणि इटालियन समाजव्यवस्था जवळ जवळ कोलमडली आहे. अनेक पुरुष मंडळी युद्धावर गेली ती परत आलीच नाही. ८ वर्षांचा साल्वाडोर त्याच्या विधवा मातेसोबत राहतो आणि तो अत्यंत खट्याळ आहे. त्याला सर्व प्रेमाने टोटो म्हणतात. त्याला एक बहीण सुद्धा आहे.

गांवात विशेष काही होत नाही. फक्त एक खास गोष्ट आहे ती म्हणजे गांवात एक थेटर आहे. त्याचे नाव सिनेमा पॅरॅडीसो. इथे गावकरी मंडळी चित्रपट पाहून श्रमपरिहार करतात. गांवातील ख्रिस्ती पाद्री प्रत्येक चित्रपट आपण सर्वप्रथम पाहतो आणि कुठले सीन्स काढून टाकावेत ह्याची सूचना थेटर चा प्रोजेक्शनिस्ट आल्फ्रेडो ह्याला देतो. आल्फ्रेडो मग त्या सीन्स ची रीळ कापून टाकतो. मग जेंव्हा फिल्म दुसऱ्या गावांत पोचवण्याची वेळ येते तेंव्हा कापून टाकलेले सीन्स तो पुन्हा जोडतो. म्हणजे विविध शृंगार रस पूर्ण सीन्स जे आहेत ते लोकांना कधी बघायलाच मिळत नाहीत. लोक त्यामुळे बोंबाबोम करतात.

आता गावातील थेटर म्हणजे इथे काही लेटेस्ट चित्रपट येत नाहीत. येथे जुने हॉलिवूडचे चित्रपट आणि जुने इटालियन चित्रपट येत असतात. आल्फ्रेडो आणि टोटो ह्यांचे आधी भांडण होते तरी शेवटी आल्फ्रेडो पाहतो कि टोटोला खरोखर सिनेमाचे प्रेम आहे. दोघेही मग प्रोजेक्शन रूम मध्ये बसून सर्व चित्रपट पाहतात. हळू हळू टोटो प्रोजेक्टर कसा चालवावा हे सुद्धा शिकतो. एकच चित्रपट अनेक वेळा पाहिल्याने त्यांना सर्व सीन्स, सर्व डायलॉग सर्व पाठ असतात. प्रत्येक चित्रपटाचे बारकावे त्यांच्या डोक्यांत जातात. टोटो एक हुशार मुलगा आहे ह्याची जाणीव आल्फ्रेडो ला होत असते.

टोटोच्या आईला हे पसंद नाही. दोन पोरांचा सांभाळ करायला तिला जड जात आहे आणि युद्धावर गेलेला आपला पती कदाचित परत येईल अशी एक खोटी आशा सुद्धा तिला आहे. सत्य तिला ठाऊक असले तरी जितके शक्य आहे तितके ती मुलांसाठी करते.

आणि एक दिवस एक मोठा अपघात होतो. त्या काळाची फिल्म रील ही ज्वालाग्राही आणि स्फोटक नायट्रेट पदार्थाची बनलेली असायची. एकदा त्याला आग लागली कि ती विझवणे जवळ जवळ अशक्य आहे. सिनेमा परडीजो ला आग लागते आणि सर्व थेटर जाळून खाक होते. आल्फ्रेडो वाचतो पण त्याची दृष्टी जाते. ज्याचे आख्खे आयुष्य सिनेमा पाहण्यात गेले त्याचे डोळेच जाणे ही एक प्रकारची विडंबनाच होते. थेटर नसल्याने आल्फ्रेडोच्या उपजीविकेचे साधन सुद्धा गायब होते. पण गांवातील एका जुगारी माणसाला लॉटरी लागते आणि तो त्या पैश्यांनी थेटर पुन्हा उभे करतो. ह्यावेळी थेटर त्याच्या मालकीचे असल्याने पाद्रीला तिथे प्रवेश नसतो आणि सर्व चित्रपट विना सेन्सर दाखवले जातात. पण आल्फ्रेडो अंध असल्याने प्रोजेक्टर चालविण्याचे काम छोट्या टोटो वर येते. त्या पैश्यांनी आल्फ्रेडो आणि टोटो चा परिवार ह्यांना सुद्धा उपजीविकेचे साधन मिळते.

टोटो आल्फ्रेडोला चित्रपटांची कथा सांगतो. तो जणू काही त्याचे डोळे बनतो. आल्फ्रेडो त्याच्यासाठी एक फादर फिगर आहे. आल्फ्रेडोने जग पाहिले नसले तरी त्याने प्रचंड चित्रपट पहिले आहेत त्यामुळे जेंव्हा जेंव्हा टोटो त्याला काही विचारतो तेंव्हा आल्फ्रेडो सुप्रसिद्ध चित्रपटांच्या डायलॉग्स वरून त्याला सल्ला देतो. ही बारीक गोष्ट तुम्ही चित्रपटांचे रसिक असल्याशिवाय तुमच्या लक्षांत येणार नाही.

दहा वर्षे निघून जातात आणि चित्रपट गियर बदलतो. टोटो तरुण आहे आणि शाळेत आहे. टोटो एक छोटा केमेरा घेऊन चित्रपट बनविण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्या शाळेतील एलेना ह्या मुलीचा व्हिडीओ तो बनवतो. आता इथे थोडा ब्रेक घेऊयात.

सिनेमा पॅरॅडीसो चा जो टायटल संगीत आहे तो इंनिओ मॉरिकॉने ह्या जगप्रसिद्ध आणि लिजेंडरी संगीतकाराचा आहे. तुम्ही कुठेही सर्च करून पहा जगातील टॉप चित्रपट संगीतात हा टायटल ट्रेक सहज पणे पहिल्या ३० मध्ये येईल. मॉरिकोनेच्या संगीत साधनेबद्दल बोलायचे झाल्यास तो एक भला मोठा विषय आहे. तुम्हाला हे नाव ठाऊक नसले तरी १००% तुम्ही त्यांचे संगीत ऐकले आहे. त्यांची कारकीर्द ५० पेक्षा जास्त वर्षांची असल्याने भरपूर भारतीय संगीतकारांनी त्यांचे संगीत थेट चोरून वापरले आहे.

पण टोटो एलेनाचा विडिओ बनविताना जे संगीत आहे ते मॉरिकॉनने ह्यांचे "फर्स्ट युथ" हे संगीत आहे. मूळ चित्रपटांत फक्त व्हायोलिन वर काही सेकंदच आहे पण त्याचे जे सौंदर्य आहे त्याचे वर्णन शब्दात करण्याची प्रतिभा नाही ही हळहळ व्यक्त करण्याशिवाय माझ्याकडे आणखी काही नाही.

https://www.youtube.com/watch?v=dcfrmZI5-yw

सिनेमाचा टायटल ट्रॅक सुद्धा एलेनाशीच संबंधित आहे आणि खरोखर सुरेख आहे.

येलेना आणि टोटो ह्यांची टीनएज प्रेमकथा आहे. ती श्रीमंत बँकरची मुलगी तर टोटो गरीब आहे. त्यांच्या प्रेमातील हि विडंबना आल्फ्रेडो त्याला एक राजकन्या आणि एक साधारण सैनिक ह्यांच्या प्रेमकथेद्वारे समजावतो. एक सैनिकाचे प्रेम राजकन्येवर जडते. राजकन्या त्याची परीक्षा घेते. ती त्याला सांगते कि तो सैनिक जर १०० दिवस तिच्या खिडकीच्या बाहेर रात्रभर उभा राहिला तर ती त्याचे प्रेम स्वीकारेल. सैनिक दर रात्री पावसांत आणि थंडीत कुडकुडत तिच्या खिडकीच्या बाहेर उभा राहतो. ९९ दिवस राजकन्या येत नाही, पण १०० व्या रात्री सैनिक येत नाही.

हि गूढ कथा आल्फ्रेडो टोटो ला सांगतो. प्रेक्षक आणि टोटो दोन्ही ह्या कथेचे तात्पर्य शोधतात.

एलेनाचे वडील तिचे प्रेम पसंद नसल्याने तिला बाहेर पाठवतात. टोटो कडे सुद्धा पर्याय असतो कि एक तर गावांत राहायचे नाहीतर बाहेर जायचे. टोटो आपले नाव सैनिक ट्रेनिंग साठी घालतो आणि शिक्षणासाठी बाहेर जातो. तो एलेनाला पत्र पाठवत राहतो पण ती सर्व परत येतात.

जेंव्हा टोटो सैनिक शिक्षण घेऊन गावांत पुन्हा येतो तेंव्हा आल्फ्रेडो अत्यंत आग्रहाने त्याला गांव सोडून जाण्याचा सल्ला देतो. हा गाव तुझ्या स्वप्नासाठी फार छोटा आहे, ती इथे पूर्ण होणार नाहीत. सोडून जा. कधीही गांवात परत येऊ नकोस. जुन्या आठवणी साठी नको. आई बहिणी साठी नको. कायमचा जा. आल्फ्रेडो आणि टोटो अश्रुपूर्ण नेत्रांनी एकमेकांचा विदा घेतात आणि टोटोची आई सुद्धा रडत रडत त्याला जायला सांगते.

टोटो म्हणजे साल्वाडोर रोम मध्ये येऊन प्रख्यात दिग्दर्शक बनतो. त्याला कुठल्याही स्त्री सोबत लग्न करण्याची भीती वाटते. आपल्या गांवात तो कधी जात नाही.

पण आल्फ्रेडो गेला हे ऐकून मात्र तो गांवात परत येतो. त्याची आई आता म्हातारी झालेली असली तरी टोटोने तिची काळजी घेतली आहे, तिने टोटोची रूम अगदी आधी होती तसाच ठेवला आहे. आपली सर्व स्वप्ने पूर्ण झाली तरी वैयक्तिक आयुष्यांत आपल्याला समाधान नाही, एक अपूर्णत्व आहे ह्याची जाणीव त्याला होते. गांवात तो परत येतो आणि आल्फ्रेडोच्या पत्नीशी बोलतो, ती त्याला सांगते कि त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक घटनेचा वेध आल्फ्रेडो अत्यंत गर्वाने घेत होता, त्याच्याबद्दलची प्रत्येक बातमी त्याला हवी होती आणि तू कधी परत आलास तर तुझ्यासाठी म्हणून त्याने एक भेट सुद्धा ठेवली आहे.

ती भेट म्हणजे टोटो ज्या स्टूल वर उभा राहून प्रोजेक्टर चालवायचा ते स्टूल आणि एक बॉक्स ज्यात जुन्या फिल्म्सची रिल्स आहेत. आल्फ्रेडोच्या अंतयात्रेंत त्याला सर्व जुने चेहेरे दिसतात हे आता वयाने वृद्ध झाले आहेत. गांव विशेष प्रगत झाला नाही आणि त्याला जाणीव होते आल्फ्रेडो त्याला जाण्यासाठी इतकी आर्जवे का करत होता.

जुना सिनेमा पॅरॅडीसो थेटर जुने झाले आहे आणि ते पडून त्याच्या जागी पार्किंग लॉट येणार आहे. साल्वाडोर त्या जुन्या थेटर मध्ये जाऊन आपल्या आठवणी जागृत करतो.

आल्फ्रेडोने दिलेली रिल्स घेऊन तो रोम मध्ये येतो आणि आपल्या खाजगी थेटर मध्ये ते पाहायला बसतो. जे जे आक्षेपार्ह सीन्स पाद्रीने कापायला लावले होते त्या त्या सीन्स मधील काही फ्रेम्स काढून त्याची एक सलग फिल्म आल्फ्रेडोने बनवली आहे. ह्यांत चित्रपट इतिहासातील सर्व आयकॉनिक रोमँटिक सीन्स आहेत. एकापाठोपाठ हे सीन्स जातात आणि आपला साल्वाडोर ते पाहून ओक्सबोक्शी रडतो.

त्या सीन्स मधील उत्कटता, नॉस्टॅल्जिया आणि मॉरिकॉने ह्यांचे संगीत ह्यांच्या मिश्रणाने कुठल्याही प्रेक्षकांच्या हृदयाचा छेडल्या जातीलच. ओक्सबोक्शी रडणारा साल्वाडोर काही क्षणासाठी आपणच बनतो.

टीप : राजकन्येची कथा किंवा साल्वाडोर ची कथा हि त्या काळाच्या इटालियन लोकांसाठी महत्वाची होती कारण द्वितीय महायुद्धानंतर इटालियन लोक मोठ्या प्रमाणात देश सोडून न्यूयॉर्क, फिलाडेल्फीया इत्यादी अमेरिकन शहरात कायमचे गेले. त्यासाठी आर्थिक आणि इतर कारणे होती. परत इटलीत जाणे शक्य नव्हते. हा चित्रपट अश्या लोकांना जास्त प्रिय होता.

राजकन्येची कथा काही प्रमाणात picture of dorian gray च्या धर्तीची कथा आहे. सैनिक १०० व्या रात्री का येत नाही ? कारण तो आला आणि राजकन्येने तिचे वाचन पाळले नाही तर त्याचा जो अपेक्षा भंग होईल तो सहन करणे त्याला शक्य नाही. मी आलो असतो तर राजकन्या मला प्राप्त झाली असती हे स्वप्न घेऊन इतर आयुष्य कंठने त्याला त्यापेक्षा जास्त प्रिय होते. प्रतारणा करणाऱ्या राजकन्येपेक्षा त्याच्या स्वप्नातील राजकन्या त्याला जास्त प्रिय होती. गावांत राहून दुःख झेलण्यापेक्षा बाहेर जाऊन गांवातील आठवणी घेऊन आपल्या स्वप्नांच्या मागे जाणे आणि त्या सैनिकाचे १०० व्या रात्री निघून जाणे एक प्रकारे समान होते.